श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “नजर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
डोळ्यांनी बघण्याची जी पध्दत असते त्याला नजर अस म्हणता येईल. पण ही अनेकांच्या विचाराने अनेक प्रकारची असते. वेळ, प्रसंग, विचार यानुसार वेगळी असू शकते.
काही गोष्टी नजरेत भरतात. तर काहिंची बघण्याची पध्दत नजरेला जाणवते. नजरानजर होत काही गोष्टी होतात. तर काही नजरचुकीने होतात, किंवा नजर चुकवून कराव्याशा वाटतात.
नजर लागू नये म्हणून नजर काढायची किंवा उतरवायची पध्दत आहे. तर बाळाला लावली जाणारी तीट सुध्दा नजर लागू नये म्हणूनच असते.
कैदी नजर चुकवून पळायच्या प्रयत्नात असतात, तर काहींना नजरकैदेत ठेवतात. काही इशारे नजरेने होतात, तर काहीवेळा इशार्यांवर नजर ठेवावी लागते.
नजर प्रेमाची, दहशत पसरवणारी, शांत, भिरभिरणारी, आश्वासक, बारीक किंवा करडी, शोधक, थंड, जरब असणारी, मादक अशा अनेक प्रकारची असते. मनातल्या भावनांचा नजरेशी संबंध असतो. नजरेने काहीगोष्टी सुचवल्या जातात, तर गैरप्रकार टाळण्यासाठी बारीक नजर ठेवतात. नजरेच्या टप्प्यात काय आहे याचा विचार असतो, तसाच भविष्यात काय साध्य करायचं आहे यावरही असते ती नजर. नजरेत काही प्रश्नांची ऊत्तरं असतात, तर नजरेमुळे मनात काही प्रश्न निर्माण होतात.
काही गोष्टी नजरेत साठवून ठेवतो, काही नजरेसमोर नकोशा वाटतात. तर काही नजरेआड झाल्यातरी चुकल्यासारखं वाटत. नाजूक, भारदस्त, आकर्षक, सुंदर म्हणजेेच दिसणं यांचा संबंध नजरेशीच असतो.
एखादी महत्वाची गोष्ट असेल तर सहजपणे जाणत्या माणसाला एकदा नजरेखालून घाल अस सुचवतो. अशावेळी नजरेला अनुभव व विचार यांची जोड व सोबत आदर मिळतो.
नजर या शब्दाचा मोह अनेक गाण्यातही जाणवतो. मराठी गाण्यात डोळे कशासाठी…. तुला साठवून मिटून घेण्यासाठी तर हिंदीत किसी नजर को तेरा इंतजार आज भी है असा अनेक गाण्यात अनेक प्रकारे नजरेचा ऊल्लेख आहे.
कलाकार, राजकारणी, कवी, शिक्षक, डाॅक्टर, वकील यासारखे अनेक हे आपापल्या नजरेने गोष्टी शिकत आणि शिकवत असतात.
नजर याबद्दल थोडक्यात पण बरंच असच सांगता येईल. First impression is the last impression अस म्हंटल तरी पहिल्या प्रसंगात नजरेत काय पडेल, किंवा काय, कसं दिसायला पाहिजे याचाच विचार असतो. म्हणजे तिथेही नजर महत्वाची असते.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



