अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “उंबरठा…” ☆ अर्चना सुरेश देशपांडे

उंबरठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला खालच्या बाजूला लावलेलं जाड उंच लाकूड. उंबरठ्याशिवाय घराला पूर्तता नसते, हा घराचा महत्वाचा भाग असतो.

माझ्या माहेरी घर मोठे होते. प्रत्येक खोलीला उंबरठा होता. पूर्वी अंगणात रांगोळी काढताना उंबरा धुऊन त्यावरही हळदी कुंकू घालून नमस्कार केला जायचा. उंबऱ्यावर गो पद्म, स्वस्तिक रांगोळी काढली जायची.

पूर्वीच्या काळी घर हेच स्त्रीचे विश्व होते. बाईने उंबरठा ओलांडून स्वकर्तुत्वाने काही करायचे म्हटले की तिला घरातून विरोध असायचा.

उंबरठा म्हणजे तिच्यासाठी लक्ष्मणरेषा. स्त्रिने घरातील लोकांच्या विरुद्ध उंबरठा ओलांडून बाहेर जाणे म्हणजे संस्काराची मर्यादा ओलांडली असे मानले जात असे.

नववधू घरात प्रवेश करताना उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. तिच्या दृष्टीने हा गृहप्रवेश खूप महत्त्वाच्या ठरतो.

धार्मिक दृष्टीने सुद्धा उंबरठा महत्त्वाचा मानला जातो. नरसिंह व लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी असते. उंबरठा सहसा उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो.

उंबरठा हा मर्यादेची जाणीव करून देतो. उंबरठ्याच्या आत सुरक्षतेची भावना असते. आपल्या संस्कृतीत उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर वास्तुशास्त्रानुसार उंबरठा नकारात्मक ऊर्जा रोखून धरतो.

हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा ही कल्पनाच इतिहास जमा झाली आहे. तिथे उंबरे नसतातच, अगदी असेल तर  कडापयाची लांबडी पट्टी बसवून घेतात.

माझ्या मते घराला उंबरा असावा. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो आणि पाय थांबले की मन ही क्षणभर जागे होते. तो सांगतो जणू आता घरात प्रवेश करतो आहेस, बाहेरचा राग, अहंकार, कटुता दाराबाहेर ठेव आणि घरात प्रवेश करताना प्रेम, आदर, संयम व विनम्रता घेऊन ये.

उंबरठा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर किती ही मोठ्या पदावर असलास तरी घरी येताना माणूस म्हणून घरात प्रवेश कर.

सद्गुरु वामनराव पै सांगतात “माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळायला हवे” खरं पाहता उंबरा हेच शिकवतो. पती, पत्नी, आईवडील आणि मुले, सासू-सून, बहीण -भाऊ, आजी आजोबा व नातवंडे या प्रत्येक नात्यात उंबरा म्हणजे मर्यादा असतात. हा उंबरा ओलांडला गेला तर नाती बिघडतात आणि हा उंबरा जपला तर आपुलकी राहते, घरात शांतता नांदते.

थोडक्यात दाराचा उंबरा घराचे रक्षण करतो तर मनाचा उंबरा नात्याचे बंध जोडून ठेवतो.

 

© अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted