उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
भल्या पहाटे, नेहमीप्रमाणेच नीलाचे डोळे उघडले. काही वेळ ती तशीच झोपून राहिली. तिचे योगगुरू म्हणायचे, जेव्हा बिछान्यातून उठाल, तेव्हा उजवीकडे वळून आरामात उठा. अचानक झटकन उठलं, तर हार्ट अॅटॅकची शक्यता असते.
ती हळुवारपणे उठली, तेव्हा उजव्या पायाच्या गुढग्यात थोडं दुखत असल्याचं जाणवलं. गेले काही महीने असंच चाललं होतं. अजून निशांतला सांगितलं नव्हतं, नाही तर लगेच म्हणाला असता, ‘ चल आई, ओर्थोपेडिक डॉक्टरला दाखवून येऊ.’ पण जास्त त्रास होत नव्हता, त्यामुळे त्याची तिला फारशी गरज वाटली नाही. चहा टाकला. बाल्कनीत ठेवलेल्या कुंडीतील पुदिन्याच्या झाडाची ताजी पाने, थोडंसं आलं आणि मसालेदार चहाने भरलेला मग घेऊन ती त्या छोट्याशा बाल्कनीत बसली.
अनेक वर्षे हा क्रम चालू होता. अभिजीत जीवंत होता तेव्हा आणि तो नसतानाही. सूर्य आपल्या किरणांची टोपली घेऊन इथूनच त्यांच्या घरात आणि जीवनात प्रवेश करायचा. काही काळ घर चमकून उठायचं. नंतर तो उंच उंच वृक्ष ओलांडून निघून जायचा. तिथे वर्तमानपत्रे यायची. सकाळी वर्तमानपत्रे वाचत, त्यातील वेगवेगळ्या बातम्यांवर चर्चा करायची दोघांनाही सवय होती.
आज एकटी असतानाही तिची ही सवय तशीच आहे. तेव्हा अभिजीतचं ऑफिस, निशांत आणि रीचाची शाळा, नाश्ता, घरातली छोटी-मोठी कामे, दुपारी महिलाश्रमात जाणं… जीवन दोन काठांमधून वाहाणार्या नदीसारखं वेगाने धावत होतं. अनेक आवाज घरातून यायचे. नंतर एकामागून एक सगळे निरोप घेऊन निघून गेले. निशांत बंगलोरच्या एका कंपनीत काम करत होता. त्याने आपल्याबरोबर काम करणार्या प्रियम बरोबर लिव-इनमध्ये राहून नंतर कोर्ट मॅरेज केलं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. नियमित फोन करत होते. चार-सहा महिन्यांनी भेटायलाही येत होते. प्रियमने त्यांना आयफोन भेटीदाखल दिला होता. ‘मम्मा यू हेव टु वोट्सएप मी, ओ.के’.
तसं सगळं ओ.के.चं होतं. तरीही मनात एक चिंता होती. रीचाने आपल्या मर्जीने, आपल्याला आवडणार्या तरुणाशी विवाह केला होता. याबद्दलही काही विरोध, हरकत नव्हती. पण कलंकित चारित्र्य असलेल्या राजकारणी पुढार्याचा परिवार. परिवारातलं कुणी ना कुणी जेलयात्रा करून आलेलं होतं. त्याच्या मुलाबरोबर विजयबरोबर इथले सगळे संबंध तोडून ती कॅनडाला निघून गेली होती. तिने तिची मनधरणी केली होती, पण क्वचित कधी हाय-हॅलोच्या पुढे बोलणं जात नव्हतं.
डोअर बेल वाजली. ती हळूच उठली. आज रविवार. पाच-सहा वर्तमानपत्रांचा गठ्ठा आला. तिने पुन्हा चहा करायला ठेवला आणि सोफ्यावर पाय पसरून बसली. जगभरातील बातम्या आरामात वाचत राहिली. वय झालं. आता आम्हाला काय करायचय, असं म्हणणं तिला मुळीच आवडत नव्हतं. तरुणपणात जेव्हा ती अतिशय व्यस्त असायची, तेव्हाही तिचे पती म्हणायचे, आम्ही आमच्या जीवनात भलेही व्यस्त असलो, तरी जगाशी जोडलेलं असलं पाहिजे. त्यामुळे आपली क्षितिजे रुंदावतात.
