सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ गणराज रंगी नाचतो… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गणराज रंगून नाचतो आहे. नाचण्याच्या नादातच पायातील घागऱ्या रुणुझुणु वाजत, नाचणाऱ्या गणेशाच्या नाचात तल्लीन होऊन त्या मंजूळ नाद करतात आहेत. स्वर्ग लांब असला तरी तल्लीनता व मंजूळ आवाज देवांपर्यंत पोचतो आहे. कुठल्याही कलेमध्ये तल्लीन होण्याचं सार्थक झाले आहे. पृथ्वीवरचे आपले दुःख कुठलीही कला इतके विसरायला लावते की आपण थेट स्वर्गसुखाचा आनंद घ्यायला लागतो.

अंगी नाना कळा असण्यातही असेच स्वर्गसुख मिळत असेल का? माझ्या अंगातल्या नाना कळांना माझा नवरा म्हणतो; “जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ  नन्”.

येवढं मात्र नक्की खरं की कुठल्याही कला निर्मितीत अथवा आस्वादात गुंगून गेल्यास ब्रह्मानंदी टाळी लागते आणि प्रत्यक्ष स्वर्ग सुख, शांती अनुभवायला मिळते.

अगदी गणराज रंगी नाचतो…….

मला भरतकाम व शिवणकामाची खूप मनापासून आवड होती.अजूनही आहे पण आता तितकं होत नाही.या कलांमध्ये गुंतल्यावर मला माझ्या दु:खाची पण आठवण रहात नसे.एकदा तर एका लग्नात गेले होते.एकीकडे लोकांचे शुभमंगल सावधान म्हटल्यावर अक्षता टाकणे चालू आणि माझे मात्र छोट्या मुलीच्या फ्राॅकच्या फॅशन कडे टक लावून बघणे चालू.फॅशन लवकर लक्षात येण्यासारखी नव्हती म्हणून! शेवटी फॅशन लक्षात आल्यानंतरच अक्षदा टाकल्या मी.नवीन फॅशन दिसली की मी लगेच मुलीला शिवत असे मी.या कलेमुळेच जीवनात खूप मोठे धक्के बसत गेले तरी सावरू शकले मी.

या कलेच्या फायद्याबरोबर तोटेही असतात बरं!’येवढी मशीन मारून द्या बरं ‘म्हणताना जुन्या कपड्यांचा गठ्ठा ठेवून जाणे,कपडा शिवल्यानंतर कसा नीट बसला नाही हेच जास्त वेळ ऐकवणे इ.इ.

या कलेच्या संदर्भात आणखी एक छुपी कला दडलेली असते बरं का? थांबा, कोणती ते सांगते….

माझ्याकडे पाहुणे येणार म्हणून बाईकडून एक दोन दिवस जास्तीचे काम पडणार होते.आधीच पैसे किती द्यायचे विचारले तर ‘पैशाचं काही टेन्शन घेऊ नका काकू तुम्ही पैशे पैशच करता गड्या’ म्हणाली.म्हणून पाहुणे गेल्यानंतर मी पैसे विचारले.’पैसे नको काकू मला!’  ती म्हणाली.मला खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्या.नंतर हळूच म्हणाली,’फकस्त न‌ऊवार पातळ शिवून द्या मले.’…

– – – पडला नं प्रश्न? कोणती कला जास्त श्रेष्ठ याचा?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments