श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “सौहार्द…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
☆
सूर्यप्रकाशाच्या सप्तरंगी किरणांची नैसर्गिक उधळण
माणसाला विसरायला लावते आयुष्यातील घुसळण
दिपावली निमित्त विवेकी प्रकाशाचा दीप उजळूया
सौहार्द जोपासण्या विवेकाचा दिप हाती घेऊया…
–जगदीश काबरे
~~~~~~~~~~
भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कापत होतो. अचानक भेंडीच्या वरिल बाजुला छिद्र पडलेले दिसले. विचार केला की भेंडी खराब झाली आहे ती फेकून द्यावी. पण ती फेकून न देता खराब झालेला तेव्हढा भाग कापून फेकून दिला. पुन्हा पाहिले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तो भागही कापून फेकून दिला. उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला.
… आणि मनात एक विचार चमकून गेला की, किती चांगली गोष्ट आहे, ५० पैशांची भेंडी आपण किती लक्षपूर्वक कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो. उरलेला भाग स्वीकारतो. खुप चांगलं आहे हे. मग आपण माणसाबाबत मात्र कठोर का वागतो?
म्हणजे असं की, आपल्या जवळच्या एखाद्याची/एखादीची एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो. त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण चुकीला माफी नाही या अहंकारापोटी त्याच्या/तीच्या सोबतचे नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की, आपल्या जवळच्या माणसाची किंमत पन्नास पैशांच्या भेंडीपेक्षाही कमी आहे का? या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आपल्या जवळच्या माणसांना लहानसहान चुकांसाठी जीवनातून वेगळे करु नका.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




