सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भाताचे विविध अवतार… –  लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

आज ब्रेकफास्टमध्ये हातसडीचा मऊ भात आला. वर मेतकूट, मीठ, मिरपूड. बरोबर लिंबाचं लोणचं. भात चाटमाट करून खाल्ला. आणि शेवटी अगदी अनाहूतपणे ताटलीही चाटून साफ केली! हो, हे थोडं असंस्कृत वाटेल. पण काही पदार्थ खाल्ल्यानंतर चमचा खाली ठेवून सभ्यपणे उठता येत नाही. ताट स्वच्छ चाटल्याशिवाय आत्मा तृप्त होत नाही.

आणि तिथेच डोक्यात विचार आला, भात हा नक्की पदार्थ आहे का? कारण एवढी रूपं दुसरा कुठला पदार्थ घेतो?

आज हातसडीचा मऊ भात. कधी वरणात विसावलेला. कधी दह्यात शांत झालेला. कधी गुळात गोड झालेला. कधी मसाल्यात रंगलेला. कधी पेज होऊन आजारी माणसाच्या उशाशी बसलेला.

मला म्हणूनच भाताकडे पाहिलं की विष्णूची आठवण येते. मूळ तत्त्व एकच. प्रसंग बदलला की अवतार बदलतो.

कोकणात पहिला पाऊस पडला की भूकही बदलते. कौलांवर पाऊस, अंगणात पाणी, हवेत मातीचा वास. अशा दिवशी गरम भातावर कुळथाचं पिठलं आणि बाजूला लोणचं आलं की बाहेर कितीही पाऊस कोसळू दे, घर सुरक्षित वाटतं.

आणि त्याच पावसाळ्यात घरात कुणाला ताप आला की हा भात सगळी नाटकं बंद करतो. तो पेज होतो. पातळ. गरम. साधी. थोडं मीठ. कधी लोणच्याचा खार. पेज फार चविष्ट नसते. पण तापात तिचा पहिला घोट जो दिलासा देतो, तो 5 Star जेवणात मिळेलच असं नाही.

काही पदार्थ आनंद देतात. काही पदार्थ पथ्य सांभाळतात. आणि ताप उतरू लागला की पेजेची बढती होते, मुगाच्या डाळीची खिचडी. भात, मुगाची डाळ, हळद, मीठ. वर साजूक तुपाची धार.

तब्येत जरा जास्त सुधारली असेल तर बाजूला पापड आणि लोणचं.

खिचडीची गंमत अशी की ती आजारी माणसाचं अन्नही आहे आणि कंटाळलेल्या घराचं सार्वत्रिक उत्तरही.

“आज काही करायचा मूड नाही. ” “खिचडी टाकूया का? ” बस. जेवणाचा प्रश्न संपला.

आणि मग घरात एखादं लग्न.

साड्या, पत्रिका, मंडप, पाहुणे, फोटोग्राफर, या सगळ्या गोंधळात एक प्रश्न मात्र अत्यंत गांभीर्याने विचारला जातो, “जेवण कुणाचं आहे? ”

पंगतीत मसालेभात येतो. वर काजू दिसला की प्रतिष्ठा वाढते. आपण दोनदा घेतो आणि ठामपणे म्हणतो, “बस. आता काही नको. ” 

पाच मिनिटांनी वाढपी विचारतो, “साधा भात? ” मान आपोआप डुलते. वर वरण. तूप. लिंबू किंवा ताक-भात

एवढ्या थाटामाटाच्या जेवणाचा शेवट पुन्हा साध्या भाताने. हे लग्नासारखंच असावं बहुधा. दिवसभर कपडे, फुले, फोटो, लाईट्स…शेवटी संसार साधाच करायचा असतो.

उन्हाळ्यात भाताचा सूर पुन्हा बदलतो. सकाळचा भात दह्यात जातो. थोडं मीठ. कधी फोडणी. दहीभात. दोन घास खाल्ले की जीव शांत.

पण तांदळाने फक्त भातच व्हायचं ठरवलंय असं समजू नका. त्याचं पीठ झालं की घावन. कधी आंबोळी. कधी तांदळाची भाकरी. कधी सांदणं.

एकाच तांदळाने एवढे Profession बदलणं पाहून आजच्या Career Counsellorलाही न्यूनगंड यावा.

आणि मग घरात गणपती येतात. कोकणात गणपती म्हणजे देवाबरोबर घर भरायचं निमित्त. मुलं परत येतात. गाद्या जमिनीवर पडतात. रात्री गप्पा रंगतात. एखाद्या दिवशी भजनी फड येऊन दणका उडवतो.

आणि तांदूळ? तो पुन्हा गायब. त्याचं पीठ होतं. उकड होते. पारी होते. आत नारळ-गूळ भरतो. आणि थोड्या वेळाने गणपतीसमोर उकडीचे मोदक.

तोच तांदूळ नारळी पौर्णिमेला गूळ, नारळ, वेलची घेऊन नारळी भात होतो.

विष्णूला मोहिनी अवतार घ्यावा लागला. भाताला नारळ आणि गूळ पुरतो.

आणि अर्थातच कोकणात भाताची कथा मासळीशिवाय पूर्ण होणार नाही.

गरम भात. ताजं मासळीचं कालवण. बाजूला तळलेला बांगडा, सुरमई, तारली किंवा पापलेट. सोबत सोलकढी.

पहिला घास घेतल्यावर घरातल्या चर्चा मंदावतात. EMI उद्या.

काम उद्या. बाजारभाव उद्या. आत्ता कालवण थंड होण्यापूर्वी भात संपवायचा.

मासळी बदलते. मसाला बदलतो. घरोघरी कालवणाची चव बदलते. पण त्या सगळ्यांना सामावून घेणारा भात तिथेच असतो.

आणि मग एखादा दिवस असा येतो की घरातला आवाजच बदलतो. श्राद्ध असतं. तांदळाचा रवा काढला जातो. त्याची खीर होते. प्रसादात वाढली जाते. गणपतीसमोर मोदक झालेला तोच तांदूळ आता पूर्वजांच्या स्मृतीत खीर होऊन येतो.

तेव्हा जाणवतं हा पदार्थ फक्त स्वयंपाकघरात नाही. तो संस्कृतीत शिरलेला आहे.

लग्नात अक्षता. देवाला नैवेद्य. बाळाच्या पहिल्या घासात. श्राद्धाच्या प्रसादात. आणि आयुष्य संपल्यावरही, दहाव्याला पुन्हा तांदूळच. पिंडाच्या रूपात.

कदाचित म्हणूनच हिंदू संस्कृतीत दहाव्याला पिंडांना कावळा शिवल्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नाही असं मानत असावेत! जन्मापासून मृत्यूनंतरच्या विधीपर्यंत एखाद्या धान्याने माणसाची साथ द्यावी हे विलक्षणच आहे.

आणि या सगळ्या अवतारांमध्ये मला सर्वांत आशावादी वाटतो तो आधल्या दिवशीचा भात. पूर्वीच्या घरात अन्न टाकून देणं हा जवळजवळ गुन्हा.

कढई चढते. मोहरी तडतडते. हिंग. मिरची. कढीपत्ता. कांदा. आणि कालचा थकलेला भात अचानक फोडणीचा भात होऊन पुन्हा उभा राहतो.

आयुष्यात माणसालाही अशी फोडणी मिळाली असती तर किती बरं झालं असतं! काल सगळं बिघडलं तरी दुसऱ्या दिवशी थोडी मोहरी, दोन मिरच्या, कढीपत्ता टाकून पुन्हा नव्याने सुरुवात.

बहुधा म्हणूनच मला भात पुराणातल्या विष्णूसारखा वाटतो. पण त्याचे दशावतार मोजायला बसू नका. गणित हमखास चुकणार. एका घरातच पेज, खिचडी, वरणभात, दहीभात, मसालेभात, नारळी भात, फोडणीचा भात, खीर, घावन, आंबोळी, भाकरी, मोदक…

पुढच्या घरात अजून काही. पुढच्या गावात आणखी काही. प्रत्येक आजीच्या हातात तर स्वतंत्र पुराण.

पण मला भाताची एक गोष्ट सर्वांत जास्त आवडते. तो स्वतःची ओळख गमावूनही हरवत नाही. मेतकूट मिळालं तर साधा. मुगाची डाळ मिळाली तर खिचडी. दही मिळालं तर शांत. गूळ मिळाला तर गोड. मसाला मिळाला तर झणझणीत. मासळीचं कालवण मिळालं तर त्याला पूर्णपणे सामावून घेणारा. काहीच नसेल तर मीठाबरोबरही समाधान देणारा. ज्या घरात जे आहे, जसा प्रसंग आहे, तसा तो होतो.

म्हणून कोकणात भाताला फक्त staple food म्हणणं मला फारच तोकडं वाटतं. तो रोज खाल्ला जातो म्हणून महत्त्वाचा नाही. तो प्रत्येक प्रसंगात आपल्याबरोबर राहू शकतो म्हणून महत्त्वाचा आहे.

आनंदात. आजारपणात. लग्नात. सणात. श्राद्धात. गर्दीत. एकटेपणात. जन्मात. आणि अगदी मृत्यूनंतरच्या विधीतही.

पुराणात विष्णूने जगाच्या गरजेनुसार अवतार घेतले म्हणतात.

कोकणात तांदूळही तेच करत आला आहे.

फरक एवढाच, विष्णूच्या अवतारांच्या कथा पुराणात लिहून ठेवल्या गेल्या. भाताच्या अवतारांची कथा मात्र आपल्या घरात रोज शिजत राहते.

लेखक : सुबोध गाडगीळ

प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted