मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ” – इंग्लिश लेखक : आर्थर सी ब्रुक्स मराठी अनुवाद : मेधा इनामदार ☆ परिचय –  शुभा रुद्र ☆

शुभा रुद्र

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ” – इंग्लिश लेखक : आर्थर सी ब्रुक्स मराठी अनुवाद : मेधा इनामदार ☆ परिचय –  शुभा रुद्र ☆

पुस्तक : स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ

लेखक : आर्थर सी ब्रुक्स 

अनुवाद : मेधा इनामदार

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठसंख्या:२५६

मूल्य- २९९

स्ट्रेंग्थ टू स्ट्रेंग्थ या पुस्तकाचा अनुवाद वाचतांना मनाला वेग येतो. हातात पुस्तक घेतले की वाचत राहावे वाटते.

जीवनाकडे कसं पहावं? विशेषतः पन्नाशीनंतर जीवन कसं असायला पाहिजे हे या पुस्तकात अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे.

वयाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर येणारी अस्वस्थता किंवा ‘आता पुढे काय? ‘ या याचे उत्तर या पुस्तकातून मिळते. अतिशय प्रगल्भ विचार या पुस्तकात वाचायला मिळतील. ‘क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स’ आणि ‘उलटी बकेट लिस्ट’ या संकल्पना मांडल्या आहेत.

क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स म्हणजे शिक्षण, अनुभव आणि सरावातून आयुष्यभर मिळवलेले ज्ञान आणि कौशल्ये वापरण्याची क्षमता होय.

यात शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान, भाषेवरचे प्रभुत्व आणि जुन्या अनुभवांच्या आधारे समस्या सोडवण्याच्या कौशल्याचा समावेश होतो.

वाढ हे बुद्धिमत्तेचे स्वरूप वयपरत्वे कमी न होता, उलट अनुभवामुळे वाढत जाते किंवा स्थिर राहते.

साठवणूक ही बुद्धिमत्ता आपल्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवलेल्या माहितीवर अवलंबून असते.

याचं जीवना महत्व म्हणजे व्यावसायिक नैपुण्य मिळवण्यासाठी आणि सामाजिक संवाद प्रभावीपणे साधण्यासाठी या बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असतो.

‘स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ’: यशाकडून सार्थतेकडे जाणाऱ्या प्रवासाचे परीक्षण

हे पुस्तक वयानुसार येणाऱ्या बदलांना ‘संधी’ म्हणून कसे पाहावे, याचे एक प्रगल्भ तत्त्वज्ञान आहे.

तीन मुख्य पैलू प्रकर्षाने समोर येतात:

बुद्धिमत्तेचे संक्रमण: ‘वेगा’कडून ‘शहाणपणा’कडे

सहसा वयानुसार निर्णयक्षमता मंदावते, अशी एक भीती असते. ‘फ्लुइड’ विरुद्ध ‘क्रिस्टलाइज्ड’ इंटेलिजन्सचा मुद्दा ही भीती घालवून देतो. तरुणपणीची बुद्धिमत्ता ही धावण्याची असते, तर ज्येष्ठत्वातील बुद्धिमत्ता ही ‘साठवलेल्या अनुभवांचे दान’ करण्याची असते. ‘कर्ता’ होण्यापेक्षा ‘मार्गदर्शक’ होण्याचा जो सल्ला दिला आहे, तो आजच्या स्पर्धात्मक युगात निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.

समाधानाचे नवीन गणित: ‘बेरीज’ नव्हे तर ‘वजाबाकी’

‘बकेट लिस्ट’ ही संकल्पना नेहमी काहीतरी मिळवण्याशी संबंधित असते. परंतु, तुम्ही स्पष्ट केलेली ‘उलटी बकेट लिस्ट’ ही संकल्पना या परीक्षणाचे मुख्य आकर्षण आहे.

इच्छांची वजाबाकी: “खरे समाधान = आपल्याकडे जे आहे / आपल्याला जे हवे आहे” हे सूत्र साधे असले तरी क्रांतीकारी आहे.

जेव्हा आपण भौतिक सुखांच्या मागे धावणे थांबवतो, तेव्हाच आपल्याला ‘स्थितप्रज्ञ’ अवस्थेचा अनुभव येतो.

आध्यात्मिक आणि भावनिक गुंतवणूक

सारांशात ‘नातेसंबंधांची गुंतवणूक’ आणि ‘आध्यात्मिक वानप्रस्थाश्रम’ यावर दिलेला भर भारतीय संस्कृतीशी सुसंगत आहे. हार्वर्डच्या संशोधनाचा दाखला देऊन तुम्ही हे सिद्ध केले आहे की, अखेरच्या टप्प्यात बँक बॅलन्सपेक्षा ‘भावनिक बॅलन्स’ अधिक कामी येतो. मृत्यूची जाणीव ही नकारात्मक नसून, ती वर्तमानातील प्रत्येक क्षण (उदा. फुलाचे सौंदर्य) अधिक सजगपणे जगण्यास प्रवृत्त करते, हा विचार खूप सकारात्मक आहे.

‘यश’ हे बाह्य जगासाठी असते, पण ‘सार्थकता’ ही स्वतःच्या समाधानासाठी असते. बीथोव्हेनचे उदाहरण, मर्यादा या अडथळा नसून त्या नवीन सृजनाची दारे उघडू शकतात.

थोडक्यात सांगायचे तर: “धावणे थांबवून, चालण्याचा आणि आसपासचे सौंदर्य पाहण्याचा” आनंद मिळवून देतो.

हे पुस्तक वाचकाला भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन ‘मी कोण आहे? ‘ आणि ‘माझ्या जगण्याचा उद्देश काय? ‘ या प्रश्नांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. आनंद हा बाहेरून मिळवण्यापेक्षा तो स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि इतरांच्या सेवेतून कसा मिळवता येतो, याचे मार्गदर्शन यात मिळते.

मिळवण्याच्या धडपडीत, राहून जातो जो स्वतःचा शोध,

कळत नाही कधी वाढतो, मनातला अस्वस्थ लोभ.

हव्यास सुटावा वस्तूंचा, आणि सोडून द्यावा खोटा थाट,

‘उलटी बकेट लिस्ट’ दाखवेल, समाधानाची नवी वाट.

नकोत आता ती ओझी, जी फक्त थकवा देतात मना,

त्यागून फोल दिखावा सारा, मुक्त जगूया प्रत्येक क्षणा.

रिते होताना हात आपले, अंतरी सुखाचा झरा फुटेल,

जेव्हा इच्छांचे ओझे सरून, खऱ्या आनंदाची गाठ सुटेल.

या पुस्तकाच्या अनुवाद करणाऱ्या मेधा इनामदार यांना मी पुढील लेखनासाठी शुभेच्छा देते. असंच अनुवाद करून वाचकांपर्यंत मौल्यवान विचारांचा खजाना पोहचू दे, तुमची लेखणी अशीच चालू राहू दे.

परिचय : शुभा रुद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन” – इंग्रजी लेखक : जेफरसन फिशर – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन” – इंग्रजी लेखक : जेफरसन फिशर – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन

 – – वाद नको संवाद साधा

आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर

लेखक : जेफरसन फिशर

अनुवाद: दीपक देवधर

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठे: २८८

किंमत – ३५०₹ 

तुमचं पुढचं संभाषण तुमचं आयुष्य बदलू शकतं, जर तुम्हाला नेमकं काय आणि कसं बोलायचं हे समजलं तर. लेखक जेफरसन फिशर त्यांच्या सोप्या आणि थेट पद्धतीने सांगतात की, वाद कमी करून संवाद कसा वाढवायचा. तणावपूर्ण प्रसंग असो, हाताळण्यास कठीण व्यक्ती असो किंवा तापलेली चर्चा असो, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि ठामपणे कसं बोलावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. योग्य वेळी योग्य शब्द वापरायला शिकलात तर तुमची नाती आणि तुमचं आयुष्य दोन्ही अधिक चांगलं होऊ शकतं.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?

वाद जिंकण्याऐवजी संवाद जिंकण्याचं तंत्र

तणावपूर्ण परिस्थितीत शांत आणि आत्मविश्वासाने उभं राहण्याचे मार्ग

स्पष्ट मर्यादा (boundaries) कशा आखाव्यात आणि ठामपणे कसं बोलावं

कमी बोलून जास्त परिणाम साधण्याची कला

संघर्षाचं रूपांतर वादात न होऊ देता तो सोडवण्याच्या प्रभावी पद्धती

मी हे पुस्तक का लिहिलं? लेखकाच्याच शब्दात

मी हे पुस्तक तीन कारणांमुळे लिहिलं आहे,

१. कारण माझ्या सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सनी याची मागणी केली. माझ्या मते, हे पुस्तक खरं तर त्यांचंच आहे.

२. कारण मला जे माहीत आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे, ज्यामुळे तुमचा पुढचा संवाद थोडा अधिक चांगला होऊ शकेल.

३. आणि तिसरं, माझ्या आयुष्यातील एक भाग माझ्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी, जपून ठेवण्यासाठी.

पण हे पुस्तक उघडण्यापूर्वी एक गोष्ट तुमच्यासमोर स्पष्टपणे मांडू इच्छितो. या पुस्तकातली संवादकौशल्यं ही कुठूनतरी उधार घेतलेली तत्त्वं नाहीत. काहीसा शास्त्रीय अभ्यास, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान किंवा वर्तनशास्त्र यासारख्या क्षेत्रांमधून आलेले काही संदर्भ असतीलही, पण बाकी सगळं मी स्वतःच्या आयुष्यातून, माझ्या बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या अनुभवांतून शिकलेलं आहे.

हे पुस्तक तुम्हाला कशी मदत करेल?

मी जरी एक खटला चालवणारा वकील असलो तरी या पुस्तकात तुम्हाला कायद्याचा कुठलाही भाग सापडणार नाही.

हे पुस्तक वकिलीबद्दल नाही, वकिलांबद्दलही नाही.

हे पुस्तक आहे, धाडसाने, उघडपणे बोलायला शिकण्याबद्दल. जे तुमच्या मनात आहे, ते मोकळेपणाने बोलताना जी थोडी भीती वाटते, ती स्वीकारूनही बोलायला शिकण्याबद्दल. जे वाटतंय तेच बोलणं आणि जे बोलताय तेच वाटणं.

ही गोष्ट आहे सोयीपेक्षा धाडस निवडण्याची, जरी हे करताना तुमचा आवाज कापत असला तरीही.

स्पष्ट बोलणं याचा अर्थ दुसऱ्याच्या भावना न जपणं असा नाही. थेट बोलणं म्हणजे स्वतःचा आणि समोरच्याचा आदर ठेवून, आपल्या गरजा स्पष्टपणे मांडण्याचं आत्मविश्वासाने घेतलेलं पाऊल.

ठामपणे बोलण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व आग्रही असण्याची गरज नाही, योग्य शब्दच तुमचं काम करतील.

हेच शब्द, हेच मार्गदर्शन हे पुस्तक तुम्हाला देईल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हे सांगायला हवं” –  लेखिका : सुश्री मृदुला भाटकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हे सांगायला हवं” –  लेखिका : सुश्री मृदुला भाटकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

पुस्तक : हे सांगायला हवे  

लेखिका : मृदुला भाटकर 

प्रकाशक : ग्रंथाली 

पुस्तकासाठी संपर्क क्र. : 9223466860

किंमत : ₹२५० एकूण पृष्ठे : १५४

माजी न्या. मृदुला भाटकर यांचे ‘हे सांगायला हवं’ हे पुस्तक त्यांचे पती रमेश भाटकर या प्रसिद्ध अभिनेत्यावर झालेल्या बलात्कार आणि विनयभंग आरोपाच्या कहाणी बरोबरच ते न्यायव्यवस्था, माध्यमांची भूमिका, सामाजिक धारणा, व्यावसायिक निष्ठा आणि वैवाहिक सहजीवनातील विश्वास यांच्या परस्परसंबंधांचा वेध घेणारे अनुभवकथन आहे.

पुस्तकाची पार्श्वभूमी अशी आहे की रमेश भाटकर यांच्यावर २००७ मध्ये बलात्काराचा आरोप झाला आणि त्यानंतर जवळपास सात वर्षे न्यायालयीन प्रक्रिया चालली. आणि नंतर खटलाच दाखल न झाल्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्याविरुद्धच्या अपीलात २०१४ मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांची निर्दोष मुक्तता कायम ठेवली. त्यामुळे या पुस्तकाकडे ‘रमेश भाटकर यांची बाजू’ म्हणून पाहण्यापेक्षाही एका कुटुंबाने बदनामीकारक आरोपाची सामाजिक किंमत कशी भोगली आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या संथ, गुंतागुंतीच्या प्रवासातून त्यांना कसे जावे लागले, त्याचा लेखाजोखा आहे.

या पुस्तकातील सर्वांत त्रासदायक विरोधाभास म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या निर्दोषत्वाची खात्री असते; कुटुंबीयांना सत्य माहीत असते; मित्रपरिवाराला त्या व्यक्तीवर विश्वास असतो; पण न्यायव्यवस्थेसमोर त्या सत्याचे रूपांतर पुराव्यात करावे लागणे हा आहे. त्यासाठी वेळ, प्रक्रिया, कागदपत्रे, साक्षी, कायदेशीर युक्तिवाद आणि न्यायालयीन निर्णय या सर्व कंटाळवाण्या टप्प्यांतून जावे लागते. ‘हे सांगायलाच हवं’ या अनुभवकथनाची वेदना याच ठिकाणी तीव्र होते. निर्दोष असणे आणि निर्दोष ठरवले जाणे या दोन वेगळ्या सामाजिक अवस्था आहेत, हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. याहून गंभीर प्रश्न माध्यमांच्या भूमिकेचा आहे. संबंधित कायदेशीर कागदपत्रांत ‘बलात्कार’ हा शब्द नसतानाही वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमांत त्या आरोपाचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख होत राहिला. न्यायालय पुराव्याच्या आधारे निष्कर्ष काढते; समाज मात्र अनेकदा बातमीच्या आधारे व्यक्तीबद्दल मत बनवतो. न्यायालयीन निर्णयाने एखादी व्यक्ती निर्दोष ठरली तरी तिच्यावर लागलेला सामाजिक डाग सहजासहजी धुतला जात नाही. प्रसिद्ध व्यक्तीच्या बाबतीत तर प्रसिद्धी हीच उलट शिक्षा ठरू शकते. मान्य आहे की, लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर आरोपांकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. तक्रारदाराचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. पण त्याचवेळी आरोपीला केवळ आरोपाच्या आधारावर दोषी ठरवणे हे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का देणारे असते.

मृदुला भाटकर यांच्याबाबतीत परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होती. त्या न्यायमूर्ती होत्या आणि त्याच वेळी रमेश भाटकर यांच्या पत्नी. त्यामुळे एका बाजूला वैयक्तिक नात्याची जबाबदारी होती, तर दुसऱ्या बाजूला न्यायिक पदाची व्यावसायिक निष्ठा. व्यक्तिगत भावबंध बाजूला ठेवून न्यायिक नीती आणि व्यावसायिक मर्यादा सांभाळणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती. न्यायाधीशाच्या वैयक्तिक संकटापेक्षा न्यायाधीश म्हणून आपली निष्पक्षता जपणे हे कठीण असते. म्हणूनच या पुस्तकात प्रेमाचा अर्थ केवळ भावनिक आधार असा राहत नाही. रमेश आणि मृदुला यांच्या नात्याची खरी परीक्षा याच काळात झालेली आहे. या संकटाच्या काळात एकमेकांवरील विश्वास टिकवणे ही भावनिक बाब असली, तरी त्याला सामाजिक आणि नैतिक अर्थही आहे. प्रसिद्धीच्या वलयात जगणाऱ्या व्यक्तीला अचानक संशयाच्या वर्तुळात उभे केले जाते तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहणे म्हणजे केवळ पती किंवा पत्नीच्या नात्याची पूर्तता नसते; ते व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर समाजाने केलेल्या आघातासमोर ठामपणे उभे करणे असते.

