श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “कर्जमुक्त व्हा!” -लेखक : सी ए अभिजीत कोळपकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : कर्जमुक्त व्हा!
लेखक: सीए अभिजीत कोळपकर
पृष्ठ: ४३५
मूल्य: ४००₹
देशाच्या आर्थिक क्षेत्रात गेल्या दशकापासून जितके व्यापक आणि वेगाने बदल झाले आणि आजही होत आहेत, तसे पूर्वी कधी झालेले नाहीत. या बदलांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचताना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा केंद्र सरकारने बँकिंग वाढण्यासाठी राबविलेल्या जन धन योजनेपासून सुरू झाला व एका दशकात सुमारे ५५ कोटी नागरिकांनी बँकेत आपली खाती उघडली, त्यात अर्थात प्रथमच बँकिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पुढील टप्पा हा ‘नोटबंदी’ चा म्हणून ओळखतो. त्या पाठोपाठ सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रचंड चालना दिली. गेल्या पाच वर्षांत देशात डिजिटल क्रांती झालेली आज आपण पाहात आहोत.
आर्थिक सामिलीकरणात या बदलांसोबत आणखी एक महत्त्वाची बाब घडते आहे. ती म्हणजे पतपुरवठ्याच्या विस्ताराची. नागरिकांना कमी व्याजदरात आणि सहजपणे भांडवल व कर्ज उपलब्ध होत आहेत.
सध्या देशात क्रयशक्ती वाढत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून राहणीमानात सकारात्मक बदल होत आहे. आतापर्यंत विकसित देशांत असे जे बदल होताना आपण पाहत होतो, नेमके तसेच बदल आपल्या देशात आज पाहायला मिळत आहेत, ही आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने उत्साहवर्धक बाब आहे.
पण अशा चांगल्या बदलांसोबत एक धोकाही अर्थव्यवस्थेत प्रवेश करत असतो, तो म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याची मानवी वृत्ती अधिकच वाढते. त्यामुळे वैयक्तिक कर्जाचे प्रमाण सतत वाढताना दिसते आहे. त्यामुळे कर्ज घेताना काय दक्षता घेतली पाहिजे, या विषयी जागर झाला पाहिजे.
अभिजीत कोळपकर यांचे ‘कर्जमुक्त व्हा’ हे पुस्तक योग्य वेळी वाचकांसमोर या पार्श्वभूमीवर आलेले आहे. श्री. कोळपकर हे स्वतः सीए आहेत आणि आर्थिक साक्षरतेविषयी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत त्यांचे ‘अर्थसाक्षर व्हा! ‘ हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झाले आहे.
धाडसी उद्योजक व व्यावसायिक आपली पत निर्माण करून कर्ज उभे करतात व आपला व्यवसाय सुरू करतात. तसेच स्वतःवर कर्जाचा बोजा उभा करतात व व्यवसाय नीट न चालल्यास ते अडचणीत येतात. त्यामुळे कित्येकदा कर्ज घेताना घ्यावयाची काळजी व त्याचा विनियोग कसा करावा व परतफेड करण्याची व्यवस्था याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
कर्जमुक्त व्हा।
लेखन, वाचन आणि प्रत्यक्ष कृती या तिन्हींचा विचार करून विविध उदाहरणांसह, तक्ते, सूत्रे, चित्रे आणि फ्लो-चार्टर्ड्स यांचा वापर केला आहे. स्मार्ट वर्कशीट्स आणि चेकलिस्ट यामुळे तुम्हाला लवकर कर्जमुक्त होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.
या पुस्तकात वापरलेली चित्रे, रकाने, चौकटी, फ्लो-चार्ट्स, सुभाषिते यामुळे कठीण विषयावरील वाटणारे हे पुस्तक सोपे झाले आहे. पुस्तक वाचायचे हे आपण जाणतो, पण कर्ज, व्याजदर, कर्जफेड असा जो आकड्यांचा किचकट खेळ आहे, तो थेट उदाहरणे देऊन रकान्यांमध्ये मांडल्यामुळे हे पुस्तक आपल्या कर्जशंकांसाठी ‘वापरण्याचे’ पुस्तक झाले आहे.
या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी लेखकाच्या ८ सूचना!
- थोडे वाचन झाल्यावर थांबा, स्वतःला विचारा: “मी यातून काय शिकलो आणि ते कसे वापरू शकतो? ” तुमच्या मनाला पटणारे मुद्दे पेन्सिल किंवा हायलायटरने अधोरेखित करा, यामुळे नंतर उजळणी करणं सोपं होईल.
- “मी कर्जमुक्त होणारच! ” हा सकारात्मक मंत्र रोज म्हणा. त्यातून नवी ऊर्जा निर्माण होईल.
- दर तीन महिन्यांनी तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या. पुस्तकातील टिप्समुळे कोणते बदल घडू शकतात ते पाहा.
- पुस्तक नेहमी डोळ्यांसमोर ठेवा तुमच्या टेबलावर, कपाटात किंवा अशा ठिकाणी जिथे ते रोज दिसेल. दिसताच प्रेरणा मिळेल.
- आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे एकट्याचं काम नाही. कर्जमुक्त होण्याच्या तुमच्या योजनांबद्दल कुटुंबासोबत चर्चा करा.
- पुस्तकात सांगितलेल्या कृती छोट्या टप्प्यांमध्ये विभागा आणि आचरणात सातत्य ठेवा.
- डायरी किंवा जर्नलमध्ये दर महिन्याला तुमच्या कर्जमुक्तीच्या प्रवासाची नोंद ठेवा. पुढच्या योजना आणि प्रगती याविषयी लिहा.
- कर्जमुक्त भविष्याची कल्पना करा: स्वातंत्र्य, मनःशांती आणि समाधान! हेच स्वप्न तुम्हाला पुढे नेणार आहे.
– – वाचकांच्या अर्थविषयक ज्ञानात मोलाची भर घालून त्यांचे आर्थिक नियोजन सोपे करणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





