श्री राजीव गजानन पुजारी
मी प्रवासी
☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ५ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
आमची चार धाम यात्रा…
गंगेच्या सांगण्यानुसार भगीरथाने सुमेरू तथा सतोपंथ हेमशिखरावर भगवान शंकरासाठी तप सुरू केले. वर्षांमागून वर्षे लोटली. भगीरथाचे तप चालूच राहिले. भगीरथाच्या तप:प्रभावाने भगवान शंकराचे आसन डगमगू लागले. त्यांची समाधी भंग पावली. भगीरथाच्या समोर येऊन ते उभे राहिले. वरं ब्रूही म्हणाले. भगीरथाने सर्व निवेदन करून गंगेस धारण करण्याची विनंती भगवान शंकरांना केली. शंकरांनी ती मान्य करून ते डमरू वाजवू लागले. आनंदाने नाचू लागले. आपल्या जटा सोडून कमरेवर हात ठेवून पाय फाकून ते आकाशाकडे पाहू लागले. त्याचवेळी आकाशात विजेसारखा लख्ख प्रकाश पडला. गगनभेदी कडकडाट होऊन गंगा जलप्रवाहाच्या रूपाने खाली कोसळली. त्या वेळी भगवान शंकरांनी आपल्या जटेत गंगा झेलली. गंगा शंकरांच्या जटेत फिरू लागली. नेत्र कमळांच्या पुष्प मालिकेसारखी ती दिसू लागली. तिच्या जलधारेचा वेग कमी होऊन ती शंकरजटांत सामावली. त्रैलोक्यनिधी पवित्र गंगा धारण केल्याच्या आनंदात भगवान शंकर कैलासात निघून गेले. भगीरथाला गंगा द्यायची आहे याचे त्यांना विस्मरण झाले. पुन्हा गंगोत्री या ठिकाणी एका शिलेवर बसून भगीरथाने शंकरांची पुन्हा उग्र तप:साधना सुरू केली. भगवान शंकर भगीरथाला पुन्हा दुसऱ्यांदा प्रसन्न झाले. भगीरथाला एक दिव्य रथ देताना ते म्हणाले, ‘भक्ता तुझी साधना, पराक्रम आणि कुल धन्य होय. तू तुझ्या तप:सामर्थ्याने साऱ्या कुळाचा उद्धार केला केला आहेस. या रथावर बसून तू पुढे जा गंगेचा प्रवाह तुझ्या मागे मागे येईल. ’
सुमेरू पर्वत शिखरशृंखलेवर जाऊन भगवान शंकराने गंगेस आपल्या जटांतून मुक्त केले. ती आल्हादपणे धरतीवर अवतरली. गंगेचा प्रवाह दहा धारांनी विविध शिखरांवरून वाहू लागला. सतपथ सरोवरातून निघालेली अलकनंदा, केदारकंठावरून निघालेली मंदाकिनी या गंगेच्याच धारा होत. गंगेची मुख्य धार शिवलिंग शिखराच्या खालील भूगर्भातील बर्फखंडातून बाहेर पडते. हीच गंगेची मुख्य मोक्षधार भगीरथाच्या मागून जाऊ लागली. गंगोत्री या स्थळी भगीरथाचे विश्राम केला. तेथे त्याने गंगेची मनोभावे पूजा केली. म्हणून या ठिकाणी गंगोत्री हे पावन तीर्थ निर्माण झाले. भगीरथामागे जाऊन सगर पुत्रांच्या रक्षेला गंगेचा स्पर्श झाला. त्या क्षणी त्यांचा उद्धार झाला. भगीरथाच्या मागून निघालेल्या गंगेने कोट्यावधी भारतवासीयांचे जीवन सुखी केले.
भगीरथाने कठोर परिश्रम करून गंगा आणली. यावरून अशा परिश्रमाला ‘भगीरथ प्रयत्न’ असा वाक्प्रचार ही मराठीत रूढ झाला आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल सप्तमीला गंगेने ब्रम्हलोकातून भगवान शंकराच्या जटांत प्रवेश केला. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल दशमीला भगवान शंकराकडून भगीरथाला गंगा प्राप्त झाली. या दोन तिथींना गंगा दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतो. मुखवा या गावापासून या दसऱ्याची विशाल मिरवणूक निघते. गंगेची पालखी घेऊन ही मिरवणूक वाजत गाजत गंगोत्रीला येते. याप्रसंगी पारंपारिक पोशाख करून लोक आनंदाने नाचतात. गंगागीत गातात. अतिशय उत्साहात गंगाजन्मोत्सव साजरा करतात.
गंगा नावाचा द्रवरूप पदार्थ म्हणजे साक्षात परब्रह्म होय. महापातकांचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे. असा स्कंदपुराणात उल्लेख आहे.
केदारनाथ —
एक जूनला पहाटे पाच वाजता चहा घेऊन फाटा गावाकडे प्रस्थान केले. या फाटा गावात त्या दिवशी आमचा मुक्काम असणार होता. खिडकीतून बाहेर पाहतांना आजूबाजूचे भान विसरायला होत होते. खरोखर ‘अनंत हस्ते कमलावराने देता, घेशील किती तू दोही करी’ अशी आमची अवस्था झाली होती. आमच्याबरोबर किचन जीप होती. नाश्ता व जेवण रस्त्यातच घेतले. वाटेत सव्वाचार वाजता रुद्रप्रयागला गाडी थांबवली. खाली उतरून अलकनंदा व मंदाकिनी नद्यांचा संगम बघितला. रात्री आठ वाजता महाराष्ट्र निकेतन या हॉटेलला पोचलो. रात्री जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली.
त्याप्रमाणे दोन जूनला रात्री एक वाजता आम्ही बसमध्ये बसलो. बसने सीतापूर पार्किंग पर्यंत गेलो. तेथून साधारण दोन किलोमीटर्स चालल्यावर शेअर रिक्षास्टँड लागले. एक रिक्षात बाराजण घेतात. ज्याला जसे जमेल तसे रिक्षा पकडून सर्वजण साधारण पाच किलोमीटरवरील गौरीकुंड पर्यंत आलो. तेथे एकत्र जमलो. डोलीचे बुकिंग करण्यासाठी क्यू असतो. त्या लाईनमध्ये उभे राहिलो असतो तर आमचे दोन तास गेले असते. पण पुसेगावकरांनी एक लोकल माणूस बरोबर घेतला होता. त्याने पुढे जाऊन सर्वांचे बुकिंग केले, थोडे जास्त पैसे द्यावे लागले, पण महत्वाचा वेळ वाचला. डोलीवाल्यांचे रजिस्ट्रेशन केलेले असते. डोलीत बसतांना गोफ मध्ये अडकविलेले रजिस्ट्रेशनकार्ड ते आपल्याला देतात. एका डोलीत एक जण बसू शकतो व चार जणं ती डोली उचलतात. जातांना मध्ये मध्ये त्यांना नाश्ता व जेवण द्यायला लागते. ट्रॅक १६ किलोमीटर्सचा आहे पण वळणं वळणं असल्यामुळे प्रत्यक्षात २२ किलोमीटर्स वाटचाल करावी लागते. प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी पोहोचलो.
मी व पुसेगावकर साडेबारा वाजता पोहोचलो. मुख्य मंदिराकडे पोहोचण्यापूर्वी एक ऑफिस लागते. तेथे चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी उत्तराखंड टुरिझम डेवलपमेंटकडे आपण जे रजिस्ट्रेशन केले होते ते दाखवून आपल्याला दर्शनासाठी एक टोकन देण्यात येते. डोलीवाले त्या ऑफिसच्या बरेच अलीकडे उतरवितात. तेथून त्या ऑफिस पर्यंतचे अंतर साधारण १-१।। कि. मी. आहे. टोकन घेऊन मंदीरासमोर एक मोठी घंटा आहे, तिथपर्यंत मी व पुसेगावकर आलो. काहीजण पूर्वीच पोहोचले होते. केदारनाथ मंदिराचे चित्र बऱ्याचदा बघितले होते. त्यासमोरच आपण उभे आहोत हे खरच वाटतं नव्हतं!! मी मनोमन देवळाच्या शिखराला नमस्कार केला. दर्शनासाठी भलीमोठी रांग होती. तीमध्ये उभे राहिलो असतो तर दर्शनाला सहा सात तास लागले