श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “जे हवं ते मिळवा” – लेखक : गौर गोपाल दास ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : जे हवं ते मिळवा
लेखक : गौर गोपाल दास
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ : ३२०
मूल्य: ३५०₹
आपल्यापैकी अनेक जण, आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता… अशी असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात. पण, खरंच हे सगळं आपण मिळवू शकतो का?
नोव्हेंबरच्या थंडीतील एका सकाळी गौर गोपाल दास जैसलमेरमध्ये आपला मित्र राकेश अरोरा यांच्या मुलाच्या तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभासाठी पोहोचतात. एक अनपेक्षित पाहुणा येतो आणि दोन कुटुंबांमध्ये फूट पाडण्याची शक्यता असलेले वादळ निर्माण होत असल्याचे गौर गोपाल दास यांच्या लक्षात येते.
गौर गोपाल दास चर्चेद्वारे यजमानांना आणि पाहुण्यांना शांत करतात. तसेच त्यांच्या आतमध्ये दडून बसलेल्या भीती आणि इच्छांनाही उलगडून दाखवतात. एवढंच नाही तर, स्वतःच्या जीवनामधील चढउतारांच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाद्वारे ते लोकांना योग्य आणि समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शनही करतात.
‘जे हवं ते मिळवा’ हे गौर गोपाल दास यांचं वैयक्तिक आणि गहन कथन आहे. महत्त्वाकांक्षा आणि समाधान, तसेच खरं असणं आणि केवळ भासवणं यांमध्ये अडकलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नवा दृष्टिकोन देणारं आहे. त्यांच्या खास विनोदबुद्धी, सहानुभूती आणि प्रभावी ज्ञानाने समृद्ध असलेलं हे पुस्तक ‘आपला दृष्टिकोनच आपलं जीवन घडवतो’ हे सांगतं. तसेच स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांच्यावर मात कशी करावी आणि जीवनप्रवासात स्वतःबद्दल करुणा कशी विकसित करावी, याचंही मार्गदर्शन करतं.
लेखकाचे मनोगत – –
या पुस्तकात जीवन बदलवून टाकणारी दहा तत्त्वं एका रंजक कथेत गुंफलेली आहेत. या कथेमधील पात्रांमध्ये तुम्हाला कदाचित स्वतःचाच काही अंश दिसेल.
प्रत्येक प्रकरण वास्तविक कथा, भावना आणि अनुभवांवर आधारित आहे. या कथेची वाचनीयता टिकवून ठेवण्यासाठी काही तपशीलांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून बहुतेक नावं व ठिकाणं बदलली आहेत; परंतु त्यामागील सार आणि सत्य मात्र अबाधित आहे.
तुम्ही या कथांचा आणि त्यामधील ज्ञानाचा आनंद खुल्या मनाने घ्या. तसंच या अनुभवाचा व्यक्तिगत स्तरावर उपयोग करायचा असल्यास तसंच या तत्त्वांवर चिंतन करायचं असल्यास आणि ती आयुष्यामध्ये लागू करायची असल्यास मदत करतील अशा माहितीपत्रिकाही तुम्हाला या पुस्तकात मिळतील. वाचन प्रवास अखंडित राहावा याचीही काळजी घेतली आहे. जे लोक पेन आणि कागद यांचा वापर करतात अशा लोकांसाठी पुस्तकाच्या शेवटी या प्रकारची पत्रकं दिली आहेत. हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी तुमचा आंतरिक विकास आणि स्वतःला शोधण्याच्या यात्रेमध्ये मदत करण्यासाठी लिहिलं आहे
या पानांवरील चिंतन, सराव आणि कथा प्रेमाने व प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडल्या आहेत त्या तुमच्या प्रवासाला पूरक ठराव्यात या उद्देश्याने, तुमचा स्वतःचा निर्णय किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांची जागा घेण्यासाठी नव्हे. जे तुमच्या मनाला पटते ते स्वीकारा, जिथे गरज वाटेल तिथे थांबा आणि या प्रक्रियेला शांतपणे उलगडू द्या.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





