श्री प्रमोद वामन वर्तक
मनमंजुषेतून
☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“आता माझा मूड नाही! “
हे वाक्य अखिल मानवजात आपापल्या मातृभाषेत किमान दिवसातून एकदा किंवा सकाळी उठल्यापासून काहीच मनासारखं होतं नसेल तर अनेकदा वदत असावी!
एवढंच कशाला, ज्या लहानग्यांना या शब्दाचा अर्थ तर सोडाच, स्पेलिंग पण येत नसेल अशी चिमुरडी मुलंसुद्धा हा शब्द, अर्थात आपल्या पप्पा, मम्मीचे ऐकून आजकाल उच्चारत असतात, आता बोला!
प्रत्येक शब्दाचे एक उगम स्थान असते, तसे या मूड शब्दाचे पण असावे, पण ते सांगण्याच्या मूड मधे मी नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ते मला खरंच ठाऊक नाही! आणि यात कमीपणा असण्याचे सुद्धा काही कारण नाही, असं आपलं मला माझा मूड चांगला असला तरी वाटतय! या माझ्या अशा वाटण्याला वाचकांचा मूड चांगला नसेल तर बाधा येण्याचा संभव नाकारता येत नाही बरं का मंडळी! तर अशा या मूड शब्दाच्या उत्पत्तीवर भाषा शास्त्रातले जाणकारच त्यांचा मूड असेल तर, अधिक प्रकाश टाकतील या बद्दल मला शंका नाही!
माझ्या मनांत कायम एक प्रश्न माझा मूड चांगला असला की या संदर्भात उभा राहतो. तो असा, की हा मूड शब्द प्रचारात येण्याआधी आपण सगळेच त्यासाठी कोणता पर्यायी शब्द आपापल्या मातृभाषेत वापरत होतो? या माझ्या प्रश्नावर सुद्धा वर म्हटल्या प्रमाणे पुन्हा भाषाशास्त्रातले जाणकारच एकदा त्यांचा मूड नसला तरी प्रकाश टाकू शकतील याची बालंबाल खात्री मला आहे! आता तुम्ही म्हणाल प्रथम मी शंका नाही असं म्हटलं आणि आता बालंबाल खात्री आहे असं कोणत्या मूड मध्ये म्हणतो आहे? तर तुमच्या या मनांत उभ्या राहीलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला कुठल्याही मूडची आवश्यकता नाही बरं का मंडळी! तुमच्या मनांत असा प्रश्न तुमचा मूड चांगला नसल्याने जर का उभा राहिला असेल तर त्याचे उत्तर असं, की पहिल्या प्रश्नाचे उत्तर भाषातज्ञाना देता आल्यावर माझा हा दुसरा प्रश्न त्यांच्यासाठी, त्यांचा मूड कसाही असला तरी, किस झाडकी पत्तीच वाटणार! म्हणूनच मी खात्रीपूर्वक असा शब्द माझा मूड चांगला लागल्याने वापरला. असो!
ह्या मूड शब्दाला निदान आपल्या मराठी भाषेत तरी कोणता पर्यायी शब्द आहे, हे जर मला लवकरात लवकर कळले (हे परत भाषातज्ञाच्या मूडवर अवलंबून बरं का) तर मी त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि माझ्या कोणत्याही मूड मधे हे असिधाराव्रत पूर्ण करण्याचे मी ठरवले आहे. मग ते करत असतांना समोरच्या माणसाचा मूड काय आहे हे मी कधीच ध्यानात घेणार नाही, याची माझी मलाच खात्री आहे! कारण कितीही झालं तरी मूड हा शब्द आपल्या मातृभाषेतला नाही, हे आपण आपला मूड कसाही असला तरी मान्य करालच कराल! तो आपण सर्वांनीच कुठून आणि कसा उचलला, आपल्या समृद्ध अभिजात मराठी भाषेत आणला आणि आपल्या कुठल्याही मूड मध्ये तो वापरण्या इतका, आपण आपल्या नकळत कसा प्रचलित केला, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल! किंवा या मूड शब्दाचा आपल्या साहित्यात कुठल्या लेखक महाशयांनी, त्यांच्या कुठल्या मूड मध्ये प्रथम वापर केला, हा सुद्धा तुमच्या मूडला साजेसा नसला तरी, वरील संशोधनाचा उपप्रश्न ठरू शकतो यात दुमत असण्याचे कारण नाही आणि या अशा उपप्रश्नामुळे कुणाचा मूड बिघडेल असं मला अजिबात वाटत नाही.
माझ्या लिहिण्याच्या मूडमधे मी लिहीत गेलो आणि आपला मूड हे वाचत असतांना कसा होता आणि आता हे सगळे वाचून झाल्यावर कसा आहे, हे आपण मला, आपला मूड लागेल तेव्हा नक्कीच कळवाल, या आशादायक मूड मध्ये मी सध्या आहे, याची खात्री बाळगा!
आपल्या सर्वांचाच मूड (दुसरा पर्यायी शब्द कोणीतरी सांगे पर्यंत) काही ना काही कारणांनी कायमच चांगला राहो, हीच त्या विधात्याच्या चरणी (ज्याचा मूड कधीही बिघडत नाही असं काही भाविक म्हणतात) माझी मूडभरी प्रार्थना!
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





