डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन किंवा त्यांच्यासाठी इतर काही गोष्टी करता करता अनेक भले बुरे अनुभव येतात. तळागाळातल्या या लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं, माणुसकी म्हणजे नेमकं काय हे समजतं, सकारात्मक बाबी दिसतात, पूर्णतः अडाणी असून सुद्धा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन भारावून टाकणारा असतो, मी मग याच चांगल्या बाबींवर लिहितो.
वाचल्यानंतर बऱ्याच वेळा अनेक जण मला असं विचारतात, ‘हि अशी चांगली लोकं तुम्हालाच कशी भेटतात, आम्हाला का नाही भेटत असं कुणी? ‘
‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात? आम्हाला का नाहीत येत? ‘
‘या इतक्या अडाणी, अंगावर धड कपडे नसलेले लोक, जगण्याची आशा नसलेले लोक, यांच्याकडे इतके चांगले विचार कुठून येतात? ‘
‘तुमच्या बाबतीत खूप छान छान घटना घडतात, एकही वाईट घटना तुमच्या बाबतीत घडत नाही दिवसभरात… मग आमच्याच बाबतीत का नाही असं घडत? ‘
अरे हो.. हो… ऐका तर खरं…
माझ्याबाबतीत सर्व काही चांगलं घडायला मी काय आभाळातून पडलोय का? की मला कोणता वर मिळाला आहे…?
तर… दिवसभरातून शंभर पैकी 99 घटना, या चिड आणि राग आणणाऱ्या, काम सोडून द्यावं की काय असं क्षणभर वाटायला लावणाऱ्या इतक्या टोकाच्या असतात. माझ्या बाबतीत काय, किती आणि कसं वाईट घडलंय हे मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलंच आहे. तरीही त्यातल्या काही सांगतो…
आयुष्याच्या सुरुवातीला हे माझं काम सुरू करण्यापूर्वी मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेत काम करत होतो (माझ्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी केलेली नोकरी होती ती, याला मी समाजसेवा म्हणणार नाही). दरवेळी मी पुण्यातल्या बुधवार पेठ या रेड लाईट एरिया मध्ये कामानिमित्त फिरत असायचो, तिथल्या महिलांशी बोलायचो, प्रसंगी जिथे हा व्यवसाय चालतो त्या घरात (याला Brothel म्हणतात) सुद्धा जायचो. यावेळी दुरून पाहणारे लोक मला “बायका पुरवणारा एजंट” समजायचे.
भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केलं, तेव्हा भीक मागणाऱ्या या लोकांना कोणीतरी सांगितलं, ‘तुमच्यातल्या चांगल्या बाया “हेरायला” हा एजंट तुमच्यात घुसला आहे, हा तुमच्या बायांना “धंद्याला” लावेल, याला दूर ठेवा. ‘
भीक मागणाऱ्या लोकांना मेडिसिन देण्यासाठी सुरुवातीला जेव्हा यांच्यात अगदी प्रेमाने मी यांच्या जवळ जायचो, पण “एजन्ट” समजून भीक मागणाऱ्या लोकांनी मला चपला फेकून मारल्या आहेत, गुटखा खाऊन अंगावर थुंकले आहेत, काठ्या घेऊन अंगावर आले आहेत…
रॅकेट चालवणाऱ्या लोकांना वाटायचं, माझ्यामुळे यांचा “बिझनेस” कमी होईल म्हणून कित्येक वेळा गळ्याला सुरे सुद्धा लावले आहेत… आई बहिणी वरून शिव्या देऊन ते मला म्हणायचे, ‘आज आत्ता इथे दिसलास, पुन्हा दिसू नकोस, दिसलास तर नागडा करून मारू, इथेच खल्लास करून टाकू… कुणाला पत्ता सुद्धा लागणार नाही…! ‘
असो, तर सांगायचा मुद्दा हा, की दिवसातून 99 वेळा माझ्या बाबतीत वाईट घटना घडतातच, क्षणभर वाटतं कशासाठी करायचं हे मी…? पण दिवसभरातून एक तरी माणुसकीचे दर्शन घडवणारी, जन्माला येऊन सार्थक झालं असं वाटायला लावणारी, एक तरी घटना घडतेच. या एकाच घटनेचे वजन 99 वाईट घटनांपेक्षा जास्त भरतं… या चांगल्या घडलेल्या एका गोष्टीच्या फुंकरीमुळे बाकीच्या 99 गोष्टी धुरळ्यागत उडून जातात…! हिच मला मिळणारी ऊर्जा आणि शक्ती! ! !
याच ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर, गेली अकरा वर्षे रोज भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून त्यांच्या पुनर्वसनाचे, शिक्षणाचे, फुटपाथ वर पडलेल्या लोकांना उचलून सुरक्षित ठेवण्याचे काम सुरु आहे, अर्थात आपल्या सर्वांच्या साथीने…!
ती दिवसभरातून घडलेली एकच चांगली घटना, मग मी शब्दरूपात मांडतो, जेणेकरून समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल, आपणही असं काहीतरी करावं हे तरुण मंडळींना सुद्धा वाटेल, निराश झालेले लोक हे वाचून नैराश्यातून कदाचित बाहेर पडतील, सगळंच वाईट नाही, काहीतरी चांगलं सुद्धा आजूबाजूला घडतंय, हे लोकांना कळेल, एरव्ही न दिसणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडेल, इतकाच माझ्या लिखाणाचा हेतू असतो…!
