श्री दिवाकर बुरसे
☆ चटका लाऊन निघून जा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
गिरिशिखरीचा नसुदे चंदन
झुडुप तरी हो दरीतले
झुडुप असे हो ज्याला पूर्वी-
कुणी कधी ना बघीतले।।१।।
*
झुडुपही नाही होता आले
इवले हिरवे गवत तरी
गवत असे देखणे, जणू की-
शालू हिरवा जरतारी।।२।।
*
अथांग सागर दूर राहु दे
गर्द निळे कासारची हो
वटवृक्षाची नसे अपेक्षा
हरि अधरीचा वेळू हो! ।।३।।
*
सारे सेनापती कशाला
कुणी शिपाई हवेत ना
‘शिवबाला‘ही सवे लागती
गड जिंकाया कुणी ‘ताना‘।।४।।
*
काष्ठशिल्प उतुंग उभविण्या
लघु लघु खणखर खिळे हवे
संगमरवरी ‘ताज‘ बांधण्या
क्षुद्र चुन्याचे कणहि हवे।।५।।
*
जसा लागतो शिल्पि तैसा
भार वाहण्या गर्दभही
राजसूय संपन्न व्हावया
शुष्क लागती समिधाही।।६।।
*
राजमार्ग होणे ना जमले
हो एखादी पाउलवाट
चंद्र-सूर्य, जा ठेव बाजुला
हो तारा घनदाट नभात।।७।।
*
आकारावर कधी न ठरते
महत्व कुठल्या गोष्टीचे
तृणभारे अन् केशरकाड्या
एक दराने तुलायचे? ।।८।।
*
जे वाट्याला आले काही
अनन्यभावे करीत जा
ईश्वरसेवा मानुनि सारी
श्रमभक्तीतचि रंगुन जा।।९।।
*
रंगरंगता रंग धुंद ते
सवंगड्यांवर शिंपित जा
आणि अचानक संघामधुनी
चटका लाउन निघून जा! ।।१०।।
*
(‘Be the best of whatever you are’ या ‘Douglas Malloch’ यांच्या मूळ इंग्रजी कवितेने प्रेरित होऊन केलेली ही रचना आहे.)
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





