मोहिनी किंहिकर हेडावू
अल्प परिचय
कला शाखेतून पदवी घेतली
सध्या नागपूर मध्ये सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)
वाचनाची लिखाणाची आवड. ललित लेखन, कविता तसेच सामाजिक विषयावर लिखाण करायला आवडते. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती, मातृ सत्ता व जन्मंगळ मधून लेख प्रकाशित झाले.
नुकतच ‘मनातलं’ हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित.
☆ “शोध अवकाशाचा” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆
☆
अमृता प्रीतम चा चौथा कमरा मला का नसावा?
म्हणून मी माझ्या अवकाशाचा शोध घ्यायचा ठरविले..
“आम्ही नाही बाई, कधी अश्या शोधाच्या मागे लगलो?
पोटापाण्याच्या प्रश्नातच अवकाश गुदमरून गेले… “असे अनेकांचे ताशेरे!
मी दुर्लक्ष केले..
बहिणाबाईंनी कुठे अवकाशाचा शोध घेतला? पण तिला गवसलेचना!
“कामात असतानाच ओवीच इन्क्यूबेशन..
तर जात्यावर बसल्यावर, त्या शब्दबध्द व्ह्यायच्या”
एका विदूषीचा मार्मिक टोमणा.
पण मी तिकडे दुर्लक्ष केले..
मी जिद्दीने मार्गक्रमण केले.. माझे अवकाश मला गवसले..
शरीराने कात टाकली. आणि मनानेही…
तिथे भाऊसाहेबांनी शायरीची मैफिल!
आर्किमिडीज बाथटब मध्ये युरेका म्हणत बसलेला..!
सिद्धार्थ ला बुद्धत्व प्राप्त होण्याचा क्षण अनुभवला!
तर काही हे क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी रांगा लावून उभे!
मी गर्दीत माझ्यासाठी एक कोपरा शोधला.. उभे राहिले तिथेच… दाटीवाटीत!
ध्रुवला अढळ पदासाठी किती संघर्ष करावा लागला… हे उमगले.. !
व
‘भगीरथप्रयत्न ‘या शब्दाचा अर्थ ही!
मी होते माझ्याच धुंदीत!
मोकळा श्वास घेत!
भानावर आले…
पहाते तर मी एकटीच उभे!
सगळे घराकडे परतले.
माउंट एव्हरेस्ट चढल्यावर ही उतरावंच लागत… जगरहाटीत यावेच लागते…
व मीही जागी झाले.
स्वप्नातून…
अन् आले वास्तवात!
☆
© मोहिनी किंहिकर हेडावू
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