एखाद्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली म्हणजे त्या प्रकरणातील प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर मिळाले असे होत नाही. आरोप खोटा असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झाले असे गृहीत धरले तरी तो आरोप करण्याच्या मागे कोणता अज्ञात हात होता? त्याचा कोणता हेतू होता? रमेश भाटकरांवर केलेल्या आरोपाच्या आडून न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांना छळण्याचा तर हा प्रकार नव्हता ना? त्यातून कोणाला लाभ झाला? सामाजिक प्रतिमा उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया का घडली? हे प्रश्न पुस्तक वाचून संपवले तरी निरुत्तरितच राहतात. पुस्तकाच्या अनुभवातून निर्माण होणारी अस्वस्थता याच अपूर्णतेतून येते. त्यामुळे ही न्यायालयाची शोकांतिका आहे असे सखेद वाटत राहते. न्यायालयाला प्रत्येक सामाजिक अन्यायाचा शोध घेता येत नाही. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांवर आणि कायद्याने आखलेल्या चौकटीवरच त्याला निर्णय द्यावा लागतो हे जरी खरे असले तरी त्यामुळे या प्रकरणामागील अज्ञात सूत्रधाराचा उलगडा न होणे हे सज्जन माणसाचा बळी घेण्यासारखे आहे.

या पुस्तकाचे आणखी एक गंभीर बाब म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर गंभीर आरोप झाला की तो काही तासांत, काही दिवसांत हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. पण निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी वर्षे जाऊ शकतात. परिणामी न्यायालयीन विजय मिळाल्यानंतरही सामाजिक नुकसान पूर्णपणे भरून निघतेच असे नाही. प्रतिष्ठा ही काचेसारखी असते; तिला तडा जाण्यासाठी एक लहानशी अफवादेखील पुरेशी असते. ती प्रतिष्ठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मात्र वर्षानुवर्षे लागतात. भाटकर दाम्पत्याची याबाबतीत मानसिक आणि सामाजिक किती कुतरओढ झाली असेल हे पुस्तक वाचताना लक्षात येते. म्हणून ‘हे सांगायलाच हवं’ या पुस्तकाचा खरा केंद्रबिंदू रमेश भाटकर यांच्यावरचा आरोप एवढाच नाही. तो आहे आरोपानंतर माणूस म्हणून जगण्याची लढाई. प्रसिद्धी असलेला अभिनेता, न्यायमूर्ती असलेली पत्नी, कुटुंब, मित्र, समाज, माध्यमे आणि न्यायालय, या सर्वांच्या मध्ये ही दोन माणसे स्वतःचे आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यात प्रेम भावनिक आधार बनते, कायदा संघर्षाचे मैदान बनते आणि समाज अनेकदा न्यायाधीशाची भूमिका स्वतःकडे घेतो. पुस्तक वाचताना वाचकाची अस्वस्थता याच त्रिकोणातून जन्माला येते.

कायदा निकाल लावतो; पण समाजाच्या स्मृतीतील आरोप कित्येक वर्षे टिकून रहातो. म्हणूनच न्यायव्यवस्थेचा खरा अर्थ केवळ दोषीला शिक्षा देणे किंवा निर्दोषाला मुक्त करणे एवढाच सीमित नसतो; तर आरोप आणि अपराध, संशय आणि सत्य, बातमी आणि पुरावा, जनमत आणि न्याय यांच्यातील सीमारेषा समाजाने समजून घेणे हाही त्याचा भाग आहे. ‘हे सांगायलाच हवं’ हे पुस्तक याची जिवंत साक्ष आहे. त्यांनी न्यायालयीन लढाई तर जिंकली, पण काळ हा जरी औषध असला तरी त्या सात वर्षांच्या काळात समाजाने दिलेल्या वेदना कशा नष्ट होणार? लेखिकेने पुस्तक अत्यंत ओघवत्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे ते एकाच बैठकीत वाचून संपते; नव्हे वाचून संपल्याशिवाय बैठक मोडायची इच्छाच होत नाही. हे या पुस्तकाचे निर्विवाद यश आहे.

☆

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जे हवं ते मिळवा” – लेखक : गौर गोपाल दास ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जे हवं ते मिळवा” – लेखक : गौर गोपाल दास ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : जे हवं ते मिळवा 

लेखक : गौर गोपाल दास 

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे

पृष्ठ : ३२०

मूल्य: ३५०₹ 

आपल्यापैकी अनेक जण, आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता… अशी असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात. पण, खरंच हे सगळं आपण मिळवू शकतो का?

नोव्हेंबरच्या थंडीतील एका सकाळी गौर गोपाल दास जैसलमेरमध्ये आपला मित्र राकेश अरोरा यांच्या मुलाच्या तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभासाठी पोहोचतात. एक अनपेक्षित पाहुणा येतो आणि दोन कुटुंबांमध्ये फूट पाडण्याची शक्यता असलेले वादळ निर्माण होत असल्याचे गौर गोपाल दास यांच्या लक्षात येते.

गौर गोपाल दास चर्चेद्वारे यजमानांना आणि पाहुण्यांना शांत करतात. तसेच त्यांच्या आतमध्ये दडून बसलेल्या भीती आणि इच्छांनाही उलगडून दाखवतात. एवढंच नाही तर, स्वतःच्या जीवनामधील चढउतारांच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाद्वारे ते लोकांना योग्य आणि समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शनही करतात.

‘जे हवं ते मिळवा’ हे गौर गोपाल दास यांचं वैयक्तिक आणि गहन कथन आहे. महत्त्वाकांक्षा आणि समाधान, तसेच खरं असणं आणि केवळ भासवणं यांमध्ये अडकलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नवा दृष्टिकोन देणारं आहे. त्यांच्या खास विनोदबुद्धी, सहानुभूती आणि प्रभावी ज्ञानाने समृद्ध असलेलं हे पुस्तक ‘आपला दृष्टिकोनच आपलं जीवन घडवतो’ हे सांगतं. तसेच स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांच्यावर मात कशी करावी आणि जीवनप्रवासात स्वतःबद्दल करुणा कशी विकसित करावी, याचंही मार्गदर्शन करतं.

लेखकाचे मनोगत – – 

या पुस्तकात जीवन बदलवून टाकणारी दहा तत्त्वं एका रंजक कथेत गुंफलेली आहेत. या कथेमधील पात्रांमध्ये तुम्हाला कदाचित स्वतःचाच काही अंश दिसेल.

प्रत्येक प्रकरण वास्तविक कथा, भावना आणि अनुभवांवर आधारित आहे. या कथेची वाचनीयता टिकवून ठेवण्यासाठी काही तपशीलांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून बहुतेक नावं व ठिकाणं बदलली आहेत; परंतु त्यामागील सार आणि सत्य मात्र अबाधित आहे.

तुम्ही या कथांचा आणि त्यामधील ज्ञानाचा आनंद खुल्या मनाने घ्या. तसंच या अनुभवाचा व्यक्तिगत स्तरावर उपयोग करायचा असल्यास तसंच या तत्त्वांवर चिंतन करायचं असल्यास आणि ती आयुष्यामध्ये लागू करायची असल्यास मदत करतील अशा माहितीपत्रिकाही तुम्हाला या पुस्तकात मिळतील. वाचन प्रवास अखंडित राहावा याचीही काळजी घेतली आहे. जे लोक पेन आणि कागद यांचा वापर करतात अशा लोकांसाठी पुस्तकाच्या शेवटी या प्रकारची पत्रकं दिली आहेत. हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी तुमचा आंतरिक विकास आणि स्वतःला शोधण्याच्या यात्रेमध्ये मदत करण्यासाठी लिहिलं आहे

या पानांवरील चिंतन, सराव आणि कथा प्रेमाने व प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडल्या आहेत त्या तुमच्या प्रवासाला पूरक ठराव्यात या उद्देश्याने, तुमचा स्वतःचा निर्णय किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांची जागा घेण्यासाठी नव्हे. जे तुमच्या मनाला पटते ते स्वीकारा, जिथे गरज वाटेल तिथे थांबा आणि या प्रक्रियेला शांतपणे उलगडू द्या.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ग्लोकल लेखिका – लेखिका – संजीवनी खेर ☆ परिचय –  वीणा रारावीकर ☆

वीणा रारावीकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ ग्लोकल लेखिका – लेखिका – संजीवनी खेर ☆ परिचय –  वीणा रारावीकर ☆

पुस्तकावर बोलू काही : “ ग्लोकल लेखिका “

 (सशक्त लेखणीच्या वारसदार) 

लेखिका – संजीवनी खेर

प्रकाशक – ग्रंथाली

मुखपृष्ठ – विजयराज बोधनकर

पाने – ४५५

किंमत – ७५० रुपये

विसाव्या शतकाच्या अखेरीस ‘ग्लोबल व्हिलेज’ ही एक संकल्पना अस्तित्वात आली. तंत्रज्ञाच्या प्रगतीमुळे सर्व जग एक खेड आहे. जगभरात सर्व प्रकाराची देवाण घेवाण अतिशय वेगाने होते. पण २०० वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत जगभरातील स्त्रिया लेखन करत आहेत. आपल्या भावना मांडत आहेत. अशा जगप्रसिद्ध लेखिकांची ओळख या पुस्तकात एकाच ठिकाणी मिळते. संजीवनी खेर आणि ग्रंथाली यांनी सुरू केलेल्या ‘ग्लोकल लेखिका’ या पॉडकास्टचे रूपांतर पुस्तकात केले आहे.

ग्लोकल अर्थात ग्लोबल आणि लोकल यांचा संगम. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील त्या नावाला साजेसे असे आहे. चित्रात अथेन्सनगरीची ज्ञान व संरक्षणाची विदेशी देवी अथिनी आणि आपली बुद्धीची सरस्वती देवी, दौतीच्या लेखणीवर उभ्या आहेत. आणि जगप्रसिद्ध लेखिकेंच्या साहित्याबरोबर लेखिकेने त्यांच्या चरित्राची, जिथे त्यांचा जन्म झाला त्या प्रदेशाची, तेथील सामाजिक- कौटुंबिक वातावरण, त्यांची कर्मभूमी, त्यांच्यावर असलेल्या प्रभावाची- विचारसारणीची अशी सर्व अंगाने ओळख करून दिली आहे. यात काळ आणि परिसर यांचा खूप विस्तृत पट आहे. म्हणजे विश्वातील सर्व खंडांमधील लेखिकांचा यात परिचय आहे. काळाच्या पटात २०० वर्षांपूर्वीच्या कादंबरीबरोबर सद्य काळातील सुधा मूर्ती, अरुंधती रॉय या लेखिकांची माहिती आहे. या जगप्रसिद्ध ५० लेखिकांमध्ये २५ भारतीय ज्यात ४ मराठी लेखिका आहेत. लक्ष्मीबाई टिळक, मालतीबाई बेडेकर, दुर्गा भागवत आणि तारा भवाळकर या मराठी लेखिकांचा समावेश आहे. तर काही भारतीय लेखिकांची नावे – महाश्वेतादेवी, अमृता प्रीतम, इंदिरा गोस्वामी, महादेवी वर्मा, तमिळ लेखिका शिवशंकरी, पोपटी हिरानंदानी (सिंधी भाषिक लेखिका), चित्रा मृदगल, अंबई. यातील अनेक लेखिका आणि त्यांच्या साहित्याची नावे आपण ऐकलेली असतील. पण त्यापलीकडे जाऊन या सर्व लेखिकांच्या जीवनाबद्दलची माहिती या पुस्तकातून उलगडत जाते. यातील बहुतेक सर्व लेखिकांनी स्त्रियांविरुध्द होणारा अन्याय, अत्याचार यावर प्रकाश टाकला आहे. या लेखिकांनी स्त्री म्हणून आखलेली एक चौकट मोडून लेखन केले आहे. त्याला स्त्रीच्या मानवी भावनांची झालर आहे. म्हणून ते लेखन कालातीत आहे. तसेच या सर्व लेखिकांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष या पुस्तकात मांडला आहे. तो वाचताना डोळे ओले झाल्याशिवाय रहात नाहीत.

स्वेतलाना अलेक्सीविच ही बेलारूस मधील नोबेल पुरस्कार प्राप्त पत्रकार, लेखिका. तिच्या ‘अनवुमनली फेस ऑफ वॉर’ ह्या पुस्तकात स्वेतलानाने एक विदारक सत्य जगासमोर आणले आहे. दुसर्‍या महायुद्धात आठ लाख स्त्रियांनी भाग घेतला होता. इतिहासात या स्त्री सैनिकांच्या लखलखत्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा कुठेच नोंदवली गेली नाही. हा एक क्रूर अन्याय दूर करण्याचा स्वेतलानाने प्रयत्न केला आहे. शोध पत्रकारिकेतून स्वेतलानाने अनेक विषय पुस्तकारूपाने जगासमोर आणले. ‘लास्ट विटनेस’, ‘झिंक बॉईज’, ‘अनवुमनली फेस ऑफ वॉर’ ही तिची काही पुस्तके.

एलफ्रीडे येलीनिक या लेखिकेला २००४ साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. या ऑस्ट्रियन लेखिकेणे जर्मन भाषेतून लेखन केले आहे.

रूथ प्रावर झाबवाला ही मूळची जर्मन ज्यु. लग्नानंतर ती चोवीस वर्षे भारतात राहिली होती. तिने ५५ पुस्तक लिहिली. या सर्व पुस्तकात भारतीय वातावरणा आणि घरेलू संवेदनशीलता व्यक्त झाली आहे. तिने कादंबरी, लघुकथा, चित्रपट पटकथा अशा विविध प्रकारात लेखन केले आहे.

एमिली ब्रॉन्टे या इंग्लिश लेखिकेने केवळ एकच कादंबरी लिहिली आहे. ‘वुदरिंग हाईटस’. जिवंतपणी या लेखिकेला तिच्या लेखनाचे श्रेय मिळाले नाही. तरी आज दोनशे वर्षांनंतर देखील तिच्या लेखनाचा अभ्यास होत आहे. तिची कादंबरी लोकप्रिय आहे. यावरून त्या लेखिकेच्या लेखनाचे महत्व लक्षात येते.

ज्या लेखिका व त्यांचे साहित्य माहित आहे, त्या लेखिकेंच्या इतर साहित्याबद्दल माहिती या पुस्तकात मिळते. तसेच जगभरातील अनेक नवीन लेखिकेंच्याबद्दल माहिती मिळते. एक संदर्भ ग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाच्या लेखिका स्वतः पत्रकार आहेत. त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्वक, थोडक्यात तरीही महत्वाची सर्व माहिती यात आहे. पॉडकास्टसाठी लेखिका संजीवनी खेर यांनी घेतलेली मेहनत अतिशय कौतुकास्पद आहे.

या पुस्तकाला कुमार केतकर सरांसारख्या जेष्ठ पत्रकारांनी प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे यातील सर्व लेखिकांचा परिचय इथे करून देणे, अशक्य आहे. पुस्तकात क्यू-आर कोड दिलेला असल्यामुळे वाचकांना ऐकता देखील येईल.

परिचय : वीणा रारावीकर

दक्षिण मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भूतकाळापासून मुक्ती वर्तमानाशी मैत्री” – इंग्लिश लेखक : डॉ. निकोल लेप्रा मराठी अनुवाद : मेधा इनामदार ☆ परिचय –  शुभा रुद्र ☆

शुभा रुद्र

अल्प परिचय 

बत्तीस वर्षे ड्रॉइंग टीचर म्हणून काम केले

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भूतकाळापासून मुक्ती वर्तमानाशी मैत्री” – इंग्लिश लेखक : डॉ. निकोल लेप्रा मराठी अनुवाद : मेधा इनामदार ☆ परिचय –  शुभा रुद्र ☆

पुस्तक : भूतकाळापासून मुक्ती वर्तमानाशी मैत्री

लेखक: डॉक्टर निकोल लेप्रा

अनुवाद: मेधा इनामदार 

प्रकाशन: मायमिरर पब्लिशिंग हाऊस

मूल्य: ३३५/₹

पृष्ठ संख्या: ३५२

पुस्तकातील प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करताना जाणवते सारांश अत्यंत सखोल आणि प्रभावी आहे. डॉ. निकोल लेपेरा यांच्या ‘How to Do the Work’ या पुस्तकातील या संकल्पना मानवी स्वभाव आणि नातेसंबंधांवर नेमके बोट ठेवतात.

स्व-जाणीव आणि आंतरिक परिवर्तनाचा प्रवास

हे पुस्तक प्रामुख्याने ‘पुनर्पालकत्व’ आणि ‘मर्यादारेषा’ यांद्वारे मानसिक मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवते.

