श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द बॉडी कीप्स द स्कोअर ” – इंग्रजी लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द बॉडी कीप्स द स्कोअर

 – – आघाताबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलवणारे आणि नवी दिशा दाखवणारे पुस्तक

 – – मेंदू, मन आणि शरीर यांची आरोग्यातील भूमिका

लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क, एम. डी.

अनुवाद: दीपक देवधर

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठ: ५१२

मूल्य: ४९९₹ 

आघात (ट्रॉमा) हा जीवनाचा वास्तव भाग आहे. युद्धाचे अनुभव, लैंगिक शोषण, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक हिंसा… अशा अनेक कारणांनी माणूस आतून जखमी होतो. आघात फक्त मनावरच नाही, तर शरीर आणि मेंदूवरही खोल परिणाम करतो. त्यामुळे आनंद घेण्याची क्षमता, नातेसंबंध, आत्मनियंत्रण आणि विश्वास यावरही परिणाम होतो.

जगप्रसिद्ध आघाततज्ज्ञ आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. बेसेल व्हॅन डर कोल्क यांनी तीस वर्षांहून अधिक काळ आघातग्रस्त लोकांसोबत काम केले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती विकसित केल्या आहेत, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे पुस्तक औषधं आणि फक्त समुपदेशन यांपलीकडे जाऊन लोकांना आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा मार्ग दाखवतं.

अजूनही आपण त्या सखोल ज्ञानाच्या बाबतीत खूप वर्षे मागे आहोत, पण गेल्या काही दशकांत तीन नव्या वैज्ञानिक शाखांमुळे मानसशास्त्रीय आघात, अत्याचार आणि दुर्लक्ष यांच्या परिणामांबद्दल मोठ्या प्रमाणात नवीन माहिती समोर आली आहे.

या तीन नवीन शाखा म्हणजे –

  1. न्यूरोसायन्स – मेंदू मानसिक प्रक्रियांना कशी साथ देतो याचा अभ्यास.
  2. डेव्हलपमेंटल सायकोपॅथोलॉजी मानसिक आणि मेंदूच्या विकासावर प्रतिकूल अनुभवांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास.
  3. इंटरपर्सनल न्यूरोबायोलॉजी आपले वर्तन आपल्या सभोवतालच्यांच्या भावना, जैविक प्रक्रिया आणि विचारसरणीवर कसा प्रभाव टाकते याचा अभ्यास.

या नव्या शास्त्रीय शाखांमधील संशोधनाने हे दाखवून दिले आहे की, आघात, मेंदू आणि शरीरात प्रत्यक्ष जैविक बदल घडवून आणतो. यात मेंदूच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या प्रणालीचे पुन्हा समायोजन होते (रिसेट होते म्हणजे लहानसहान आवाज, शब्द किंवा प्रसंगही मेंदूला मोठा धोका वाटू लागतात), तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची क्रिया वाढते, आणि महत्त्वाची व महत्त्वाची नसलेली माहिती वेगळी करणाऱ्या प्रणालीत बदल होतात. आपल्याला आता माहीत झाले आहे की, मेंदूच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जिवंत असल्याची शारीरिक, मूर्त भावना व्यक्त होते, त्या क्षेत्रावर मानसिक आघाताचा परिणाम होतो. यामुळे मानसिक आघातग्रस्त व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात उत्स्फूर्तपणे व्यग्र असताना मनातील धोक्याबद्दल अतिजागरूक का बनतात हे आपण समजू शकतो. यामुळे आघातग्रस्त लोकांना अनुभवातून शिकण्याऐवजी वारंवार त्याच समस्यांचा सामना का करावा लागतो हे समजून घेण्यास देखील आपल्याला मदत होते. आता आपल्या हे लक्षात आले आहे की, त्यांचे वर्तन नैतिक अपयशाच्या परिणामस्वरूप किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे किंवा कलंकित चारित्र्यामुळे नव्हे, तर मेंदूतील वास्तविक बदलांमुळे प्रभावित होते.

आघातासंबंधीच्या मूलभूत प्रक्रियांविषयी आपण मिळवलेल्या या नव्या माहितींमुळे, या त्रासाचे निवारण करण्यासाठी किंवा काही प्रमाणात पुनर्बाधणी करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. मेंदूची नैसर्गिक लवचीकता (न्यूरोप्लॅस्टिसिटी) वापरून आघातग्रस्त लोकांना वर्तमान क्षणात संपूर्णपणे जिवंत वाटण्यास आणि त्यांच्या जीवनात पुढे जाण्यास मदत करण्याच्या पद्धती आता विकसित करता येतात. यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत.

 या पुस्तकात  

– आघातातून बाहेर येण्यासाठी न्यूरोप्लॅस्टिसिटीचा उपयोग

– ध्यान, न्यूरोफीडबॅक, खेळ आणि योग यांसारख्या उपचारपद्धती 

– आघात बरे करण्यात नात्यांची भूमिका

– शरीर आणि मेंदू यांचा परस्परसंबंध

– मन आणि मेंदू समजून घेण्यातील क्रांती

– योगसाधना, EMDR उपचार पद्धती

 

प्रभावी अनुभवकथांनी भरलेले असे हे खिळवून ठेवणारे पुस्तक. गेल्या तीस वर्षातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे.

– – नॉर्मन डॉइज, ‘ द ब्रेन वॅट चेंजेस इटसेल्फ ‘ चे लेखक आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments