अलका ओमप्रकाश माळी
विविधा
☆ – नातं आणि अपेक्षा… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆
नातं…! हा शब्दच प्रेमाने भरलेला आपुलकीच्या धाग्याने घट्ट बांधलेला आणि मायेने ओथंबलेला वाटतो मला.. जन्मासोबत एका कुटुंबसोवात आपलं नातं निर्माण होत.. आणि जन्मा अगोदर जे नातं जुळत ते म्हणजे जगातील सर्वात निस्वार्थी निर्मळ ज्या नात्यात फक्त देण माहित असत ते म्हणजे आपल्या आईसोबत चं नातं.. जन्म होतो आणि एका कुटुंबासोबत आपलं नातं जुळलं जात आई बाबा, भाऊ बहिण, काका मामा आजी आजोबा अशी अनेक नाती जन्मासोबत आपोआप मिळतात आपल्याला.. जस जस वय वाढू लागत तस तस प्रत्येक नात्याकडून आपल्या अपेक्षा ही जन्म घेतात.. इवल्या शा बाळाला सगळ्यात पहिली अपेक्षा असते ती आईकडून भूक भगविण्यापासून ते लाड करून घेण्यापर्यंत बेसिक वाटणारा सुरू होणाऱ्या ह्या अपेक्षांचा सिलसिला अखंड सुरू होतो तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहतो.. मग अजून मोठे होतो मग कुटुंबासोबतच समाजाकडून अपेक्षा वाढू लागतात आणि जशा जशा ह्या अपेक्षा वाढू लागतात तसं सोबत दुःख निराशा ही वाढू लागते.. कारण अपेक्षा हे दुःखाच सर्वात मोठं कारण आहे अस मला वाटत.. अपेक्षा आल्या म्हणजे दुःख थोड का होईना येणार हे निश्चित असत पण हे दुःख पचविण्याची तयारी मात्र आपली नसते.. मुळात आपण आपल्याच माणसांकडून अपेक्षा ठेवतो त्यामुळे त्या पूर्ण करण हे त्यांचं कर्तव्यच आहे असा एक गोड गैरसमज आपल्या मनात ठाम असतो.. पण काहीवेळा ह्या आपल्या माणसांकडून काही अपेक्षांची पूर्ती होत नाही मग सुरू होतो राग द्वेष आणि दुःखाचा खेळ.. मन दुखावली जातात.. एकमेकांमध्ये रुसवेफुगवे होतात, वादाची ठिणगी पडते आणि आपलं समजलं जाणार नातं आपोआप मागे पडतं.. नात्यात कधी दुरावा येतो हे कळत ही नाही.. म्हणून मला नेहमी वाटत दुःखाच मूळ कारण असत ते म्हणजे अपेक्षा.. ह्याची दुसरी बाजू म्हणजे अपेक्षांचं ओझं..! काही नात्यात आपल्या कडून इतक्या अपेक्षा ठेवल्या जातात की त्या अपेक्षांचं ओझं वाटू लागत आणि अशा वेळी ही जन्म होतो तो निराशा आणि दुःखाचा..! अवास्तव अपेक्षा फक्त आणि फक्त दुःखच देतात आणि हे दुःख दोन्ही पक्षाच्या वाट्याला येत.. तिसरी बाजू म्हणजे अपेक्षाभंग.. नातं आल की छोट्या मोठ्या का होईना अपेक्षा येतातच काहीवेळा ह्या अपेक्षा अवास्तवतेच रूप घेतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही करू शकलो तर अपेक्षाभंग हा निश्चित असतो.. आणि अपेक्षाभंगाचे दुःख फार मोठं असत ह्या दुःखात आपण इतके डुबून जातो की किनारा मिळणं कठीण होऊन जात.. आणि इथे बळी जातो तो नात्याचा..! नातं जपण्यासाठी अपेक्षांचं ओझ घेऊन आपण इतका आटापिटा करतो की त्या त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली नकळत आपण दबून जातो.. मग हळूहळू नात्यातील प्रेम विश्वास आपोआप कमी होतो आणि उरते ती केवळ कर्तव्यपूर्ती… आपलं कर्तव्य आहे म्हणून अपेक्षा पूर्ण करण्याकडे आपल पूर्ण लक्ष केंद्रित होत आणि जिथे केवळ कर्तव्य उरते तिथे प्रेम आपोआप कमी होऊन जात.. मग अशी नाती आपण केवळ ओढत राहतो.. ती सांभाळण्यासाठी त्या नात्यातल्या अपेक्षा पूर्तीसाठी झटत राहतो काही नाती तर फक्त अपेक्षा बनून राहतात आणि मग अशा नात्याला काहीच अर्थ राहत नाही.. समाजासाठी एक दिखावा बनून राहतात अशी नाती.. आणि मला वाटत अशी नाती म्हणजे फक्त निराशा आणि दुःखाच कारण बनतात…. काहीवेळा एखाद्या नात्यात आपण इतके हतबल होऊन जातो की नात्यांकडून काही अपेक्षाच राहत नाहीत.. आणि जशा अवास्तव अपेक्षा दुःखाच कारण असतात तसेच अपेक्षाहीन नाती ही फक्त एक दिखावाच बनून राहतात.. मला तर वाटत जेंव्हा एखाद्या नात्याकडून काही अपेक्षाच राहत नाहीत अशा परिस्थिती इतकी वाईट गोष्ट कोणतीच नाही.. कारण अशा नात्यात असते ती केवळ हतबलता..! निरपेक्ष नाती जगात फार कमी पाहायला मिळतात.. ज्या नात्यांमध्ये प्रेम जिव्हाळा आणि एकमेकांबद्दल विश्वास कुटकुटके भरा होता है अशा वेळी निरपेक्षता हे सगळ्यात मोठी गोष्ट असते अस मला वाटत.. निरपेक्ष नात्यांमध्ये फक्त आणि फक्त आनंद असतो कारण अशा नात्यांमध्ये अपेक्षाभंगाचे दुःख नसते.. अवास्तव अपेक्षांचे ओझी नसतात असते ती फक्त प्रेमळ जबाबदारी मनापासून मनापर्यंत स्वीकारलेली जबाबदारी.. आपलं प्रेम दाखविण्यासाठी केलेली एक सुखकर धडपड किंवा आपण अस म्हणू शकतो की अशा नात्यांमध्ये एकमेकांस काही गोष्टी सांगण्याची गरज नसते ते दोघ एकमेकांसाठी एकमेकांच्याही नकळत झटत असतात आणि ते ही फक्त कर्तव्यपूर्ती म्हणून न्हवे तर त्या नात्यात असणाऱ्या प्रेमापोटी ते एकमेकांची मन जपत असतात.. आणि जिथे जपण असत तिथे असत फक्त आणि फक्त प्रेम..! आणि अर्थातच हे प्रेम निरपेक्ष असत.. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख नाही की अवास्तव अपेक्षांचं ओझं ही नाही त्यामुळे अशी नाती निर्मळ निखळ प्रेमाची प्रतिक बनून राहतात.. अवास्तव अपेक्षा आणि अपेक्षा भंग ह्या दोन्ही गोष्टी केवळ आणि केवळ दुःखास कारण असतात अस अगदी मनापासून वाटत मला..!
© अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





