डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वास्तुशांती… ☆ डॉ. शैलजा करोडे

घरात हळूहळू एकेक पाहुणा येत होता. वर्दळ वाढत होती. ” अरे शशांक (माझा मोठा मुलगा) माळी काकांनी फुले नाही पाठवली अजून. त्यांना फोन कर. मी सगळं पूजा साहित्य, होमासाठीच्या समिंधा व इतर साहित्य सगळं व्यवस्थित चेक केलंय. तू ही बघ जरा. आणि अहो तुम्ही ऐकलंत का? जरा गुरूजींना फोन करा. अरे श्रीकांत (माझा धाकटा मुलगा) तू काय करतोस रे. बघ दूधवाल्या काकांना आज पाच लिटर दूध आणायला सांग. नैवेद्यात पूर्णाहूती आहे. खीरसाठी दूध लागेल. पाहुणे मंडळींसाठी चहा. बरीच पाहुणे मंडळी येत आहेत. त्यात लहान मुलांसाठीही दूध लागेल. अगं मोना (माझी नात) तुझी रांगोळी झाली काय काढून, मी अंगणात डोकावत बोलले. मोनाने सुंदर घरकुल रेखाटले होते. विविध फुलांच्या माळांनी ते सजविले होते. पुढे छोटेसे अंगण, त्यात विविध फुलझाडे, दरवाज्यावर स्वस्तिक व सुंदर कलश, अगदी हुबेहूब घरकुल तिने रांगोळीत साकारलं होतं. ” काय ग आजी, काय म्हणतेस. बघ झाली माझी रांगोळी. कशी वाटते. ” क्षणभर मी पाहातच राहिले होते कि मोनाच्या बोलण्याने मी भानावर आले. ” अरे व्वा. काय अप्रतिम रांगोळी रेखाटलीस ग. बाळ रांगोळीतच तू इतकं सुंदर घरकुल रेखाटलंस तर आयुष्यात किती चांगलं घर सजवशील. ज्याच्या घरी जाशील त्याचं कल्याणच होईल. गुणाची ग माझी बाळी ” म्हणत तिच्या बलाया घेत माझ्या कानाजवळ कडाकड बोटं मोडून मी दृष्ट काढली.

चार दिवस झाले माझी (सारिका) अशी धावपळ सुरू होती. आणि का करू नये? माझ्या शशांकनं आज स्वतःचं घरकुल उभारलं होतं आपल्या मेहनतीवर व कष्टावर. मुलांना आम्ही काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवू शकलो नाही कि त्यांच्यासाठी फारसा खर्चही करू शकत नव्हतो. अंगावर कापड आणि पोटभर अन्न यापलिकडे आम्ही काही करूही शकत नव्हतो. मी ओद्योगिक वसाहतीत जाऊन मिळेल ते काम करत होते कधी मेंदीचे पॅकेट तयार करणे तर कधी बाटल्यांचे बूच तयार करणे, आणि आमचे अहो अगरबत्ती आणून विविध सुंगंधाची फवारणी करुन त्यांची पाकीट तयार करुन मार्केटमध्ये विविध दुकानात पुरवायचे. अशा आमच्या तुटपुंज्या कमाईत आम्ही मुलांचे कोणते श्रीमंती चोचले पुरवणार होतो. किंवा मुलांचे साधे हट्टही आम्ही पुरवू शकत नव्हतो. पण माझी मुले ही समजदार. उलट ते ही आम्हांला कामात मदत करायचे. स्वतःचे शिक्षणही कमवा व शिका स्वरूपाचेच त्यांनी केले. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मिळेल ते काम करुन ते आपला शैक्षणिक खर्च व गरजा भागवत होते.

” या या वन्स, केव्हाची वाट पाहात होते. प्रवास ठीक झाला ना ” इतक्यात निलाक्षीने पाण्याचे ग्लास आणले. आत्या तुम्ही फ्रेश व्हा. मी गीझर चालू करते. ” ” अग होईल ग बेटा. तू आधी तयार हो. गुरूजी येतीलच इतक्यात. आमचा शशांक कोठे आहे. होय आत्या आलो आलो म्हणत शशांकने मीना वन्सचे चरणस्पर्श केले. ” ” आयुष्यमान भव. घराकडे चौफेर नजर फिरवत मीना वन्स म्हणाल्या, खूपच सुंदर, मस्त, छान प्रगती केलीस ” ” रात्रंदिवस मेहनत करतो तुमचा भाचा वन्स. आणि मित्र परिवारही खूप आहे त्याचा. समाजात मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं असतं त्याचं. ” ” अग सारिका, तुझे संस्कारही आहेत ग त्यात, तूच त्यांच्या मनात जिद्द, काही करुन दाखविण्याचं बळ निर्माण केलंस.

