अमृता देशपांडे
विविधा
☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ अमृता देशपांडे ☆
फिफा (FIFA) फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबाॅल असोसिएशन ही विश्वचषक सामने खेळवणारी संस्था आहे.
हे विश्वचषक सामने दर चार वर्षांनी खेळले जातात.
या वर्षी 11जून ते 19 जुलै 2026 या दिवसात खेळले जातील. हे सामने कॅनडा, मेक्सिको, आणि युनायटेड स्टेट्स् येथे खेळले जाणार आहेत. कॅनडामध्ये प्रथमच सामना होतो आहे. 1998 पासून 32 देशातले खेळाडू भाग घेत होते. 2026 ला 48 देश क्वालिफाय झाले आहेत. एकूण 104 सामने खेळले जातील.
काबो वेर्दे, कुरकाओ, जाॅर्डन आणि उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच भाग घेत आहेत. युकेचे इंग्लंड आणि स्काॅटलंड हे दोनच संघ सामील होतील.
48 संघ सोळा भागात विभागून सामने खेळले जातील. अंतिम निर्णायक सामना न्यू जर्सी (अमेरिका) येथे मेटलाईफ स्टेडियमवर 19 जुलैला खेळला जाईल. 2022 वर्षी अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, तो अर्जेंटिनाने जिंकला होता.
पहिला विश्वचषक फुटबाॅल सामना 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. तेव्हा 13 संघांनी भाग घेतला होता.
यानंतर पुढच्या चार वर्षांनी म्हणजे 2030 ला हे सामने मोरोक्को, पोर्तुगाल, आणि स्पेन येथे खेळले जातील. 2030 हे वर्ष या विश्वचषक सामन्यांचे 100 वे वर्ष असेल. विश्वचषक शतकपूर्तीचा मान म्हणून यातील एक सामना उरुग्वेच्या ईस्तादियो सेंटेनरी स्टेडियमवर खेळला जाईल.
विजेत्याला सन्मानाने, गौरवाने देण्यात येणारा कप हा सुवर्णचषक असतो. तो 3. 5 फूट उंच आणि त्याचे वजन 6. 2 किलो असते. त्याची किंमत 15 मिलियन पौंड म्हणजे भारतीय चलनात करायची तर असते दीडशे करोड रुपये.
पण विजेते ही ट्राॅफी घेऊन जात नाहीत, ती स्वित्झर्लंडच्या FIFA म्युझियम मध्ये ठेवली जाते. विजेत्या प्रत्येक खेळाडूला ब्राॅन्झची प्रतिकृती दिली जाते.
खेळाडूंची धावण्याची शारिरीक क्षमता, स्थिर आणि बळकट मन, समान गोल असताना पुढचा गोल करण्यासाठी लागणारी सांघिक एकात्म शक्ती, विरुद्ध संघातला खेळाडू बाॅल कुठल्या दिशेने कुठे पास करतो त्याप्रमाणे बाॅल गोलपोस्टकडे ठोकणे याला शारिरीक हालचाली आणि मेंदूची अतिशय तत्परतेची क्षमता लागते, तसेच गोलरक्षकाची येणा-या बाॅलचा अंदाज घेण्याची ताकद, मांजरासारखी धारदार नजर, चित्त्यासारखी झप् कन उडी घेण्याची चपळता
आणि सर्वात महत्वाचे, प्रत्येक सामना आणि विश्वचषक जिंकण्याची प्रचंड आणि जबरदस्त इच्छा हेच खेळाचे वैशिष्ट्य!
खेळाडूंच्या बरोबरीने पळणारा रेफरी हा तर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आणि खेळातला महत्वाचा दुवा.
खोडकर, रागीट, पळताना पायात पाय घालून पाडणा-या खेळाडूला एका शिट्टीवर बाहेरचा रस्ता दाखवणारा मास्तरच!
टीव्हीवर सामना बघताना सरासर धावणारे खेळाडू, रेफरी, गोलरक्षक, मध्येच धडाडकन् पडणारे धावक आणि एकत्र आवाजाने आणि टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे प्रेक्षक हा सगळा नजारा बघायला आणि सामन्याचा थरार अनुभवायला तयार राहूया.
लिओनेल मेस्सी, पेले, रोनाल्डो, डायगो माराडोना यांची आठवण करत, चला तर, 11 जून पासून विश्वचषक फुटबाॅल सामन्यांचा आनंद घेऊया.
© अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





