श्री सुधीर करंदीकर
विविधा
☆ “गुरु पौर्णिमा” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
नमस्कार नमस्कार,
आज खूपच पवित्र अशा सणाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान हे खूपच आगळे वेगळे आणि महत्त्वाचे असे असते.
घरामध्ये आई-वडील आपले गुरु असतात, आजी आजोबा आपले गुरु असतात, आपले भाऊ-बहीण / काका काकू/ मामा मामी/ आत्या मावशी, हे आपले गुरु असतात. लग्न झाल्यानंतर बायको पण आपली गुरु असते (बायकां करता नवरा गुरु असतो का नाही याबद्दल माहिती नाही). आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपल्या ओळखीचे, आपले मित्र-मैत्रिणी (मेघना आणि मनवा पण) हे पण आपले गुरु असतात.
शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपल्याला छान शिक्षण देणारे आपले गुरु असतात, त्यामुळे नोकरी / उद्योग धंदे / कामधंदे आपल्याला करता येतात आणि यामध्ये आपली छान प्रगती होते. त्यामुळे आपले आणि कुटुंबीयांचे जीवन सुखकर होण्यास खूप मदत होते.
जीवन कसे सुंदर जगावे याचे धडे आपण या सगळ्यांकडून घेत असतो, आणि छान जीवन जगण्याच्या मार्गावर आपण पुढे पुढे जात असतो.
योग करणे, ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे, याचे शिक्षण आपल्याला त्या त्या क्षेत्रामधल्या गुरुवर्यांकडून मिळत असते. त्यामुळे आपण उत्तम तब्येत ठेवून छान आयुष्य जगू शकतो. आनंदाने आणि उत्साहाने जीवन जगू शकतो. ताणतणावरहीत (stress free) जीवन जगू शकतो, ज्याची आजच्या जगात सगळ्यांना खूप गरज आहे.
आणि खरं म्हटलं तर आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, निसर्गाकडून, प्राणीमात्रांकडून,जीवजंतूकडून, जीवन आनंदात आणि उत्साहात कसे जगावे याचे ज्ञान रोजच मिळत असते. ते पण आपले गुरु असतात.
अशा या सगळ्या गुरूजनांना आज मनापासून आपण नमस्कार करूया आणि त्यांचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहावेत याकरता देवाकडे प्रार्थना करूया.
आणि फक्त आजच नाही, तर यापुढे रोजच या सर्व गुरुजनांना आपण वंदन करूया आणि त्यांचे आशीर्वाद रोज नियमितपणे घेऊया आणि मस्त जगूया /आनंदाने जगूया /उत्साहाने जगूया…..
रोज सकाळी उठल्यावर खालील श्लोक म्हणायचा आणि वरील सर्व गुरुजनांना डोळ्यासमोर चलचित्रपटाच्या स्वरूपात बघायचं, नमस्कार करायचा आणि दिवस सुरू करायचा…
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
(७१ वर्षांपूर्वी मी जेव्हा शाळेमध्ये पहिलीत गेलो तेव्हा श्री बोर्डे गुरुजी हे मला पहिली ते तिसरी शिक्षक होते. चौथीमध्ये श्री ठाकरे हे गुरुजी होते. पाचवी नंतर श्री मजलीकर हे गुरुजी होते. कॉलेजमध्ये डॉक्टर छबलानी प्रोफेसर होते. पुण्याला नोकरी लागल्यानंतर डिपार्टमेंटचे मुख्य श्री भाटवडेकर साहेब होते. यांच्याकडून आणि इतर सगळ्याच यांच्या सहकाऱ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांना त्रिवार वंदन करतो)
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






