श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ अडखळलेली पावलं… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

रुसून माहेरी आलेल्या ताईला सांगत होती आजी असेच काही समजावून…

“पिठात पाणी घातल्याबिगर भाकरी थापता येत न्हाई पोरी,

जगाची रीतच अशी ही सासुरवास कुणाला चुकलाय का?

कसा संसार उभा जन्म केला आमचं आम्हाला ठावं. “

 

मग आठवलं मला बालपण,

ताईने अंगणात आखलेली ती रिंगणं…

दगडाची चीप रिंगणात टाकून लंगडी खेळत म्हणायची,

“माझ्या नादाला कुणी जर लागलं तर,

एका फटक्यात आडवी करीन… “

तेव्हा आई म्हणायची

” उद्या लगीन झाल्यावर कळल तुला.

सासू एका दणक्यात सरळ करील. “

 

नाक फुगवत ताई म्हणायची

“अगं सासू असू दे न्हायतर नवरा.

मी करीन त्याचा भवरा.. “

 

आम्ही सगळे खळखळून हसायचो…

आणि ताई वाघिणीसारखी चालत म्हणायची,

“नाद करायचा न्हाय माझा चल हो बाजूला. “

आणि राजकुमारी असल्यागत ऐटीत झोक्यावर जाऊन बसायची.

 

आत्ता हीच वाघीण शेळी होऊन बसली होती

आज्जी सांगत होती.. आणि ताई फक्त मान डोलवत होती.

व्यवस्थेच्या पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडीच ना शेवटी ती…

फरक इतकाच… मरेपर्यंत धगीवर शिजत राहते बस इतकंच…

 

जरा काय झालं, कुणी काय बोललं की,

रुसून लगेच माहेराला यायची.

माहेरपण जगायची..

चार दिवसात राग संपायचा

कुणीतरी समजूत काढायचं.

मग अचानक भावजी यायचे

चिमणी पुन्हा हसायची.. सगळं विसरायची.

आणि परत तिच्या चिमण्यासोबत निघायची…

 

“सासरच्या घरी जाताना अर्धं पोतं ज्वारी,

थोडंसं गहू, जमलंच तर वायशी तांदूळ,

आणि बरणीभर लोणचं, थोडीशी चटणी… 

आणि तिच्या काळजाची वाटणी करून

तिची निरोपाची पावलं चालू लागायची

 

गाडी यायची.. गडबड व्हायची

सामान अगोदर आत.. नंतर आमची चिमणी.. मग भावजी आत

खिडकीतून हात हातात यायचा

तिचे पाणावलेले डोळे.. त्या हिरव्या बांगड्या..

आणि खिडकीच्या काचेतून बाहेर हसत असलेलं..

तिचं तिच्या जन्मासोबत आलेलं स्वातंत्र्य…

 

टांग… टांग… घंटा वाजायची

तिचं स्वातंत्र्य आकाशात भुर्रकन उडून जायचं…

कंडक्टर दार जोरात ओढून घ्यायचा.

गाडी पुढे जायची..

 

तेव्हा… मला दिसायचं

गाडीच्या पाठीमागे लिहिलेले वाक्य..

 

“मुलापेक्षा मुलगी बरी

प्रकाश देते दोन्ही घरी”

——

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments