डॉ मकरंद पिंपुटकर
☆ बंगाली साडी… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
“हॅलो शिल्पा! अगं, आज नवरात्रीच्या पूजेला तू चक्क बंगाली साडी नेसली होतीस? तुझा फोटो पाहिला मी! ” फोनवर शिल्पाला तिची ऑफिसमधली मैत्रीण विचारत होती.
“हो गं! का? काय झालं? ”
“काय झालं म्हणजे काय? अगं, आपण मराठी मुली! आपली मराठी अस्मिता, आपली संस्कृती, आपली परंपरा! आणि हे सगळं विसरून, महाराष्ट्रात – मुंबईत राहून छान इरकल नेण्याच्या ऐवजी तू बंगाली साडी नेसलीस? लोकं म्हणतील, मराठीपण विसरल्या या बायका! ”
शिल्पा शांतपणे हसली. “अगं, केवळ साडी बंगाली आहे म्हणून माझं मराठीपण कमी होणार असेल, तर मग माझं मराठीपण फारच तकलादू आहे म्हणायचं! ”
“शिल्पा, तू नेहमीच अशी तत्त्वज्ञानात शिरतेस! पण खरं सांग, आजच बंगाली साडी नेसायची काय हुक्की आली तुला? ”
शिल्पा काही क्षण शांत राहिली. “आजच नाही गं, बंगाली पद्धतीने साडी मी दुसऱ्यांदा नेसले. ”
“दुसऱ्यांदा? म्हणजे? ”
“पहिल्यांदा नेसले होते, तीस वर्षांपूर्वी. अहमदाबादला. माझ्या एका मैत्रिणीच्या – सोनियाच्या लग्नात. ”
“मग? लग्नात बंगाली साडी नेसण्याचं काय विशेष? ”
“विशेष साडीमध्ये नव्हतं गं, विशेष होतं त्या साडीच्या पदराखाली दडलेल्या एका नात्यात. ”
आता मात्र मैत्रिणीचा आवाज बदलला. “काय झालं काय होतं नेमकं? ”
शिल्पा भूतकाळात गेली…
तीस वर्षांपूर्वीची गोष्ट.
शिल्पाची तेव्हाच्या ऑफिसमधली एक जिवलग मैत्रीण होती – पंजाबी मुलगी. सोनिया मल्होत्रा. घरात सुबत्ता, वडील निवृत्त सरकारी अधिकारी. अहमदाबादमध्ये मोठा, प्रशस्त बंगला. बाग, अंगण, मोठ्या खोल्या, पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी भरपूर माणसं.
आणि त्या प्रगल्भ विचाराच्या मैत्रिणीनं matrimony site वरून लग्न ठरवलं होतं एका बंगाली तरुणाशी – सुजय घोष.
प्रेमविवाह म्हणावं का – लग्नाची, लग्नाच्या तयारीची चर्चा मैत्रिणींमध्ये रंगली होती.
वधूचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे तिच्या वडिलांच्या बंगल्यातच राहणार होते. वरपक्षासाठी मात्र एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.
हे ऐकताच शिल्पा गोंधळली. “अगं, तुमचा एवढा मोठा बंगला आहे. सगळे पाहुणे तिथे राहणार आहेत. मग वरासाठी आणि त्याच्या माणसांसाठी जवळचा एखादा बंगला भाड्याने का घेत नाही? लग्न चार दिवसांचं तर असतं. नवरदेव आणि त्याचे घरचे परक्यासारखे हॉटेलमध्ये, आणि तुम्ही सगळे घरी? हे काही मला पटलं नाही! ”
नेहमी खिदळणारी सोनिया हसली नाही. तिने शिल्पाचा हात हातात घेतला.
“शिल्पा, वरपक्षात आहेत तरी किती माणसं, माहिती आहे? ”
“असतील पंचवीस-तीस. मग काय झालं? ”
“सहा. ”
“काय? फक्त सहा? ”
“हो. तो, त्याचे दोन धाकटे भाऊ आणि त्याच्या ऑफिसमधले तीन सहकारी. एवढेच. ”
“अगं, पण त्याचे आई, वडील, काका, मामा, आत्या, मावश्या? कुणीच नाही? ”
सोनियाने नकारार्थी मान हलवली. “नाही. कुणीच नाही. ”
शिल्पाला काही समजेना.
सोनियाने सांगायला सुरुवात केली. “सुजयच्या आईवडिलांचं निधन झालं, तेव्हा तो फक्त बारा वर्षांचा होता. त्याचे दोन्ही धाकटे भाऊ अगदी लहान होते. भावाच्या मृत्यूनंतर काकांनी पद्धतशीररीत्या घरची मालमत्ता ताब्यात घेतली. तिन्ही कोवळ्या मुलांच्या वाट्याला ना संपत्ती, ना घरातला हक्क, ना नात्यांचा आधार.
काका-काकूंनी त्यांना जवळ घेण्याऐवजी दूर लोटलं. ज्या घरात त्यांचा जन्म झाला, तिथेच ते परके झाले. ”
शिल्पा स्तब्ध झाली.
“मग त्या मुलांचं पुढे काय झालं? ”
“सुजय शिकायला हुशार होता. त्यानं शिष्यवृत्ती मिळवली. शिकता शिकता अर्धवेळ नोकऱ्या केल्या. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवला आणि दोन्ही धाकट्या भावांना शिकवलं. स्वतःच्या लहानपणाचा त्याग करून त्याने त्यांच्या आयुष्याला आकार दिला.
आज तिघेही स्थिरस्थावर आहेत. सुजय स्वतः चांगल्या पदावर आहे. धाकटेही आपापल्या संसारात सुखी आहेत. पण त्यांच्याकडे आपलं म्हणावं असं माहेर नाही, हक्काने बोलावं असं कुणी काका-मामा नाहीत, हट्ट करायला छोटी बहीण नाही, सणासुदीला जमणारं मोठं कुटुंब नाही. ”
सोनिया थोडी थांबली. “आणि आता तो माझ्याशी लग्न करतोय. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचं कुटुंब मिळणार आहे. पण लग्नाच्या दिवशी त्याच्या बाजूने त्याला आशीर्वाद द्यायला कोण उभं राहणार? त्याचे ते तीन सहकारी. बस्स! ”
शिल्पाच्या डोळ्यांसमोर जणू एखाद्या जुन्या बंगाली कादंबरीतील दृश्य उभं राहिलं. शरच्चंद्रांच्या कादंबऱ्यांत वाचलेलं दुःख आजच्या जगात तिच्यासमोर येऊन प्रत्यक्ष उभं ठाकलं होतं.
एका बारा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बालपणाला निरोप देऊन आपल्या भावांसाठी वडिलांची आणी प्रसंगी आईचीही भूमिका स्वीकारली होती. स्वतःच्या दुःखाला गिळून त्याने दोन भावांचं भविष्य घडवलं होतं.
आणि आता, आयुष्याच्या या एका सुंदर वळणावर, त्याच्यासाठी उभं राहायला रक्ताच्या नात्यांपैकी कुणीच नव्हतं.
शिल्पाच्या मनात काहीतरी तुटलं.
आणि त्याच क्षणी काहीतरी जन्मालाही आलं.
ती सोनियाला म्हणाली, “ऐक. मी तुझ्या लग्नाला तुझ्यासोबत नसेन. ”
“आ? हे काय आता? ”
“लग्नाला मी येणार सुजयची बहीण म्हणून. ”
सोनिया तिच्याकडे पाहतच राहिली. “अगं, पण… ”
“काही पण-बिण नाही. त्याच्या आयुष्यात रक्ताची नाती नसतील, तर काय झालं? आपण आहोत ना! आणि नाती फक्त रक्ताने ठरत नाहीत. कधी कधी ती माणुसकीने जोडावी लागतात. ”
लग्नाला काही दिवस बाकी होते.
शिल्पाने आयुष्यात पहिल्यांदाच बंगाली साडी नेसायचं ठरवलं. तिला बंगाली साडी नेसण्याची पद्धत माहीत नव्हती. पदर कसा घ्यायचा, घड्या कशा पाडायच्या, साडीचा तो खास बंगाली लुक कसा आणायचा, याचा तिला काहीच अंदाज नव्हता.
तिच्या शाळेतल्या मैत्रिणीच्या आईने तिला मदत केली. “बेटा, साडी नेसताना फक्त कापड सांभाळायचं नसतं. तिचा पदरही सांभाळावा लागतो. तो नीट घेतला, की साडीला शोभा येते. ”
त्या दिवशी शिल्पाला या वाक्याचा अर्थ फक्त साडीपुरताच समजला होता.
तिने मन लावून बंगाली साडी नेसायला शिकून घेतली.
आणि मग ती अहमदाबादला पोहोचली.
लग्नाच्या दिवशी वरपक्षाचे ते सहा जण तिला दिसले. तीन सहकारी, दोन धाकटे भाऊ आणि तो नवरदेव.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता; पण त्या आनंदामागे कुठेतरी एक खोल बोचही होती.
नवरदेवाने शिल्पाला पाहिलं. बंगाली साडीत सजलेली, कपाळावर मोठी टिकली, चेहऱ्यावर हसू.
ती त्याच्याजवळ गेली आणि अगदी सहजपणे नवीन शिकलेल्या बंगालीत म्हणाली, “दादा, आमी आच्छे! ”
त्या एका शब्दाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
“दादा! ”
कदाचित कुणा मुलीने पहिल्यांदाच त्याला या हक्काने हाक मारली होती.
त्याने शिल्पाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
शिल्पाने त्याच्या हातावर हलकेच हात ठेवला. “आज तुझ्यातर्फे, तुझ्यासोबत तुझी छोटी बहीण उभी आहे. आता सगळं छान होईल. ”
त्या दिवशी शिल्पा फक्त एक लग्नाला आलेली मैत्रीण नव्हती. ती त्या नवरदेवाची बहीण झाली होती. त्याच्या भावांची ताई झाली होती.
लग्नाच्या फोटोंमध्ये ती नववधूच्या मैत्रिणीपेक्षा वराच्या बहिणीसारखीच दिसत होती.
आणि त्या बंगाली साडीच्या पदराखाली एक नवं नातं जन्माला आलं होतं.
“शिल्पा… अगं, कुठे हरवलीस? ” फोनवरून मैत्रिणीचा आवाज आला.
शिल्पा वर्तमानात परतली. “काही नाही गं. आठवण आली त्या लग्नाची. ”
“म्हणजे आजची साडी तू त्याच्यासाठी नेसलीस? ”
“हो. आज नवरात्रीची पूजा होती. सकाळी कपाट उघडलं, तेव्हा अचानक त्या लग्नाची आठवण झाली. तीस वर्षं झाली. तो बंगाली आहे, मी मराठी आहे. पण त्या दिवशी आम्ही दोघांनीही भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन एक नातं स्वीकारलं होतं. ”
“अजून संपर्कात आहात का तुम्ही? ”
शिल्पा हसली, “अगं, नियमित बोलतो आम्ही. आज सकाळीच त्याला माझा बंगाली साडीतला फोटो पाठवला. ”
“मग त्याचं उत्तर काय आलं? ”
शिल्पाच्या आवाजात एक अनामिक ओलावा उतरला.
“त्यानं लिहिलं… ”
ती क्षणभर थांबली. मग फोनमधला संदेश जणू पुन्हा वाचत असल्यासारखी म्हणाली, “शिल्पा, आज तुला या साडीत पाहिलं आणि तीस वर्षांपूर्वीचा तो दिवस डोळ्यांसमोर उभा राहिला. त्या दिवशी तू माझ्या लग्नाला आली नव्हतीस, तू आमच्या आयुष्यात आली होतीस.
माझे आईवडील गेले तेव्हा मी बारा वर्षांचा होतो. माझं बालपण गेलं, घर गेलं, नात्यांवरचा विश्वास गेला. पण त्या दिवशी तू मला एक गोष्ट शिकवलीस—माणसाला नाती जन्माने मिळतातच असं नाही; काही नाती कुणीतरी मनापासून स्वीकारावीत लागतात.
आजही माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी एकच जागा आहे. माझ्या बहिणीची.
तू आजही बंगाली साडी नेसतेस, हे पाहून आनंद झाला. पण मला सर्वांत जास्त आनंद याचा आहे की तीस वर्षांपूर्वी तू आम्हा भावांच्या डोक्यावर ठेवलेला बहिणीचा हात आजही तिथेच आहे. “
शिल्पाचा कंठ दाटून आला.
फोनच्या दुसऱ्या टोकाला मैत्रीणही शांत झाली होती.
काही क्षणांनी ती हळूच म्हणाली, “शिल्पा, खरंच, मी उगाचच तुला मराठी अस्मितेच्या गोष्टी सांगत होते. पण एक सांग, तुला त्या साडीत स्वतःला पाहताना नेमकं काय वाटतं? ”
शिल्पा खिडकीबाहेर पाहत म्हणाली, “मला वाटतं, तीस वर्षांपूर्वी मी एक साडी नेसले नव्हते गं. मी एका नात्यांचा खरा अर्थ समजणाऱ्या माणसाच्या आयुष्यात बहिणीचं नातं विणलं होतं आणि मी समृद्ध झाले होते.
आज बंगाली साडी पुन्हा नेसताना मला जाणवतंय की साडीचा पदर कितीही बंगाली असला, तरी त्याखाली धडधडणारं हृदय मराठी / पंजाबी असतं असं नाही, ते फक्त माणसाचं असतं. ”
ती थोडी थांबली.
“आणि हो, मराठी अस्मिता जपायला मला दुसऱ्या भाषेचा पदर झटकण्याची गरज नाही. माझ्या संस्कृतीने मला दुसऱ्याला आपलंसं करायला शिकवलं, तर त्याहून मोठा अभिमान कोणता? ”
त्या रात्री शिल्पाने कपाटात बंगाली साडी पुन्हा नीट ठेवली.
आजची नवीन साडी तर झळझळीत होतीच पण तीस वर्षांपूर्वीच्या नात्यांचा पोतही होती तस्साच कायम पक्का होता, पदराखाली जपलेलं नातं मात्र तितकंच ताजं होतं.
© डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




