सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “जीव भांड्यांवर जडला– –” ☆ सुश्री शीला पतकी ☆
खरं तर साधारण चार वाजता, असलेले कपडे नीट घड्या करून ठेवणे, घासून आलेली भांडी पुसून स्वच्छ जागेवर लावणे आणि तदनंतर चहा करणे, हा प्रत्येक घरचा रिवाज. माझ्या घरी मी तेच करते.. आईने लावलेल्या सवयी! मला आवडत नाही पण करते! मोलकरणीला एक सोय करून दिली.. भांडी थोडा वेळ उन्हात ठेवायची, मग टोपली उचलून आणून स्वयंपाक घरात खाली साडीचा दुपदरी मोठा तुकडा अंथरलेला असतो त्याच्यावर भांडी पालथी घालायची.. ती पुन्हा मी सरळ करून ओट्यावर ठेवायची आणि चार वाजता मी ती लावायची!
आज ओट्यावर पडलेली ती सगळी भांडी मला काही वेगळीच दिसायला लागली. डोक्यात वेगळेच विचार यायला लागले. नेहमीचीच भांडी.. पण त्या भांड्यामध्ये घरातले एकेक व्यक्तिमत्व दडलेले आहे असं मला वाटायला लागलं. भांड्यातली ती दोन फुलपात्री मला भालदार-चोपदारासारखी दिसू लागली. भांड्यातल्या त्या पाच सहा वाट्या चार वाजता निवांतपणे अंगणात गप्पा मारायला बसलेल्या बायकांसारख्या वाटायला लागल्या. काटे चमचे-बारके चमचे मला अंगणात खेळणाऱ्या टारगट पोरांसारखे वाटायला लागले, आणि जेव्हा लावले त्यांना तेव्हा गुरुजींनी शिक्षा केलेल्या मुलासारखे वाटायला लागले. ओळीने त्या फडताळात उभे..
मग काय.. नात्यातली माणसं भेटली.. कढई मला सासुसारखी वाटायला लागली.. कान देऊन ऐकणारी पण ‘मला हल्ली ऐकायला येत नाही रे’ असं आवर्जून सांगणारी. कुकर तर महादेवाच्या पिंडीसारखा वाटला.. या जगात देवाशिवाय दुसरा कोणी नाही तसं स्वयंपाक घरात कुकर शिवाय कोणी नाही असं वाटतं. मोठा गॅस केल्यावर त्याचं होणारं तांडव शंकराच्या तांडवापेक्षा कमी नाही. चहाचे व साखरेचे डबे जेष्ठा कनिष्ठासारखे वाटायला लागले.. त्यांच्याशिवाय दिवस सुरू होत नाही. उलथनं एखाद्या टार्गेट पोरासारखं वाटायला लागले.. वर्गामध्ये सगळ्या पोरांना टपल्या मारत हिंडणाऱ्या मुलासारखं!
चिमटा घरातल्या मोठ्या नणंदेसारखा वाटायला लागला.. याला धर त्याला धर! पोळू नये म्हणून धरावा पण चिमटा काढल्याशिवाय सोडू नये. पोळपाट आणि लाटणे भांडणाऱ्या नवरा बायकोसारखं वाटायला लागलं.. तीन पायावर पाय पसरून निवांत बसलेला नवरा आणि त्यावर या बाजूने त्या बाजूने रागाने लाटणारी बायको.. मध्ये कणकेचा मऊ गोळा असतो म्हणून बरे. भांडण झाल्यावर दोघांनी वेगळ्या खोलीत जाऊन बसावं तसं काम झाल्यावर पोळपाट एकीकडे जातो आणि लाटणं दुसरीकडे जातं. आणि रवी म्हणजे मला घरातल्या गरीब बिचाऱ्या नापास होणाऱ्या दिरासारखी वाटते.. आपलं काम झालं की कोपऱ्यात जाऊन बसणे.. पण थोड्या वेळाची फिरवाफिरवी तर सोडत नाही बरं! तवा जरा खोल विचारांचा.. त्याला ठाऊक आहे आपल्याशिवाय कोणाचंही पोट भरणार नाही.
मिसळण्याचा डब्यातले ते सात कप्पे म्हणजे घरातली वेगवेगळी तऱ्हेवाईक माणसं.. कोणी तिखटासारखं लाल तर कोणी मसाल्यासारखं खमंग.. तिकडे तडफडणारी मोहरी एकात, तर कमी तापमानाला उडणारे जीरे दुसऱ्यात. सगळ्यांनी निरोगी राहावं आणि स्वयंपाकाला चव यावी म्हणून दिसणारे हिंग-हळदीचे पाळे! पळी तर मला दिसते घरंदाज बाईसारखी.. डोक्यावरचा पदर न पडू देता सगळ्यात राबणारी महिला!
गॅस सासरेबुवासारखा.. बायको हा सिलेंडर स्वतःबरोबर असेल तर हे पेटणार एरवी असंच!
उद्या पाणी येणार म्हणून घासून लख्ख केलेली कळशी एखाद्या नव्या नवरीसारखी दिसत होती आणि दहा ठिकाणी पोचे आलेला तो हंडा बसून बसून खाऊन शरीरावर मेद वाढलेल्या एखाद्या माणसासारखा दिसत होता……
…… या सगळ्या कल्पनेचं माझं मला हसू येत होतं.. सगळ्या विचारांच्या नादात भांडी लावून झाली पण त्या चार सहा वाट्या मला छान काय गप्पा मारत बसलेल्या बाया दिसत होत्या तेवढ्याच लावायच्या राहिल्यात..
चला एकूण काय सगळ्या भांड्यात कोणी ना कोणीतरी दिसलं आणि माझं काम झालं बघा.. तुम्हालाही काही सुचतंय का ——-
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