यातील मुख्य विचार 

१. बालपणातील आघात आणि अहंकाराचे कवच

आपल्या प्रौढपणातील वर्तणुकीचे मूळ बालपणीच्या संस्कारांत असते. पालकांकडून झालेले दुर्लक्ष किंवा आघातांमुळे आपल्यात एक ‘दुखावलेले लहान मूल’ दडलेले असते. या जखमांपासून वाचण्यासाठी आपला ‘अहंकार’ एक संरक्षणात्मक कवच तयार करतो. स्वतःला बदलण्यासाठी या अहंकाराला शत्रू न मानता, त्याला त्रयस्थपणे ओळखून त्याशी मैत्री करणे आवश्यक आहे.

२. मर्यादारेषांचे महत्त्व

नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनिक ओझे कमी करण्यासाठी स्पष्ट मर्यादारेषा आखणे गरजेचे आहे. या मर्यादा म्हणजे भिंती नसून, स्वतःचा स्वाभिमान जपण्याचे मार्ग आहेत.

प्रकार: ताठर, सैल किंवा लवचिक.

अंमलबजावणी: स्वतःच्या गरजा ओळखून ‘नाही’ म्हणायला शिकणे आणि ‘मी’ भाषेचा वापर करून स्पष्ट संवाद साधणे. सुरुवातीला अपराधी वाटले तरी मानसिक आरोग्यासाठी हे अनिवार्य आहे.

३. पुनर्पालकत्व: स्वतःचे पालक होणे

ज्या भावनिक गरजा पालकांकडून पूर्ण झाल्या नाहीत, त्या आता स्वतः पूर्ण करणे म्हणजे ‘पुनर्पालकत्व’. याचे चार आधारस्तंभ आहेत:

भावनिक नियंत्रण: भावनांचे निरीक्षण करून शांत राहणे.

स्व-शिस्त: स्वतःला दिलेली छोटी वचने पाळणे.

स्व-काळजी: शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे.

आनंद : छंद जोपासून बालसुलभ निरागसता जपणे.

म्हणजेच जुन्या सवयी आणि ‘ट्रॉमा बाँड्स’ तोडून स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख करून घेणे, हाच या उपचाराचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाचा गाभा 

१. बालपणातील आघातांचा प्रभाव 

आपल्या प्रौढ आयुष्यातील अनेक मानसिक समस्यांचे मूळ बालपणातील दुर्लक्ष, अत्याचार किंवा चुकीच्या संगोपनात असते. यामुळे मनात अपराधीपणा, न्यूनगंड आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. लेखकाने सुप्त मनातील ‘लहान मुलाचे’ सात प्रकार सांगून आपण नकळत कोणत्या स्वभाववैशिष्ट्यांच्या आहारी जातो, हे स्पष्ट केले आहे.

२. नात्यांचे स्वरूप आणि ‘ट्रॉमा बाँड’ 

लहानपणी पालकांशी असलेले नाते (सुरक्षित किंवा असुरक्षित) आपल्या भविष्यातील नात्यांची दिशा ठरवते. ‘ट्रॉमा बाँड’मुळे माणूस नकळत अशा व्यक्तींकडे किंवा सवयींकडे ओढला जातो ज्या त्याला वेदना देतात. हे एखाद्या व्यसनासारखे असते, जिथे स्वतःचे नुकसान होत असूनही माणूस त्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकत नाही.

३. अहंकाराची भूमिका 

अहंकार हा प्रत्यक्षात एक ‘संरक्षणात्मक कवच’ आहे, जो आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हाच अहंकार आपल्याला टोकाचे विचार करायला लावतो आणि बदला घेण्यास प्रवृत्त करतो. अहंकाराला शत्रू न मानता त्याला एक नाव देऊन (उदा. जेसिका) त्याच्यापासून अलिप्त राहणे आणि त्याच्या हालचालींचे तटस्थपणे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

४. मुक्तीचा मार्ग आणि उपाय 

भूतकाळातील जखमांतून मुक्त होण्यासाठी खालील तीन पावले महत्त्वाची आहेत:

स्वीकार आणि संवाद: आपल्यातील ‘दुखावलेल्या लहान मुलाचा’ स्वीकार करून त्याच्याशी संवाद साधणे.

जागरूकता प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ थांबून आपल्या विचारांचे निरीक्षण करणे.

अभिव्यक्ती: जर्नललिंग किंवा पत्राद्वारे आपल्या भावनांना वाट करून देणे.

थोडक्यात: हे लेखन आपल्याला आपल्या भूतकाळातील जखमा शोधायला, त्या स्वीकारायला आणि अहंकाराच्या पाशातून मुक्त होऊन वर्तमानात जाणीवपूर्वक जगण्याची प्रेरणा देते.

भावनिक प्रगल्भता आणि स्व-उपचार

१. भावनिक प्रगल्भता आणि नियंत्रण:

भावनिक प्रगल्भतेचा वयाशी संबंध नसून ती स्वतःच्या भावना समजून घेण्याची प्रक्रिया आहे. अतिसंवेदनशीलता किंवा भावना दडपणे ही अपरिपक्वतेची लक्षणे आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लेखकाने ‘१० सेकंदांचा नियम’ सुचवला आहे, ज्यामुळे मेंदूला शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. तसेच, स्वतःच्या भावनांसाठी इतरांना जबाबदार न धरता त्यांचा स्वीकार करणे आणि ध्यानाद्वारे मानसिक स्थिरता मिळवणे आवश्यक आहे.

२. कृती आणि समुदायाचे महत्त्व:

मानसिक शांततेसाठी केवळ विचार न करता कृतीवर भर दिला पाहिजे. यात लेखन सराव, निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि गरज पडल्यास मदत मागणे समाविष्ट आहे. ‘स्व-उपचार गटांमुळे’ एकटेपणा दूर होऊन सुरक्षितता मिळते. नात्यांमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख जपून पारदर्शकता निर्माण करणे प्रगल्भतेसाठी गरजेचे आहे.

३. स्वतःचे उपचारक व्हा:

डॉ. निकोल लेप्रा यांच्या मते, आपण आपल्या भूतकाळातील आघातांतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच स्वतःचे सर्वोत्तम उपचारक होऊ शकतो. शरीराच्या गरजा ओळखणे आणि अहंकाराचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. लेखिकेने ‘पिझ्झा बॉक्स’च्या उदाहरणातून स्पष्ट केल्याप्रमाणे, आपल्याकडे नकारात्मक सवयी बदलण्याचा ‘पर्याय’ नेहमी उपलब्ध असतो. थोडक्यात, परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिक्रियेत बदल करणे हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे.

परिचय : शुभा रुद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विकसित भारत २०४७” – लेखक : डॉ. शरद कुंटे – लेखक : श्री ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विकसित भारत २०४७” – लेखक : डॉ. शरद कुंटे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

 

पुस्तक : “ विकसित भारत २०४७”

– – सुखी, समृद्ध, समरस, संघटित, समर्थ, अखंड भारत

लेखक: डॉ. शरद कुंटे

पृष्ठः २८५

मूल्य: ३५०₹ 

भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतासमोर अजूनही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि पायाभूत विकासाची अनेक आव्हाने आहेत. २०४७ हे भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष आहे. त्या टप्प्यापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभे करण्याची कल्पना आज राष्ट्रीय विकासाच्या चर्चेचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, तरीही अजून भारतातील जनता आपल्या मूलभूत समस्या सोडवण्यातच गुंतलेली आहे. युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश विकास प्रक्रियेमध्ये आपल्या कितीतरी पुढे जाऊन पोचलेले आहेत.

