श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ सहवास… – भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

मी सुमनमावशीच्या प्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडीक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते. तिच्या गुढग्याचे ऑपरेशन करावे लागणार होते. मावशीच्या घरी मावशी एकटी. तिचे यजमान चार वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्याना मुलबाळ नव्हते. मावशीचे यजमान मोठया कंपनीत नोकरीला होते, मावशी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती. मुंबईतील ही अख्खी बिल्डिंग त्त्यांची होती. भरपूर भाडे येत होते. खुप संपत्ती होती पण पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येई. प्रत्येक रुपया रुपया साठी ती वाद घालायची. आता ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासंबधी बोलायला मी आलो होतो.

मावशी -तू विचारलंस का हॉस्पिटलमध्ये खर्चाच.. आधी पासून कोटेशन घे नाहीतर मुंबईतील हे डॉक्टर्स लुबाडतात पेशन्टना.

मी -होय, मी सगळी चौकशी करून आलोय. एकाच गुढग्याच ऑपरेशन करायचंय तर चार लाखपर्यत खर्च येईल.

मावशी -बापरे, चार लाख.. एवढे?

मी – त्या हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा असते… ऑपरेशननंतर फिजिओची गरज लागते किमान चार महिने. त्या हॉस्पिटलचा फिजिओ घरी येऊन उपचार करतो, शिवाय नर्सिंगवगैरे टॉप असत त्या हॉस्पिटलमध्ये म्हणून…

मावशी -त्यापेक्षा साधे हॉस्पिटल बघ.. मालिश काय कोणी पण बाई करेल.

मी -मावशी, काय करणार आहेस त्या पैशांचं.. बँकेत ठेऊन काय उपयोग.. स्वतः साठी उपचार तर करून घे.

मावशीं -असे काही खुप पैसे नाही आहेत आमच्याकडे.. सर्वाना वाटतं हिच्याकडे खुप पैसा पडलाय.. पण यांच्या आजारपणात किती खर्च झाले?

मी -मला सर्व माहित आहे, मी काकांचा मेडिक्लेम काढला होता, त्यामुळे त्यान्च्या आजारपणात किती खर्च झाला आणि किती कंपनीकडून मिळाला हे माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहित नसणार.

मावशी -बरं बरं.. काय ते हॉस्पिटलच ठरव आणि या ऑपरेशननंतर मी पाच सहा महिने घरात काही करू शकणार नसेन तर बाई बघायला हवी… आंघोळ बाथरूममध्ये न्यायला.. जेवण करायला.. बाजारहाट करायला.

मी -मुंबईमध्ये अशा बायकासाठी एजन्सी आहे, मी त्याची चौकशी करतो आणि ऑर्डर कळवतो.

मावशी -छे छे, तसल्या भैय्याबायका नको माझ्या घरात. त्या एजन्सी यूपीबिहार नाहीतर मद्रासी बायका पाठवतात, त्या नको.

मी -मग कसली बाई हवी.. आता कामवाली बाई मिळणे खुप कठीण झाले आहे.

मावशीं -तू आपल्या गावाकडची बाई बघ. त्याना माहित असते आपल्या चालीरीती.. जेवणाची पद्धत.

मी -अग आपल्या गावामध्ये शिक्षण पोहोचलाय, सर्वांनी शिक्षण घेतलं, सरकारी योजना पण गावात गेल्यात, आता बहुतेक लोकांची परिस्थिती सुधारली, आता आपल्याकढची बाई मिळणे कठीण..

मावशी -तू शोध.. एवढे मावशीसाठी कर.. जोपर्यत बाई मिळतं नाही तोपर्यत मी ऑपरेशन करून घेणार नाही.

आता आली पंचाईत, मावशीचे ऑपरेशन करून घेणे आवश्यकच होते, आताच तिला खाली बसता येत नव्हते, जिने चढता उतरता येत नव्हते आणि गुढगे दुखतं होते.

काहीतरी करायला हवे होते, काय करावे असा विचार करुंन मी माझ्या पुतण्याला फोन केला.

माझ्या पुतण्याला सांगितले सहा सात महिन्याकरिता कोणी गरजू आणि विश्वासू बाई बघ, आपल्या मावशीच्या घरात.. मावशी कशी आहे, हे तुला माहित आहे.. म्हणून..

पुतण्याने तिसऱ्या दिवशी उषा नावाच्या बाईची माहिती दिली. उषा ही आमच्या गावातील कुंभारवाडीतील, ती लग्न करून दुसऱ्या गावात गेली, तिला एक मुलगी झाली पण तिचा नवरा करोनामध्ये गेला आणि सासरी दीर जाऊ तिला थारा देईनात, म्हणून ती मुलीला घेऊन माहेरी आली. तिची मुलगी आता आठवीत शिकते आहे.

 माझ्या पुतण्याने तिची शिफारस केली, चांगल्या वर्तनाची बाई आहे आणि मनमिळाऊ आहे, तिची मुलगी पण चुणचुणीत आहे, अर्थात तिची मुलगी मामाकडेच राहील कारण तिची शाळा आहे.