दुपारी थोड्या वेळासाठी ती महिलाश्रमात जायची. तिथे अनेक प्रकारचे आभ्यासवर्ग चालायचे. एक वर्ग तिचाही असायचा. देशाच्या वेगवेगळ्या भागात घडणार्या घटनांविषयी ती रसाळ भाषेत माहिती द्यायची. कधी कधी त्यांना इंग्रजीही शिकवायची. अनेकांच्या जीवनाचा ती हिस्सा बनली होती. घराच्या समोर म्युन्सीपल गार्डन होती. तिथे काही वेळ योग करणार्या गटाशी ती जोडली गेली होती. परतू तास संपला, की ती लगेचच घरी यायची. निवृत्त झालेली पुरुष मंडळी तिथे गप्पा-गोष्टी करत रहात. संध्याकाळी ती फिरायला जायची, तेव्हा अनेक शेजारणी गप्पा मारताना दिसायाच्या, पण ती त्यांची नजर चुकवून तिथून निघून जायची. आज रविवार. आज योगाच्या क्लासला सुट्टी. आज वेळच वेळ होता. तिने दोन पेपर पलंगावर ठेवले. दुपारी वाचण्यासाठी. निशांत आणि प्रियमशी बोलणं झालं. मग आंघोळ करून तयार होऊन बाजारातून सांभाराचं साहित्य आणलं. मोबाईलवर गुलजारांची गाणी ऐकता ऐकता तिने इडली सांभार बनवलं. अंजू कामाला आली, तेव्हा तिलाही खायला दिलं. नवीन आलेल्या सिनेमाबद्दल ती बोलत राहिली, तेव्हा तिला तिकिटाचे पैसे दिले आणि म्हणाली, ;जा बाई, तू पण जा. मजा कर. तिला खूप आनंद झाला. फटाफट काम आवरून ती निघून गेली.
मग घर पुन्हा एखाद्या ध्यानस्थ मुनीप्रमाणे शांत आणि निश्चल झालं. वर्तमानपत्रांच्या कागदांच्या फडफडण्याचा आवाज तेवढा त्या शांततेचा अधून मधून भंग करत होता. इजिप्तमध्ये नवी ममी सापडली… करोडोंचा भ्रष्टाचार…इराणमध्ये स्त्रियांचे आंदोलन… तिने काही बातम्या रेखांकीत केल्या. इंग्रजी कथांच्या अनुवादाच्या पुस्तकाचा रिव्ह्यू वाचून ते पुस्तक अॅमेझॉनवर ऑर्डर केलं. थोडी डुलकी आली, म्हणून वर्तमानपत्र बाजूला ठेवता ठेवता, एका लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष गेलं… डेथ क्लीनिंग.
डेथ क्लीनिंग? म्हणजे? … एक नवीनच शब्द.
तिने लेख वाचायला सुरुवात केली. अप्रतिम लेख आणि अगदी नवा विचार. ब्याऐंशी वर्षाची एक महिला विशाखा सुब्रमण्यम यांची मुलाखत घेऊन वर्तमानपत्राच्या एका वार्ताहराने लेख तयार केला होता.
नीला उत्साहाने लेख वाचू लागली.
सुरुवातीलाच लिहिलं होतं – हा लेख सिनियर सिटीजन्ससाठी खास आहे, पण शीर्षक वाचून, लेखातील विचार निराशावादी वा पलायनवादी आहेत, असे समजू नका. डिप्रेशनशी यातील विचारांचा काहीही संबंध नाही, उलट डेथ क्लीनिंग इज सेलिब्रेशन ऑफ लाइफ। मृत्यू जीवनाचा उत्सव आहे.
नीला बसली आणि तिने एकाग्रतेने तो लेख वाचला.
