सुश्री ज्योति हसबनीस

सुरेल संगत …

(Today we present wonderful article on music, songs and our moods written by  Mrs. Jyoti Hasabnis. She is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.) 

एखादं गाणं जेव्हा मनात रूंजी घालू लागतं ना तेव्हा त्या शब्दांनीच जाग येते , त्याचे सूर दिवसभर संगतीला असतात आणि रात्री ते उशाशी घेऊनच त्याच्या तालावर झुलत आपण निद्रेच्या अधीन होतो . खरंच गीताची ही मोहिनी मनावर इतकी जबर्दस्त असते की त्या क्षणी जाणवतं , संगीत हा आयुष्याचा केवढा सुरेल भाग आहे ! रोजच्या नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्याची लय बिघडू न देण्यात ह्या शब्द सूरांचा केवढा मोठा वाटा आहे !

गाण्याचं सुद्धा असं असतं ना ,  गाण्याचे जसे भाव , शब्द ,  सूर , तसा मूड व्हायला लागतो . एखादं गाणं ऐकताक्षणी मूड अगदी प्रसन्न होतो . प्रसन्न मूड असला की मनात अगदी चांदणं फुललेलं असतं आणि त्या चांदणगावात चंद्र , तारका , आणि आपण एवढेच वस्तीला असतो , सूरावर झुलत असतो , ठेक्यात ताल धरत असतो  ‘ आ जा सनम पासून तर नीले नीले अंबर ‘ पर्यंतचा जोडीदाराबरोबरचा प्रवास असा चांदणप्रकाशात अगदी झोकात पार पडतो !     गीतातल्या शब्दाबरोबरच तृप्त करणारं संगीत आणि कलाकारांनी त्यात ओतलेला जीव सारं कसं एखाद्या सुंदर कलाकृतीसारखं मनात ठसतं . आणि मग काही गाण्यांबरोबर

कायमच ते भाव मनात घर करतात   . ‘तेरा मेरा प्यार अमर ‘ ऐकतांना उगाचच हळवं व्हायला होतं , ‘ तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं ‘ ऐकतांना बेचैन व्हायला होतं , तर ‘ वो शाम कुछ अजीब थी ‘ऐकतांना आत आत असे तरंग उठल्यासारखे वाटतात , ‘ हमने देखी है इन आँखोंकी महकती खुशबू ‘ ऐकताना तर हलका शहारा मनाला व्यापतो , अंतर्मुख करतो ! एखाद्या गाण्याने आळवलेला दु:खी सूर आयुष्याच्या फोलपणाची जाणीव करून देत अगदी रितं रितं करून टाकतो तर ,’ दिखाई दिए यूँ ‘ सारखं गाणं काळीज चीरत जातं . गाणं संपलं तरी सुप्रिया पाठकचा कोवळा चेहरा , आणि गीतातले शब्द त्याच्या सूरासकट संगीतासकट पाठलाग करत राहतात . ‘ ये जीवन है ‘ असो की ‘ जिंदगी के सफरमें गुजर जाते हैं ‘ असो ह्या सारखी जीवनावर नितांत सुंदर भाष्य करणारी गाणी विरळाच  . काल परवा माचिस मधलं ‘ छोड आएँ हम ये गलियाँ ‘ हे गुलजारने लिहीलेलं सुरेश वाडकरांनी गायलेलं गाणं ऐकलं आणि अक्षरश: मनात विचारांचं मोहोळच उठलं ! अशांत पंजाब , आणि भडकलेला वाट चुकलेला , आणि परतीच्या वाटेला मुकलेला अगतिक तरूणवर्ग इतकी भेदक परिस्थिती आणि विदारक वास्तव त्या चित्रपटात चितारलंय , की सगळा चित्रपटच हे गाणं ऐकतांना डोळ्यासमोरून झर्रकन सरकतो . ह्या गाण्यातल्या सुरूवातीच्या शब्दांतून झरणारा गोडवा कधी नैराश्यात कडवटपणात बदलतो ते कळतही नाही आणि मग गाणं संपलं तरी मनात ते सगळ्या भावनिक आंदोलनांसकट सुरूच राहतं . आजची काश्मिरची परिस्थिती , बहकलेला , बिथरलेला तरूण वर्ग असाच नैराश्याच्या गर्तेत गेला तर …परतीच्या वाटा त्यालाही बंद झाल्या तर ..

अशीही काही गाणी , जिवाची घालमेल करणारी  , घायाळ करणारी , जिवाच्या चिंधड्या करणारी ,  !!

सुख -दु:ख , प्रीति -असूया , मीलन-विरह ह्या साऱ्या छटांनी नटलेलं जीवन आणि त्याचंच प्रतिबिंब ही गाणी ! सावलीसारखी त्यांची आपल्याला असलेली सोबत आयुष्याची वाटचाल सुरेल करते हे मात्र नक्की !

© ज्योति हसबनीस

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Dheeraj Kulkarni

अप्रतिम लेख