खूप लोक म्हणतात, ‘तुम्हाला येणाऱ्या वाईट अनुभवांवर सुद्धा काहीतरी लिहीत जा की… ‘ पण पेपर उघडला, टीव्ही लावला, आजूबाजूला पाहिले तर अनंत नकारात्मक आणि वाईट वाटेल अशा घटना घडतच असतात, आपण त्या वाचतो पाहतो… मग पुन्हा माझ्या बाबतीत घडलेल्या नकारात्मक गोष्टी सांगून मी त्यात आणखी कशाला भर घालू…???
‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात? आम्हाला का नाहीत येत? ‘, ‘वाईट आलेल्या अनुभवांवर का लिहीत नाही? ‘ हे मला विचारणाऱ्या त्या सर्वांसाठी हे उत्तर आहे…! असो… अगदी साधी गोष्ट… एखाद्याने आपल्याला विचारलं – तुला मी पाचशे किलो गहू देऊ? की एक किलो गहू? दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल? पाचशे किलो गहू… कारण इथे *वजन* महत्त्वाचं ठरतं.
एखाद्याने विचारलं – तुला मी चांगल्या सोसायटीतला पाच रूम असलेला 3000 स्क्वेअर फुटचा पॉश फ्लॅट देऊ? की चाळीतलं 100 स्क्वेअर फुटाचं पत्र्याचं एक घर देऊ? दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल? अर्थातच पॉश फ्लॅट… कारण इथे महत्त्वाची ठरते *आकारमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत. *
पण…
एखाद्याने विचारलं – तुला मी पाचशे किलो लोखंड देऊ? की 50 तोळे सोनं… काय देऊ? दोन्हीतलं एक काहीतरी निवड… आता कुणीही काय निवडेल? 50 तोळे सोनं…!
बघा क्षणामध्ये संदर्भ बदलले…
“वजन” महत्त्वाचं म्हटलं तर 500 किलो लोखंडाचे वजन खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी वजनाच्या सोन्याची!
“आकारमान” महत्त्वाचं मानलं, तर 500 किलो लोखंडाचं आकारमान खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी आकारमानाच्या सोन्याचीच!
एखाद्याने विचारलं – तुला मी अब्जावधी रुपयाची एक छोटी हिऱ्याची अंगठी देऊ? की पॉश सोसायटीतल्या दहा खोल्या भरतील इतके जुने भंगार सामान देऊ? दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल? अर्थातच हिऱ्याची अंगठी…!
बघा इथेही वजन, आकारमान, असं सर्व काही असूनही, निवड झाली कमी वजनाच्या, कमी आकारमानाच्या हिऱ्याच्या अंगठीचीच…!
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जीथे “वजनाला” किंमत नसते आणि “किमतीला” वजन नसतं…! रुपयात होणारी किंमत हि फक्त व्यवहारासाठी आहे…!
“किंमत” आणि “मूल्य” यात खूप फरक आहे…! “किंमत” ही कायम खर्च होते… “मूल्य” आयुष्यभर जपले जाते…!
हॉटेलमध्ये स्वतः दोन हजार रुपयांचं खाणं… आणि एखाद्या भुकेल्या माणसाला दहा रुपयाचा वडापाव घेऊन देणं… दोन हजार रुपयांना किंमत जास्त आहे, परंतु या किमतीला वजन नाही… दहा रुपयांना विशेष किंमत नाही, तरीही याचे “मूल्य” आणि “वजन” खूप जास्त आहे…! दोन हजार रुपये खर्च झाले… दहा रुपये अमूल्य होऊन जमेच्या रकान्यात जमा झाले…
तर… मला रोज मोठ्या “आकाराचे” अपमान मिळतात… खूप जास्त “वजनाचे” तिरस्कार मिळतात…
पेशंट तपासायला रस्त्यावर मी एखादी “मोक्याची जागा” बघून मेडिसिन चे डबे मांडून बसतो, परंतु चालायला अडथळा होतो म्हणून लोक माझ्या या डब्यांना मुद्दाम लाथा मारून जातात, दुकानदारांना गिऱ्हाईक आत यायला अडथळा येतो म्हणून मला ते तिथून हाकलून लावतात… या नंतर, दहा खोल्या भरतील इतक्या शिव्या मिळतात…! ! ! पण मी हे मुद्दाम लिहीत नाही, गरजच काय…?
पण हे सर्व करत असताना उकिरड्यात काहीतरी चकाकताना दिसतं, मी जवळ जाऊन पाहतो ती बहुधा हिऱ्याची अंगठी असते, वेगवेगळे घाव बसले असावेत म्हणून अंगठीचा आकार बदललेला असतो, हिरा मात्र तस्साच लखलखणारा…! हां, थोडी धूळ बसलेली असते इतकंच…
मी माझ्या रुमालाने धूळ साफ करतो, एक सुरकुतलेला पण डोळ्यात चकाकी असणारा साधारण सत्तरीच्या आजीचा चेहरा मग हिऱ्याच्या रूपात समोर येतो…!
मी तिला बोलतं करतो… , ‘मुलगा चांगल्या खात्यात हाय, मला कसला त्यो टीबी का फीबी रोग झालाय म्हणत्यात, सतत खोकणाऱ्या म्हातारीमुळं आपल्या पोरास्नी काय तरास नगो म्हणून हितं आनून पोरानं बशीवली, परत घ्यायाला येतो म्हनला पण धा दिस झालं तरी आला न्हायी…! ‘
‘आजी तुम्हाला मुलाचा फोन नंबर माहित आहे का, पत्ता माहित आहे का? मी तुम्हाला सोडतो, ते वाट बघत असतील तुमची. ‘
‘मला समदं म्हाईत हाय बाळा, पन वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी. माजी वाट बघणारं आता तिथं कुणी न्हायी’ तिने डोळ्याला पदर लावला.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






हृदयस्पर्शी