मी मावशीला कल्पना दिली आणि पुतण्याला उषाला मुंबईत आणायला सांगितले.

दोन दिवसांनी माझा पुतण्या उषाला घेऊन माझ्याकडे आला. माझ्याकडे ती दोन दिवस राहिली, यावेळी माझ्या पत्नीने तिला सुमनमावशीच्या स्वभावाची कल्पना दिली.

शनिवारी मी उषाला मावशीकडे घेऊन गेलो. मावशी कोचवर बसुन पाय दाबत होती, उषाला माझ्यासोबत पहिल्यानंतर ती मला सांगायला लागली 

“अरुण, हिला सांग माझ्या खोलीत कुणी आलेलं मला आवडत नाही फक्त लादी पुसण्यासाठी यायचं, माझ्या कपाटाला किंवा रूममधील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही.. माझ्या रूमला जोडून संडासबाथरूम आहे, तो वापरायचा नाही, इतरांना वेगळी सोय घरात आहे, रोज मला विचारून जेवण नाश्ता बनवायचा, उगाच वस्तू खुप आहेत म्हणून जास्ती बनवायच्या नाहीत, तेल थोडं वापरायचं. भांड्याची पावडर, कपड्याची पावडर कमी घालायची, कपडे भांडी स्वच्छ व्हायला हवीत. वाणसामान, भाजी आणल्यानंतर मला हिशेब द्यायचा ‘.

 मी मावशीला म्हणालो “अग, तिला मी आणि समिधाने कल्पना दिलेली आहेच आणि तुझे ऑपरेशन झाले की समिधा दोन दिवस येथे राहील म्हणजे तिला सर्व समजेल, तू काळ्जी करू नकोस, आता हॉस्पिटलची तारीख ठरवू. ‘

शेवटी मी ऑपरेशन तारीख ठरवली आणि मावशीला ऍडमिट केले.

दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाले, ऑपरेशनबद्दल डॉक्टर समाधानी होते, मी आणि समिधा होतोच आमच्यासोबत उषा होतीच.

 रात्री उषाने बनवलेले जेवण घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मावशी व्यवस्थित जेवली म्हणजे तिला जेवण आवडले असणार नाहीतर तिने जेवणाला नाव ठेवले असते.

 दोन दिवसांनी मावशी घरी आली, आता तिला वेदना सुरु झाल्या. हॉस्पिटलचा फिजिओ येऊन ट्रीटमेंट देत होताच पण उषा गरम पाण्याने शेकत होती, जेवण, पाणी औषधे हातात आणुन देत होती.

मावशी उषाच्या तक्रारी करत नव्हती याचा अर्थ उषा तिला तक्रार करायला जागा ठेवत नव्हती. उषाने बनवलेले जेवण मी आणि समिधा जेवलो होतो, तिचे जेवण आमच्या पद्धतीप्रमाणे होते.

रविवारी संध्याकाळी मी आणि समिधा मावशीकडे गेलो, तेंव्हा उषा मावशीच्या हाताला धरून थोडं थोडं चालवत होती आणि मावशी हळूहळू पाय टाकत होती.

 एप्रिल महिना लागला. मी मावशीकडे गेलो असताना उषा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली 

“भाऊंनू, माज्या चेडवाक आता सुटी पडतली, दोन महिने शाळा नाय.. माका वाटा होता चेडवाक हय आणूचा, दोन महिने रवात माज्याबरोबर, तुमी मावशेक विचारा “

 मी मावशीला “उषाच्या मुलीला दोन महिने रजा आहे, तेंव्हा ती तिच्याबरोबर रहाण्यासाठी इथे येते आहे, मग त्या दोघी जूनमध्ये एकदमच गावी जातील कारण तोपर्यत उषाला पण सहा महिने होतं आहेत, असे सांगितले. उषाची मुलगी इथे येते आहे हे ऐकून मावशीच्या डोक्याला आठ्या पडल्या. तिने उषाला बोलावले आणि सांगू लागली.

“अरुण म्हणतो आहे, तुझी मुलगी रजेत इथे येते आहे पण मला शांतता लागते, गडबड गोंधळ चालत नाही, मुलांनी सतत मोबाईल पहाणे, अचकट विचकट गाणी म्हणणे मला आवडत नाही हे लक्षात ठेव. माझ्या खोलीत कुणी आलेले मला आवडणार नाही, बाकी तुला माहित आहेच.. घरात जे बनेल तेच तिने खायचे.. तिच्यासाठी वेगळे काही बनणार नाही ‘.

उषा माझ्याकडे पहात होती, मी तिला मान हलवायला सांगितली, तशी तिने मान हलवत “होय.. होय म्हंटले आणि एका शेजारच्या माणसांसोबत उषाची मुलगी नंदा मावशीकडे आली.

नंदा आठवीत होती म्हणजे बारातेरा वर्षाची. मी तिला पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले ती चुणचुणीत मुलगी आहे, काळीसावळी असली तरी बोलघेवडी आहे.. सतत हसत राहायची. आता हिचे घरात रहाणे मावशीला किती रुचते हे पाहायचे, कारण ती दोन महिने रहाण्याच्या दृष्टीने आली होती.

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted