डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तप्तपदी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
तप्तपदी – –
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळं मुरुडं विनायकमहं, चिंतामणिं थेवरम् ॥
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं, विघ्नेश्वरं ओझरम् ।
ग्रामोरांजण संस्थितो गणपती, कुर्यात् सदा मंगलम् ॥
॥ शुभमंगल सावधान ॥
भटजींचे मंगलाष्टक सुरु होते. वधू—वरामध्ये अंतरपाट होता. लग्न मंडप वर्हाडींनी भरलेला. प्रत्येकाच्या हाती अक्षता. आता थोड्याच वेळात मंगलाष्टके संपून वाजंत्री वाजणार होती. जयमाला एकमेकांच्या गळ्यात घालून दोन जीव मंगल, पवित्र बंधनात बांधले जाणार होते, ही रेशीमगाठी आयुष्यभरासाठी राहाणार होती.
वाजंत्री वाजली, मी जयमाला घातली व एक दीर्घ श्वास घेतला. मे महिन्यातील कडक ऊन, त्यात शालूचा भार, दागिन्यांचा भार, माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा झालेले. मी मावशीला इशारा केला. तिने अलगद घर्मबिंदू टिपले. थंड पाणी अंगठा, तर्जनी व माध्यमाच्या साहाय्याने अलगद फवार्यासारखे माझ्या चेहर्यावर उडविले जेणे करून मला थोडे प्रफुल्लीत वाटले व माझा मेकअपही खराब नाही झाला.
स्टेजवर आम्हां उभयतांना शुभेच्छा देणार्यांची गर्दी उसळली. आई, मावशी, मामा व माझे इतर नातेवाईक येणार्यांच्या स्वागतात गुंतलेले.
“कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ” मामांनी तर लाऊड स्पीकरमधूनच अनाऊंसमेंट केली.
चला पुढील विधीसाठी वधूवरांना आणा ” इति गुरुजी. होमपात्रात अग्नि प्रज्वलित केला होता. पाटावर तांदूळाच्या सात राशि एका ओळीत ठेवलेल्या. ” अग्निभोवती एक एक वर्तुळ पूर्ण झाले कि या पाटावरील एक एक राशि पायाच्या अंगठ्याने बाजूला करायची ” गुरुजी मला सांगत होते.
मी (निलांबरी) व अर्णव विवाह बंधनात बांधले जात होतो. अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदीचे सात फेरे सुरू झाले. प्रत्येक पावलासोबत माझ्या मनात एकच विचार चक्रावत होता—’लग्न म्हणजे फक्त सात पावले एकत्र चालणे की दोन वेगवेगळ्या विचारांना एकत्र बांधणे? ‘
१) इष एकपदी भव सा मामनुव्रता भव।
(अन्न व आरोग्य)
घरात अन्नाची कमतरता भासू नये व दोघांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
वधूने पायाने तांदूळाची एक राशि बाजूला सारावी
२) ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव।
(ऊर्जा व शक्ती) शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासाठी, तसेच संकटांचा सामना करण्यासाठी एकमेकांना ताकद देणे.
मी तांदूळाची दुसरी राशि बाजूला सारली
३) रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव।
(संपत्ती आणि समृद्धी)
प्रामाणिक मार्गाने संपत्ती कमावणे आणि संसाराचा आर्थिक भार समजूतदारपणे सांभाळणे
४) मयोभवाय चतुष्पदी भव सा मामनुव्रता भव।
(सुख आणि समाधान)
संसारात प्रेम, आनंद, परस्पर आदर आणि समाधान टिकवून ठेवणे.
आता पुढील तीन फेर्यांसाठी वधू पुढे राहील व वराने तिच्या मागून चालावे
५) प्रजाभ्यः पंचपदी भव सा मामनुव्रता भव।
(कुटुंब आणि संतती)
उत्तम संतती, त्यांचे संगोपन आणि परिवाराचे कल्याण करण्यासाठी एकत्र प्रार्थना करणे.
६) ऋतुभ्यः षड्पदी भव सा मामनुव्रता भव।
(ऋतू आणि जीवनभर साथ)
जीवनाच्या सर्व ऋतूंमध्ये, सुख-दुःखात आणि प्रत्येक प्रवासात एकमेकांची साथ न सोडणे.
