डॉ मकरंद पिंपुटकर
☆ वारसाहक्क… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
पुण्यात सदाशिव पेठेत आज राहुलशेठ जोशी यांच्या बंगल्यावर लगबग चालू होती. राहुलशेठ यांचं तीन दिवसांपूर्वी थोड्याशा आजारानं निधन झालं होतं. अस्थी विसर्जन करून लोकं घरी परतले होते – त्यांचीच वर्दळ होती. दिव्याला नमस्कार करून व्यवसायातील संबंधित व परिचित आपापल्या घरी परत गेले. आणि मग मुंडन करून आलेल्या राहुलशेठच्या मुलाचं – विजयचं लक्ष बंगल्यातील प्रशस्त दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेल्या पंचवीस तीस वर्षाच्या तरुणाकडे गेलं. हा तरुण चेहऱ्यानं तरी विजयच्या ओळखीचा नव्हता. त्यामुळे काहीशा प्रश्नार्थक नजरेने तो त्या तरुणाला सामोरा गेला.
“विजय, नमस्कार. मी जय. ” विजयपेक्षा साधारण चार पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या त्या तरुणाने उजव्या हातानं कानाची पाळी कुरवाळत आपलं नाव सांगितलं. त्या नावानं विजयला काही अर्थबोध होणार नाही हे जयला माहित होतं, म्हणून त्याने आपलं पूर्ण नाव सांगितलं – “मी जय. जय राहुल जोशी. ” राहुल जोशी या नावावर जोर देत जय म्हणाला. “राहुल जोशी माझेही वडिल होते. ” जयनं बॉंब टाकला.
विजय कोणाशी बोलत आहे हे पहायला राहुलशेठ यांच्या कंपनीचे वकिल व अगदी घरातल्यासारखे असलेले ॲडव्होकेट पंडित त्या दोघांजवळ आले होते, त्यांच्या कानावर जयचं बोलणं पडलं आणि मौके की नजाकत को समझते हुए ते या दोघांना आतल्या खोलीत घेऊन आले. जयच्या उजव्या कानाच्या पाळीला कुरवाळण्याच्या सवयीकडे विजय व पंडित दोघांचही लक्ष गेलं होतं.
“मी ॲडव्होकेट पंडित. तुमचं काय म्हणणं आहे ते सविस्तर सांगाल का? आत्ता अनौपचारिकपणे मी तुमचं बोलणं ऐकून घेतोय याचा कोणत्याही प्रकारे असा समज करून घेऊ नका की तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे. ” पंडितांनी वकिली बाणा दाखवला.
“थोडक्यात सांगायचं तर माझे वडिल राहुलजी, ” माझे वडिल या शब्दांवर जोर देत जय सांगू लागला, “इंजिनिअरिंग शिकायला जेव्हा गोव्याला होते तेव्हा त्यांचं माझ्या आईवर प्रेम जडलं, त्या दोघांनी लग्नही केलं होतं. त्यांनी आईला वचन दिलं होतं की ते आपल्या पायावर उभे राहिले, नाव कमावलं की हक्कानं आईला घेऊन जातील म्हणून. माझी आई कोंकणी असल्याने शिक्षण चालू असताना केलेल्या अशा या लग्नाला तुमच्या घरच्यांचा विरोध असेल अशी रास्त शंका त्यांना होती. शिक्षण संपवून ते पुण्याला परतले तेव्हा आई गर्भवती होती. पण त्यांच्या प्रगतीच्या मार्गात आड येऊ नये म्हणून आईनं त्यांना त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. “
“पुढे काही वर्षं त्यांची पत्रं आली होती. त्यांच्या व्यवसायाबद्दल, पुढच्या प्लॅन्सबद्दल ते भरभरून लिहीत असायचे. यशस्वी झालो की तुला घ्यायला नक्की येईन असंही दर पत्रात ते लिहायचे. पण मग त्यांनी जेव्हा विजयच्या आईशी दुसरं लग्न केलं त्यानंतर पत्रं यायचीही थांबली. तोपर्यंत ते उद्योगपती राहुलशेठ झाले होते. माझी आई गरीब होती पण स्वाभिमानी होती. तिनं दुसरं लग्नही केलं नाही की मला कधीच या कशाबद्दल सांगितलं नाही. “
“ती गर्भवती असताना माझे वडिल अपघातात वारले असंच ती मला सांगत आली. काबाडकष्ट करून तिनं मला वाढवलं. पण वर्तमानपत्रात माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी वाचली आणि तो धक्का तिला सहन झाला नाही. तिनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. माझ्यासाठी तिनं एक पत्र लिहून ठेवलं व त्यात ही सगळी हकीकत तिनं लिहून ठेवली. “
“माझ्या वडिलांबरोबरचे तिचे काही फोटो, त्यांची काही पत्रं, त्या दोघांच्या लग्नाचं नोंदणी प्रमाणपत्र अशा काही आठवणी एका पेटीत तिनं माझ्यासाठी ठेवल्या होत्या. तिचं अस्थीविसर्जन करून दोन दिवसांनी मी परत येईन तेव्हा या सर्व गोष्टी मी बरोबर घेऊन येईन. आणि हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी काही तुमच्या संपत्तीत हक्क वगैरे मागायला आलेलो नाही. मला फक्त माझ्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करायचं आहे. मला माफ करा मी असं अचानक आलो म्हणून पण माझीही परिस्थिती लक्षात घ्या – दोन दिवसांत मी वडिल आणि आई दोघांचंही छत्र हरवलं आहे. ” परत ते नकळत कानाची पाळी कुरवाळणं.
जय एकानंतर एक धक्के देत होता. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही, आरडाओरडा नाही. जे जे जसं जसं घडलं तसतसं तो सांगत होता. त्याच्या या बोलण्यानंतर त्याच्या व राहुलजींच्या चेहऱ्यात साम्याची झाक जास्तच जाणवत होती. तसेच कुरळे केस व दाढीमिश्यांचं जंगल. डोळ्यात तीच चमक. आणि कानाची पाळी कुरवाळण्याची लकब तर सही सही राहुलशेठचीच.
ॲडव्होकेट पंडित विचारात पडले. एकीकडे तो संपत्तीत हक्क नको म्हणतोय पण मग तो त्या कागदपत्रांचे पुरावे कशाला आणतोय? मुख्य म्हणजे परतच कशाला येतोय? कोडं उलगडत नव्हतं.
पुढचे दोन तीन दिवस पंडित व विजय या दोघांनाही खूप तणावाचे गेले. नावातील जय विजय साधर्म्यही चिंतेत भर टाकत होतं. आणि पंडितांच्या वकिली डोक्यात एक गोष्ट लख्ख प्रकाशून गेली की जर जय त्याच्या आईचं राहुलजींशी लग्न झाले होते हे सिद्ध करू शकला तर विजयच्या आईचं लग्नच बेकायदेशीर ठरतं आणि मग विजयसुद्धा अनौरस ठरतो, मग त्याचा राहुलजींच्या इस्टेटवरील हक्कच रद्दबातल होतो – सगळंच अवघड होणार होतं.
आणि जय परतला – आईच्या अस्थी विसर्जनानंतर त्यानेही मुंडन केलं होतं. कानाची पाळी कुरवाळत तो आला, दिवाणखान्यातील दिव्याला नमस्कार करून तो विजय व पंडितांच्या समोर आला. “हे ॲडव्होकेट डिसुझा – अर्थात आज ते केवळ माझे मित्र म्हणून आले आहेत. “
पंडितांच्या मनात हा सर्व प्रकार शांततेत पार पडेल अशी एक जी धूसर आशा होती ती जयबरोबर वकिलाच्या येण्याने पूर्णत: मावळली. ऍडव्होकेट डिसुझा यांनी टीपॉयवर काही पत्रं, काही फोटो, मॅरेज सर्टिफिकेट अशा गोष्टी मांडल्या व काही न बोलता ते बाजूला झाले.
राहुलजी कॉलेजकुमार असतानाचे त्यांचे फोटो होते ते आणि बऱ्याचशा फोटोंत एक तरुणीही होती. खांद्यावर हात टाकून, काही हौशी फोटोग्राफरने काढलेले, काही जत्रांमध्ये सीन सीनरीसमोर गावांतल्या प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेले – पण सर्वच फोटोंत राहुलजी व त्या तरुणीतील जवळीक स्पष्ट दिसत होती.
गोव्यातील लग्न असल्याने इंग्रजीत छापलेले मॅरेज सर्टिफिकेट आणि प्रथम दर्शनीतरी राहुलजींच्याच हस्ताक्षरासारख्या अक्षरातील काही जुनी पुराणी पत्रं.
पंडितांनी काहीच न सुचून मॅरेज सर्टिफिकेट उचललं. छापील फॉर्मवर नीटनेटक्या कॅलीबरी फॉंटमध्ये नवरा नवरींची नावं छापलेली. नवरा, नवरी, दोन साक्षीदार, मॅरेज रजिस्ट्रार यांच्या सह्या, शिक्के, सहीसुद्धा राहुलजींसारखीच.
पंडित व विजय यांचं भांबावलेपण जय एन्जॉय करत होता – मुंडन केल्यानं त्याचे कान गणपती कानासारखे बाहेर आलेले दिसत होते आणि नेहमीच्या लकबीने कानाची पाळी कुरवाळत होता.
पंडितांचे डोळे लकाकले – “जय, ही जीवघेणी मस्करी आता मर्यादेच्या पलीकडे गेली आहे. तू आणि तुझा हा सो कॉल्ड वकिल मित्र दोघांनीही लेखी माफीनामा लिहून द्या आणि इथून निघून जा, नाहीतर नाईलाजाने मला पोलिसांना फोन करावा लागेल. “
“याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! ” जयचा संभावित सोज्वळ मुखवटा क्षणार्धात टरटरून फाटला व त्याचं असली रूप समोर आलं. “मीसुद्धा एक बिझनेसमन आहे. या कागदांद्वारे मी कोणालाही सहज सिद्ध करून दाखवेन की मीच राहुलजींचा पहिला मुलगा आहे. विजयच्या आईशी त्यांचं झालेलं लग्न बेकायदेशीर आहे. आणि त्या बेकायदेशीर लग्नातून जन्मलेला हा विजय हा काही त्यांच्या संपत्तीचा वारस ठरत नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना धक्के मारून इथून घालवून देण्यासाठी मीच पोलिसांना फोन करेन. “
आश्चर्य म्हणजे जयच्या या सगळ्या आरडाओरड्यानंतर कावरेबावरे होण्याऐवजी ॲडव्होकेट पंडित प्रसन्न हसले. म्हणाले, “तू कमी वेळात छान गृहपाठ केलास आणि राहुलजींचा मुलगा असल्याचा दावा पेश केलास, पण तू फिनिशिंग टचेस मध्ये कमी पडलास, आणि ओव्हर ॲक्टिंगने मार खाल्लास. “
पंडितजी निरगाठ उकल तंत्राने सांगू लागले.
“हे फोटो कॉंप्युटर ग्राफिक्सनं तयार केले आहेत हे कदाचित सिद्ध करताही येईल, पण आपण राहुलजी आणि तुझ्या कॉमन सवयीपासून सुरुवात करू – कानाची पाळी कुरवाळणं. राहुलजींची लकब तर तू सही सही उचललीस. केस-दाढीही हुबेहूब राहुलजींसारखी. परवा तुझ्या केसांच्या जंजाळात माझ्या लक्षात नाही आलं पण आज चकोट करून आल्यावर तुझ्या कानवरचे केस स्पष्ट दिसत आहेत. विजयच्या कानाच्या पाळ्या बघ – त्यांच्यावर केस नाहीत. “
“अहो, कुठचा विषय कुठे नेत आहात तुम्ही? आणि कानाच्या पाळ्यांवर केस असले नसले – काय फरक पडतो? “
“बेटा, मी BSc, LLB झालो आहे. सायन्समध्ये आम्हाला अनुवांशिकतेचे गुणधर्म होते. कानावर केस उगवणे hypertrichosis pinnae auris हा Y गुणसुत्रांवर आधारित गुणधर्म आहे. प्रत्येक वडिलांकडून तो प्रत्येक मुलग्याकडे वंशपरंपरागत येतोच येतो. राहुलजींचा हा फोटो बघ, दाढी मिशांचं जाळं आहे पण कानाच्या पाळ्यांवर केस नाहीत. तुझ्या या मुंडन केलेल्या तुळतुळीत गोट्याच्या पार्श्वभूमीवर तुझ्या कानावरचे केस ठळकपणे उठून दिसत आहेत आणि हे केस तुझी केस नुसती कमजोर करत नाहीत तर पार फेटाळून लावतात. ” पंडितजींनी श्लेष करत जयच्या जखमेवर मीठ चोळलं.
“आणि हे जे छापील मॅरेज सर्टिफिकेट तू आणलं आहेस, त्यावर राहुलजींचं व तुझ्या आईचं नाव कॅलीबरी फॉंटमध्ये छापलं आहे. लग्न १९९० साली झालंय, तेव्हा कॅलीबरी फॉंट अस्तित्वातच नव्हता राजा, तो फॉंट २००७ साली आला. याचाच साधा सोपा अर्थ – या डॉक्युमेंटमध्ये जबरदस्त गोलमाल आहे”
“बाकी राहुलजींची सही, त्यांचं हस्ताक्षर खरं कसं नाही हे तज्ञांच्या मदतीने सिद्ध करता येईलच. “
“केस डिसमिस्ड”, असं म्हणत ॲडव्होकेट पंडित पुणे पोलिस कमिशनरना फोन लावायला उठले. बोगस जय आणि डिसुझा वकिल यांना आपला डाव आपल्यावरच उलटल्याचं कळून चुकलं होतं.
आणि ॲडव्होकेट पंडितांविषयी अतिशय कृतज्ञ भावनेने विजय आपल्या वडिलांसारखाच आपल्या कानाची पाळी कुरवाळत होता.
© डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