असते. आम्ही थोडी विश्रांती घेऊन, स्पेशल दर्शनाची काही सोय होती का हे पहायचे ठरविले. केदारनाथ येथे विश्रांतीसाठी तंबू आहेत तसेच पक्क्या खोल्या देखील आहेत. आमच्यासाठी पुसेगावकरांनी कांही तंबू आरक्षित करून ठेवले होते. कांही तंबूत तिघांची तर कांहीत चौघांची राहण्याची व्यवस्था होती. आम्हाला चौघांची सोय असलेला तंबू देण्यात आला. तंबू जाड गाद्या, जाड पांघरुणे, उशा आदींनी सुसज्ज होता. लाईट व मोबाईल चार्जिंगची सोय होती. मंदिराच्या मागील बाजूस स्पेशल दर्शनासाठीचा काउंटर आहे व तो पाच वाजता उघडतो असे समजले. सौ सुनीता त्या शून्याच्या खाली चार अंश तपमान असणाऱ्या गोठविणाऱ्या थंडीत काउंटर समोर तीन वाजताच लाईनमध्ये उभी राहिली. पाच वाजता काऊंटर उघडला पण काउंटरवाल्याने सांगितले की स्पेशल दर्शनाचा कोटा संपला आहे. हताश मनाने लाईन मधील सर्वजण आपापल्या टेंटकडे परतले. सुनीता कांहीवेळ तिथेच उभी राहिली. तवंर एक व्यक्ती तिच्याजवळ आली आणि म्हणाली, ’मांजी, आपको स्पेशल दर्शन करना है क्या? ’ सुनीता होय म्हणाली. तो म्हणाला, आठ बजे मोबाईल टॉवर के नीचे एक दुकान है, वहा आ जाईये’ आम्ही रात्री आठ वाजता तिथे पोहोचलो. त्याने आम्ही किती माणसे आहोत ते विचारून, अमुक एव्हढे पैसे होतील असे सांगितले व रात्री अकरा वाजता स्पेशल दर्शनाची लाईन असते तिथे यायला सांगितले. त्याप्रमाणे थोडंस खाऊन आम्ही स्पेशल दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो. स्पेशल दर्शन वाल्यांना बाजूच्या दरवाज्याने सोडतात. त्याप्रमाणे आम्ही आत गेलो. गाभाऱ्याच्या बाहेरील भागात पाच पांडव, द्रौपदी, कुंती यांच्या कलात्मक सुंदर मूर्ती आहेत. त्यांचे दर्शन घेत घेत आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथे केदारनाथांचे रेड्याच्या पाठीसारखे स्वयंभू पाषाण स्वरूप आहे. ते बघून मन भरून आले. त्याला तूप लावायची प्रथा आहे. तत्पूर्वी तेथील गुरुजींनी गंगेच्या पाण्याने भरलेला एक कलश आमच्या हाती देऊन आम्हाला त्या पाण्याने केदारनाथांचा अभिषेक करायला सांगितले. अभिषेकानंतर आम्ही केदारनाथांना बरोबर नेलेले तूप चोळले व चांदीचे बिल्वपत्र अर्पण केले. हे शिवलिंग नसल्याने त्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली तर चालते. अर्धी प्रदक्षिणा झाल्यावर गुरुजींनी यमुना जलाने भरलेला एक कलश आमचे हाती देऊन त्या पाण्याने देखील अभिषेक करायला सांगितला. आम्ही केला. आम्ही किती नशीबवान की, आम्हाला गंगा व यमुना दोन्हींच्या जलाने केदारनाथांना अभिषेक करता आला!! दर्शन घेऊन बाहेर आलो. ज्यांनी आमच्या स्पेशल दर्शनाची सोय केली होती, ते गुरुजी भेटले. त्यांचे आभार मानून त्यांना ठरलेली दक्षिणा देऊन नमस्कार केला.
नंतर मंदिराच्या मागील बाजूस जाऊन भीम शिळेचे दर्शन घेतले. ही शिळा २० फूट लांब व १२ फूट व्यासाची आहे. २०१३ साली आलेल्या प्रचंड महापुरात पाण्याच्या प्रवाहाबरोबर ही शिळा घरंगळत आली व मंदिराच्या मागील बाजूस येऊन थांबली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह दुभंगून मंदिराचे रक्षण झाले. ही खरोखर ईश्वराची लीलाच म्हणायला पाहिजे. भीम शिळेचे दर्शन घेऊन आम्ही टेंटवर येऊन थोडी विश्रांती घेतली व (तीन जूनला) सकाळी चहा बिस्किटे घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. हा प्रवास मी पिट्टूने केला. पिट्टू म्हणजे आपणाला नेणाऱ्या माणसाच्या पाठीवर एक बास्केट असते, त्यात बसवून आपणास तो नेतो. पार्श्वभूमीला बर्फाच्छादित हिमशिखरे असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दर्शन डोळे भरून घेतले. पिट्टूने मी व आमच्यापैकी कांही वयस्क मंडळी एक ते दिड किलोमीटर्स दूर असणाऱ्या एका हॉटेलजवळ गेलो. साधारण याच ठिकाणी डोलीवाल्याने काल आम्हाला सोडले होते. कांही मंडळी पायी तिथपर्यंत आली. नंतर पिट्टू, घोडा व डोली यांपैकी ज्याला जे सोयीचे वाटले त्याने ते निवडले व खऱ्या अर्थाने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत आम्ही निघालो. मध्ये मध्ये रिमझिम पाऊस पडत होता. पिट्टूवाल्याने पिट्टूवर व पर्यायाने माझ्यावर प्लास्टिकचे आवरण घातले. एक व्यक्तीस पाठुंगळीला घेऊन २२ किलोमीटर्सचा उतार उतरणे खायचे काम नाही. त्यामुळे दोन तीन ठिकाणी मी मुद्दाम थांबवून त्यास खाऊ पिऊ घातले. चारच्या सुमारास गौरीकुंडला पोहोचलो. तेथून शेअर जीपने सोनप्रयाग पर्यंत गेलो. तेथून बरेचसे चालल्यावर एक वाहनस्टँड लागते. तेथून गुप्तकाशीकडे जाणारी शेअर जीप मिळाली. तिने फाट्याच्या महाराष्ट्र निकेतनला साधारण पावणेसहा पर्यंत पोचलो. कांही मंडळी साडेतीन चारपर्यंत पोचली होती. जेवायला पुरणपोळीचा बेत होता. मंडळी पुरणपोळीवर ताव मारून आराम करत होती. आचारी मंडळीही निवांत होती. मी हातपाय धुवून कपडे बदलले व चहा वगैरे काहीतरी घ्यावे म्हणून मी व पत्नी वरच्या मजल्यावर गेलो. आचाऱ्याने निरोप दिला की, तुमच्यासाठी गरम गरम पोळ्या बनवल्या जात आहेत. मला त्यांचे खूप कौतुक वाटले. दूध व पुरणपोळीवर ताव मारून ताणून दिली ते दुसरे दिवशी (४ जूनला) पहाटे पाचलाच उठलो.
महाभारत, लिंगपुराण, वामनपुराण, शिवपुराण, ब्रह्मपुराण, वायुपुराण, कूर्मपुराण व गरुड पुराणात केदारनाथच्या अनेक कथा आणि अख्यायिका आहेत. भारत भूमीवर जी बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकी हिमालयातील केदारनाथ हे एक होय. ज्यावेळी ईश्वराने मानवी सृष्टी निर्माण केली, त्याच्या रक्षणासाठी भगवंताने नरनारायण यांना पृथ्वीवर पाठवले. जगाच्या कल्याणासाठी गंधमादन पर्वतावर नरनारायणाने भगवान शंकरासाठी उग्र तप केले. भगवान शंकर प्रसन्न होऊन नरनारायणास त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावेळी नरनारायण नम्रपणे त्यांना म्हणाले, ” विश्वकल्याणासाठी आम्ही आपले स्मरण केले. विश्वकल्याणासाठी आपण या पर्वतात सदैव प्रकट स्वरूपात कायम वास्तव्य करावे. आपल्या दर्शनातून संसारी मानवाला मुक्ती लाभेल. ” भगवान शंकरांनी नरनारायणाचे मनोगत स्वीकारले. केदार भूमित ते निवास करू लागले. त्यापासून हे पावन तीर्थ केदारनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. या पवित्र निवासस्थानाबाबत पार्वतीशी बोलताना ते म्हणाले, ”मी ज्याप्रमाणे अनादी कालापासून या विश्वात वावरतोय, त्याप्रमाणे केदारभूमी ही प्राचीन आहे. ब्रह्मरूप धारण करून याच ठिकाणी सृष्टीनिर्मितीची रचना मी केली तेव्हापासून ही केदारभूमी अस्तित्वात आहे. ही देव दुर्लभ पवित्र भूमी होय. ” ही कथा वायुपुराणात वाचायला मिळते.
पुरातन यथा हं वै तथा स्थानामिदं किला।
यदा सृष्टीक्रिया यांच मयावै ब्रह्ममूर्तीना।।
स्थितमत्रैव सततं परब्रम्ह जिगीशया ।
तदादिकमिदं स्नानं देवानामपि दुर्लभम।।
असे या तीर्थक्षेत्राचे वर्णन केदारकल्प या ग्रंथात आहे.
– क्रमशः भाग पाचवा
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






