श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “ब्रेक के बाद” – लेखक: पुरुषोत्तम बेर्डे – परिचय: मुकेश माचकर ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : “ ब्रेक के बाद “
– नाट्य-चित्रपटसृष्टीतील कलावंतांसह रंगलेली रंगतसंगत सांगणारे पुस्तक
लेखक: पुरुषोत्तम बेर्डे
पृष्ठ: २४२
मूल्य: ४८०₹
नाटकवाल्यांचा एखादा लोकप्रिय कट्टा… चहाच्या आवर्तनांसोबत रंगत जाणाऱ्या गप्पा… दिग्गजांच्या आठवणी ऐकण्यासाठी उत्सुकतेनं जमलेले नवोदित… आणि आपल्या इष्टमित्रांचे भन्नाट किस्से सांगण्यात रमलेले पुरुषोत्तम बेर्डे!
पुरुषोत्तम बेर्डे हे सिनेनाट्यक्षेत्रातले लेखक असल्यामुळे मुळात त्यांच्याकडे चित्रमय शैली उपजत आहे, वाचकाच्या डोळ्यांसमोर सीन उभा करण्याची हातोटी आहे. ते या लेखनातून जणू वाचकाच्या खांद्यावर हात टाकून ‘चल, तुला एक गंमत सांगतो, ‘ असं म्हणत थेट त्या प्रसंगातच घेऊन जातात आणि मग कुठे क्लोजअप लागतो, कुठे लाँग शॉट लागतो, कुठे ट्रॉलीवरच्या कॅमेऱ्याबरोबर आपण चालतो, तर कुठेतरी एखाद्या गमतीच्या क्लायमॅक्सवर कॅमेऱ्याबरोबर झूम होतो असा सगळा सिनेमातला एक प्रसंगच आपल्यासमोर उलगडत राहतो प्रत्येक किश्शातून.
‘ब्रेक के बाद’ मध्ये पुरुषोत्तम बेर्डेनी फर्स्ट हँड, त्यांच्या नजरेसमोर घडलेले ‘पहिल्या धारे’चे एकापेक्षा एक ‘कडक’ किस्से लिहिलेले आहेत आणि तेही चित्रमय शैलीत, नाट्यमय रचनेचं कौशल्य पणाला लावून. वाचता वाचता वेड्यासारखे हसू लागलात, तर आसपासचे लोक विचित्र नजरेनं पाहू लागतील, तेवढा धोका पत्करायची तयारी ठेवा मात्र.
शिवाय, ‘आतला माणूस’ असल्यामुळे पुरुषोत्तम बेर्डेना सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेमागचा कुणी न पाहिलेला लहानपणीचा उपद्व्यापी गोट्या बेर्डे माहीत असतो, रवींद्र साठे यांना रॅगिंगमधून गाण्याची संधी कशी मिळाली हे माहीत असतं, ‘रवी हा लोकप्रिय गायक नसून श्लोकप्रिय गायक आहे. ‘ ही नाना पाटेकरांची खोचक टिप्पणी त्यांनीच ऐकलेली असते, चिमणरावांवर राजदत्त यांच्या दिग्दर्शनात हिंदी मालिका बनवली जात असताना ते त्यांचे साहाय्यक असतात, त्यामुळे त्यांना दिसलेले ‘दिलीपभय्या’ वेगळे असतात, विनय आपटे यांच्यासारख्या सणकी कलाकारानं औरंगाबादेतून नाटक पाहण्यासाठी मुंबईला येणाऱ्या आणि लहान वयातच चमक दाखवणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णीबद्दल ‘सॉलिड आहे रे हा’ असे आश्चर्यकारक कौतुकोद्गार बेर्डेपाशीच काढलेले असतात (आणि विनयनं कुणाचं कौतुक करणं म्हणजे रस्त्यावरच्या डांबरात फिट बसलेलं रुपयाचं नाणं काढून देण्याइतकं कठीण, अशी अप्रतिम उपमा बेर्डेनाच सुचू शकते), बॉक्स ऑफीसचा बेताज बादशहा असलेल्या गोऱ्यापान प्रशांत दामले यांनी ‘टूरटूर’मध्ये मद्रासी बनण्यासाठी काळा रंग फासून घेणं आणि मग उतरवणं अशी तपश्चर्या किती निष्ठेनं केली, हे त्यांनीच पाहिलेलं असतं; त्याच वेळी ज्या विजयाबाई (मेहता) नाटक पाहायला येणार म्हणून सगळा संच विनम्र उत्साहानं सज्ज झालेला असतो, त्या नाटक सुरू होण्याआधी येऊन ‘मला हे दोन कलाकार हवे आहेत, ‘ असं सांगून नाटक पाहायला न थांबता निघून जातात, हाही अनुभव बेर्डेनीच घेतलेला असतो. हे सगळं संचित अनमोल आहे आणि बेर्डेमुळे ते या पुस्तकातून दस्तऐवजांत…
बेर्डेंचं लेखन वाचताना आपणही याच मैफलीचा भाग होतो. अकृत्रिम, गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ शैलीतून उलगडणाऱ्या या आठवणी निव्वळ मनोरंजनाच्या पलीकडे जातात. विशेषणांची आरास न मांडताही त्या प्रत्येक व्यक्तीचं सत्त्व, कर्तृत्व आणि वेगळेपण वाचकाच्या मनात ठसवतात.
– – मुकेश माचकर
हे नाट्य-चित्रपटसृष्टीतील हुन्नरी कलावंतांचे एकापेक्षा एक ‘कडक’ किस्से—चित्रमय निवेदनातून, नाट्यमय रचनेतून आणि खास ‘पुरुदृष्टी’तून उलगडणारी माणसं आणि त्यांच्या पडद्यामागच्या गोष्टी!
परिचय: श्री मुकेश माचकर
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






