श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
स्वयंपाक घरात होणारी चर्चा काहि ठराविक मुद्यांवरच होते. त्या मुद्यांचा जागतिक मुद्यांशी तसा संबंध नसतो. तसा असायचं कारणही नाही. कारण आज भाजी कोणती करु?… या प्रश्नाशी जागतिक बाजारातपेेठेेत मिळणार्या भाज्या कोणत्या. त्या पालेभाज्या आहेत का फळभाज्या. त्या करायच्या कशा… म्हणजे. तेलावर का शिजवून. पातळ भाजी का दाण्याचा कुट लावायचा. किंवा त्यांचे असलेले बाजारभाव याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. अगदी खोबरं किंवा मिर्ची याचा ऊल्लेख आला तरी खोबर्याच्या बाबतीत राजापुरी खोबरं आणि मिर्ची बाबत सिमला मिर्ची अथवा लवंगी मिर्ची या पनवेेल किंवा सिमल्याची. नाहीतर कोल्हापुरची सीमा ओलांडून पलिकडे आम्ही गेलो नाही.
फारतर दिवाळी जवळ आली की फराळाचे पदार्थ करायचे का… कोणते… का विकत आणायचे… यावर चर्चा होते. किंवा थांबते. तिथे काही दिवाळीत विकत घ्यायच्या फटाक्यांचे प्रकार किंवा बाण आणि संरक्षण क्षेत्राकडे असणारे अग्निबाण. किंवा फटाक्यातले बाॅम्ब आणि सैन्याकडे असणारे बाॅम्ब यांंचा या र्चेचत संबंध नसतो.
अधुुनमधूून कामवाली येणार नाही. किंवा पाणी येणार नाही याचवेळी थोडी आणिबाणी जाणवायची. पण ती सुध्दा घरगुती. त्याचा जागतिक घडामोडींशी किंवा निर्माण झालेल्या आणिबाणी सद्रुष्य परिस्थितीशी संबंध नसायचा. त्यामुळे स्वयंपाक घरात जागतिक चर्चा होतच नव्हती. थोडक्यात स्वयंपाकघर आणि जागतिक घडामोडी यांच्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या. कोणत्याही प्रकारे सिमोल्लंघन किंवा घुसखोरी नव्हती.
दोन देशात काही बाबतीत शीतयुद्ध असत. पण आमची चर्चा शितकपाट म्हणजेच फ्रिज यात काय भरलंय याच विषयावर फ्रिज व्हायची. त्यामुळे तिथेही असणारा आंतरराष्ट्रीय प्रभाव तसा थंडच होता. पण आता मात्र त्या चर्चा बदलल्या होत्या.
रशिया. युक्रेन. इस्रायल. चिन. अमेरिका आणि विशेषकरून डोनाल्ड ट्रंप यांचा विषय येतोच. म्हणजे भंंगार किंंवा रद्दी घेणारा. भाजीवाला जस सहजपणे दोनचार वेळा दारावरून ओरडत जातो. तितक्याच सहजपणे यांचा विषय होतो. कारण काय तर या सगळ्यांमुळे वाढत जाणारे सोन्या चांदिचे भाव. हमास या शब्दाचा वापर तर हमाम साबण जितक्या सहजतेने आणि सारखा सारखा वापरतो तेवढ्या सहजतेने वापरला जात होता.
आता टमाटा आणि डोनाल्ड ट्रंप यांचा काहीच संबंध नाही. तरीही डोनाल्ड ची धोरणंतर टमाट्याच्या भावासारखी रोज बदलतात असा सूर लावत त्याच्या धोरणांना आम्ही सहज टमाट्याच्या बरोबर तोंडीलावायला घेतो. डोनाल्ड या नावाचाच राग आहे.
मी मोबाईल वर ॲलन डोनाल्ड या क्रिकेट खेळाडूची एक ध्वनीचित्रफित बघत होतो. त्याच्या आवाजाने घरात विचारलं. काय पाहताय येवढं. मी सहज म्हंटल. ङोनाल्डचा व्हिडीओ आहे छोटासा. छान आहे.
झालं… डोनाल्डचा व्हिडीओ. आणि चांगला. यावरच आवाज इतका वाढला कि कदाचित ॲलन किंवा ट्रंप पैकी कोणताही डोनाल्ड जवळ असता. किंवा दोघेही असते तर ते सुध्दा थोडावेळ गप्प बसले असते…
काय म्हणतोय तो आता.. आता काय वाढवतोय… मग मला सांगाव लागलं कि हा वेगळा डोनाल्ड आहे. हा फास्ट बॉलर होता… तरीही डोनाल्ड या नावाचा राग काही गेला नव्हता…
असेल फास्ट बॉलर… याची धोरणं डोक्यावरुन जातात. त्याचे बाॅल जात असतील. पण सगळं डोक्यावरुनच जात नं… त्याचा बॉल डोक्याला लागू नये म्हणून निदान हेल्मेट तरी वापरता येतं. याच्या डोक्यावरुन जाणाऱ्या गोष्टींसाठी काय वापरणार… डोक्यावरुन जाणारा चेंडू कसा टाकायचा. यासाठी तरी तो तुुमचा डोनाल्ड डोकं वापरत असेल. पण या डोनाल्डच्या डोक्याच काय… आता या युक्तीवादावर मी काय बोलणार… मी आपलं अंपायर्स काॅल सारखा निर्णय मान्य केला.
हा राग काहि येवढ्यावरच थांबला नाही. पुढे सुरुच होतं.
याचा राग कशावर. तर आम्ही दुसरीकडून घेत असलेल्या तेलावर. अरे तुला काय त्याच्याशी. तुला विकायच तर आम्हाला परवडेल त्या किमतीला विक… आम्ही पाच किलो तेल घ्यायला बाजारात गेलो तरी दोन ठिकाणी तेलाचे भाव पाहतो… तुला जमत असेल तर दे. नाहीतर जा तेल लावत… हे याचं म्हणजे वडाच तेल वांग्यावर काढण्यासारख आहे. यावर तेलाचा आंतरराष्ट्रीय विचार थांबतो. नाहीतर हे तेल प्रकरण इतक गरम झालं असत कि भक्त प्रल्हाद सारखं यालाही गरम तेलात टाकण्याची शिक्षा दिली असती.
हा संताप किंवा राग थांबला अस वाटत होत. तेवढ्यात एक मित्र सपत्नीक आला. त्याचा दात दुखत असल्याने संध्याकाळी तो दाताच्या डाॅक्टरांकडे जाऊन आला होता.
तो म्हणाला. डाॅक्टरांनी त्याचे सहज दिसणारे दात त्यांच्या भिंगाच्या सहाय्याने पाहिले. दोनचार प्रश्न विचारले आणि म्हणाले. फार काहि नाही. थोडी मोकळी जागा आहे तिथे फक्त थोडी चांदी भरावी लागेल. इतकच. झालं… त्यावरून परत चर्चा सुरु झाली…
काय भाव वाढत चाललेत चांदिचे. यांना काय लागत फक्त थोडी चांदी भरा म्हणून सांगायला. अगोदर ब्लड रिपोर्ट करणारे यांच्या संबंधातले असतात अस म्हणत होतो. आतातर चांदिवालेपण मिळालेले वाटतात. आणि जी चांदी वरुन दिसणारच नाही ती भरुन करायचं काय.. चाटायची आहे… चाटायची म्हंटली तरी दाताच्या खालीच असणार… कशी पुरणार जिभ…
माझ्या पायातली साखळी किंवा अंगठी केली तर दिसेल किंवा दाखवता येईल. पण दातातल्या चांदिच काय करणार… ते काही हत्तीचे दात आहेत दिसायला.
असं म्हणत मित्राची बायको माझ्या बायकोबरोबर स्वयंपाक घरात गेली… आणि परत स्वयंपाक घरातल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ आला…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