2017 मधे स्वीडिश महिला मार्गारेटने `जेंटल आर्ट ऑफ स्वीडिश डेथ क्लीनिंग’ विचाराचे प्रवर्तन केले. आपल्या जीवनाच्या सूर्यास्ताच्या काळात हे विचार तिने अमलात आणले. जीवन हा लोहचुम्बक आहे. तो अनेक वस्तुंना आपल्याकडे खेचत रहातो. जीवनाच्या दरम्यान अनेक छोट्या-मोठ्या वस्तुंनी आपलं घर भरून जातं. आपल्यानंतर त्या सगळ्या वस्तूंचं काय? गुजरीबाजारातून आणलेले आपले मनपसंत जुने घड्याळ, आजीच्या काळातील जुनी तिवई, मुले छोटी होती, तेव्हा त्यांच्यासाठी खरीदलेली आणि मोठ्या काळजीपूर्वक जपून ठेवलेली खेळणी, फोटोंचे आल्बम, भांडी-कुंडी, कपडे… आपल्याला निरोप दिल्यानंतर, या सगळ्याची विल्हेवाट लावताना आपल्या स्वजनांना नाकी नऊ येतील. कदाचित ते आपल्यावर रुष्ठही होतील. त्या ऐवजी आपण आपल्याच अनावश्यक वस्तू, ज्यांना जी गोष्ट पसंत आहे, त्यांना, किंवा ज्यांना उपयोगी पडतील त्यांना देत रहा. याला डिकल्टरिंग म्हणतात. ’डिकल्टरिंग युवर हाउस एँड लाइफ टु.’ आपल्याला गृहस्थाश्रमानंतर सन्यस्ताश्रमात प्रवेश करायचा आहे. नाही… नाही… वनात प्रवेश करायचा नाहीये. साधं जीवन जगणं हा उद्देश आहे. त्यामुळे आपोआप मोह सुटत जातील. वस्तू कमी असतील. त्यामुळे पॉज़िटिव एनर्जीच्या लहरींनी आपलं जीवन पुलकित होईल.
लेख मोठा होता. नीलाने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. हे सगळं वाचण्याची गरज नाही. डेथ क्लीनिंग या शब्दानेच मनाचा कब्ज़ा घेतला. तिने घरात सगळीकडे नजर फिरवली. घरात अनेक चीजवस्तू भारंभार होत्या. इथे जे लोक राहिले होते, त्यांनी आपल्या पदचिन्हांबरोबर आणखीही अनेक गोष्टी ठेवून दिल्या होत्या. ड्रॉइंगरूमच्या सीलिंगवर लावलेले झुंबर. रीचा जेव्हा कॉलेजमध्ये होती, तेव्हा कुणा मैत्रिणीच्या घरी असं झुंबर पाहिलं होतं आणि हट्टाने अभिजीतला ते विकत आणायला लावलं होतं. घरात अनेक वेळा अभिजीतचे मित्र येत. ऊंधियापार्टी आणि पाकातल्या पुर्या यांनी आदरातिथ्य होई. रीचा-निशांतच्या वाढदिवसाची पार्टी होई. तेव्हा ते झुंबर घर प्रकाशमान करत राही. घर उजळून जाई.
ती विचार करत राही. किती तरी वर्षांपासून स्वीचच चालू केलेला नाही. कोणासाठी चालू करायचा? कोणत्या निमित्ताने? निशांत आणि प्रियमला एकदा म्हंटलं होतं, झुंबर खूप महाग आहे. घेऊन जा. पण, ती म्हणाली, ‘आई, आम्हाला ‘कंसिल्ड लाइटिंग’ पसंत आहे.
तिने खाली उभं राहून त्या झुबराकडे बघितलं. त्याला खूप लोलक जडवले होते आणि त्या सगळ्यांवर धूळ माखली होती. ज्याचा उपयोग अनेक दिवसात केलेला नव्हता आणि पुढही केला जाण्याची शक्यता नव्हती, अशा गोष्टीचा उपयोग कुणी करणार असेल, तर त्याला का देऊ नये? अरे, यापूर्वी असा विचार का मनात आला नाही? हे म्हणजे काही मनपसंत वस्तू विकणं नव्हे. हळू हळू हे विचार मनात रुंजी घालू लागले.
