शालिनी जोशी
विविधा
☆ खिडकीतून दिसणारे पक्षीजग ☆ शालिनी जोशी ☆
आमच्या घराच्या शेजारच्या घरात आंबा आणि चिकू यांची मोठी झाडे आहेत. दोन्ही जवळ जवळ असल्याने एकमेकात मिसळून गेली आहेत. दोन्ही झाडे कायम हिरवीगार असतात. चिकू तर जास्तच, त्याची पानगळ कधी होते आणि नवीन पालवी कधी येते कळतच नाही. सहाजिकच असा वृक्षसंभार म्हणजे पक्षांचे आणि छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान. आमच्या घराची खिडकी समोरच येते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हा माझा छंद.
बरेच पक्षी झाडांना भेट देतात. कधी भारद्वाज आपल्या भारदस्त आवाजात साद घालतो. मला तो शाल पांगरलेल्या प्रौढ राजासारखा वाटतो. त्याच्या पाठीचा मखमली तांबूस रंग त्याला शोभून दिसतो. पांढऱ्या ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. आपल्या कर्कश आवाजात काळ्याभोर रंगाच्या, लाल डोळ्यांच्या, मंजुळ आवाजाच्या कोकिळाला साथ घालत असते. छोट्या सनबर्डची पळापळ अखंड सुरू असते. बारीकशी पिवळी चोच असणारी साळुंकी दबक्या पावलांनी वावरत असते. खारुताई खालीवर अखंड धावत असते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे हा तिचा आवडता छंद. शेपटीच्या हलण्यावर आवाज करते, का आवाजाच्या तालावर शेपटी हरवते ते कळत नाही. मात्र दोन्ही क्रिया अखंड आणि एकदमच सुरू असतात, एवढे मात्र खरे. एक दोनदा दुर्मिळ शिक्रा व चष्मेवाला यांनीही दर्शन दिले. टिट, रॉबिन, पोपट, कावळा ही अधून मधून असतात. बुलबुलांचा बुलबुलाट अखंड सुरू असतो. तो विविध आवाजात ओरडतो. म्हणून मी त्याच्या ओरडण्याला बुलबुलाट म्हणते. एकदा आमच्या घराच्या खिडकीच्या ग्रीलवर त्याने घरटे केले. काड्या काड्याजमवून गोल वाटी तयार झाली. एक दिवस पाहिले तर जोडी ग्रील वर बसलेली. अंडी कधी घालतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणीच फिरकले नाही. घरटे खाली लोंबताना दिसले. बहुतेक महाराणींच्या पसंतीस महाल उतरला नाही. काय करणार. पण या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर टोपी असते. तपकिरी काळ्या रंगाचा, पांढरे पोट, रुंद चोच असलेला हा पक्षी गालावर दोन बाजूला लाल भडक रंगाचे डाग मिळवतो. शेपटीखालीही तसाच मोठा लाल टिपका असतो. समोरून पाहिला तर काळ्या शेंडीचा पांढर्या दाढीचा साधूच तो वाटतो. सगळे पक्षी मिळून काही वेळेला इतका कलकलाट करतात की पक्षांची शाळा भरली असावी.
या सर्वांपेक्षा माझे लक्ष वेधले ते नाचण किंवा नाचरा यानी(fantail). चिमणी सारखा छोटासा पक्षी, दहा-बारा सेंटीमीटर लांब, छोटीशी चपटी चोच आणि मातकट रंग. रंगाचे कोणतेही सौंदर्य नाही. पण एका जागेवर थांबली की शेपटीचा पिसारा फुलवते, तो पाहत राहावा. या पक्षाला स्थिरता नाही. अखंड पिसारा फुलवीत नाचत असतो. त्यामुळे नाव नाचण. मोराचे नृत्य भारदस्त व सौंदर्यवती नर्तकीच्या नृत्याची आठवण करून देते. तर नाचण तुरू तुरू चालणारी बारीक अशी छोटी बालिका. अखंड उत्साहाचा झराच. आता इथे दुसऱ्या क्षणी तेथे पसारा फुलवून तयार. या फुलवलेल्या पिसार्याची नागमोडी किनार त्याची शोभा वाढवते. मला उत्साह देणारी ही नाचण. अखंड घरात बसणारी मी. पण नाचण मला अखंड काहीतरी करायची उमेद देते. त्यामुळे मी काहीतरी लिहीत, वाचत राहते. म्हणूनच मला कार्य प्रवण करणाऱ्या या नाचणचे कौतुक.
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





