श्री सुधीर करंदीकर

??

☆ “मांजरीशी गप्पा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

गप्पा या शब्दामध्ये एक वेगळीच जादू दडलेली आहे. गप्पा या कुणाबरोबरही असोत, त्या आपल्याला हमखास आनंदाच्या दुनियेत घेऊन जातात.

घरच्यांबरोबर आपल्या गप्पा अगदीच कमी असतात, त्याऐवजी वादविवाद आणि सूचनाच जास्ती असतात. त्यामुळे आनंदाच्या दुनियेत जाणे फार कमी असते. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी पण साधारण असाच प्रकार असतो.

गप्पा खऱ्या अर्थाने होतात त्या फक्त मित्र मैत्रीणीं बरोबर. भरपूर हसणे होते आणि आनंदाच्या दुनियेत मस्त फेरफटका होतो.

माझ्या एका मित्राकडची गंमत सांगतो – त्याची फॅमिली मोठी आहे. रात्री आठ पर्यंत सगळे घरी येतात. रात्रीच्या जेवणाच्या आधी सगळेजण हॉलमध्ये पंधरा मिनिटे बसतात. आणि प्रत्येकाने आज दिवसभरात काय गमती जमती अनुभवल्या, काय मजा केली /काय मजा झाली, किंवा आधीच्या काही मजेशीर आठवणी, याबद्दल प्रत्येक जण सांगतो. त्यामुळे सगळ्यांचे भरपूर हसणे होते आणि आनंदी दुनियेत सफर होते. आणि मग एकत्रित सह भोजन होते. एक दिवस त्या मित्राने मला रात्री त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. बरोबर आठ वाजता पोहोचलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या, आणि बघतो तर सव्वा आठ वाजता घरातले सगळेजण हॉलमध्ये जमा झाले. माझ्या एकदम लक्षात येईना, त्या मित्रांनी मला बॅकग्राऊंड समजावून सांगितली आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला की आज गप्पांचा विषय आपण माझ्या मित्रा पासून सुरू करूया. मला माझ्या आवडीचा गप्पा हा विषय मिळाल्यामुळे मस्त गप्पा मी सुरू केल्या आणि पंधरा मिनिटे म्हणता म्हणता अर्धा तास गप्पा आणि सगळ्यांचे हसणे सुरू होते. नंतर मस्त जेवण झालं आणि बाय बाय झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिताना बायकोला मी कालची रोज घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा मारणे याबद्दलची घटना सांगितली. बायकोला ही कल्पना मनापासून आवडलीआणि आम्ही ठरवले की त्या दिवसापासून रोज रात्री जेवण्यापूर्वी पंधरा मिनिटे मन मोकळ्या गप्पा मारायच्या, आणि मग मस्त जेवण करायचे. आणि त्याप्रमाणे आमचा गप्पा हा कार्यक्रम रोज मस्त सुरू आहे. आणि याचा छान साईड इफेक्ट पण मी अनुभवतो आहे आणि तो म्हणजे – दिवसभरात जेव्हा जेव्हा गरमागरम चहा प्यावा असा मूड होतो तेव्हा बायको कडून हातात गरमागरम चहाचा कप न सांगता मिळतो. अजून एक चांगला साईड इफेक्ट म्हणजे माझ्या वाढदिवसाला बायको कडून वॉशिंग मशीन सारखे छान गिफ्ट पण मला मिळते, आणि वगैरे वगैरे……

पक्षांबरोबर गप्पा मारण्यात पण एक वेगळीच मजा असते. सकाळी मी वरती टेरेसवर गेल्यानंतर बऱ्याच वेळा कावळ्यांबरोबर छान गप्पा होतात. बागेत झाडांना पाणी घालताना फुल झाडांबरोबर पण मस्त गप्पा होतात. अशा गप्पा असतात थोडा वेळच पण पूर्ण दिवस मस्त जातो. (याबद्दलचे माझे अनुभव मी मध्यंतरी लिहून पाठवले होते. आपण कदाचित वाचले असतील)

एक दिवस असाच एक छान योग आला आणि तो म्हणजे चक्क मांजरीशी गप्पा मारण्याचा. त्याचे झाले असे –

एक दिवस सकाळी नऊ च्या सुमारास घरासमोरच्या रस्त्यावर विटामिन डी मिळवण्याकरता मी नेहमीप्रमाणे उन्हामध्ये फेऱ्या मारत होतो. रस्त्याच्या डावी उजवीकडे दोन्ही बाजूला बंगले आहेत आणि तारा लावून कंपाउंड आहेत.

मांजरींची सारखीच डावीकडच्या बंगल्या मधून रस्ता क्रॉस करून उजव्या साईडच्या बंगल्याकडे जाणे, किंवा तिकडून इकडे, अशी काहीतरी खाण्यापिण्याकरता ये जा सुरू असते.

त्या दिवशी मी फेऱ्या मारत होतो आणि डावीकडच्या कंपाउंड मधून एक मांजर बाहेर येत होती. तिला रस्ता क्रॉस करून समोरच्या कंपाउंड मध्ये जायचे होते. तिला जाऊ द्यावे म्हणून मी उभा राहयलो. मांजर पण उभी राहिली. कुणीच हलेना हे बघून मी मांजरीला म्हणालो – तुम्ही जा पलीकडे मी थांबलोय.

मांजर : तुमच्यामध्ये मांजर आडवी जाण्याला अपशकुन मानतात ना. म्हणून मी थांबले आहे.

मी : ठीक आहे मी आधी जातो

मांजर : नको नको. तुम्ही पण जाऊ नका, कारण आमच्या मध्ये पण चालताना माणूस आडवा जाणे याला अपशकून मानतात. आता यातून काय मार्ग काढावा हेच लक्षात येत नाही.

मी म्हटलं – मी मागे फिरतो. मग तुम्ही क्रॉस करा..

मांजर : मानलं तुम्हाला. तुम्ही अगदी विन विन सिच्युएशन मार्ग काढला.

मी अबाउट टर्न केले आणि दोन पावलं मागे गेलो. तेवढ्यात मांजरीने रस्ता क्रॉस केला.

मी पुन्हा अबाउट टर्न केले. मांजर उजवीकडच्या कंपाउंड शी उभी होती.

मांजर : ठीक आहे तुम्ही जा आता. कुणालाच अपशकून नाही. धन्यवाद

दोघांचे एकमेकांना बाय-बाय झाले. मी हात हलवून बाय बाय म्हणालो, मांजरीने एक पाय वर करून आणि म्याव म्याव आवाज करत बाय बाय केले.

आणि आम्ही मार्गस्थ झालो……..

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted