शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ एक शिक्षक म्हणून खूप काही वाटतं…! ☆ शीला पतकी ☆
☆
एका पेपरमधील रघुरामन फंडा हे सदर मी नेहमीच वाचते. खूप छान असतं. हे लिहिणाऱ्या माणसाचा अनुभव, जाणीवा प्रगल्भ आहेत निरीक्षण उत्तम आहे प्रामाणिकपणे समाजात काही घडाव अशी इच्छा असते. त्यामुळे ते मला आवडतं…!
काल त्यांनी शिक्षकासंबंधी एक नमूद केलं होतं ती गोष्ट अशी आहे… एका शाळेत वर्गामध्ये साधारणपणे आठवीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षक विचारतात तुला पुढे काय व्हायचे? हा प्रश्न आम्ही सर्व शिक्षक विचारत असतो. शिक्षकाचा कामच आहे त्याची स्वप्न जाणून घेणे, नसतील तर तिच्या डोळ्याला दाखवून देणे, असतील तर त्याच्या स्वप्नांना पंख देणे आणि कधी कधी त्याच्या स्वप्नांना बळ सुद्धा देणं…! हेच तर शिक्षकाचे काम आहे. मराठी हिंदी गणित हे विषय काय त्याला आयुष्यभर उपयोगी पडत नसतात ते फक्त बुद्धी प्रगत व्हावी यासाठी असतात. विचार करायला शिकवणाऱ्या गोष्टी वेगळ्याच असतात. त्या सिलॅबस मध्ये नसतात.
वर्गात शिक्षकाने विचारलं तुम्हाला पुढे काय व्हायचंय? काही मुलं म्हणाली मला इंजिनिअर व्हायचंय, डॉक्टर व्हायचे, वकील व्हायचे प्राध्यापक व्हायचे, शिक्षक व्हायचे त्यांच्या घरात आसपास ते जे पाहत होते ते त्यांना माहिती होतं तेच व्हायचे त्यांचे स्वप्न होते. मुलं चांगल्या घरातली होती एक मुलगा मात्र आपल्याला काय व्हायचे ते सांगू शकत नव्हता अशी बरीच मुलं असतात त्यांचं ठरलेलं नसतं त्यांना कळत नसतं… तो काहीच बोलला नाही आणि तो असा बराच अबोल राहायचा शिक्षेकेच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तीने थोडी त्याची माहिती काढली. मुलांमध्ये त्याच्या मित्रांमध्ये विचारलं.. तिच्या लक्षात आलं की याला आपल्या वडिलांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता चपला आणि बूट शिवण्याचा म्हणजे चाभाराचा..! आणि वडिलांचे ते काम लहानपणापासून तो बघत असल्यामुळे सोल लावणे ते शिवणे वेगवेगळ्या प्रकारचे लेदर ते कशा पद्धतीने कापतात कसे शिवतात त्याला छिद्र कसे पडतात हे सगळे वडिलांचे पाहून तसेच तो शिकत होता आणि त्याला ते काम खूप आवडत होते. त्याला पुढे जाऊन बूट शिवायचे होते पण हे वर्गात कसे सांगावे? म्हणून त्यांनी आपले स्वप्न कधीच सांगितले नाही त्याला पुढे जाऊन त्याचा स्वतंत्र व्यवसायही करायचा होता.
खरंतर हे इतरांपेक्षा अतिशय वेगळं होतं पण हे खूप कमी आहे डॉक्टर वकील होणं हे भारी आहे अशा काहीतरी कल्पना त्यावेळी मुलांच्या डोक्यात होत्या त्यामुळे न्यूनगंडापायी त्यांनी कधी ही कल्पना वर्गात बोलून दाखवली नाही, पण शिक्षिकेने मात्र हे बरोबर ओळखले की याला वेगळं काहीतरी व्हायचं. आणि हे जाणून घेतल्यावर तिने एके दिवशी आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गाकरिता एका बूट बनवणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरलाच बोलवले. त्यांनी बूट आणि ते कसे तयार होतात याविषयी मुलांना माहिती दिली ते सांगत असताना ते मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारत होते हे लेदर म्हणजे काय प्रकार असतात… तुम्ही कधी बुटाचे लेदर बघून घेतले का? वगैरे वगैरे.. पण मुलांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण हा जो मुलगा होता त्याला मात्र सगळी माहिती होती आणि तो त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी चोख देत होता. ते पाहून ते मॅनेजर अतिशय थक्क झाले आणि ते म्हणाले अरे तुला तर बरच माहिती आहे. तो म्हणाला सर मी बूट शिवू सुद्धा शकतो. मॅनेजर त्याच्या अभ्यासाने खूप खूश झाले. तातडीने त्यांनी सांगितले की या मुलाला शाळा सुटल्यानंतर माझ्या कंपनीमध्ये मी दोन तासाचे काम देऊ इच्छितो जेणेकरून आणखीन शिकेल आणि याच व्यवसायात प्रगती करेल.
मुलाला खूप आनंद झाला तो दोन तास शाळेनंतर तिथे काम करू लागला खूप गोष्टी नव्याने शिकला आणि एके दिवशी त्याने स्वतःची बुटाची कंपनी काढली आणि त्याचे स्वप्न होते की आपल्या वडिलांना या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बनवायचे ते त्याचे पूर्ण झाले. स्वप्न ओळखणारे, स्वप्न देणारे आणि स्वप्न पूर्ण होतील यासाठी मदत करणारे पालक आणि शिक्षक हवेत आणि शिक्षक बहुदा हे काम करतातच आपल्याकडे या क्षमता ओळखून त्या विद्यार्थ्यावर काम करायला शिक्षकांना सरकार सवडच देत नाही. कुत्री मोजायचे काम सुद्धा शिक्षकाकडून करून घेणारे हे सरकार या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला भिकार बनवण्याचे काम करीत आहेत असो.
याबाबतीतला हे वाचल्यानंतर मला माझा अनुभव आठवला अगदी परवाच घडलेली गोष्ट आहे एका मुलाचा फोन आला अननोन नंबर होता पण मी फोन उचलला. “नमस्कार मॅडम मी सदावाडीचा अभिमन्यू पाटील बोलतोय तुमचा स्टुडन्ट”… आणि माझ्या पटकन लक्षात आलं या विद्यार्थ्याने नववी मध्ये शाळा सोडून दिली होती आणि तो आपल्या गावामध्ये सलून चालवत होता. गाव अतिशय छोटं त्याच्यामध्ये कटिंग चे दुकान कधी चालणार पण त्याला तेच काम मोठं वाटत होतं. वय लहान होतं शाळेत काहीतरी बिनसलं म्हणून शाळा सोडून टाकली. त्याचा भाऊ इंजिनिअरिंगला होता तो त्याला आमच्या नापास शाळेत घेऊन आला तो म्हणाला, ” आम्ही सगळी भावंड चांगली शिकतोय. मॅडम पण हा शाळेत जायला तयार नाही”. मुलगा माझ्यासमोर हाताची घडी घालून उभा होता चेहऱ्यावरती अगदी वेगळेच भाव धरून आणल्यासारखे.. त्याला अजिबात शाळेत यायचे नव्हते. मी त्याला म्हणाले, “अभिमन्यू तुला का शिकायचे नाही, ” त्यावर त्यांनी उत्तर दिले, ” काय करायचे शिकून मी आता पैसे मिळवतोय ना माझं छान भागतंय”. त्याला त्या गावात चालणार सलूनच खूप मोठं वाटत होतं आणि मिळणारे पैसे जास्त वाटत होते. आयुष्यातली पुढची ध्येय नव्हती आणि तो ठाम होता की मला शाळेत यायचं नाही. मी त्याला विचारलं “तर मग आयुष्यभर कटिंग करत राहणार आहेस का? ” त्यावर तो म्हणाला, “हो मला शिकायचे नाही”… मी म्हणलं, “हे बघ हाच व्यवसाय करायचा ना तुला तर दहावी आणि बारावी झाल्यानंतर हेअर ड्रेसरचे अनेक कोर्सेस असतात ते कर. पुढे खूप स्कोप आहे या व्यवसायाची सध्या चलती आहे आणि पुढेही राहणार आहे आणि मी त्याला गमतीने म्हणाले अरे अमिताभ बच्चनच्या डोक्यावर केस राहिले तर त्याचा हेअर ड्रेसर सुद्धा तू होऊ शकतोस… आता ह्या नव्या गोष्टीने तो जरा चलबिचल झाला मग मी त्याला सांगितले, ” आठ दिवस तू शाळेत बस तुला ज्या दिवशी आवडणार नाही कंटाळा येईल त्या दिवशी आम्हाला न विचारता तू वर्गातन निघून जाऊ शकतोस. आठ दिवसानंतर आपण तुझी ऍडमिशन करू पण त्यानंतर मात्र आमच्या शिस्तीप्रमाणे तुला वागावे लागेल”… आठ दिवसात पीडा संपेल असं वाटून तो हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी पासून शाळेत हजर झाला
बघता बघता आठ दिवस संपून गेले. त्याला शाळा आवडायला लागली मुळात मुलगा हुशारच होता काहीतरी डोक्यात घेऊन बसला त्यामुळे शाळा सोडली होती. थोड्या दिवसात पहिली चाचणी झाली त्याला चांगले मार्क पडले गणितात तरी 30 पैकी 30 मी त्याचे वर्गात खूप कौतुक केले त्यामुळे त्याचा उत्साह वाढला शाळेत तो रमू लागला वेगवेगळ्या गोष्टीत भाग घ्यायला लागला प्रत्येक परीक्षेमध्ये अधिकाधिक मार्क मिळवत गेला आणि 67 68% काहीतरी मार्क मिळवून तो फर्स्ट क्लास मध्ये पास झाला. त्याचा सत्कार सुद्धा झाला होता.
मुलगा हुशार असल्यामुळे पुढे तो शिकत गेला पण नापास शाळेतून गेल्यामुळे काही मुलांना पुन्हा परत येऊन काही सांगावं असं वाटत नाही. आम्हाला भेटणं म्हणजे आपण नापास झालो होतो हे कबूल करणं त्याची काही मुलांना लाज वाटते त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा वाटते हा माझा अनुभव आहे. पण परवा मला एकाने त्याच्याबद्दल माहिती सांगितल्याने त्यांचा नंबरही दिला मी त्याला फोन केला त्याने फोन उचलला नाही. थोड्यावेळाने फोन आला त्याला बहुतेक माझा नंबर कोणीतरी दिला होता तो मलाम्हणाला, ” मॅडम गाडीवर असल्यामुळे मी फोन उचलला नाही सॉरी “मी म्हणाले, ” अभिमन्यू काय करतोस सध्या? ” त्यावर तो म्हणाला मॅडम पुण्यामध्ये आहे एफसी रोडला माझे पार्लर आहे लेडीज आणि जेंट्स… मी म्हणाले वा खूप छान! तो… पार्लर खूप छान आहे मॅडम… मी विचारले मग महिला आणि पुरुषांच्या साठी वेगवेगळे विभाग आहेत का? तो म्हणाला नाही अपॉइंटमेंट घेऊनच काम होतात त्यामुळे पार्लर एकच आहे हेअर ड्रेसिंग हेअर सेटिंग हेअर कटिंग… लोक वेळा घेऊन येतात सध्या तरी मी एकटाच हे काम करतोय. त्यातलं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि त्याचा व्यवसाय अतिशय उत्तम चाललेला होता. त्याला मी एकाच प्रश्न विचारला, ” अभिमन्यू तुला आठवते माझं वाक्य पहिल्या दिवशी मी तुला काय सांगितलं होतं अमिताभ बच्चनचे केस आठवतात? “… त्यावर तो हसला आणि म्हणाला हो मॅडम तुमचं म्हणणं बरोबर होतं पुण्यात माझं खूप छान चाललेला आहे आणि या कामाला खूप डिमांड आहे माझ्याकडे भरपूर काम आहे मला खूप आनंद वाटला. त्यालाही खूप छान वाटलं मी त्याला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
एखादा वाट चुकलेला विद्यार्थी जेव्हा आपण पुन्हा त्यातलं कौशल्य शोधून त्याला आयुष्याच्या वाटेवर आणतो तेव्हा शिक्षकाचा आनंद अपरिमित असतो बीएलओच्या मीटिंगमध्ये शिक्षकांना नालायक म्हणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला हे कधीच कळणार नाही. शिक्षक एक एक मूल घडवत असतो एक एक मूल उभं करत असतो धडपडणाऱ्या त्याच्या पायांना बळ देत असतो आणि स्वप्नांना पंख देत असतो कालच्या रघुरामन फंडा यातल्या दुसऱ्या देशातली गोष्ट होती. आमच्या देशात अशा सुंदर घटना घडत असतात पण त्याचा आस्वाद घेऊन काही लिहावं असा वेळ आमच्या शिक्षकांकडे आज तरी नाही. कारण आज सरकार त्यांना शाळा सोडून असंख्य प्रकारची काम लावत आहे. चार दोन शिक्षकांकडून काही चुकीचं घडत असेलही पण विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या अनेक शिक्षकांच्या कामाचा सरकार बट्ट्याबोळ करत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान तर अपरिमित आहे आणि पालक इतका अडाणी आहे.. विशेषता मराठी शाळेतला सामान्य गरीब त्याला आपल्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. तरी त्याला वाटत असतं माझं पोरगं शिकावं आणि एखाद्या जवळच्या मराठी शाळेत त्या पोराला तो टाकतो ती शाळा त्याला गणवेश देते दप्तर देते वहया पुस्तक देते आणि हे देते म्हणूनच ते पोरगं तेवढं तरी शिकत बाकी काही जाऊ दे निदान माणूस घडवायचं काम तरी काहीच नक्की होतं मायबाप सरकारतेवढ तरी करू दे आमच्या शिक्षकांना एवढीच विनंती या लेखाद्वारे मला करायची आहे. गरिबांना मोफत आणि पैसे वाटून आम्ही त्यांना श्रीमंत करत आहोत असा भास आभास निर्माण करणारे सरकार त्यांना विचार करायला लावणाऱ्या शिक्षण प्रणाली पासून दूर नेत आहे. परवा तर एका राजकीय जबाबदार माणसाने सांगितले शिक्षकाने हे काम केलेच पाहिजे राष्ट्र उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे… मग तुझ्यावर काय आहे? … असं कॉलर पकडून विचार असं वाटलं मला.
हे लोक मुख्यमंत्री फोडाफोडीत गुंतलेत किंवा पलटवार करण्यात व्यस्त झालेत.. पण त्याची काही गरज नाही. ते खूप प्रामाणिक आणि हुशार आहेत. त्यांनी त्यांचं काम करत राहावं आणि शिक्षकांच्या या प्रश्नाकडेही मनापासून बघावं.
आपल्या वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या इंदिराबाईंचं नाव शाळेला आहे म्हणून तुम्ही शाळा सोडून दिली. आमच्या गरीब मुलांना ती मुभा नाही ते अशा शाळेत जातात जिथे त्यांना एक वेळचं जेवण मिळतं अंगावर गणवेश मिळतो वह्या पुस्तक मिळतात. पण शिक्षण मिळूच नये अशी सोय सरकार करतं आहे हे कुणाच्याच लक्षात येत नाही असो शिक्षक म्हणून खूप वाटतं पण लेखन मर्यादा…!
मी आजही अनेक विद्यार्थी घडवत आहे अनेक घडवले आहेत झोपडपट्टीतल्या असंख्या मुलांना मार्गदर्शन केले आज माझ्या घरी सायंकाळी सहा ते सात या एक तासासाठी झोपडपट्टीतील गरीब मुलांना *शिकवणी घर* या प्रकल्पांतर्गत मोफत शिकवले जाते म्हणून हे लिहिण्याचा मला अधिकार आहे.
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





