सौ. वंदना अशोक हुळबत्ते
☆ पदराचे पदर… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
पदर या शब्दाला अनेक अर्थाचे पदर आहेत. बाईचे सारे आयुष्य या पदराभोवती गुरफटलेले असते. बालवयातून किशोर अवस्थेत ती पदार्पण करते तेव्हा ग्रामीण भागात आजही ती मोठी झाली, तिला पदर आला असे म्हणतात. बालपणातील अल्लडपणा एका क्षणात त्या पदरात परका होऊन जातो. तिथूनच बाईचे जीवन पदराभोवती गुरफटत जाते. ती पदराभोवती फिरत राहते. खरं तर साडीच्या एका बाजूचा नक्षीदार भाग म्हणजे पदर. पदराचे रंग काम, जरी काम उत्तम असते. पदरामुळे साडीची शोभा वाढते. साडीचा पदर सुंदर असावा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पदर म्हणजे डाव्या खांद्यावरून खाली सोडलेला साडीचा एक लांब भाग. या पदरात बाईचे विश्व सामावलेले असते.
पूर्वी तर बायका डोक्यावर पदर कसा घेतात त्यावरून तिची शालिनता ओळखली जायची. खानदानाची ओळख पदरावरून व्हायची. हा पदर माणसाला जगण्याचं बळ देतो. हाच पदर वेगवेगळ्या अर्थानी जीवनात पुन्हा पुन्हा भेटतो.
लहानपणी आपल्या हातून एखादी चूक झाली आता आपल्याला मोठी माणसे ओरडणार हा अंदाज आला की आईच्या पदराआड लपून बसायचे. ओरडा चुकवायचा. आपली चूक आई पदरात घेईल याची खात्री असायची. आपल्या मुलांना कोणी विनाकारण त्रास देत असेल तर तोच पदर खोचून ती भांडायला तयार असते. जुन्या साड्यांचे सुरेख पदर नातवंडाच्या आंगडी-टोपडी, कुंची, दुपटी करण्यासाठी जपून ठेवले जायचे. हीच या पदराची मला नेहमी भारी गंमत वाटते.
जेवण झाल्यावर आईच्या पदराला हात, तोंड पुसल्याशिवाय जेवणाच समाधान मिळत नाही. कधी चुकून पावसात भिजून घरी आलो तर आधी एक धपाटा पाठीत बसायचा मग आई जवळ ओढून घेऊन पदरानेच डोकं पुसायची. किती किती माया, ममता होती तिच्या पदरात. तो सुती कपड्याचा मऊशार उबदार स्पर्श नेहमी स्मृतित जाणवतो.
प्रत्येक व्यक्तीचे पदराशी अनन्य साधारण महत्व आहे. त्याचं भरणपोषण या पदराआड झालेले आहे. पदर एवढा मोठा असतो की त्यात सारे विश्व सामावते. ओटी पदरात घेतात. ओटीभरणाचा अर्थ ही निराळाच असतो जो पदराशी निगडीत असतो. आपला स्वाभिमान सांगायचा असेल तर म्हणतात आजवर मी कुणापुढे पदर पसरला नाही. कुणाला आश्रय हवा असेल, क्षमा हवी असेल तर म्हणतात आम्हाला पदरात घ्यावे. मदत मागायची असेल तर म्हणतात आम्ही आपल्या समोर पदर पसरतो. चूक पदरात घ्यावी म्हणजे समजून घ्यावे. पदराला हात लावणे, पदरात हात घालणे याचा अजून वेगळा अर्थ समोर येतो. पदराचे प्रसंगावरूप किती कसे अर्थ बदलतात.
पदर या शब्दालाच अनेक पदर आहेत. एखाद्या विषयाला अनेक पदर असतात ते समजून घ्यावे लागतात.. चपाती भाकरीला ही पदर असतो. पदर हा एखादा स्तर ही होवू शकतो. या पदराची जादू आजवर टिकून आहे. साडी ऐवजी इतर पोषाख आज वापरले जातात. पण बाईचं ममत्व कुठं कमी होतं ? ममत्वाचा अदृश्य पदर तिला साथ देतोच….. पदराचं कर्तव्य पूर्ण करतोच.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