७) सखे सप्तपदी भव सा मामनुव्रता भव।
(मित्रता आणि विश्वास)
आयुष्यभर एकमेकांचे सच्चे मित्र, विश्वासू आणि समर्पित जोडीदार राहणे.
सप्तपदी संपली व आम्ही उभयता थोरांचे आशीर्वाद घेऊ लागलो. “नांदा सौख्य भरे ” ” पुत्रवती भव” ” दोघे गुणाने संसार करा “ आशीर्वाद मिळत होते. सप्तपदी चालू असतांना माझे चुलत आजोबा नवपिढीला, तरूणाईला समजावत होते. या सप्तपदीला फार महत्व, त्याशिवाय लग्न झाले मानले जात नाही. नुसती जयमाला घालून उपयोग नसतो.
आम्हांला वधूवराला जेवायला बसविले. एकमेकांना गोडाचा घास भरवतांना अर्णवने थोडी मस्तीही केली.
प्रत्येक मुलीला नकोसा वाटणारा विदाईचा क्षणही आला. सगळेच भावनाशील झालेले, ज्या घरात मी जन्मले, लहानाची शहाणी झाले, आई बाबांच्या छत्रछायेत वाढले, भावंडांशी खेळले, प्रसंगी भांडले, मायेच्या ओलाव्यातही बांधले गेले ते घर मला परकं होणार होतं. माहेर झालं होतं, पाहुणी म्हणूनच मी येथे येणार होते. जणू एक रोपटं उचलून दुसर्या जागी लावलं होतं. खूप कठीण क्षण होता माझ्यासाठी.
सासरी आले. काही धार्मिक विधी, सत्यनारायण पूजन, स्वागत समारंभ, नंतर कुलदेवतांचे दर्शन आटोपले. आणि घरात वादाला सुरुवात झाली. माझी जेठाणी म्हणे आमची जवाबदारी संपली आणि तिने काढता पाय घेतला.
असू देत, काही बिघडत नाही. सांभाळू आपण सगळं म्हणत मी कंबर कसली. घर, आँफिस, आजारी सासूची सेवा, सणवार, व्रतवैकल्य सगळं सुरळीत पार पाडत होती. मधूनच माझे दोन्ही
जेठ, तिन्ही नणंदा भावाकडे आर्थिक अडचणी दाखवत पैसे मागायचे. ” आता माझंही लग्न झालंय? मलाही घर संसार आहे? अर्णवने असे म्हणताच, ” आम्ही कोणी नाही का तुझे, तुला एवढा शिकवला, डाॅक्टर केला, त्यात आमचे कष्ट नव्हते काही. ” नणंदेच्या मुलीचं लग्न, दे पैसे, भावाच्या मुलीचं बाळंतपण, दे पैसे, भावाच्या मुलाची अॅडमिशन” दे पैसे, असे वारंवार घडत राहिले व अर्णव पैसे देतच राहिला. ” अर्णव, थांबव हे, काही लिमिट आहे कि नाही ” ” देऊ दे निलांबरी, माझी माणसं आहेत ” ” हो तुझी माणसं आहेत, पण तू केलेली मदत कधी परत मिळते काय? एक तरी पैसा परत आलाय का? ” ” नसेल आला, पण आपल्याला काही कमी पडलंय काय? ” ” कमी पडलंच असतं जर मी कमावती नसते तर. माझ्या पैशांवर घर चालावायचं, तुझा पैसा तिकडे वळवायचा “शब्दाला शब्द वाढला आणि मी न जेवताच झोपले. उद्या आॅफिसला मला एका प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन द्यायचं होतं, डोकं भणभणायला लागलं. स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं मी.
माझ्या सुख समाधानाला गालबोट लागलं होतं. सप्तपदीतलं हे पाऊल माझ्यासाठी तप्तपदी ठरलं होतं
सासूच्या आजारपणात झालेली सेवा, सूनमुख पाहुन तिने समाधानानं निरोप घेतला.
मला कडक डोहाळे लागलेले, आॅफिसमधील कामाचं प्रेशर, मी प्रोजेक्ट लिडर असल्याने रजाही मिळत नव्हती, अशावेळी सासरची कोणीही मंडळी मदतीला आली नाही, आली माझी आई मदतीला.
प्रथमेशचा जन्म माझ्या जीवनातला सुखदायी क्षण. आनंदाचा क्षण, पण माझे दीर, जाऊ, नणंदा कोणीही बाळाला बघण्यासाठी आले नाही. अर्णवचा वारस, म्हणजे जणू त्यांचा दुश्मनच होता तो.
हळूहळू अर्णवचं सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली पिणंही वाढू लागलं. रात्री अपरात्री येणं वाढू लागलं, मी काही बोलायला गेले तर पुन्हा वाद. मी तो टाळण्याचा प्रयत्न करायची.
प्रथमेश सहा महिन्यांचा, त्या रात्री खूप किर किर करत होता. तीन वाजायला आले. अर्णवचा पत्ता नाही, फोन उचलत नव्हता. हाॅस्पिटलला फोन केला, तिथे नव्हता, त्याच्या एक दोन मित्रांना फोन केला, त्यांनाही माहित नव्हते. झाले अर्णवचा पारा चढला, हाॅस्पिटलला, मित्रांना फोन करून तू माझी बदनामी केली म्हणत आक्रस्ताळेपणा करू लागला. पायाखालचा हा ही निखारा मला वेदना देऊन गेला.
अर्णव बाथरूममध्ये स्नान करत असतांना अर्णवचा फोन आला. मी घेतला, एका स्त्रीचा आवाज होता, ” हाय स्वीटहार्ट? काय करतोस? ” स्वीटहार्ट? कोण आहेस तू? ” माझा आवाज ऐकताच समोरून फोन कट झाला. अर्णव धावत पळतच बाथरूममधून आलेला. “अर्णव, कोण होती ही तुला स्वीटहार्ट म्हणणारी “. ” मला नाही माहित, राँग नंबर असेल. सोड, तू नको टेंशन घेऊस. “
आता अर्णवचा मोबाईल चेक करणं भाग होतं. अर्णवच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने मोबाईलला पासवर्ड लावला. कोणाचा फोन आल्यास बाहेर किंवा एकांतात घेऊ लागला.
त्याचं स्वीटहार्ट प्रकरणही बाळसं धरत होतं. पैशाचा ओघ सासरची मंडळी व स्वीटहार्ट कडे वाढू लागला.
“काय अर्णव आम्ही तुझी माणसं. ये आमच्यात राहायला. सोड तो कैदखाना, मस्त खा, पी, मजा कर. माझे स्वार्थी दीर जाऊ शिकवत होते. आणि माझ्या संसारावर पाणी फेरणारी स्वीटहार्ट तर आगीत तेल ओतत होती. डिव्होर्स पिटीशन दाखल कर म्हणून सारखी मागे लागलेली.
आणि एक दिवस अर्णव गेलाच कि मला व प्रथमेशला सोडून. लग्नात घातलेली सप्तपदी, सात जन्माचं वचन सात वर्षातच कमकुवत होत या पदाला आलेलं होतं.
पण माझ्या बाळासाठी व माझ्या अभिमानासाठी मी सज्ज झाले. बोलणारे लोकं, समाज, नातेवाईंकांचे सल्ले सगळं काही सोसत मार्गक्रमणा करत राहिले.
आणि एक दिवस अतिशय भणंग अवस्थेत अर्णव परतला. ” कोण ” क्षणभर मी ओळखलंही नाही. ” मी तुझा अर्णव? ” ” असं काय घडलं कि तुला आता माझी आठवण यावी ” ” मी चुकलो, तुझ्या आश्रयाला आलोय. सगळ्यांनी मला लुटलं, नातेवाईकांनीही, आणि तिनेही, जिने प्रेमाचं नाटक केलं, प्रेम नव्हतंच तिचं कधी, फक्त हवा होता पैसा, आणि माझ्यासोबत टाईमपास. आज मी खरंच भणंग भिखारी झालोय गं “, ” अर्णव अर्धांगी होती मी तुझी. सप्तपदीची सात वचने दिली होती आम्ही एकमेकांना. पण तू ती वचने धुडकावून लावलीस. तुला तो एक खेळ वाटला रे. पण मी मात्र त्या आगीत होरपळले. आला आहेस आश्रयाला तर राहा, नाही म्हणणार नाही मी. पण त्या प्रेमाची अपेक्षा मात्र करू नकोस. त्या तप्तपदीमध्ये ते केव्हाच खाक झालंय. उरलीय
आता केवळ माणुसकी.
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – karodeshailaja@gmail.com