हाॅलमध्ये पूजा, होमहवन सुरू होते. मी आणि माझी बहीण आम्ही किचन व पाहुण्यांच्या आगत स्वागतात व्यस्त होतो. आणि माझी विचार शृंखलाही त्याच वेगानं धावत होती. शशांकने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व नोकरीचा शोध सुरू केला. IDFC बँकेत त्याला Investment Agent म्हणून काम मिळालं अर्थात मुलाखत व सर्व सोपस्कर होऊन. तीन चार वर्ष त्याने काम केले पण मेहनतीच्या मानाने त्याला मिळणारा मोबदला कमी होता. एवढे काम मी स्वतःच केले तर? मीच स्वतःची एजन्सी सुरू केली तर. थोडे पैसे जमा झालेत माझे. करावं का मी हे धाडस? मी धाडस करावे आणि यश नाही आले तर? आहे तो पैसाही जायचा.

“काय झाले शशांक? आजकाल खूप बैचेन दिसतोस? मी व अहों नी त्याला बोलतं केलं. ” अरे मग नुसता विचार नको करूस पुढे पाऊल टाक. आम्ही आहोत सोबत. आणि शशांकने ” सप्तशृंग फायनान्सशियल असेट् स अँन्ड फोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा शुभारंभ केला. सुरूवातीला प्रतिसाद कमी होता पण हळूहळू वाढत गेला. दरम्यान शशांकसाठी सांगून मुली येऊ लागल्या व एका शुभमुहूर्तावर निलाक्षीसोबत शुभमंगल पार पडलं. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. माझीच दृष्ट ना लागो या माझ्या संसाराला अशी माझी स्थिती झालेली. धाकट्या श्रीकांतनेही ट्रव्हल एजन्सीमध्ये जम बसवला होता. माझ्या घरात आता चिमणी पावलेही उमटण्याची चिन्हे दिसू लागली. मोनाचा जन्म म्हणजे घरात आनंद पर्वणी ठरला, पाठोपाठ आला जयेश.

या दरम्यान श्रीकांतचंही शुभमंगल पार पडलं. माझं घर तसं लहान. पण करत होतो अंडजेस्ट. आणि एक दिवस श्रीकांतने फ्लॅट बुक केल्याची बातमी दिली. ” म्हणजे तू वेगळा होणार श्रीकांत” ” नाही आई, आम्ही इथेच राहू. रात्री झोपण्यापुरतं तिथे जाऊ ” हा परिपाठ वर्षभर चालला. श्रीकांतला घरी परतायला कधी रात्रीचे दहा अकराही वाजायचे, जेवण करून मग फ्लॅटवर जायचे. रियाची कुचंबणा होऊ लागली आणि त्यात तिची प्रेग्नन्सी. म्हणून एक दिवस आम्हीच उभयतांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटवर शिफ्ट होण्याची परवानगी दिली..

” चला पूजा संपन्न झाली. आता गृहप्रवेश विधी व त्यानंतर आरती संपन्न होईल. कुटुंबातील सगळ्यांनी बाहेर अंगणात थांबा, गृहप्रवेश विधी संपन्न करायचाय, श्रीकांत व निलाक्षी आता उजवा पायाने घरात प्रवेश करा, मग एकापाठोपाठ सगळ्यांनी यासचंय.

आरती, नैवैद्य, ब्राम्हणभोजन यथासांग पार पडले. सायंकाळी शशांकने मोठे रिसेप्शन ठेवले होते. लोक येत होते, शुभेच्छा देत होते. फुलांचे बुके व भेटवस्तू जमा होत होत्या आणि मी जीवनाचे सार्थक झाले म्हणून समाधानी होते.

नवीन घरात पाहुण्यांची गर्दी म्हणून आम्ही दोघे आमच्या जुन्या घरी झोपायला आलो. सकाळी मी पुन्हा शशांकडे हजर झाले, निलाक्षीवर कामाचा ताण पडू नये म्हणून मी चार दिवस कंपनीतून रजा घेतलेली.

शशांक व निलाक्षी ने दोन चार दिवस जुन्या घरी ये जा केली. आणि हळूहळू ते येणे कमी केले. ” शशांक आम्हीही तिकडे येतो आता. हे घर भाड्याने देऊ. “आई बाबा, तुम्ही तिकडे येऊ नका म्हणत नाही मी. पण आईचं कामाचं ठिकाण तेथून लांब पडेल. शिवाय या घरातील सामान तिकडे नाही मावणार एवढा. ” अरे शशांक मुलांना शाळेत ने आण कशी करणार, मी येतो तिकडे ” ” बाबा ती काळजी नका करू हो. मुलांना स्कूलबस लावेन मी. आयुष्यभर तुम्ही कष्ट केले, आता करा आराम. आणि आम्ही काही कुठे गेले आहोत काय? गावातच आहोत. सणवार आपण एकत्रच माझ्या घरी साजरे करू. आणि काही लागलंच तर मला फोन करा. लगेच हजर होईन मी.”

माझ्या मुलाने घरकुल उभारलं, मला वाटलं, आता माझे कष्ट संपले. सुखसोईंनीयुक्त या घरात आता आरामात जीवन जगायचं. पण त्या घरकुलात आम्हा उभयतांना जागा नव्हती. आज वास्तुशांती झाली होती. पण त्या वास्तुत आम्हांला जागा नव्हती. खरंच माझी मुलं खूपच मोठी झाली होती.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments