श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ७ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(याबाबत ही एक कथा आहे. संन्यास स्वीकारण्यासाठी शंकराचार्यानी आपल्या आईची अनुमती मागितली. त्यावर आई त्यांना म्हणाली, तू संन्यास घेतल्यावर माझा अंत्यविधी तुला करता येणार नाही. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला संन्यास घ्यायचाच असेल तर माझ्या मृत्यूनंतर घे. यावर मी संन्यास घेतला तरी तुझा अंत्यसंस्कार जरूर करीन, असे वचन आईला देऊन संन्यासासाठी तिची अनुमती मिळवली.) – इथून पुढे – – – 

ज्यावेळी त्यांच्या मातेचा अंत झाला त्यावेळी संन्यासी बनलेले शंकराचार्य आईच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आले. त्यावेळेस संन्याशाने अंत्यसंस्कार करणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे असे सांगून तत्कालीन सनातनी रूढीप्रिय धर्ममार्तंडानी प्रेत स्मशानात नेण्यात शंकराचार्यांना विरोध केला. शंकराचार्यांच्या जातभाईंनी प्रेत उचलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी आपल्या घराच्या अंगणातच चितारचून आईच्या मृत शरीराला अग्नी दिला. त्यावेळी चोली आणि मुकाणी जातीच्या दोन ब्राह्मणांनी त्यांना साथ दिली. या ब्राह्मणांना बद्रीनाथाच्या पूजनाच्या अधिकार देऊन शंकराचार्य त्यांच्या ऋणातून मुक्त झाले. आजही याच ब्राह्मणांच्या वंशात बद्रीनाथाच्या पूजनाचे अधिकार वंशपरंपरेने चालत आले आहेत.

बद्रीनाथ गढवाल नरेशांचे कुलदैवत होय. गढवालची राजगादी ही भगवान बद्रीनाथाची होय या भावनेने त्यांनी राज्यकारभार केला. बद्रीनाथ मंदिराच्या पुजाऱ्यास रावळ असा किताब त्यांनी बहाल केला. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थेत चलावी यासाठी १४० गावातील सरकारी जमीन देणगी दाखल मंदिरास बहाल केली. त्याद्वारे लाख दीड लाखाचे उत्पन्न मंदिरास मिळते. याशिवाय दानशूर भक्तांकडून देणग्या मिळतात. त्यातून मंदिराची पूजाअर्चा, प्रसाद, रावळ व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा पगार भागविला जातो. पंधराव्या शतकात टेहरीच्या गढवाली राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला. सध्या मंदिराचा कारभार टेहरी संस्थानाच्या वतीने पाहण्यात येतो.

बद्रीनाथ मंदिर मे मध्ये उघडते व दिवाळीनंतर बंद होते. मंदिर बंद करताना पूजा करून तुपाचा दिवा लावून ठेवतात. सहा महिने मंदिर बर्फात निद्रिस्त असते. बर्फ वितळल्यावर मे मध्ये ज्यावेळी मंदिर उघडले जाते त्यावेळी दिवा तसाच जळत असतो, पूजेतील फुले टवटवीत असतात. बंद काळात नारद गुप्त रूपाने पूजा करतात, लक्ष्मी दिवा लावते अशी भक्तांची श्रद्धा आहे. बंद काळात येथे कोणीही राहत नाही. मंदिर बंद करते वेळी एक किलो शुद्ध गाईचे तूप घेतात. त्यापैकी काही तूप मूर्तीवर चोळले जाते, त्यावर पातळ वस्त्र चिकटवले जाते. त्यानंतर राहिलेल्या तुपात एक किलो तांदूळ कालवून कापसाची वात बाहेर काढून एका डब्यात भरतात. वात पेटवून आरती करून मंदिर बंद करतात. सहा महिन्याने मंदिर उघडल्यावर दिवा जसाच्या तसा जळत असतो. हे दिव्य ज्योती दर्शन पाहण्यासाठी मंदिर उघडण्याच्या दिवशी यात्रेकरूंची मोठी गर्दी बद्रीधामात होते.

महाभारत व इतर अनेक पुराण ग्रंथात बद्रीनाथांसंबंधी अनेक उल्लेख आहेत. भगवान विष्णू द्वापार युगात श्रीकृष्ण व अर्जुनाच्या रूपाने प्रकट झाले. दक्षाच्या तेराव्या मुलीचा विवाह धर्माबरोबर झाला. तिच्यापोटी सत् युगात मानव कल्याणासाठी विष्णूने नर आणि नारायणाच्या रूपाने जन्म घेतला. अलकनंदेच्या किनाऱ्यावरील ज्या पर्वतावर त्यांनी तप केले त्यांना नर आणि नारायण पर्वत अशी नावे पडली. नर नारायणांनी ऋषीमुनी व मानव जातीला त्रस्त करणाऱ्या सहस्त्र कवचधारी राक्षसांचा वध केला. मानवी कल्याणासाठी महाभारत आणि अठरा पुराणे रचण्याची प्रेरणा नारायणांनीच व्यासांना दिली. स्कंद पुराणात बद्रिक्षेत्राची चार नावे आहेत. द्वापार युगात विशाला, त्रेता युगात योगसिध्दा, सत् युगात मुक्तीप्रदा व कलियुगात बद्रीनाथ अशा नावांचे उल्लेख स्कंद पुराणात सापडतात. कलियुगात मानवाला श्री विष्णूचे साक्षात दर्शन होणार नाही म्हणून ते मूर्ती रुपात या ठिकाणी प्रकटले. बद्री म्हणजे बोर. पूर्वी या परिसरात काटेरी बोरीची झाडे विपुल होती. या झाडांना येणारी बोरे ऋषीमुनी भक्षण करीत. या बोरांमुळे त्यांच्या शरीरात अनेक दिवस टिकणारी ऊर्जा निर्माण होत असे. त्या कारणाने ते अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकत. तप:साधनाप्रसंगी नरनारायणावर बोरीच्या झाडाने सावली धरली अशी अख्यायिका आहे. बोरीच्या वनातला नारायण म्हणून भगवान विष्णू बद्रीनारायण झाले. बद्रीवनाचा विस्तार १२ योजने (एक योजन म्हणजे चार मैल) लांब व तीन योजने रुंद होता. बदरीशपुरी ऐश्वर्य व सुख शांती देणारे तीर्थस्थान आहे. बद्रीनाथ यात्रा करणाऱ्यास पुनर्जन्म लाभत नाही. या पुण्यदायी यात्रेने सर्व पापांचा नाश होतो, विकार वासना संपून जातात. आत्मशुद्धी होते. ‘जो जाईल बदरी न येईल तो उदरी’ अशी मराठीत एक म्हण आहे.

बदरी विशाल या नावामागची वराह पुराणातील एक कथा आम्हास येथे ऐकायला मिळाली. सूर्यवंशी राजा विशाल शत्रूकडून पराजित झाला. त्याचे राज्य त्याच्या शत्रूंनी बळकावले. तो दुःखी झाला. त्या अवस्थेत तो हिमालयात आला. भक्तिभावाने त्याने बद्रीनाथाचे पूजन केले. बद्रीधामपूरीतील गंधमादन पर्वतावर जाऊन बद्रीनाथाच्या कृपेसाठी तपाचरण केले. त्याची भक्ती पाहून बद्रीनाथांनी त्यास दर्शन दिले. आपले राज्य पुन्हा मिळवून देण्याचे कृपा व्हावी अशी विनंती भगवान बद्रीनाथाजवळ राजाने केली. बद्रीनाथने राजाला सामर्थ्य व निर्भयता प्रदान केली. त्यामुळे राजाला राज्य पुन्हा मिळाले. तसेच तुझ्या अढळभक्तीमुळे माझ्या नावापुढे लोक तुझे नाव लावून जयजयकार करतील असाही वर दिला. तेव्हापासून जय बद्री विशालकी असा जयघोष सुरू झाला. हॉटेलवर आलो तर साबुदाण्याची गरम गरम खिचडी तयार होती. ती खाऊन आम्ही जवळच असलेल्या माणा गावी जायचे ठरविले. त्यासाठी आम्ही एक टॅक्सी बुक केली. माणा हे गाव बद्रीनाथ पासून तीन कि. मी. अंतरावर असून तिबेट सीमेपासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी हे गांव भारतातील शेवटचे खेडे म्हणून ओळखले जायचे. पण पंतप्रधान मोदीजींनी त्याचे नामकरण भारताचे प्रथम खेडे असे केले. गावची लोकसंख्या फक्त १२०० असून हिवाळ्यात हे सर्व लोक सखल प्रदेशात स्थलांतरीत होतात; कारण हा भाग त्यावेळी पूर्णपणे बर्फाच्छादित असतो. हे गांव पौराणिक कथांचे संदर्भ, महाभारतातील घटनांचे संदर्भ तसेच अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ९. ३० वाजता माणा गावच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. प्रवेशद्वारावर ‘First Indian village Mana:भारत का प्रथम गांव माणा’ अशी इंग्रजी व हिंदीत पाटी लावली आहे. तिच्या पार्श्वभूमीवर आम्ही फोटो काढून घेतले. टॅक्सीवाल्याने आम्हाला पार्किंगमध्ये ड्रॉप केले. तेथून आम्ही पिट्टू केले व दर्शनीय ठिकाणे पाहण्यास निघालो.

‘First Indian village Mana’ 

प्रथम आम्ही पाहिली ती गणेश गुफा. येथेच महर्षी व्यासांनी श्री गणेशास महाभारताचे श्रुतलेखन सांगितले होते. त्याचे असे झाले: महर्षी व्यासांनी महाभारताची रचना करायचे ठरवले. ते अत्यंत वेगाने विचार करीत. एव्हढ्या जलद कोण बरे लिहून घेणार? असा ते विचार करू लागले. त्यांना श्री गणेशाचे नाव सुचले. त्यांनी गणेशास विनंती केली. त्याने ती मान्यही केली. पण त्याने एक अट घातली. ‘मी तुम्ही ज्या वेगाने सांगाल, त्या वेगाने लिहून घेईन, पण तुम्ही सांगताना अजिबात थांबायचे नाही. ज्या क्षणी तुम्ही थांबाल, त्या क्षणी मी लिहायचे सोडून निघून जाईन. ’ महर्षी व्यास विचार करू लागले. ‘श्री गणेशाएव्हढा जलद लिहिणारा लेखनिक आपणास शोधून सुद्धा सापडणार नाही. पण त्याच्या या अटीचे काय बरे करावे? ’ तेव्हाढ्यात त्यांना एक कल्पना सुचली. ते गणेशाला म्हणाले, ”तुमची अट मला मान्य आहे, पण माझीही एक अट आहे. मी जे सांगेन ते आपण फक्त लिहायचे नाही, तर त्याचा अर्थ समजून घेऊन घेऊन मगच ते लिहायचे. ’ गणेशाने ती अट मान्य केली. महर्षी व्यास महाभारत सांगू लागले. गणेशांना त्याचा अर्थ लागून ते लिहितात तो पर्यंत व्यास मुनींना पुढील मजकूर सुचत असे. अशा प्रकारे महाभारताचे लिखाण पूर्ण झाले. मंदिर प्राचीन असून मंदिरात श्री गणेशाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्ग भुयारी आहे. दर्शन घेऊन आम्ही सरस्वती नदीचचे उगमस्थान पहायला गेलो. येथे सरस्वती नदी उगम पावते, मोठा आवाज करीत दरीत कोसळते व तिथेच लुप्त होते. मान्यता अशी आहे की, ज्यावेळी गणेशजी महाभारताचे लिखाण करीत होते त्यावेळी त्याना सरस्वतीनदीच्या आवाजाचा त्रास होऊ लागला. त्यांना त्रास होऊ नये म्हणून ती लगेचच लुप्त झाली. सरस्वती नदीवरच एक भलीमोठी शिळा आहे, तिला भीम पूल असे संबोधिले जाते. अशी मान्यता आहे की, ज्यावेळी पांडव स्वर्गात निघाले होते, त्यावेळी सरस्वती नदी त्यांचे मार्गात येत होती. द्रौपदीला नदी ओलांडणे सुलभ व्हावे म्हणून भीमाने नदीवर एक शिळा टाकली. तिच्यावरून जाऊन द्रौपदीने नदी पार केली. भीम पूल ओलांडून आम्ही सरस्वती मंदिर बघायला गेलो. हे मंदिर भव्य व अतिशय सुंदर आहे. मंदिराची निर्मिती MIT विश्वशांती विश्वविद्यालय, पुणे यांनी केली आहे. मंदिरात सरस्वती देवीची अत्यंत देखणी मूर्ती आहे. सोबतच विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती देखील आहेत. या मंदिराच्या अनावरण प्रसंगी MIT विश्वशांतीचे संस्थापक प्रो. विश्वनाथ कराड, प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ विजय भटकर, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हजर होते. भीमपूल ओलांडल्यावर एक कमान लागते. त्यावर ‘स्वर्गारोहण मार्ग’ असे लिहिले आहे. हा तोच मार्ग आहे ज्यावरून पांडव व द्रौपदी स्वर्गप्रती जाते झाले. आम्ही त्या कमानीतून पलीकडे गेलो.

पलीकडे यूधिष्ठिराचे श्वान तसेच द्रौपदीसह पाच पांडवांच्या १२ फूट उंचीच्या सोनेरी रंगाच्या मूर्ती आहेत. मान्यता अशी आहे की, श्री कृष्णाच्या मृत्यूनंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला राज्य सोपवून पाची पांडव व द्रौपदी नर नारायण पर्वतावरून आपली स्वर्गाकडे जाण्याची यात्रा सुरू केली. मार्ग दऱ्याखोऱ्याचा व घनदाट अरण्याचा होता. चालता चालता द्रौपदी तोल जाऊन दरीत पडली व मृत्यू पावली. कांही वेळानंतर सहदेवाचाही तोल गेला व तो मृत्युमुखी पडला. त्यापाठोपाठ नकुल, अर्जुन व भीमही मृत्यू पावले. शेवटी फक्त धर्मराज व त्याचा विश्वासू श्वान स्वर्गात पोहोचले जेथे इंद्रदेवाने त्यांचे स्वागत केले. स्वर्गारोहण मार्ग परिसरातच चहाच्या कांही टपऱ्या आहेत. त्यांवर ‘हिंदुस्तानकी आखरी चायकी दुकान’ असे पूर्वी लिहिले होते, त्यातील ‘आखरी’ शब्दावर काट मारून तिथे ‘प्रथम ’ शब्द लिहिलेला दिसला.

इथे लोकरीचे कपडे चांगले मिळतात. त्यामुळे स्त्रीवर्गाने इथेही शॉपिंग केले. पिट्टूत बसून आम्ही पार्किंग पर्यंत आलो. तेथून सकाळच्या टॅक्सीने साधारण अडीच वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो.

 त्या दिवशी विश्रांती घेऊन ६ जूनला सकाळी ६. ३० वाजता हरिद्वारला जायला निघालो. रात्री आठ वाजता हरिद्वारला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बरीचशी मंडळी मनसादेवीच्या दर्शनाला गेली. पण सौ ची तब्येत जरा नरम असल्याने आम्ही गेलो नाही.

 ७ जूनला जेवण करून सकाळी अकरा वाजता आम्ही दिल्लीला जायला निघालो. संध्याकाळी सहा वाजता दिल्लीला पोहोचलो. ड्रायव्हरने आम्हाला साधारण स्टेशनजवळ सोडले. सर्व सहकाऱ्यांचा व पुसेगावकर दांपत्याचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला जाणारे सातजण दोन रिक्षांनी स्टेशनला आलो. आमची पुणे समर स्पेशल ट्रेन रात्री १०. १० ला होती. आम्हाला रात्रीचे जेवण बांधून दिले होते. ते आम्ही गाडीत खाल्ले. गाडी आठ जूनला रात्री ११. ५५ ला पुण्याला पोचणार होती. पण समर स्पेशल असल्याने प्रत्येक स्टेशनवर हिला मागे ठेऊन रेग्युलर गाड्या पुढे सोडल्या जात होत्या. पूर्वीच्या प्लॅन प्रमाणे आम्ही एक दिवस चि. मुग्धाकडे थांबून नऊ तारखेला दुपारी किंवा दहा तारखेला सकाळी सांगलीला जाणार होतो. पण असे तसे जागरण होणारच आहे व अनायसे कनेक्टिंग ट्रेन आहेच, तर सांगलीला जाऊनच विश्रांती घेऊ असा आम्ही विचार केला व नऊ तारखेच्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे बुकिंग आम्ही हरिद्वार सोडल्यावरच केले होते. आमची सांगलीला जाणारी कनेक्टिंग ट्रेन रात्री ३. ४० ला होती. ती मिळते की नाही अशी धाकधूक वाटू लागली. रडत खडत पुणे समर एक्सप्रेस नऊ तारखेच्या पहाटे ३. ३५ ला पुण्याला पोचली. नशिबानं आमच्या लगतच्या प्लेटफॉर्मवरच महाराष्ट्र एक्सप्रेस लागली होती. पळत पळत कशीबशी ती पकडली व नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सांगलीला पोचलो. आम्हाला घ्यायला जावई आले होते, त्यांच्या गाडीत बसून घरी पोचलो. अशा पद्धतीने आमची चारधाम यात्रा सफल संपूर्ण झाली.

– समाप्त –

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments