सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ गिल्टी माइंडस्…  ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गिल्टी माईंड्स – – 

 – – बोध आणि शोध अपराधी मनोवृत्तीचा!

या वेब सिरीजच्या नावाने लक्ष वेधून घेतलं होतं पण एकूण त्या नावाचा जो आशय आहे त्यावरून यामध्ये प्रचंड खून खराबा, किंवा अश्लीलता असेल की काय असं वाटत असल्याने बऱ्याच आधीपासून नोटिफिकेशन्स आले तरी पाहिली जात नव्हती. शेवटी एकदा एखादा एपिसोड बघूया आणि मग ठरवूया असं म्हणून या शीर्षकाने खेचून घेतलं आणि वेब सिरीज बघायला सुरुवात झाली.

आजकाल कोणतीही वेबसिरीज बघायची झाली तर तुम्हाला अश्लीलता, खून हिंसा आणि अल्कोहोलिकता याचा सामना करावाच लागतो. अगदी काही कौटुंबिक वेब सिरीज सोडल्या तर जवळपास प्रत्येक वेब सिरीजचा हा एक अपरिहार्य भाग असल्याप्रमाणे झालं आहे. हे असं का आहे हा प्रश्न पडणारी व्यक्ती म्हणजे जणू आजच्या काळातली मागासलेली ठरावी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात फार काही हशील आहे असं वाटत नाही. तर असो.

मूळ मुद्दा हा आहे की ही वेबसिरीज त्याला अपवाद आहे. म्हणजे यात हिंसा, क्रौर्य किंवा अल्कोहोलिकता, वगैरे नाही असं नाही. परंतु त्याचं प्रमाण अतिशय मर्यादित आहे. ही एका कोर्टाच्या कामकाजावरती केंद्रित अशी वेबसिरीज आहे. त्यामुळे अर्थातच यामध्ये काम करणाऱ्या सर्व पात्रांचा वकीली हा व्यवसाय दिसतो. आणि वकिली म्हटलं की गुन्हा आला, आरोप आले, प्रत्यारोप आले, डावपेच आले, शिक्षा आली, कायदा आला. हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे पण बरंच वास्तवदर्शी आहे. कथानकात, मांडणीत कुठेही भाबडेपणा नाही. अतिरंजितता नाही आणि हे थोडेसं कौतुकास्पदही वाटलं. खरं म्हणजे यातले कित्येक प्रसंग असे आहेत की जे खूप लाऊडसुद्धा करता आले असते परंतु वास्तवदर्शी चित्रण करण्याचा हेतू असल्यामुळे असेल ते जेवढ्यास तेवढ्या प्रमाणामध्ये दाखवले गेले आहेत. आणि म्हणून ते जास्त परिणामकारक ठरले आहेत. इथे व्यक्ती आणि समाज म्हणून घडणाऱ्या गुन्ह्यांमागची मानसिकता आपल्याला जास्त विचार प्रवृत्त करते.

दुर्दैवाने आज गुन्हेगारी हा विषय आपल्याला नवीन नाही. समाजात दिवसातल्या 24 तासात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. त्यातल्या काही मोजक्याच गुन्ह्यांची नोंद केली जाते. त्यातल्याही काही मोजक्या गुन्ह्यांवर खटले चालवले जातात. आणि त्यातल्याच काही मोजक्याच खटल्यांचा योग्य प्रकारे निकाल लागतो. याची आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पुरेपूर कल्पना आहे. ती कल्पना किती बरोबर आहे हे या वेब सिरीजमधून चांगल्या प्रकारे अधोरेखित होतं.

मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे हा की वकिली व्यवसायाकडे एका वेगळ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं जाण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे असं म्हणता येईल. आणि या वेबसिरीजचं शीर्षकच ही मानसिकता चपखलपणे मांडतं.

एकामागे एक येत जाणाऱ्या केसेस, ते सोडवत जाणारे वकील, त्यांचे प्रत्यक्षातले एकमेकांशी असलेले संबंध, एकीकडे कायद्याची बुज राखण्याची त्यांची मनापासून चाललेली धडपड, दुसरीकडे काही सामाजिक आणि राजकीय दबाव यांच्यातून घ्यावे लागणारे निर्णय अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा न्याय हा कसा कोंडीत पकडला जातो ते यातून प्रभावीपणे दिसतं.

गुन्हा करणारा माणूस आहे, त्याला वाचवणारा आणि त्याला शिक्षा ठरवणारासुद्धा माणूस आहे ही सगळी माणसं आहेत समाजात वावरणारी, सामाजिक नीतिनियम यांची पुरेशी कल्पना असणारी, काही प्रमाणामध्ये साक्षर, काहींना तर कायद्याच्या वाटा आणि पळवाटाही माहित आहेत अशी, तरीही त्यांच्याकडून स्वार्थी भावनेतून गुन्हे घडतात. आणि त्यातून वाचण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण हा प्रयत्न सुरू असताना एका वकिलाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, वैचारिक आंदोलन, त्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी यासुद्धा खूप छानपणे यातून मांडलेल्या आहेत. इथे वकिलातला माणूस आणि माणसातला वकील दोन्हीही प्रभावीपणे दिसतात.

या वेब सिरीजमध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि विशेष म्हणजे वेगळ्या पातळीवरचे जणू काही भविष्यकाळात घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद या वेब सिरीजमध्ये घेण्यात आलेली आहे. इथे गाण्याच्या कॉपीराईटचा प्रश्न आलेला आहे. इथे आयव्हीएफ तंत्रज्ञान मध्ये केले जाणारे घोटाळे आलेले आहेत. व्हिडिओ गेमच्या माध्यमातून हिंसा करायला प्रवृत्त होणारी तरुणाई इथे आली आहे. स्वयंचलित मोटार मुळे निर्माण होणारा अपघात आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत इथे आहे. म्हणजे चालू आणि पुढील आधुनिक काळामध्ये घडू शकतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार यात प्रामुख्याने केलेला दिसतो. आणि हेच मला या वेब सिरीजचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे असं यश वाटले. शिवाय प्रत्येक केसमध्ये भाबडेपणाने काव्यगत न्याय न देता कायदा हा पुरेशा पुराव्यांवरच चालतो हे मांडलं आहे. मग तो गुन्हा कितीही गंभीर स्वरूपाचा का असेना. आणि अनेकदा जिंकू पाहिलेली केस एखाद्या पुराव्याने हरवू शकते तर एखादी हरू पाहणारे केस ही योग्य त्या प्रकारे जिंकताही येते हे अतिशय स्पष्टपणे दाखवलेले आहे.

यातली सर्व पात्रे अतिशय उत्तम रीतीने आपापल्या भूमिकेनुसार चोख वागतात. कारण अशा भूमिकांमध्ये संयम बाळगणे हे खरंच कठीण आहे. भूमिकेचा तोल चुकूनसुद्धा एखाद्या विशिष्ट विचाराकडे झुकू शकतो आणि त्यातून त्या पात्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. या सर्व भूमिका ग्रे शेड्समध्ये आहेत कारण वकील असो की न्यायाधीश त्याला अनेकदा अनेक गोष्टींकडे केवळ पुराव्या अभावी कानाडोळा करावा लागतो आणि निर्णय घ्यावे लागतात. इथे भावनांपेक्षाही कर्तव्याला आणि समोर उपलब्ध असलेल्या पुराव्याला महत्त्व आहे हे दाखवताना कमालीचा संयम मला यात आढळला.

यातले मुख्य कलाकार, उप कलाकार कोण या सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च केल्यावर नक्कीच मिळतील त्यामुळे त्या मी इथे देत नाही. मात्र सर्व कलाकारांचं काम हे वाखाणण्याजोग झालं आहे.

प्रत्येकाने तुम्हाला हिंसा आवडत असो अगर नसो गुन्हेगारीबद्दल वाचणं पाहणं आवडत असो नसो ही वेब सिरीज एकदा पहावी असं माझं सांगणं आहे. त्यावरून साधारणपणे गुन्हा काय असतो, गुन्हेगाराची मानसिकता काय असते, खटले कसे दाखल होतात, वकील कशा प्रकारे विचार करतात, आणि एकूणच ज्या सामाजिक जगतात आपण जगतो, ज्या कायद्याच्या आधारे आपण जगू पाहतो आहोत, सुरक्षितता बाळगू पाहतो आहोत तो कायदा नक्की कसा वागतो. त्याचा कसा वापर होतो. याचे उत्तम उदाहरण देणारी ही वेब सिरीज आहे. त्यामुळे जरूर जरूर पहा.

– – या वेब सिरीजला जर रेटिंग द्यायचं झालं तर माझे पाच स्टार्स नक्की असतील.

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted