श्री राजीव गजानन पुजारी
मी प्रवासी
☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ६ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
दुसरी एक कथा पांडवांच्या संबंधात आहे. या कथेतून केदारनाथ मंदिराशी त्यांचा निकटचा संबंध जाणवतो. पांडवांकडून महाभारतातील महायुद्धात भाऊबंद, गुरुजन व ब्राह्मण पुत्रांची हत्या झाल्याचे पातक घडले. या पापातून मुक्त होण्यासाठी व्यास ऋषींचे सांगण्यावरून ते भगवान शंकराच्या दर्शनासाठी काशीला गेले. पांडवांची भक्ती पारखण्यासाठी काशीत त्यांना दर्शन न देता भगवान शंकर हिमालयात गुप्त काशीला येऊन गुप्त रूपाने राहू लागले. पांडव त्यांच्या शोधार्थ गुप्त काशीला येऊन पोहोचले. पांडवाना पाहून शंकर गुप्त रूपाने गौरीकुंडापाशी प्रकटले. अंतर्ज्ञानी पांडव त्वरित गौरीकुंडाकडे आले. तेथून शंकराने केदार शिखराकडे पोबारा केला. शंकर दर्शनाच्या उत्कट इच्छेने भारावलेले पांडव दगड धोंड्यातून वाट काढीत केदार भूमीवर पोहोचले. पांडव दिसताच रेड्याचे रूप घेऊन ते चरू लागले. परंतु चाणाक्ष भिमाने रेडा रूपातील भगवान शंकराला ओळखले. सर्व पांडव दर्शनासाठी पुढे धावले. त्या क्षणी प्रचंड शिलाखंडाचे रूप घेऊन भगवान शंकर भूमीत प्रवेश करू लागले. भीमाने धावत जाऊन भूमीत गडप होणाऱ्या शंकराला पकडण्याचा प्रयत्न केला. बहुतेक भाग भूमीत प्रवेशला होता फक्त पाठीचा भाग भीमाच्या हाती सापडला. सर्व ताकत एकवटून आपल्या बलवान बाहूंनी भीमाने हा भाग पकडून ठेवला. त्यामुळे हा भाग तसा जमिनीवर राहिला तेच त्रिभुजाकार केदारलिंग होय. भूमीत गेलेले बाकी भाग तुटून ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. डोळे नेपाळमध्ये निघाले; त्याला पशुपतिनाथ म्हणतात. बाकी शरीराचा भाग केदारनाथ परिसरात प्रकट झाला. मुख रुद्रनाथमध्ये, हात तुंगनाथमध्ये, नाभि मद् महेश्वर मध्ये व जटा कल्पेश्वरामध्ये प्रकट झाल्या.
हिमालयातील केदारनाथसह या चार तीर्थक्षेत्रांना पंचकेदार म्हणतात. या पंचकेदारांची यात्रा केल्यावर केदार यात्रा पूर्ण होते असे मानले गेले आहे. पांडवांची अढळ आणि उत्कट भक्ती पाहून भगवान शंकरांनी त्यांना प्रसन्नतेने दर्शन दिले. त्यांना पाप मुक्त केले. भगवान शंकरदर्शन स्मृती प्रित्यर्थ पांडवांनी त्रिभुजाकार शिवलिंगावर मंदिर बांधले. आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अशी या पवित्र केदारनाथ मंदिराची जन्म कथा आहे. कतुरी शैलीच्या या दगडी मंदिराची उंची ६६ फूट आहे. तांबड्या रंगाचे दगड चुन्याशिवाय बेमालूम सांधण्यात आले आहेत. दर्शनी दरवाज्यावर सूर्य देवाची प्रतिमा कोरण्यात आली आहे. मंदिरावर सुवर्णकलश आहे. भोवतालच्या हिमपर्वतांच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. आद्य शंकराचार्यांनी येथे तप:साधना करून हिंदू धर्माची पुनर्स्थापना व पुनर्रचना केली. त्यांचे जीवनकार्य संपल्यावर वयाच्या बत्तीसाव्या वर्षी याच पवित्र भूमीत त्यांनी देहत्याग केला. केदारनाथ मंदिरामागे शंकराचार्यांची समाधी आहे. एका शिलेवर शंकराचार्यांचा हात रेखांकित करण्यात आला आहे. याच ठिकाणी अतिप्राचीन इशानेश्वराचे अवशेष व शिलालेख सापडले आहेत. हिमालयातील पाच खंडांपैकी केदारखंड हा हिमालयाचा मध्यवर्ती भाग होय. या मध्यभागाच्या केंद्रबिंदूवर केदारनाथाचे मंदिर उभे आहे.
मंदिराच्या पूजाअर्चेसाठी टेहरीच्या राजाने काही गावातील जमीन देवस्थानला दान केली आहे. त्या अगोदरच्या काळात आद्य शंकराचार्यांनी केदारनाथाच्या पूजेची व्यवस्था केली होती. प्राचीन काळात हिमालयातील यक्ष-किन्नर केदारलिंगाची पूजा करीत. दक्षिणी जंगमाकडे केदारनाथाचे पौरोहित्य वंशपरंपरेने चालत आले आहे. शिवभक्त भुकुंड हा आपला मूळ पुरुष होय असे या मंदिराचे पुजारी म्हणतात. याबाबतचा इतिहास असा: पांडवकाळात स्वामी वीरभद्र नावाचा शिवगण होता. पांडवांच्या स्वर्गारोहण प्रसंगी त्याच्याकडून शिवाज्ञाचे उल्लंघन झाले. त्यावेळी तुला मानवजन्म घेऊन माझ्या अवज्ञेचे प्रायश्चित भोगावे लागेल, असा शाप भगवान शंकराने त्यास दिला. त्यावर वीरभद्राने आर्त स्वरात भगवान शंकरांची क्षमा मागितली. शंकरांचा क्रोधाग्नी क्षमला. ते प्रसन्नतेने वीरभद्रास म्हणाले, ”चौल देशातील वेदपाठी ब्राह्मणाच्या घरी तुझा जन्म होईल. पुढे तू भूकुंड नावाने प्रसिद्ध पावशील. त्यावेळी दृढभावाने माझी पूजाअर्चा करून माझ्या सहवासात येशील. ”त्यानुसार चौलमध्ये वेदपाठी ब्राह्मणाच्या घरात वीरभद्राचा जन्म झाला. ब्रह्मचर्य धारण करून तो वेदशास्त्र संपन्न झाला. भूकुंड मुनी या नावाने प्रख्यात झाला. काही दिवस वाराणशीत जाऊन अध्ययन करीत राहिला. तेथून तो गंगोत्रीला आला. तेथे त्याने तप:साधना केली. गंगोत्री वरून केदार नगरीत आला. येथे भगवान शंकराची मनोभावे भक्ती केली. अनेक शिवभक्तांनी भुकुंडांचे शिष्यत्व स्वीकारले. त्याने पंचकेदाराची यात्रा करून श्रद्धेने पूजन केले. केदारपुरीत त्याने कठोर तप केले. त्याच्या तपाने प्रभावित होऊन भगवान शंकरांनी त्यास दर्शन दिले. भूकुंडाने शंकराकडे एक वर मागितला, ”मला या मानवी देहातून मुक्त करून शिवगण म्हणून पुन्हा आपल्या सेवेत घ्यावे, तसेच केदारलिंगाच्या पूजनाची परंपरा माझ्या शिष्यांत सदैव चालत राहावी. ” भुकुंडाच्या विनंतीनुसार श्री शंकराने त्यास मानव देहातून मुक्त केले. केदारलिंगाच्या पूजाअर्चेची जबाबदारी भुकुंडाच्या शिष्यांकडे कायमची सोपवण्यात आली. तेव्हापासून हीच प्रथा चालू आहे. मंदिराच्या दक्षिण पुजाऱ्यांनी नंतर बद्रीनाथच्या पुजाऱ्यांप्रमाणे श्रीनगरच्या राजाकडून रावळ ही उपाधी घेतली. भुकुंडापासून आजतागायत झालेल्या केदारनाथच्या ३२० पुजारांची जाडजूड जुन्या वहीत केलेली नोंद पुरावा म्हणून उपलब्ध आहे. मुख्य रावळास विवाह करण्याचा अधिकार नाही, मात्र त्याच्या शिष्यांना तो आहे.
मे महिन्यात अक्षय तृतीयेला केदारनाथाचे मंदिर उघडते. दीपावली बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येतो. त्यानंतर येथे चिटपाखरूही राहत नाही. गौरीकुंडा पर्यंतचा साराप्रदेश बर्फमय होतो. रस्ते बुजून जातात. केदारनाथ मंदिर बर्फात समाधीस्थ होते. तप:साधना व ईश्वरी साक्षात्कारासाठी काही साधू या बर्फमय प्रदेशात अट्टाहासाने राहतात. सारी सामग्री अगोदर जमवितात. केदारनाथची यात्रा म्हणजे पृथ्वी, आकाश आणि सूर्य या त्रिनेत्ररुपी ईश्वराची एक निसर्ग यात्रा होय. या निसर्गयात्रेत घनदाट वृक्षराजी आणि हिमशिखरांच्या दर्शनाने डोळे सुखावतात. महाकवी कालिदासाचे मेघदूत महाकाव्यच जगल्याची अनुभूती येते. या निसर्ग यात्रेतून निसर्गानंद आणि स्वर्गसुखाच्या प्राप्तीचे समाधान मिळते. ही आनंददायी निसर्गयात्रा प्रत्येकाने एकदातरी अनुभवावी.
बद्रीनाथ..
चार जूनला सकाळी आठ वाजता बद्रीनाथसाठी प्रयाण केले. अलकनंदेच्या काठाकाठाने बदरीधामाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळचे प्रसन्न वातावरण, हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी, धुक्याचा दुपट्टा लेऊन शेजारून वाहणारी अलकनंदा, मधूनच अवखळ वारा हा दुपट्टा ओढून वृक्षांच्या गळ्यात अडकवायचा, त्यावेळी दिसणारे अलकनंदेचे बदामी रंगाचे पाणी बघत बघत आमचा प्रवास सुरू होता. एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे चारी धामांकडे जाणारे रस्ते अप्रतिम आहेत, पण त्यांची रुंदी कमी आहे. कांही कांही ठिकाणी तर केवळ एकच चारचाकी जाईल एव्हाढाच रुंद!! सव्वासहा वाजता विष्णुप्रयाग येथे चहापानासाठी थांबलो. हे क्षेत्र अलकनंदा व धौलीगंगा या नद्यांच्या संगमावर स्थित आहे. पंचप्रयागांपैकी हे प्रथम प्रयाग आहे. उरलेले चार प्रयाग म्हणजे नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग व देवप्रयाग होत. विष्णुप्रयाग हे क्षेत्र जोशीमठ-बद्रीनाथ रस्त्यावर चमोली जिल्ह्यात आहे. येथेच नारद मुनींनी घोर तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले होते. म्हणून या स्थळाचे नाव विष्णुप्रयाग असे पडले. येथील सुंदर असे अष्टकोनी विष्णुमंदिर १८८९ साली इंदोरच्या महाराणींनी बांधवले होते.
चहा-बिस्किटे घेऊन आम्ही बद्रीनाथकडे आगेकूच केली व साधारण आठ वाजता अलकनंदा नदीच्या काठावर असणाऱ्या बद्रीनाथला पोचलो. नारायण पॅलेस या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. प्रचंड थंडी होती जेवण करून झोपी गेलो.
पाच तारखेला पहाटे उठून हॉटेलबाहेर आलो. समोर बर्फाच्छादित हिमशिखरांचे मनोहर दर्शन घडले. ती शिखरे म्हणजे नर-नारायण पर्वत रांग आहे. ज्यामध्ये निळकंठ हे एक प्रमुख शिखर आहे. धुके नसल्याने त्याचे मनोहर दर्शन आम्हाला घडले.
अंघोळी वगैरे उरकून सात वाजता बद्रीनाथाच्या दर्शनाला निघालो. हॉटेल ते मंदिर अंतर दोन किलोमीटर एव्हढेच असले तरी रस्ता चढाचा असल्याने आम्ही पिट्टू ठरविले. हे पिट्टूवाले नेपाळी होते. पिट्टूवाल्याने मंदिरापर्यंत नेऊन तुम्हाला दर्शनही घडवतो असे सांगितले. वाटेत बाजारपेठ आहे. तिथे पूजासाहित्य वगैरेंची दुकाने आहेत. अलकनंदेवरील पूल ओलांडून व दगडी पायऱ्या चढून पिट्टूवाल्याने आम्हाला मंदिराच्या प्रांगणात आणले. जय बद्रिविशाल असा जयघोष करत यात्रेकरू रांगेत उभे होते.
चित्रांत नेहमी पाहत असलेल्या बद्रिनाथाच्या देखण्या मंदिरासमोर आपण प्रत्यक्ष उभे आहोत हे अजूनही खरे वाटत नव्हते. स्वतःला चिमटा घेऊन कळ आल्यावर हे खर आहे हे पटलं. मंदिर अतिशय भव्य असून पशुपक्षांच्या विविध शिल्पकृतींनी नटलेले, रंगीबेरंगी व अतिशय देखणे आहे. प्रवेशद्वारावर चौघड्यासाठी मंडप असून त्यावर तीन सुवर्ण कळस आहेत. आम्हाला पिट्टूवाल्याने पहिल्यांदा गेट नं २ ला नेले व तेथील सुरक्षा रक्षकांना आम्हाला आत सोडण्याविषयी सांगितले. बऱ्याच विनंत्या करूनही रक्षकाने आम्हाला सोडले नाही, पण गेट नं ३ ला जाण्यास सांगितले. गेट नं ३ समोर बराच वेळ उभे राहिलो. दिंडी दरवाज्यातून आतील डोअर कीपर्स आम्हाला दिसत होते. आमच्या पिट्टूवाल्यांनी हजारो विनंत्या करूनही ते आमच्याकडे किल्ली नाही, ज्यांच्याकडे किल्ली आहे ते लवकरच येतील असे बहाणे करत राहिले. आम्ही परत मंदिराच्या प्रांगणात आलो. तेथे आल्यावर असे समजले की दोन हजार रुपयांचे स्पेशल कूपन काढल्यावर आपल्याकडून अगदी बद्रीनाथांच्या मूर्तीसमोर बसून पूजा करून घेतली जाते. आम्ही तिकीट काढले व बाजूच्या दरवाज्याने सभामंडपात प्रवेश केला. सभामंडपात कुबेर, गरुड आदिंच्या अतिशय सौंदर्यशाली कलापूर्ण भव्य मूर्ती आहेत. आमचा नंबर आल्यावर आम्ही गाभाऱ्यासमोर जाऊन बसलो. शाळिग्राम शीलेची बद्रीनाथजींची मूर्ती तीन फूट नऊ इंच आहे. आम्हाला नशिबाने ओरिजिनल मूर्ती पहायला मिळाली. या मूर्तीत परीस बसवलेला आहे असे म्हणतात. केदारनाथ सारखे गर्भगृहात जाऊन मूर्तीचे स्पर्श दर्शन घेऊ दिले जात नाही. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस नरनारायण, कुबेर व नारदाच्या मूर्ती आहेत. गुरुजींनी संकल्प सांगून आमचेकडून यथासांग पूजा करून घेतली. बरोबर आणलेले चांदीचे तुळशीपत्र आम्ही बद्रीनाथांना वाहिले. आम्हाला अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. पूजा करून बाहेर आलो.
परिक्रमा मार्गावर घंटाकर्णाची विशाल मूर्ती आहे. हा बद्रीनाथांचा द्वारपाल होय. तसेच श्री लक्ष्मी, श्री गणेश, लक्ष्मण यांची सुंदर छोटी मंदिरे मंदिराच्या आवारात आहेत. मागे शंकराचार्यांची गादी आहे. तेथे एका चित्रकाराने काढलेले शंकराचार्यांचे अतिशय प्रसन्न चित्र आहे. प्रदक्षिणा घालून साडेआठ पर्यंत आम्ही रूमवर परतलो.
हरिद्वारला आम्हाला कल्पना देखील नसतांना आमच्या कडून गंगामय्येची आरती करून घेतली गेली, केदारनाथला गर्भ गृहात जाऊन आम्हाला स्पर्श दर्शन घेता आले, आज अगदी चार फूट अंतरावरून आम्हाला बद्रिनाथांची पूजा करता आली. कोणी विश्वास ठेवो वा ना ठेवो, माझे पक्के मत बनले आहे की, या सर्व गोष्टी नशिबातच आसाव्या लागतात. देवच आपणाकडून या सर्व गोष्टी करवून घेत असतो. नाहीतर बघा ना, आमच्या ग्रुप मधीलच एक नवराबायको केदारनाथचा चढ डोलीने चढले पण त्यांची बायको आजारी पडल्याने त्याना केदारनाथांचे दर्शन कांही घडले नाही. अशी बरीच उदाहरणे आपण नित्य बघत असतो.
बद्रीनाथाचे मंदिर कोणी व कधी बांधले याचा इतिहास उपलब्ध नाही. परंतु शंकराचार्यांनी लिहिलेला एक संस्कृत श्लोक मंदिरात सापडला आहे, त्यावरून बद्रीनाथाचे मंदिर अडीच हजार वर्षांपूर्वी बांधलेले आहे याचा उल्लेख सापडतो. पूर्वी देवगण, सिद्ध, गंधर्व व ऋषीमुनी बद्रीनाथाचे पूजन करीत. सदर मंदिर शंकराचार्यांनी बांधले असे काहीजण म्हणतात. परंतु शंकराचार्य आठव्या शतकात झाले. त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढून हिंदू धर्म मृतप्राय झाला होता. बौद्ध धर्मियांनी बद्री मंदिरातील बद्रीनाथाची मूर्ती तप्तकुंडात फेकून दिली होती. या मूर्तीबाबत शंकराचार्यांना दृष्टांत झाला. त्यांनी सदर मूर्ती तप्तकुंडातून काढून त्याची प्रतिष्ठापना केली. बद्रीनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे पौरोहित्य दक्षिणेकडील नंबुद्रीपाद ब्राह्मणाकडे आहे. याबाबत ही एक कथा आहे. संन्यास स्वीकारण्यासाठी शंकराचार्यानी आपल्या आईची अनुमती मागितली. त्यावर आई त्यांना म्हणाली, तू संन्यास घेतल्यावर माझा अंत्यविधी तुला करता येणार नाही. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला संन्यास घ्यायचाच असेल तर माझ्या मृत्यूनंतर घे. यावर मी संन्यास घेतला तरी तुझा अंत्यसंस्कार जरूर करीन, असे वचन आईला देऊन संन्यासासाठी तिची अनुमती मिळवली.
– क्रमशः भाग सहावा
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







