image_print

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग ✈️

राजधानी मॉस्कोनंतर रशियातील महत्त्वाचे शहर म्हणजे सेंट पीटर्सबर्ग. पीटर्सबर्गला आलो तेंव्हा सूर्य मावळायला बराच वेळ होता. आमची गाईड नादिया हिच्याबरोबर छोट्या बसने शहराचा फेरफटका मारायला निघालो. पीटर्सबर्गच्या वायव्येला लादोगा या नावाचे युरोपमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरातून नीवा नदीचा उगम होतो. या नदीवर जवळजवळ चारशे ब्रिज बांधलेले आहेत.नीवा,मोइका आणि फोंटांका   अशा तीन नद्या पीटर्सबर्ग मधून वाहतात. त्यांच्या कालव्यांनी पीटर्सबर्ग शहर आपल्या कवेत घेतले आहे.

कालव्यांवरील पूल ओलांडून बस जात होती. सहा पदरी स्वच्छ रस्ते व दोन्ही बाजूला पंधरा-पंधरा फुटांचे सुरेख दगडी फुटपाथ होते. दुतर्फा एकाला एक लागून दगडी, सलग तीन चार मजल्यांच्या इमारती होत्या. लाल, पिवळ्या,निळसर रंगांच्या त्या इमारतींना मध्येमध्ये नाजूक जाळीदार गॅलेऱ्या होत्या. बऱ्याच इमारतींच्या खांबांवर तगड्या दाढीधारी पुरुषांचे शिल्प दोन्ही हात पसरून जणू इमारतींना आधार देत होते. तर काही ठिकाणी काळ्या रंगातील पऱ्यांची देवदूत आंचे शिल्प होती निवा नदीच्या एका काठावर उतरलो.  नदीच्या काठावर  खूप उंच दीपगृह उभारले आहे. त्याच्या मधोमध चारही बाजूंना सिरॅमिक्सच्या मोठ्या पणत्या आहेत. चौथऱ्याच्या चारी बाजूंना सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील एक नीवा नदीचे प्रतीक आहे. रस्त्यांवर दोन्ही बाजूला अतिशय सुंदर, कलात्मक आणि वेगवेगळ्या आकाराचे मोठे लॅऺ॑प पोस्ट उभारले आहेत. प्रत्येक दिव्याचा खांब वेगळा. कधी तो छोट्या देवदूतांनी हातात धरलेला तर कधी सिंहासारखा पण पंख असलेल्या प्राण्याच्या शेपटीतून उभारलेला. त्रिकोणात मोठे गोल दिवे तर कधी षटकोनी दिवे कारंज्यासारखे दांडीवर बसविलेले होते. शंभर-दीडशे वर्षांपूर्वींचे शहराच्या रस्त्यांचे नियोजन आणि स्वच्छता कौतुक करण्यासारखे वाटले. मोइका आणि फोंटांका या नद्या जिथे एकमेकींना मिळतात त्यावरील अॅनिकॉव्ह ब्रिज अत्यंत देखणा आहे. त्याच्या मध्यवर्ती चौकातून चारही दिशांना सरळसोट मोठे रस्ते गेले आहेत. चौकाच्या चार कोपऱ्यांवर लालसर काळ्या ब्रांझमधील उमद्या घोड्यांचे सुंदर शिल्प आहे. प्रत्येक शिल्पाजवळ त्या घोड्याला माणसाळवण्यासाठी शिक्षण देणारे ट्रेनर्स वेगवेगळ्या पोझमध्ये आहेत. घोड्यांची आक्रमकता आणि ट्रेनर्सच्या चेहर्‍यावरील भाव लक्षवेधी आहेत.पिटर क्लॉड या सुप्रसिद्ध शिल्पकाराची ही देखणी शिल्पे आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी  ‘हर्मिटेज’ हा जगन्मान्य उत्तम दर्जाचा म्युझियम बघायला गेलो. हर्मिटेज या फ्रेंच शब्दाचा अर्थ खाजगी जागा. ‘कॅथरीन द ग्रेट’ हिचा हा वैयक्तिक संग्रह आहे. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर हे म्युझियम सर्वांसाठी खुले करण्यात आले. कला, सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचा संगम म्हणजे हे हर्मिटेज  म्युझियम! पहिल्या महायुद्धामध्ये जर्मन सैन्याचा वेढा पीटर्सबर्ग भोवती ९०० दिवस होता. लाखो लोक उपासमारीने मेले. त्यावेळी हर्मिटेजची देखभाल करणारे खास प्रशिक्षित क्युरेटर्स, विद्वान पंडित, नोकरवर्ग वगैरे सारे, हे हर्मिटेज ज्या पिटर दि ग्रेटच्या राजवाड्यात आहे, त्याच्या तळघरात गुप्तपणे राहीले. धोका पत्करून अनेक मौल्यवान कलाकृती त्यांनी बाहेरगावी रवाना केल्या. हा खजिना वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता त्यांनी मोठ्या परिश्रमाने कलाकृतींची तपशीलवार नोंद केली. मोजदाद केली. या कलाकृतींमध्ये लिओनार्दो- दा- विंची, पिकासो, देगा, रॅफेल, रेम्ब्रा, गॉ॑ग,व्हॅनगो,सिझॅन अशा जगप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती आहेत. जीवावर उदार होऊन जपलेल्या या कलाकृती म्हणजे रशियाचे वैभव आहे.

विंटर पॅलेस मधील ही हर्मिटेजची बिल्डिंग तीन मजली आहे. बाहेरूनच इमारतीच्या शंभराहून अधिक उंच खिडक्या आणि इमारतींचे सरळसोट उभे, कवेत न मावणारे मार्बलचे नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात. पांढऱ्या व गडद शेवाळी रंगातील या इमारतीच्या प्रवेशद्वारात कलात्मक सुंदर पुतळे आहेत. इटालियन पद्धतीच्या भव्य हॉलमधील खिडक्यांमधून नीवा आणि मोइका या नद्यांना जोडणारा विंटर कॅनॉल  दिसतो. अंतर्गत सजावट तर आपल्याला चक्रावून टाकते.प्रत्येक पुढचे प्रत्येक दालन अधिक भव्य, सरस आणि संपन्न वाटते .१८३७ मध्ये लागलेल्या आगीत याचे लाकडी फ्लोअरिंग व बरीच अंतर्गत सजावट जळून गेली होती. पण १८५८ पर्यंत पुन्हा सारे नव्याने उभारण्यात आले. यावेळी धातू व मार्बल यांचा वापर करण्यात आला. तऱ्हेतऱ्हेची  प्रचंड झुंबरे, कलात्मक पुतळे, गालिचे, राजसिंहासन, दरबार हॉल, अर्धवर्तुळाकार उतरते होत जाणारे अॅ॑फी थिएटर, गुलाबी, पिवळट, हिरवट ग्रॅनाईट वापरून उभारलेले भव्य खांब, वक्राकार जिने, मौल्यवान रत्ने,माणके,हिरे यांची अप्रतिम कारागिरी, लाकूड व काचकाम, पोर्सेलिनच्या सुंदर वस्तू ,सोनेरी नक्षीच्या चौकटीत बसविलेले वीस- वीस फूट उंचीचे आरसे होते .पाहुण्यांसाठीच्या खोल्या, डान्सचा हॉल, नाश्त्याच्या, जेवणाच्या खोल्या अतिशय सुंदर सजवलेल्या होत्या. तेथील रेशमी पडदे ,सोफा सेट, नक्षीदार लाकडी कपाटे, अभ्यासाची जागा, लायब्ररी, लहान मुलांचे व स्त्री-पुरुषांचे उत्तम फॅशनचे कपडे,ज्युवेलरी, डिनर सेट, हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या फायरप्लेस सभोवती सिरॅमिक्सची नक्षी सारेच उच्च अभिरुचीचे आणि कलात्मक  आहे.  डान्स हॉलमधील आरसे आणि सोन्याचा मुलामा दिलेले नक्षीदार खांब यांनी डोळे विस्फारले जात होते. या म्युझियममध्ये तीस लाखांहून अधिक कलाकृतींचा संग्रह आहे. चायना, जपान, ब्रिटन, फ्रान्स येथून आणलेल्या हरतऱ्हेच्या अमूल्य वस्तू आहेत. तीस फूट उंच छत आणि त्यावरील ३०फूट×४०फूट लांबी रुंदीची, पूर्ण छतभर असलेली पेंटिंग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात. खालच्या मजल्यावरील लांबलचक रूंद गॅलेरीच्या दोन्ही भिंतींवर छतापर्यंत भव्य पेंटिंग्ज आहेत. तत्कालीन युद्धाचे देखावे, नीवाचा किनारा, त्यावेळचे रीतीरिवाज, गप्पा मारत एकीकडे विणकाम, भरतकाम करणाऱ्या तरुण, सुंदर मुली चितारल्या होत्या. गुलाबाची फुले व वेली अशा रंगविल्या होत्या की त्या छतावरून खाली लोंबत आहेत असे वाटावे. इथे असलेले रती आणि मदन( सायको आणि क्युपिड) यांचे पुतळे अतिशय देखणे, प्रमाणबद्ध आणि चेहर्‍यावर विलक्षण उत्कटता, प्रेमभाव दाखविणारे होते. हर्मिटेजमधील या प्रकारचे अनेक पुतळे नग्न असूनही अश्लील वाटत नव्हते. .सर्वात  महत्त्वाचे म्हणजे या सार्‍या वैभवाची अत्यंत कसोशीने, काळजीपूर्वक निगुतीने सतत देखभाल केली जाते.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments