जस्मिन शेख
जीवनरंग
☆ ५ अनुवादित लघुकथा : हप्ता / एक दिवस बालदिवस / निर्लज्जपणा / आई.. एक गरज / सून बनली सुकन्या – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆
☆
☆ १. हप्ता ☆
सुंदर आणि सुशिक्षित सपनाचे फक्त एकच स्वप्न होते की मुंबईमध्ये तिचे एक फ्लॅट असावे. आई-बाबांचे आयुष्य तर चाळीच्या कोठरीतच गेले. कसंतरी आपले शिक्षण पूर्ण करून तिने आपले स्वप्न साकार करण्यासाठी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी मिळवली. परंतु महागाईच्या लाटेने तिच्या स्वप्नावर पाणी फेरले. पगारातून बचत करणे शक्य नव्हते. फ्लॅट विकत घेणे आता केवळ एक स्वप्न बनून राहिले. सपनाची शेवटची आस होती ती म्हणजे तिचा भावी पती! तिला असा जोडीदार हवा होता की जो कमीत कमी एका फ्लॅटचा मालक असावा. परंतु तिथेही नशीब आडवे आले. आई-बाबांच्या पसंतीला तिला होकार द्यावा लागला. नवरा पण असा भेटला की जो फ्लॅट न खरेदी करू शकल्याच्या दुःखात दारूच्या व्यसनात बुडाला होता. इतरांचे अलॉटमेंट लेटर देताना सपना आतून आणखीन कुढत होती. नवऱ्याचा आधार पण न मिळाल्याने ती भरकटली.
काही दिवसातच सपनाची बढती झाली. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाची ती आता पी. ए. बनली. तिच्या नावावर एक फ्लॅट अलॉट झाला. आई-बाबांना मुलीची प्रगती बघून अभिमान वाटू लागला. दारुडा नवरा आता महागडी दारू पिऊ लागला आणि सपना प्रत्येक महिन्याला मालकाच्या मिठीत हप्ते चुकवू लागली.
मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जास्मिन शेख
☆ २. एक दिवस बाल दिवस ☆
बंगल्याच्या बाहेर पडताच मंत्रीसाहेबांनी गार्डला विचारलं, “आज मैदानात एवढी शांतता का पसरली आहे? “
” साहेब, तुम्हीच म्हणाला होता की मुलांना तंबी दे की इथे क्रिकेट खेळायचे नाही. बंगल्याची काच चकणाचुर होऊ शकते. “
” हो, ते ठीक आहे, पण आज ‘बाल दिवस’ आहे. मीडियाची माणसं येणार आहेत. मी मांडव घालण्याची पण ऑर्डर दिली आहे. आज मुलांच्या पूर्ण टोळीला एकत्र कर. “
राजनीतीपासून कोसो हात लांब असलेली सारी चिमुरडी आनंदाने हजर झाली. वाटलं क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. दिवसभर क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. संध्याकाळी रंगारंग कार्यक्रम पण झाला. मुलांना सन्मानित करण्यात आले. मंत्री साहेबांनी मुलांना क्रिकेट बॅट आणि बॉल भेट दिली. मंच वरून खाली उतरताना मंत्री साहेबांनी गार्डच्या कानात काहीतरी पुटपुटले.
समारोह संपन्न होताच गार्डने मुलांना कडक शब्दात चेतावणी दिली, “पुन्हा इथं दिसता कामा नये! ”
मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जास्मिन शेख
☆ ३. निर्लज्जपणा ☆
अचानक धुवांधार पाऊस पडू लागला. लोक पावसापासून बचावासाठी एका चहाच्या टपरीत घुसले. जागा खूपच कमी होती. तरी पावसापासून वाचण्याचा असफल प्रयत्न करत होते.
थोड्या वेळानंतर एक तरुणी तिथे येऊन उभी राहिली. चिंब भिजल्याने तिचे कपडे शरीराला चिटकले होते. छातीवर ओढणी पण नव्हती. सगळ्यांच्या नजरा तिच्या चिंब शरीरावर रेंगाळू लागल्या. तरुणीला खूपच अवघडल्यासारखे वाटू लागले. आपल्या दोन्ही हातांचा दुपट्टा बनवून ती वृक्षस्थळांना झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली. तेव्हा वाऱ्याच्या झुळकेने उघडा पडलेला कमरेचा नग्न भाग कामुक नजरांचा शिकार बनला. पाऊस इतका जोरात पडू लागला की ती तरुणी इच्छा असून ही जाऊ शकली नाही.
एक मध्यम वयाची स्त्री सगळ्यांच्या नजरांना ओळखून होती. लोकांच्या कामूक मानसिकतेचा रागपण येत होता. तरुणी सभ्य लोकांत उभी होती वेश्यावस्तीत नव्हे!
परिस्थिती जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेली तेव्हा ती तरुणीच्या समोर भिंत बनून उभी राहिली आणि प्रत्येकाकडे डोळे रोखून पाहू लागली. पराभूत नजरा लाजेने खाली झुकल्या.
मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जास्मिन शेख
☆ ४. आई… एक गरज ☆
— दादा, एक वर्ष झालं आई तुझ्या जवळ राहिली. आता माझ्या कडे पाठव.
— ठीक आहे. शिखा कशी आहे?
— बस वेळ झाली आहे आता. लवकरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल.
— तुला शिखाच्या देखभालीसाठी आणि होणाऱ्या बाळाच्या पालनपोषण करण्यासाठीच आई हवी आहे.
— तू पण तेच केलस ना! पाच वर्षे आई एकटी गावाकडे राहिली, तेव्हा साधी विचारपूस सुद्धा केली नाहीस. मी पण मोठ्या बंधूच्या पदचिन्हाचे अनुकरण करत आहे.
— ठीक आहे. पाठवून देतो. बेबी आता जवळपास एक वर्षाची होईल. तुझी वहिनी सुद्धा आता चिडचिड करत आहे.
वातावरणात दोन्ही भावांचे आवाज घुमू लागले.
मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जास्मिन शेख
9881584475
☆ ५. सून बनली सुकन्या ☆
लक्ष्मी आपल्या सासरी खूप आनंदात होती. पतीचे प्रेम तर तिला भरपूर मिळत होतेच, सासू-सासर्यांनी देखील मुलीसारखी माया लावली होती. दोघे नवरा बायको कामासाठी बाहेर पडले तर सासू घरातील सर्व काम सांभाळात होती. जेव्हा लक्ष्मी ऑफिस मधून घरी परत येईल तेव्हा घरातील राहिलेले कामे पूर्ण करून घेई. रात्री सगळे एकत्र जेवायला बसत. मनीष पण आपल्या बायकोला कामात मदत करत असे. जीवन खूपच आनंदात जात होते.
अचानक एक दु:खद घटना घडली. मनीष ऑफिसमधून परत येत होता त्यावेळी वेगाने येणा-या ट्रकने स्कूटरला मागून जोरात धडक दिली. अपघात एवढा भयानक होता की मनीषचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आई-बाबांना मोठा धक्का बसला. आणि लक्ष्मीचे तर हाल पाहावेना. मनीषचे वडील एका पुतळ्यासारखे निर्जीव बनले होते. नंतर सगळे एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करू लागले.
हळूहळू स्थिती सामान्य होऊ लागली. एके दिवशी लक्ष्मीचे आई-वडील भेटायला आले. लक्ष्मीच्या आईने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला… आता मनीष तर नाही राहिला, पण तिच्या समोर तर पूर्ण आयुष्य आहे. लक्ष्मीला आम्ही सोबत घेऊन जातो आणि पुढे मागे दुसरे लग्न करून देतो.
त्यांची मागणी ऐकून दोघेही शांत बसले. नंतर लक्ष्मीच्या सासर्यांनी मान हलवूनच आपली सहमती दर्शविली. परंतु लक्ष्मी शांत बसली नाही. ती निडरपणे म्हणाली, ” आई, मी आता परत येणार नाही. आता हेच माझे घर आहे. मनीष नंतर यांची देखभाल कोण करेल? तुमच्याजवळ कमीत कमी तुमचा मुलगा तरी आहे. माझ्या भविष्याबाबत म्हणाल तर यांचे विचार सुद्धा तुमच्या विचारांशी मिळते- जुळतेच आहेत. योग्य वेळ बघून मी स्वतः माझा निर्णय घेईन. ”
मुलीचं बोलणं ऐकून आई-वडील शांत राहिले आणि सासू-सासर्यांना आपल्या सुनेचा अभिमान वाटला. त्यांना भास झाला की, मनीषच पुन्हा जिवंत होऊन पुढे उभा राहिला आहे.
मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जास्मिन शेख
☆
मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद
मराठी अनुवाद: जस्मिन शेख
मिरज जि. सांगली मो 9881584475
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





