श्री सुधीर करंदीकर
☆ “हॅपी न्यू इयर २०२६” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
नमस्कार नमस्कार,
तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि **** यांच्याकडून.
*** यांच्याकडून’ म्हणजे कुणाकडून हे लक्षात यायला जरा कठीण आहे पण त्याचे झाले असे–
मी रोजच सकाळी घराच्या टेरेसवर नऊच्या सुमारला जातो. व्यायाम करत करत वरच्या आकाशाकडे बघताना /झाडांकडे बघताना आणि त्यांच्याशी आणि स्वतःशी गप्पा मारताना मजा येते, ऊन पण छान असतं त्यामुळे डी विटामिन पण मिळतं. मधून मधून ३ – ४ कावळ्यांची गच्चीत जा ये सुरु असते /थोडी काव काव असते. मी पण त्यांच्याशी नेहमीच थोड्या गप्पा मारतो- हाय हॅलो म्हणतो, मजा येते.
आजची घटना – आज सकाळी गच्चीत गेलो आणि थोड्याच वेळात एकदम भरपूर कावळे गच्चीतल्या कठवड्यावर जमा झाले. आणि सगळेच कावळे जोरजोरात काव- काव- काव- काव एका विशिष्ट सुरात करायला लागले. मी पण थोडा बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांची नॉन स्टॉप काव काव थांबेचना.
मनात विचार आला की असा प्रकार आधी कधी झाला नव्हता. ३-४ कावळे रोजच यायचे थोडी काव काव करायचे, मी पण त्यांना हाय हॅलो म्हणायचो आणि ते काव काव करत उडून जायचे. आणि अशी जा ये रोजच सुरू असायची.
आज नॉन स्टॉप काव काव आणि ते पण गच्चीत एकदम इतके कावळे एकदम आले आहेत, कशामुळे/ काय कारण असेल, असा विचार करत होतो. आणि डोक्यात ट्यूब पेटली.
अरे – बहुदा यांना मला हॅपी न्यू इयर म्हणायचं असणार. आणि त्यांच्या भाषेत एका सुरात सगळे काव काव करत ते मला शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असावेत.
लगेच मी सगळ्या कावळ्यांकडे बघत थँक्यू थँक्यू म्हणालो, तुमच्या शुभेच्छा मिळाल्या असे म्हणालो आणि तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर असं म्हटलं, आणि गंमत म्हणजे सगळ्या कावळ्यांचे काव काव एकदम थांबले.
आणि लगेचच थोड्या वेळात पुन्हा कावकाव सुरू झाली पण थोडा वेगळा टोन होता. लगेच माझी ट्यूब पेटली, की, यांना असं सांगायचं असणार की आमच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या ग्रुप्स वरच्या सगळ्यांना पण कळवा.
मी लगेचच कावळ्यांकडे बघत म्हणालो तुमच्या शुभेच्छा नक्कीच सगळ्यांना कळवतो.
अशा रीतीने हॅपी न्यू ईअर शुभेच्छांची आमच्यामधली देवाण घेवाण पूर्ण झाली आणि एकदम सगळे कावळे काव काव करत आनंदात निघून गेले.
अशा रीतीने आज नवीन वर्षाची अशी पण एक आगळीवेगळी आणि कल्पनेच्या बाहेरची छान सुरुवात झाली. चक्क कावळ्यांकडून म्हणजेच निसर्ग देवतेकडून आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या, म्हणजेच नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना अगदी सुरेख आणि आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे जाणार हे नक्की.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