नीला सकाळी उठून योगाच्या क्लासला गेली. गुरूजींनी ध्यानधारणेबरोबरच व्यायामदेखील करवून घेतला. क्लास संपल्यावर तिने गुरूजींना विचारले, ‘आपण रामकृष्ण आश्रम, चिदानंद गुरुकुल, हरद्वारचा आश्रम इथेही वर्ग घ्यायला जाता. तिथे सणावारी, संमेलने वगैरे होतात. माझ्याकडे एक चांगले झुंबर आहे. तिथे झुंबराचा उपयोग होणार असेल, तर तिथे ते मी पाठवण्याची व्यवस्था करेन. त्यासाठी होणारा खर्चदेखील मी करेन.’ गुरूजींनी मोठ्या खुशीने लगेचच संमती दिली.
‘हरिद्वारला गंगाघाटावर एक मोठं भवन आहे. तिथे अनेक उत्सव होतात. ताई, आपण व्यवस्था करत असाल, तर उत्तम होईल.’
तिने त्याच दिवशी पॅकर्स अॅंड मूव्हर्स कंपनीला फोन लावला. झुंबर काढले. ते स्वच्छ केले आणि ‘फ्रेजाईल’ च्या स्टिकरसह एक मोठा कंटेनर हरिद्वारच्या आश्रमात पोचला.
घरात खूप फर्निचर होतं. आता त्याची जरूर नव्हती. जास्तीच्या खुर्च्या, सोफा, तिवया, ट्रकमधून प्रवास करून महिलाश्रमात पोचले. जास्तीच्या गाद्या, उशा आणि चादरी अॅनिमल शेल्टरमध्ये गेल्या.
आता स्वैपाकघरात प्रथमच पहात आहोत, अशी ती चमकली. अरे, इतक्या सार्या बरण्या, डबेडुबे, भांड्यांचा ढीग जमला होता आणि तिला त्याचा पत्ताच नव्हता. स्टुलावर चढून वरचे कापाट उघडले. अरे एकदम नवीन अनब्रेकेबल इंपोर्टेड डिनरसेट! तिला आठवलं, ती आणि अभिजीत बँकॉकला मित्रांबरोबर गेले होते, तेव्हा त्याला हा डिनरसेट खूप आवडला होता. आणि पाच किलो अतिरिक्त सामानाचे पैसे काउंटरवर जमा करून त्यांनी तो आणला होता. आपल्या हातांनी तो कुरवाळत, तेव्हा ती म्हणाली होती, आता यानंतर आपली ऊंधियापार्टी याच डिनरसेटमध्ये। पण तशी वेळ आलीच नाही..
बँकॉकहून परतल्यावर काही काहीने गेले असतील. एका रात्री फिल्म बघून परतल्यावर दोघे जण गप्पा मारत झोपी गेले, तर सकाळी अभिजीतने डोळेच उघडले नाहीत. झोपेतूनच अंतहीन प्रवासासाठी ते निघून गेले.
आठवणींनी तिला असं घेरून टाकलं होतं, की तिला गुदमारल्यासारखं होऊ लागलं होतं. इथल्या घरात जशी ती कैद झालीय, असं तिला वाटू लागलं. ती लगेचच बागेत फिरायला बाहेर पडली. हळू हळू अंधुक दिसू लागलं होतं. दिवे झगमगू लागले होते. काही पुरुष मंडळी खाण्या-पिण्याची मजा घेत होते. आया आपल्या मुलांना घेऊन निघून गेल्या होत्या. झोपाळे आता रिकामेच झुलत होते. त्यांचं किलबिलणं अजूनही हवेत गुंजत होतं. ती निघाली.
– क्रमश: भाग १
☆☆☆☆
मूळ लेखिका – वर्षा अडालजा – मोबाइल: 9833076673
हिन्दी अनुवाद – डॉ.रजनीकान्त एस.शाह – मोबाइल: 9924567512
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




