डॉ मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ गोष्ट एका मुंगूसाची ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
राजेश, त्याची बायको रजनी व त्यांची २ वर्षांची छकुली स्वीटी यांचं छोट्टं कुटुंब यमुना सोसायटीत खूप आनंदात होते. राजेशची एका बॅंकेत नोकरी होती आणि रजनीने स्वीटीच्या जन्मापासून नोकरी सोडली होती. सोसायटीचा वॉचमन नकुल सिंग याचा स्वीटीवर खूप जीव. “इसे देखता हूँ ना तो गांवमे मेरी बिटीया है ना, उसकी याद आती है! “, त्याचं नेहेमीचे पालुपद असायचे.
एकदा राजेश नेहमीप्रमाणे कामावर गेलेला. दुपारी ४ – ४:३० ची वेळ होती. सोसायटीच्या बागेत सावलीत स्वीटी व ७-८ वर्षाची सोहम, पिंकी, राजू खेळत बसली होती. सोहमची आई दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत कपडे वाळत टाकत होती. रजनीला पटकन कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन यायचे होते. रजनीने सोहमच्या आईला खूणेनेच आपण ५ मिनीटात येतोय असे सांगितले. मुलांनाही सांगितले – “स्वीटीवर लक्ष ठेवा रे, तिला एकटीला नका सोडू. मी आलेच पाच मिनीटात. ” गेटशी नकुल सिंग अर्धवट डोळे मिटून डुलक्या काढत होता.
रजनी परतली, पाहते तर बागेत मुलं नव्हतीच. एकटी स्वीटीच तिथे आणि नकुल सिंग तिच्या जवळ बसून, तिचा स्कर्ट वर करून… रजनीच्या जीवाने ठाव सोडला. जोरात ओरडतच ती नकुलच्या अंगावर धावून गेली आणि लाथा-बुक्क्याने त्याला मारू लागली.
इमारतीशी उभी राहिलेली मुलं काहीतरी ओरडून तिला सांगत होती, नकुल हात जोडून तिला काही सांगत होता, पण ती बेभान – बेफाम झालेली.
सोहमची आई धावतच येत होती. ” अग रजनी, हात आवर, हात आवर. ही मुलं खेळत होती तर तिकडून हा एवढा मोठा नाग आला. मुलं घाबरून पळाली, स्वीटी मात्र काही न कळल्याने तिथेच तशीच फतकल मारून बसलेली. मुलांच्या आरडाओरड्याने नकुलचे लक्ष गेले; नाग स्वीटीच्या पायात घुटमळत होता. नकुलने जीवाची पर्वा न करता खाली वाकून त्याला हाताने उचलले आणि दूर भिरकावून दिले. तो तिला कुठे डसला नाही ना नकुल पहात होता. “
रजनीच्या जीवाचे पाणी पाणी झाले, मारहाण करणारे हात जोडले गेले आणि ती नकुलकडे क्षमायाचना करू लागली, तिच्या छकुलीचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पाया पडू लागली.
— —
पंचतंत्रातील मुंगूसाची गोष्ट –
एक शेतकरी एका मुंगूसाला वाचवतो आणि घरी आणतो. एकदा तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही घराबाहेर गेले असतात, घरी त्यांचे बाळ व मुंगूस असे दोघेच असतात. बायको घरी येऊन बघते तर दारात मुंगूस उभं असतं – त्याचं तोंड आणि शरीर रक्तानं माखलं असतं. या मुंगूसाने नक्की आपल्या बाळाचा घात केला असे वाटून ती माऊली तिथल्या तिथे त्या मुंगूसाला मारून टाकते. घरात जाऊन पहाते तर बाळ मजेत खेळत असतं आणि त्याच्याजवळ एक विषारी नाग मरून पडलेला असतो – बाळाला इजा करण्याच्या आधीच मुंगूसाने त्याला मारलेले असते.
— —
संस्कृतमध्ये मुंगूसाला नकुल म्हणतात, माहित होतं का हो तुम्हाला?
© डॉ मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