जगातील सर्व प्रगत देशांची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून बरीच मोठी मजल मारावी लागणार आहे. 2022 च्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली, की आगामी २५ वर्षांमध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनेल व आज असलेल्या युरोप अमेरिकेतील विकसित देशांच्या मांडीला मांडी लावून बसेल! प्रत्यक्ष हा पल्ला गाठण्यासाठी भारताला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये किती वेगाने प्रगती करावी लागेल याचा आराखडा करण्याचे काम आता देशभर सुरू झालेले आहे. आपल्या हाताशी असलेल्या साधनसामग्रीचा, आपल्या देशात असलेल्या बौद्धिक कौशल्याचा व देशाचा विकास घडवून आणण्यासाठी युवकांमध्ये जागृत झालेल्या ऊर्जेचा उपयोग करून घेऊन आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे प्रगती करता येईल याची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

जागतिक बँकेने विकसित देशाचे जे आयाम निश्चित करून दिलेले आहेत, ते सर्व आयाम 2047 पर्यंत पूर्ण करण्यासाठी भारताला कशाप्रकारे वाटचाल करावी लागेल, याचा प्रत्येक आयामानुसार आराखडा या पुस्तकांमध्ये संग्रहित केलेला आहे. विकासाची वाटचाल तर प्रत्यक्ष सुरू झालेली आहे व आपण अपेक्षित असलेला प्रगतीचा हा टप्पा निश्चितपणे गाठू असा आत्मविश्वास राज्यकर्त्यांना, देशातील शास्त्रज्ञांना, उद्योजकांना व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निश्चितपणे वाटतो आहे. आज देशाच्या विकासासंबंधी असलेली वस्तू स्थिती व आगामी काळात आपल्याला करावयाचा प्रवास यासंबंधीचे या पुस्तकात आलेले विवेचन देशातील वाचकांना प्रेरणादायक ठरेल असा मला विश्वास वाटतो.

हे पुस्तक केवळ भारताच्या विकासाचे स्वप्न मांडत नाही; तर विकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये आणि भारताला त्या दिशेने कोणत्या प्रकारची वाटचाल करावी लागेल, याचा विषयवार विचार करते. पुस्तकात भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, मानवी कौशल्य, राष्ट्रीय सामर्थ्य आणि विविध विकासपरिमाणांचा विचार करण्यात आला आहे. “सुखी, समृद्ध, समरस, संघटित, समर्थ, अखंड भारत” ही या पुस्तकाच्या विचारांची व्यापक दिशा आहे

या पुस्तकातील प्रमुख विषय – – 

 – विकसित भारत २०४७ची संकल्पना 

 – आर्थिक विकास आणि समृद्धी

 – शिक्षण व ज्ञानाधारित समाज

 – विज्ञान आणि तंत्रज्ञान

 – बौद्धिक संपदा आणि नवोन्मेष

 – उद्योग आणि उत्पादनक्षमता

 – युवकशक्तीचा विकास

 – शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास

 – पायाभूत सुविधांची आवश्यकता

– सामाजिक समरसता आणि संघटन

– भारताचे राष्ट्रीय सामर्थ्य

– जागतिक स्तरावर भारताची भूमिका

– २०४७ पर्यंतच्या भारतासाठी दीर्घकालीन विचार

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  द अल्टिमेट इन्व्हेस्टर “…

गोष्ट जन्मजन्मांतरीची

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट 

लेखक : आशिष मुळे 

प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे 

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की काही अवांतर वाचन करणे शक्य नव्हते. त्यानंतर वाचनासाठी वेळ उपलब्ध झाला. पण वाचायचे इतके राहिले होते की कुठून सुरुवात करावी हे समजानेसे झाले होते. त्यामुळे आवडीचा विषय–कविता– आणि त्यासंबंधीचे साहित्य वाचायला घेतले. पण बरेच वर्षे कादंबरी मात्र वाचनात आली नव्हती. आणि अचानकपणे एक नवी कोरी कादंबरी हातात आली. कादंबरीही नवीन आणि लेखकही नवीन. तरीही ती वाचण्याचा योग येईना. अखेर काही दिवसांपूर्वी वाचून झाली. मात्र मनाला एक गोष्ट पटेना. ती म्हणजे लेखकाची म्हणजे श्री. आशीष मुळे यांची ही पहिलीच कादंबरी आहे. एखाद्या अनुभवी लेखकाने कथानक गुंफत जावे, नवीन पात्रे त्यात वाढत जावीत, मूळ कथानकाशी एकरूप व्हावीत आणि कथानक अगदी शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारे होत जावे… ही भट्टी नव्या लेखकाला जमू शकते हे आशिष यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी संपूर्ण कथानकाचा आवाका आणि त्यातून व्यक्त करायचा असलेला आशय प्रथम लेखकाच्या मनात स्पष्ट असायला हवा. श्री आशिष मुळे यांना ते साधले आहे याबद्दल शंका नाही.

श्री आशिष मुळे

खरं तर ही एक कादंबरी नसून एकात एक गुंफलेल्या दोन कादंब-या आहेत. एकीकडे राघव आणि सायली, शिरीन यांची कथा आणि त्याच वेळेला हळूहळू फुलत जाणारी निम आणि नादिया यांची कथा. दोनही कथानकांना पोषक असे वातावरण, त्यानुसार पात्र निर्मिती आणि त्याला उचित ठरेल अशी भाषाशैली… त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय निसर्ग, शहरी वातावरण, हिमालयाचे वर्णन, संवादाची भाषा या बाबतीत अचूकता आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक विचारांची असलेली किनार! दोन्ही कथानकांमध्ये समतोल साधून मूळ सूत्र सुटू न देता कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

आवश्यक त्या ठिकाणी गंभीरपणे व्यक्त केलेले विचार हे लेखकाच्या परिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ, सागराला उद्देशून काढलेले उद्गार पहा :

“माणसाचा दुराभिमान आणि अहंकार क्षणात नाहीस करण्याचं आणि त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे “. किंवा

“आदमी बादशाह नहीं है, वक्त बादशाह है |” हे वाक्य.

तर दुसरीकडे, ‘ दारुडा माणूस सगळं विसरत असला तरी स्वतःच्या घरी व्यवस्थित कसा काय पोचतो? ” असा मजेशीर पण खरा प्रश्न त्यांना पडतो. पुढे बिलावाला यांच्या मृत्यूच्या प्रसंगी राघवच्या तोंडी आलेले

“मृत्यू थांबवण्याचं काम विज्ञान करु शकत असेल पण मृत्यू टाळण्याचं नाही. ” हे वाक्य आपल्याला नकळत एका सत्याची जाणीव करून देते. इनव्हेस्टसंबंधी ‘ बेसीक रुल ‘ राघवच्या तोंडून सांगताना लेखकाच्या अंगभूत व्यावसायिक विचारांची दिशा दिसून येते. तसेच अध्यात्माविषयी आचार्यांनी मांडलेले विचार हे लेखकाच्या अध्यात्म विषयक चिंतनाचे प्रकटीकरण आहे हे जाणवते.

कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लेखकाने केलेले वर्णन, विवेचन, संवाद वाचल्यानंतर महाभारतातील पांडवांच्या अखेरच्या प्रवासाच्या वर्णनाची आठवण होते. या अखेरच्या लिखाणात दोन जन्मांची घातलेली

सांगड अत्यंत कठीण पण कौशल्यपूर्ण आहे. गुंतवणूक संबंधी असलेल्या आपल्या व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव, चिंतनशीलतेची जोड, मातोश्रींकडून आलेले लेखनाचे कौशल्य, जगण्याकडे पाहण्याचा चौकटी पलीकडचा दृष्टिकोन या सर्वांच्या घुसळणीतून मिळालेले ‘ रिटर्नस’ म्हणजे *द अल्टिमेट इन्व्हेस्टर.. गोष्ट जन्मजन्मांतरीची*.. असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते.

अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माझी जडणघडण” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माझी जडणघडण” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक : माझी जडणघडण

लेखिका ~ सौ. राधिका भांडारकर, पुणे

प्रकाशक ~ सौ. अलका भुजबळ, न्यूज स्टोरी पब्लिकेशन्स

 संपादक ~ श्री. देवेंद्र भुजबळ

 निर्मिती ~ ग्रंथाली, माहीम, मुंबई

 मुखपृष्ठ~ सौ राधिका भांडारकर (ए आयच्या सहाय्याने)

न्यूज स्टोरी टुडे या श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या सौ. राधिका ताई भांडारकर यांच्या *माझी जडणघडण* या लेखमालेच्या पहिल्या भागानेच मला जितके आक्रुष्ट केले तितकेच पोर्टलच्या सर्व वाचकांनाही केले. प्रस्तावनेत संपादकांनी सांगितल्याप्रमाणे या सदराचे ७८ भाग दीड वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झाले. एकेक भाग वाचताना वाचक त्यात इतके तल्लीन झाले होते की, सोमवार कधी उजाडतो आणि राधिका ताईंच्या जडणघडणीचा पुढील भाग कधी वाचावयास मिळतो असे सर्वच रसिक वाचकांना होऊन गेले होते. ही मालिका संपूच नये असेही आम्हा वाचकांना मनापासून वाटत होते.

सौ. राधिका भांडारकर

माझी जडणघडण हे पुस्तक म्हणजे लेखिकेचे आत्मचरित्र नव्हे, तर ते एक आत्मकथन आहे. आजवरच्या आयुष्यात तिच्या जीवनात अगदी बालपणापासून जी नानाविध माणसे आली, अनेक प्रकारचे जे अनुभव आले, त्यातून लेखिका कशी घडत गेली याचे एक सुंदर चित्र म्हणजे *माझी जडणघडण* हे पुस्तक असे या पुस्तकाविषयी एका वाक्यात सांगता येईल.

[ ] धोबी गल्ली या पहिल्याच माळेत लेखिका तिच्या बालपणातील काही रम्य, ह्रद्य अशा आठवणी सांगते. धोबी गल्लीतलं त्यांचं ते छोटसं घर, त्यांचा शेजार, बालपणीचे गल्लीतले सवंगडी या सर्वांविषयी वाचताना आपणही आपल्या बाल्यात अगदी सहज शिरतो आणि त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्या वाट्याला येतो. लेखिकेने *”आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं* ” अशी सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष जीवनात सगळ्यांचीच घरे बदलतात. लग्न होऊन सासरी गेल्यावर, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदल्यांमुळे, लहान घरातून मोठ्या घरात जाताना, इत्यादी विविध कारणांनी आयुष्यात घरे बदलण्याचा अनुभव प्रत्येकच वाचकाने घेतला असेल. ही गोष्ट मात्र सत्य आहे की आपल्या स्वप्नात नेहमी आपले पहिलेच घर दिसते. सांगायचा मुद्दा हा की सुरुवातीपासूनच वाचक लेखिकेच्या आयुष्यातील घटनांशी असा सहज जोडला जातो. हे कथन वाचताना, अरे माझीही कथा याहून काही फार वेगळी नाही असे वाटू लागते आणि त्यामुळेच पुढे वाचण्याची उत्कंठा वर्धित होते.

संस्कार बाल्यावस्थेतच होत असतात आणि त्यानुसार बालक हळुहळू घडत जाते. लेखिकेला नेमके हेच सांगायचं आहे. त्या म्हणतात की मोठ्यांचा मान ठेवणे, रीती परंपरा पाळणे, नम्रता, सत्य वदणे वगैरे हे संस्कार आहेतच पण याहूनही त्यांना वेगळे काही सांगायचे आहे. त्यांच्या मते संस्काराची व्याख्या, *”संस्कार म्हणजे स्वतः केलेले निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली- वाईट, भली- बुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रीतीने शोधणं. ते शोधता येण्याची क्षमता म्हणजे संस्कार. * ” अत्यंत प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांनी केलेल्या संस्कारांच्या या व्याख्येतून वाचकांना घडते.

शाळा, कॉलेज, त्यांची बँकेतील नोकरी यातून त्यांच्या आयुष्यात ज्या नानाविध स्वभावाच्या व्यक्ती आल्या त्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार सखोल निरीक्षण केले आहे. त्यातूनच अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे त्यांना ज्ञान मिळत गेले आणि आज ताठ मानेने उभ्या असलेल्या राधिकाताई घडल्या असे मला म्हणावेसे वाटते.

त्यांच्या विद्यार्थी जीवनातील अनेक रंगी किस्से वाचताना वाचक अगदी गुंगून जातो.

लेखिका जडणघडणीच्या एका प्रकरणात वाचकांना सांगते की माणसाला भांडता सुद्धा आलं पाहिजे, आणि हा धडा त्यांना त्यांच्या तीर्थ रूपांकडूनच मिळाला होता. त्या लिहितात, ” *एकीकडे शालिनीता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असे न बोलणे अशा तऱ्हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘ तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे’ असं जेव्हा पप्पा सांगायचे तेव्हा या विरोधाभासाची नुसती गंमत नव्हे तर आश्चर्यही वाटायचं. ” कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही हीच शिकवण त्यांना लहान वयात मिळाली होती. याविषयी त्यांनी केवळ गणित वेगळ्या पद्धतीने सोडवल्यामुळे बाईंनी त्यांचे गणित चूक दिले, आणि लेखिकेने ती चूक नव्हती, ती कशी बरोबर होती हे बाईना पटवून दिले, हा किस्सा मनोवेधक वाटतो.

जीवनात या अशा बाळकडूची किती आवश्यकता असते याची जाणीव आज परिपक्व झाल्यावर वाचकांनाही नक्कीच आली असेल.

कुटुंबातील माणसे, मित्र-मैत्रिणी, शिक्षक वर्ग, भोवतालचा समाज, पुस्तके, रेडिओ या सर्वांचाच लेखिकेच्या जडणघडणीवर फार मोठा प्रभाव कसा आहे हे त्यांनी सांगितलेल्या एकेक रंगतदार किश्यांवरून, त्यांच्या अनुभवांवरून आपल्याला जसजसे वाचत जातो तसतसे उलगडत जाते. त्यांच्या आयुष्यातील काही खास व्यक्तींवर त्यांनी स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात लिहिल्याचे आढळून येते. यात त्यांचे वडील, जीजी, आजोबा, वहिनींसारख्या शेजारी, रत्नाकर मतकरींसारखे साहित्य गुरु, आप्पा, वासंती वगैरे लेखांना विशेष महत्त्व आहे.

जीजीचे (लेखिकेची आजी) स्थान लेखिकेच्या आयुष्यात अनमोल आहे, हे त्यांनी वर्णिलेल्या जिजीच्या व्यक्तिमत्वावरून आपल्या लक्षात येते. लहान असताना त्यांना त्यांच्या मोठ्या टपोर्‍या डोळ्यांवरून, त्यांच्या श्यामल वर्णावरून काही लोक हिणवीत असत, या गोष्टीचे त्यांना फार वाईट वाटायचे, परंतु त्यांची एक आजीच होती जी त्यांना “विठोबा सुद्धा काळाच होता” “तुझे डोळे तर तुझी ओळख आहे” असे सांगून त्यांच्या मनाला उभारी देत 

असे. राधिकाताईंच्या जडणघडणीत जिजीचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. (राधिका ताईंचे जीजी हे जीजी चे जीवन कथा सांगणारे पुस्तक अवश्य वाचावे)

त्यांची हरवलेली लहान बहीण केवळ ढग्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डोळ्यांवरून विमलताई रांगणेकर या ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेविकेने ओळखावी आणि हरवलेल्या मुलांना घरी घेऊन यावे, हा त्यांच्या आयुष्यातील प्रसंग खरोखरच अविस्मरणीय असा आहे.

त्यांना लहानपणी, ” श्रावण भेटायचा तो तोंड पाठ केलेल्या बालकवी, बा भ बोरकर, पाडगावकर, यांच्या कवितांतून. , ” श्रावण महिन्यातील एकेका सणांचे त्यांनी जगलेले क्षण फारच वाचनीय आहेत. हे वाचताना मला राधिका ताईंना *शब्दांची धनी* अशी संज्ञा द्यावीशी वाटते.

लग्न हे मुला मुलींच्या, विशेषतः मुलींच्या जीवनातील फार मोठे स्थित्यंतर असते. राधिकाताईंनीही हा अनुभव घेतला. आई-वडील आजी आणि बहिणी या छोट्याशा कुटुंबातून त्या लग्न होऊन मोठ्या कुटुंबात गेल्या, शहरी वातावरणातून अंमळनेर सारख्या ग्रामीण वातावरणात त्यांना मिसळायचे होते. माणसे निराळी, भोवतालचे वातावरण निराळे, उठण्या बसण्याची पद्धत निराळी, अशा परिस्थितीत त्यांचे या जडणघडणीतले एक एक अनुभव मनाला मोहवून टाकणारे आहेत.

लहानपणी आई-वडिलांकडून आणि विवाहानंतर सासू-सासर्‍यांकडून बरेच काही शिकत असतो हे त्यांचे मत आपल्याला पटते. राधिका ताईंच्या जीवनात त्यांच्या सासूबाईंचा वाटाही फार मोठा आहे. त्यांच्यावरचे खानदेशी संस्कार त्यांच्या सासूबाईंकडूनच झालेले आहेत.

राधिका ताई त्यांच्या आई या प्रकरणाची सुरुवातच ” मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले ” अशी करतात. लेखिका ही कोणी वेगळी आई नाही. आई झाल्यावर आईची वेगवेगळी रूपे त्यांना उलगडत गेली. सगळ्यात कठीण काळ म्हणजे मुलाला नोकरावर सोपवून कामाला जाणे. काय घालमेल होते जीवाची? प्रत्येकच वाचक आईचा हा अनुभव आहे. वाचताना भावूक व्हावयास होते.

जळगावला मांडलेला स्वतंत्र संसार, दोन मुलींचा जन्म, बँकेतील नोकरी, मुलींचे परदेश गमन, त्यांचे विवाह नातवंडे या सर्व गोष्टी एका मध्यमवर्गीय पठडीतल्या असल्या तरी वाचताना हे आपलेच जीवन आहे ही भावना निर्माण होते त्यामुळे ही जडणघडण आपलीच आहे या जवळिकतेने वाचनात आपण मग्न होतो.

खरं सांगायचं तर जडणघडणीच्या एक एक लेखा विषयी लिहावे तेवढे थोडेच आहे, परंतु सगळ्या ७८ भागांवर लिहिणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यापेक्षा वाचकांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि वारंवार वाचत जावे असा मला सल्ला द्यावासा वाटतो.

सौ. राधिका ताई या अतिशय दमदार अशा लेखकांपैकी एक आहेत. त्यांची प्रवाही भाषा वाचकांचे रंजन करते यात संशयाला जागाच नाही. वैशिष्ट्यपूर्ण शब्दप्रभुत्व त्यांच्यापाशी आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आतापर्यंत त्यांचे पाऊल, आंतर्बोल, लव्हाळी, गमभन, अंश इत्यादी अनेक कथा व ललित लेखांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्यांच्या जीजी या पुस्तकाला तितीक्षा पुरस्कारही मिळाला आहे.

या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिकेचे मला आणखी कौतुक करावेसे वाटते की त्या कालानुरूप चालणाऱ्या आहेत, अभ्यासू आहेत. त्यांना शेक्सपियर, कालिदास समजतो, तसेच आजची कृत्रिम बुद्धिमत्ताही(AI) समजते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी एआय च्या मदतीने स्वतः बनविले आहे.

राधिका ताई तुमचा हा लेखन प्रवास असाच अखंड चालू राहण्यासाठी माझे तुम्हाला अनेकोत्तम आशीर्वाद.

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “घेई छंद” — लेखक : सुबोध भावे — शब्दांकन : अभय इनामदार ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “घेई छंद” — लेखक : सुबोध भावे — शब्दांकन : अभय इनामदार ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

पुस्तक : घेई छंद

लेखक : सुबोध भावे 

शब्दांकन : अभय इनामदार 

प्रकाशक: सुनिता नांदुरकर, रसिक आंतरभारती 

सहप्रकाशक: मनोज अडसूळ.. ग्राफ्ट पब्लिकेशन्स 

बालगंधर्व, ” ‘लोकमान्य’ टिळक आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात भूमिका केलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या सुबोध भावे यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या लेखांचा संग्रह..

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपण सुबोध भावे यांना ओळखतो. या पुस्तकाचे शब्दांकनकार अभय अरुण इनामदार आहेत.

प्रकाशकाच्या मनोगतात पुस्तक ‘उस्ताद’ असतात, जसं ‘उस्ताद’ ठरलेल्या वेळी रियाज करतात आणि शागिर्द समोर बसून ऐकतात. तसे हे पुस्तक व्यक्तीकेंद्रित न करता विचारकेंद्रित आहे..

पुस्तकाच्या अंतरंगात पाच विभाग केलेले आहेत..

पहिल्या विभागात सुबोध भावे यांनी त्यांची वैयक्तिक जडणघडण कशी झाली यावर भर दिला आहे. बालपणापासून पुण्यात वास्तव्य असल्यामुळे नाट्य, साहित्य क्षेत्र चांगले माहिती होते. लहानपणी शाळेत असताना नाटकात फारसा सहभाग घेतला नव्हता. परंतु कॉलेजला गेल्यानंतर रंगमंचावर त्यांचे मन रमले. कसं बसं कॉमर्स कॉलेज चालू होतं, पण नाटकात अधिक इंटरेस्ट होता. पुरुषोत्तम करंडक हा मानाचा करंडक कॉलेजला मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार होता. पुढे या क्षेत्रातच त्यांनी प्रगती केली. हळूहळू टीव्हीवरील मालिकांमध्ये प्रवेश केला. पुण्यात भरत नाट्यगृहाच्या कट्ट्यावर बसून नाटकाच्या चर्चा करणे चालू असे. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. जिच्याशी त्यांनी लग्न केले त्या मंजिरीने घराची बाजू सांभाळून धरली. आणि सुबोध भावे नाट्य-चित्रक्षेत्रात पूर्णपणे शिरले!

बालगंधर्वांची व्यक्तिरेखा साकार करताना त्यांना अनेक गोष्टींची जाणीव झाली. नाटकासाठी किंवा त्या सिनेमासाठी स्वतःची तब्येत योग्य कशी करावी लागते, व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याच्या दृष्टीने त्यावेळेचा काळ, त्या व्यक्तीची वैशिष्ट्यं, त्याचं सादरीकरण या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते सुबोध भावे यांच्या पुस्तकांमधल्या लेखांवरून दिसून येते.

‘बालगंधर्व’ मधील स्त्री व्यक्तिरेखेसाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले हे या पुस्तकात त्यांनी 

विस्तृतपणे लिहिले आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका करताना केस पूर्ण काढलेले आणि त्याचवेळी इतर कुठल्या सिनेमा नाटकाचे प्रयोग आले की होणारी कसरत त्यांनी छान व्यक्त केली आहे. “कट्यार काळजात घुसली” या सिनेमाबद्दल सुबोध भावे म्हणतात की, “हा सिनेमा म्हणजे माझी ध्येयपूर्ती होती. ” या सिनेमाबद्दल त्यांच्या मनात एक उदात्त भावना होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमात शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांनी संगीताची बाजू सांभाळली. सचिन पिळगावकर यांनी खाॅ साहेबाची भूमिका साकारली. स्वतः सुबोध भावेंनी सदाशिवची भूमिका केली. या सिनेमाने सुबोध भावे यांना नावलौकिक मिळवून दिला.

लोकमान्य टिळकांची भूमिका करताना प्रथम त्यांच्या मनावर दडपण होते. लोकमान्य टिळकांची करारी, कणखर, भारदस्त व्यक्तिरेखा आपण साकार करू शकू की नाही, याबद्दल सुरुवातीला मनात भीती होती.. परंतु एकदा भूमिकेत झोकून दिल्यावर मनापासून काम करणे हे सुबोध भावेचे वैशिष्ट्य त्यातून व्यक्त होते.

एकंदर पुस्तक वाचताना असं जाणवलं की ‘ *बालगंधर्व* ‘, ‘ *लोकमान्य टिळक’* आणि ‘ *कट्यार काळजात* *घुसली* ‘ हे तीनही पिक्चर्स आपण बघितले आहेत. तेव्हाही ते आवडले होतेच, पण हे पुस्तक वाचल्यावर सुबोध भावेंच्या दृष्टिकोनातून ते पुन्हा पहावेत असा विचार मनात आला.

कोणत्याही भूमिकेसाठी कलाकाराला किती कष्ट करावे लागतात हे या सुबोध भावे यांच्या कथनातून दिसून येते. तसेच जे जे घडलं ते प्रांजळपणे वाचकांच्या समोर त्यांनी उलगडून दाखवलेले आहे आणि ते अधिक सच्चे आहे.

सुबोध भावे म्हणतात, ‘ हा पुस्तक प्रपंच सर्वांच्या सहकार्याने घडून आला. शौनक अभिषेकींमुळे शास्त्रीय संगीत आयुष्यात आले. गवयाची नजर मिळाली आणि माझ्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा संगीतामुळे मला अनुभवता आला. ‘

सुबोध भावे मूळचे पुण्याचे, सदाशिव पेठी वातावरणात वाढलेले, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेला कलाकार म्हणून आपल्या मनात त्यांना कौतुकाचे स्थान आहे. हे पुस्तक वाचल्यावर ते कौतुक अधिकच मनात उतरते. अवश्य वाचावे असे हे पुस्तक ‘घेई छंद’

©  उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares