संध्या बेडेकर

☆ “निर्णय…“ ☆ संध्या बेडेकर ☆

सध्या रोजच ढगफुटीच्या बातम्या ऐकू येतायेत. म्हणजे गिनीज बुक (Guinness Book) मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंद होईल की काय असं वाटतंय. वर्तमानपत्रात वाचले, TV वर हा सर्व विनाश मी बघत होते.

कार वाहून जातानाचे दृष्य बघताना.. मला माझा नवराच आठवला. माझ्या नवऱ्याचं पहिलं प्रेम म्हणजे त्याची कार. ऑफिसमध्ये जाताना कडक इस्त्रीचे कपडे आणि चकचकणारी कार म्हणजे आनंदाने कानावर जाण्यासाठी पूर्णतया तयार.

आज आमच्या कारला एक ओरखडा आला. खरं तर यांचा मुड खराब होण्यासाठी हे कारण खूप मोठं होतं. पण आज महाराज एकदम शांत, काहीच बडबड, चिडचिड वगैरे काहीच नाही. थोडं आश्चर्यच वाटलं. कदाचित TV वर बघीतलेल्या बातम्यांचा परिणाम असावा हा. घर पडताना, कार बूडताना, माणसं पडतांना त्यांना वाचवतांना च्या घटना डोळ्यासमोर आल्या असाव्यात, आणि त्यामुळेच आपलं दुःख बरंच कमी आहे असं वाटलं असावं. असा आपला माझा अंदाज.

आज अजय, बाबा एकत्रच घरी आले. असंही होतं कधी कधी.

अजय आमचा एकुलता एक मुलगा. बाबांचा लाडका, हुशार, smart, आणि बाबांच्या सेवेत नेहमी हजर. सर्व लाड बाबांकडे पूर्ण होणार. सर्व गोष्टी बाबांबरोबर शेअर करणार.

कंपनी मध्ये जायच्या आधी तो बाबांची कार स्वतः बघणार, पूसणार.

चार वर्षांपूर्वी अजय अनिताच्या प्रेम विवाहाला बाबांनी पूर्ण पाठींबा दिला होता.

पहिल्यांदा अजय अनिताला घेऊन बाबांच्या ऑफिस मध्येच गेला होता. नंतर तिघे घरी आले आणि ताईला आयुष्याचं सर्वात मोठं surprise gift दिलं होतं.

ताईबाई खुश होत्या. लगेचच आपल्या स्वभावामुळे, नेहमी प्रसन्न राहणारी अनिता सर्वांची लाडकी झाली. साधा कोणाला थोडा खोकला जरी आला तरी धावत जाऊन पाणी आणून देणार. प्रेमळ व काळजी घेणारी अनिता देशमुखांच्या घरी लवकरच स्थिरावली.

आज नेहमीप्रमाणेच ताई ची आपली बडबड सुरू होती. ऑफिस मधून आल्यावर दिवसभराच्या बातम्या सांगणं. कोणाचा फोन आला, कोणाला केला, वगैरे वगैरे. हे असं रोजच होत असतं. पण आज प्रतिसाद असा कोणाकडून काही येत नव्हताच. कदाचित कार ला आलेल्या ओरखड्याच्या दुःखात असावेत बहुतेक…

असं शक्यतो कधी होत नाही. अजयची तर सतत बडबड असतेच. आफिस मध्ये गेल्यापासून ते येतपर्यंतचे सवीस्तर वर्णन सुरू असते. आज सगळे एकदम शांत.

अनिताची पण कामावरून यायची वेळ झालीच होती. ताई तशी स्वभावाने शांत. खूप खोदून विचारण्यापेक्षा वाट बघणारी. त्यामुळे काय झालं असावं याचा विचार करत होती.

अनिता आल्यावर जेवणं झाली. बाबांनी सर्वांना हाॅलमध्ये बोलविले. तशा सगळ्यांच्या हाॅलमध्ये गप्पा खूप रंगतात, पण आज बाबांचा सूर वेगळाच लागलेला दिसतोय.

बाबा म्हणाले, “आज अजय ऑफिस मध्ये आला आणि त्याने एक मोठे सरप्राईज दिले. “

अजयचे प्रमोशन वगैरे झाले की काय असं सहजच दोघी एकदम बोलून गेल्या. बाबांना अंदाज आला.. दोघींना काहीच माहित नाही हे लक्षात आलं.

बाबा म्हणाले, “तसं असतं तर मी पेढे घेऊन आलो असतो. आजची बातमी काही आनंदाची नाही. खरंतर धक्कादायक आहे. “

बाबा बोलत होते… “अजयने आज ऑफिस मध्ये येऊन मला सांगितलं की तो एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, आणि दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे.

त्याला कदाचित नेहमीप्रमाणेच मी त्याला साथ देईन असं वाटलं असावं. पण या गोष्टींला माझं समर्थन नाही. चूकीच्या निर्णयावर मी कधी सहमत होणार नाहीच.

चार वर्षांपूर्वी अनिताला घेऊन आला होता तेंव्हा मी आनंदाने सम्मती दिली होती. आज नाही. ती मुलगी कोण आहे? तिचे नाव, गाव याबद्दलही मी चौकशी केली नाही. मला तिला बघायचेही नाही, भेटायचे तर नक्कीच नाही.

