श्री सुधीर करंदीकर
☆ “पुढच्या वर्षी लवकर या..!!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या “
गणेशोत्सव आपण सगळ्यांनीच खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला आहे.
कालच्या विसर्जन सोहळ्यानंतर गणपती बाप्पा जरी मूर्तीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये, शेजारच्या घरामध्ये, नातेवाईक, ओळखीचे, यांच्या घरामध्ये नसले, तरी त्यांचं वास्तव्य सगळीकडे कायम असणारच आहे.
काल विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा आपल्याला हेच सांगत होते: –
‘ माझ्या मूर्तीचे विसर्जन होत आहे, पण मी कायमस्वरूपी तुमच्या इथेच राहणार आहे. त्यामुळे ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ वगैरे असे काहीही म्हणू नका.’
– – पण डीजेच्या आणि ढोल ताशे यांच्या कर्कश्य आवाजामध्ये आपल्याला हे बाप्पांचे बोलणे ऐकूच येत नव्हते.
बाप्पा इथेच राहणार आहेत म्हणजे गेल्या दहा दिवसांमध्ये जसे आपले एकमेकांकडे आरतीला जाणे, दर्शनाला जाणे, प्रसादाला जाणे, जसे सुरू होते, तसेच या न त्या निमित्ताने आपण एकमेकांकडे जाणे सुरूच ठेवूया आणि एकमेकांशी संपर्कात जरूर राहू या.
…. सगळ्यांशीच कायमस्वरूपी प्रेमाने वागणे, आनंदाची देवाण-घेवाण करणे, हे पण आपण सुरूच ठेवूया. तेच बाप्पाला आवडते.
आपल्या आयुष्यातील आरोग्य आणि आनंद यांचे सगळ्यात मोठे साधन, हे आपले निकटवर्तीय संबंध आणि मैत्री यामध्येच असते, असे एका जागतिक रिसर्च मधून सिद्ध झाले आहे.
सध्या ‘मैत्रीमधील मंदी’ ही आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन व्यवहारात अतिशय प्रभावीपणे शिरकाव करत आहे. म्हणून परदेशामध्ये एका विद्यापीठामध्ये ‘Design of healthy friendship’ हा विषय अभ्यासक्रमाकरिता सुरू केला आहे.
…. आणि आपल्याकडचा दहा दिवसांचा गणपती उत्सव काही वर्षांपासून हेच साध्य करत आहे, कुठल्याही विद्यापीठात न जाता.
आजपासून रोजच सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा आपण गणपतीची आरती मनोभावे म्हणत राहू आणि मैत्री संबंध वाढवत राहू आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण पसरवत चलू.
तुमचे पण याबद्दलचे विचार जरूर कळवा.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






