श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “अरुणोदय” – लेखिका : श्री भावेश ब्राह्मणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : अरुणोदय.
लेखक: भावेश ब्राह्मणकर
पृष्ठ: २७६
फ्री होम शिपिंग
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या अभ्यासवृत्तीद्वारे साकारलेले अरुणोदय पुस्तक अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याच्या खडतर कार्यावर आणि संघर्षावर प्रकाश टाकते. श्री. ब्राह्मणकर यांनी स्वतः प्रत्यक्ष सीमेवर जाऊन या कादंबरीचे लेखन केले असून, यात ‘अरुण’ नावाच्या जवानाचा चित्तथरारक जीवनपट उलगडण्यात आला आहे. एका पत्रकाराने प्रत्यक्ष सीमेवरील अनुभवातून सैनिकांच्या त्यागाची ही शौर्यगाथा मांडणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे (निवृत्त) (अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, नौसेना मेडल) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात – –
– – अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा हा विषय सद्यस्थितीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा आहे. मुळातच अशा प्रकारचा आव्हानात्मक विषय लेखक स्वीकारत नाहीत. मात्र लेखकाने तो स्वीकारल्याने मला मनापासून आनंद झाला. या शिष्यवृत्तीसाठी मी त्यांना शिफारसपत्रही दिले होते. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष राहून लेखकाने सैन्याचे कामकाज जाणून घेतले. तेथील वातावरण, भौगोलिक स्थिती पाहिली. तेच त्यांच्या लेखनात उतरले आहे. संरक्षण मंत्रालयाचा प्रतिष्ठित डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स केला असल्याने लेखकाला अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीचा अंदाज आलेला दिसतो. अरुणाचल प्रदेशातील सीमा प्रदेश हा विषय तसा मराठी लेखकांसाठी अतिशय दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या भागावर फारसे लेखन मराठीमध्ये होत नसल्याचे निरीक्षण अनेकांनी मला सांगितले आहे. तोच विषय घेऊन ‘अरुणोदय’ ही कादंबरी लेखकाने लिहिल्याने ही बाब मराठी साहित्याच्या दृष्टीनेही मला महत्त्वाची वाटते.
भारतीय सैन्य किती खडतर परिस्थितीमध्ये राहते, कामकाज करते, शत्रूबरोबरच देशांतर्गत, भौगोलिक, पर्यावरणीय किती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत हे सारे लेखकाने चपखलपणे मांडले आहे. अशा प्रकारचे लेखन होणे गरजेचे आहे. यामुळे सैन्याच्या कामकाजाबरोबरच अन्य स्वरूपाची माहितीही वाचकांपर्यंत पोहोचते. अरुण या जवानाची कथा सांगतानाच लेखकाने त्याच्या जीवनातील भावनिक, मानसिक, कौटुंबिक पैलू अचूकपणे उलगडले आहेत. त्याशिवाय ग्रामीण जीवनाचे विविध पदरही उत्तमरीत्या शब्दबद्ध केले आहेत. छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्यांनी सैन्यातील खडतर परिस्थिती वाचकांसमोर ठेवली आहे. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली असावी, असे मनोमन वाटते.
लेखकाला मी २०१५ पासून वैयक्तिक व व्यावसायिकरीत्या ओळखतो. पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असताना सातत्याने उल्लेखनीय आणि मोलाचे योगदान लेखक देत आहे. अत्यंत कष्टाळू पत्रकाराबरोबच लेखकाची आकलनशक्ती तसेच विश्लेषणात्मक विचारपद्धती वाखाणण्याजोगी आहे. विशेषतः पर्यावरण आणि संरक्षण यांसारख्या अत्यंत संवेदनशील व तांत्रिक विषयांवर सातत्याने सखोल लेखन करण्याची हातोटी लेखकात आहे.
‘कुसुमाग्रज शिष्यवृत्ती’ च्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा आणि भारतीय लष्कराचे कामकाज यावरील अप्रतिम लेखन वाचकांपुढे येत आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करायला हवे असे मला वाटते. कादंबरीचा नायक असलेल्या अरुणची पत्नी त्याच्या शोधार्थ सीमाभागात जाते. मात्र, सैन्यशिस्तीच्या ते विरुद्ध आहे हे सुद्धा अचूकपणे लेखकाने पुस्तकात मांडले आहे. सैन्यातील कामकाजाचे बरेच बारकावे लेखनात आल्याने हे पुस्तक वास्तवाच्या समीप जाणारे आहे. केवळ युद्ध किंवा संघर्ष यावर होणारे लेखन आणि शांतता काळातील लेखन यात कमालीचा फरक आहे. भारतीय सैन्य हे अनेक आघाड्यांवर लढत असते. त्याची विस्तृत माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना होईल, असे वाटते. सैन्यात गुणवत्तेला किती किंमत आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी किती सक्षमपणे सांभाळली पाहिजे, याचेही दर्शन या पुस्तकात होते. हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील सीमा या सर्व विषयांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोनही वाचकांसमोर आला आहे. वाचकांना नक्कीच हे पुस्तक आणि त्यातील लेखन आवडेल, अशी मला ठाम खात्री आहे.
…
पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया – –
हे पुस्तक सर्वार्थाने अद्वितीय आहे. ते भारतीय लष्कराचे सार नेमकेपणाने मांडते. राष्ट्रीय सुरक्षेसारखा गंभीर विषय रोमँटिक कथेच्या स्वरूपात मांडून लेखकाने कमालच केली आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली न ठेवता येण्यासारखे आहे. ते प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.
– कर्नल विनायक भट (सेवानिवृत्त)
पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ व साहित्यातील ‘सर्जनशीलता’ यांचा अनोखा अनुबंध भावेश ब्राह्मणकरांच्या या कादंबरीत आढळतो. अरुण देशकर या भारतीय लष्करातील जवानाची कहाणी वाचकाला खिळवून टाकते. यानिमित्ताने ‘अरुणाचल’ या निन्तातसुंदर प्रदेशातील खडतर जीवनाची झलकही वाचकाला मिळते.
– प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






