श्री सुधीर करंदीकर
☆ “बायकोची हुशारी – अनोखा अनुभव…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
बायका घर कामामध्ये आपल्यापेक्षा नक्कीच खूप पुढे असतात हे नक्की. (म्हणजे, हा माझा अनुभव…)
घर नीट नेटकं ठेवणं, घराला घरपणं देणं, घरच्यांकरता सकाळ दुपार संध्याकाळ खाण्याची व्यवस्था करणं, घरी येणारे जाणारे यांचा पाहुणचार करणं, वगैरे वगैरे.. या सगळ्या फ्रंट घरामधली स्त्री च सांभाळत असते.
आणि आपला सर्वसाधारण असा समज असतो की बायका घर कामात आपल्यापेक्षा नक्कीच पुढे आहेत, पण टेक्निकल कामामध्ये नक्कीच आपल्यापेक्षा मागे आहेत. जसे घरातला गिझर बिघडला, पंखा चालत नाहीये, टीव्हीवर एखादा चॅनल लागत नाहीये, वगैरे वगैरे. कारण अशा गोष्टी दुरुस्त करण्यात बायका सहसा पुढाकार घेत नाहीत.
माझे विचार पण साधारण याच पॅटर्न मधले आहेत. त्यामुळे कुठलीही टेक्निकल संबंधी घरातली अडचण असेल तर बायकोला त्या मधले काहीही समजत नाही असे मी नेहमीच गृहीत धरून चालत असतो. आणि मी ते काम पूर्ण करतो.
पण परवाच्या एका अनुभवावरून माझ्या लक्षात आलं, की बायको टेक्निकल विषयामध्ये पण आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. त्याचं झालं असं –
बायकोला स्कूटर घेऊन संध्याकाळी कुठे बाहेर जायचं होतं. बायकोने बऱ्याच वेळ गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती. बायकोने मला हाका मारली. मी बऱ्याच वेळ स्कूटर सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काही जमेना. कदाचित किक मारून सुरू झाली असती, पण किक मारणं आता आपल्या आवाक्यातले नाही हे मी ओळखून असल्यामुळे, विचार केला उद्या सकाळी मेकॅनिकला फोन करावा..
दुसऱ्या दिवशी सकाळी मेकॅनिकल फोन केला. लगेच मेकॅनिक आले. आणि बऱ्याच वेळ स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण स्कूटर स्टार्ट होत नव्हती. त्यांनी बऱ्याच किक मारून पण प्रयत्न केला. पण जैसे थे. शेवटी मेकॅनिक म्हणाले : गाडी घेऊन जातो आणि बघतो काय झालंय ते..
आमची पार्किंगची जागा घराच्या बेडरूमच्या खिडकीच्या जवळच आहे. मेकॅनिक आले तेव्हा बायको घरामधे खिडकी जवळच उभी होती. कदाचित मेकॅनिक काय करतात ते बघत असावी.
मेकॅनिक जेव्हा मला म्हणाले, गाडी घेऊन जातो, तेव्हा बायकोने मला हाका मारली आणि म्हणाली, त्यांना सांगा की गाडीचा स्पार्क प्लग बदला. त्यामुळेच प्रॉब्लेम आहे
मी म्हटलं – स्पार्क प्लग का बरं
बायको : कारण काल मी जेव्हा गाडी स्टार्ट करत होते, तेव्हा मधून मधून फटाका वाजल्या सारखा आवाज येत होता. आणि आत्ता मेकॅनिक जेव्हा गाडी स्टार्ट करत होते, तेव्हा पण मधून मधून असाच फटाका फुटल्यासारखा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच स्पार्क प्लग गेला आहे.
मी बायकोला हो म्हटलं, पण फटाक्या सारखा आवाज आणि स्पार्क प्लग बदलणे, यांचा मला काही त्याचा संदर्भ लागत नव्हता.
त्यामुळे मेकॅनिकला मी स्पार्क प्लग बद्दल काही बोललो नाही. मेकॅनिक नी पार्किंग जवळचं गेट उघडलं आणि गाडी ढकलत ढकलत घेऊन गेले.
तासाभरात मेकॅनिक चा फोन आला.
साहेब गाडी तयार आहे, घेऊन येऊ का?
मी : घेऊन या. गाडीमधे काय प्रॉब्लेम सापडला.
मेकॅनिक : साहेब गाडीचा स्पार्क प्लग खराब झाला होता, तो बदलला. आणि गाडी लगेच सुरू झाली.
मी : किती बिल झालं
मेकॅनिक : शंभर रुपये फक्त.
फोनवरचं बोलणं संपलं. मी बागेत गेलो गुलाबाच्या झाडाला मस्त फुलं लागली होती. एक छान फुल तोडलं, घरात जाऊन बायकोला फुल देत म्हटलं – गाडी दुरुस्त झाली आहे आणि मेकॅनिक गाडी घेऊन येत आहेत.
बायको : आज एकदम प्रेमानी हे फुल कशाबद्दल! स्कूटरला काय प्रॉब्लेम होता
मी : तू सांगितल्याप्रमाणे मी मेकॅनिकला स्पार्क प्लग बद्दल बोललो होतो. मेकॅनिक म्हणाले मी गाडी पूर्ण चेक केली आणि लक्षात आलं की प्रॉब्लेम स्पार्क प्लगचा आहे. तो बदलला आणि गाडी सुरू झाली….
तू प्रॉब्लेम अचूक ओळखला म्हणून तुला हे फूल. आणि मेकॅनिकनी पण प्रॉब्लेम काय आहे ते तू सांगितल्याबद्दल तुला धन्यवाद कळवायला सांगितले आहे.
या अनुभवावरून काय शिकायचे हे तुम्हीच सांगा….
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