नाटकात एकत्र काम करताना एका नामी अभिनेत्री बरोबर ओळख झाली आणि त्या ओळखीत तो भरकटत गेलेला दिसतोय. इतक्यात घरी उशीरा येत होता, आपल्याला वाटायचं नाटकाची प्रॅक्टीस चालू आहे.

अनिता बरोबर ही प्रेम विवाह झालेला. पुन्हा तेच. ही काय सवय झाली आहे का? मनावर कंट्रोल नाही बहुतेक. मोठ्या मोठ्या सेलीब्रेटींना फाॅलो करतोय बहुतेक. स्वतःला सेलीब्रेटी समजायला लागला आहे का?

एका सेलीब्रेटीच्या प्रभावाखाली येऊन आपल्याच माणसांना खाली पाडायला निघाला आहे का?

अरे! उद्या तीच सोडेल तुला एखादा सेलीब्रेटी हिरो मिळाल्यावर.

याचा व्हाटसअप DP बघीतला का? अनिताच्या खांद्यावर हात ठेवून दोघांचा छान हसरा फोटो आहे. काय खरं आहे कोण जाणे?

आणि अनिताचं काय? तिचा काय विचार केलाय? ती काय परीक्षा द्यायला आली होती का? तात्पुरती सोय होती का ती?

मागे लग्नानंतर अनिताला आॉफिस मधून आल्यावर स्वयंपाक करावा लागू नये म्हणून अजयने आईला सांगून तिची बाजू घेतली होती. कामाला मावशी येऊ लागल्या. ‘आई आणि बायकोला, दोघींना बघायची जबाबदारी माझीच आहे, दोघींना न्याय मिळावा’ म्हणून घेतलेली ती बाजू बघून मला आनंद झाला होता. आता अजयची काळजी नाही असं वाटलं होतं.

आता असं काय झालं अचानक की दुसरं लग्न?

अरे! डोक्यातून निघणाऱ्या प्रत्त्येक इच्छेला /अनावश्यक विचाराला प्रतिक्रिया/ प्रतिसाद द्यायचा नसतो. तू तुझ्या विचारांचा मालक आहेस की गुलाम?

माझंच चूकलं. खूप लाड केले. प्रत्त्येक गोष्टीत हो म्हंटलं, कधी कशाला नाही म्हंटलं नाही.

म्हणतात ना… जीवनात दोन्ही गोष्टींची किंमत मोजावी लागते… बोलण्याची आणि वेळ आल्यावर गप्प बसण्याची. “

बाबा अनिताला म्हणाले, “अजिबात रडू नकोस अनिता. आम्ही दोघं तुझ्या बाजूने आहोत. आजपासून तू आमची सून नाही मुलगी आहेस. या माणसासाठी रडायची गरज नाही तुला. “

ताई आणि अनिताला अश्रु आवरत नव्हते.

“तुम्ही दोघी रडू नका” बाबा रागाने लाल झाले होते.

आज अजयचं काही खरं नाही हे त्याच्याही लक्षात आलं. तो कोणाच्याच नजरेला नजर देत नव्हता. आपल्या खोलीत जायला लागला तेंव्हा बाबा म्हणाले, “आता या घरात रहायची तुला परवानगी नाही. “

बाबांचं हे रूप सर्वांना नवीनच होतं. आजपर्यंत त्यांचं प्रेम बघीतलं होतं, आज रौद्र रूप.

ताई म्हणाली, “अहो! लोक काय म्हणतील? “

“तुला लोकांची काळजी आहे? अनिताची नाही? ” बाबा ओरडलेच.

या अशा गोष्टी ऐकल्यावर असं वाटतं… प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीला आपण बघू शकतो, त्याच्या बरोबर बोलू शकतो. पतन एवढं झालंय का? हा विचारही मनात येत नाही का?

की आपल्या निर्णयामुळे आपल्या बरोबर राहणाऱ्या माणसांवर त्याचा काय प्रभाव पडेल? त्याचे दुःख, त्रास, कशाचाच विचार मनात येत नाही.

आता तर असं म्हणावसं वाटतं की… शरीराच्या तपासणीच्या वेळी प्रत्येक वेळी रक्त, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण तपासून पाहिले पाहिजे असं नाही. प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचीही तपासणी करून घ्यायला हवी; कोणास ठाऊक—दयाळूपणा, माणुसकी, करुणा, सहानुभूती, व्यावहारिक समज किंवा सामाजिक शिस्त/बंध यांसारखे गुण कदाचित कमी होत चालले असतील.

एक तो आपला काळ होता. सातजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून व्रत-उपवास करत असत.

आधी कधी कधी ऐकू येणाऱ्या घटना, आजकाल सर्वसाधारण मध्यम वर्गीय परिवारातही घडतायेत.

हे असं वागणं चूकच आहे. अशा वागण्याला माफी नसावी.

ज्या व्यक्तीने तुमचे नाते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, तिला पुन्हा कधीही आपल्या आयुष्यात, कुटुंबाचा भाग म्हणून स्थान देऊ नका.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted