श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “रॉकीभाई…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
नुकताच रिटायर झालो असल्यानं निवांत होतो. मित्रानं आग्रह केला म्हणून त्याच्यासोबत अन्नदानाचं कार्य चालतं त्याठिकाणी गेलो. अनेक गरजू, भुकेले जेवत होते. बाजूला उभा असताना पंगतीतला एक हडकुळा, मळके कपडे, मानेपर्यंत वाढलेले केस, झुपकेदार मिशा आणि वीतभर लांब पांढरी दाढी अशा अवतारातला चेहरा ओळखीचा वाटला. निरखून पाहताना आमची नजरानजर झाल्यावर त्यानं तोंड फिरवलं. दोनतीनदा असं झालं. अचानक तो उठला अन काठी टेकवत जाऊ लागला तेव्हा “रोशन” मी हाक मारली. तो थांबला. अंदाज बरोबर होता. जवळपास ३०-३५ वर्षांनंतर आम्ही भेटत होतो. दोघं हॉलमधून बाहेर आलो. “रोशन, मी… ”
“तुला पाहिल्याबरोबर ओळखलं”
“मग बोलला नाहीस”
“आपल्यातला फरक बघ. तू साहेब, मी भिकारी.. ”
“असं का बोलतोयेस”
“जे खरंयं ते. ”
“तुझी ही अवस्था? ”
“नको इतका माज केला त्याचे परिणाम. माझं सोड. तुझं सांग”
“टिपिकल मध्यमवर्गीय, बँकेत होतो. मुली सासरी. एकूणच मस्त चाललयं. तुझं काय? ”
“माझ्याकडं बघून आयुष्याची झालेली बरबादी लक्षात आली असेलच. ”
“म्हणजे”
“आपण सएकाच गल्लीत, एकाच शाळेत होतो. तू शिकलास.
पुढे गेलास. ऑफिसर झालास आणि मी नववीत शाळा सोडून वाईट संगतीला लागलो. त्याच नादात भरकटलो अन स्वतःच वाटोळं करून घेतल. ”
“घरी कोण कोण असतं”
“आता एकटाच आहे. नशिबानं चांगली बायको मिळालेली पण बिचारी करोनात गेली. मुलगी सासरी, चांगलं चाललंय पण तिच्यासाठी बाप केव्हाच मेलाय आणि पोरगं असून नसल्यासारखं. दारूशिवाय काही सुचत नाही. त्याची अवस्था पण माझ्यासारखीच होणार. दम्याचा त्रास, हात थरथर कापतात,
काठीशिवाय चालता येत नाही. त्यामुळे काही काम करता येत नाही. दोन टाइम खायचे वांधे म्हणून रोज दुपारी इथं येतो. संध्याकाळी दुसरीकडं… ”
“कामधंदा काय करायचास? ”माझ्या प्रश्नावर रोशन मोठ्यानं हसायला लागला.
“वसूली, खंडणी, सुपाऱ्या घ्यायचो, मारामाऱ्या करायचो. “रॉकीभाई” म्हणून फेमस होतो. जबरदस्त दहशत होती. बऱ्याचदा तुरुंगात गेलो. नावावर पंधरा वीस केसेस आहेत. एकदम अट्टल रेकॉर्डवरचा… ”
“म्हणजे तू???? बाप रे!! ”
“तो इतिहास झाला. आता सगळं संपलयं. रॉकीभाईचं पार खोकडं झालंय. दारू, सिगरेटनं तब्येतीची वाट लागली. भाईगिरीच्या नादात लोकांना त्रास देताना मजा वाटायची. सगळे आपल्याला घाबरतात याची भन्नाट नशा होती पण आजारी पडलो अन दिवस बदलले. टम्म फुगा टाचणी लागल्यावर जसा केविलवाणा होतो तसं झालं. सततच्या आजारपणामुळं मी संपलो. दिवस बदलले आणि पार रस्त्यावर आलो. आता कुणीही विचारत नाही की ओळखही देत नाही. लई पैसा कमावला पण टिकवता आला नाही. एकेकाळी नोटांची गड्डी उडवायचो आता एक चहा पिण्याइतकी ऐपत नाही. ”
“काही मदत.. ”मी खिशात हात घातला.
“आपणहून ओळख दाखवलीस हेच खूप आहे. बरं वाटलं. आता परत भेटायला नको आणि चुकून भेटलोच तर ओळख दाखवू नकोस. आता देवानं लवकर सुटका करावी एवढीच इच्छायं… ”थरथरत्या हातानं नमस्कार करून काठी टेकवत चालायला लागला. पाठमोऱ्या खंगलेल्या रॉकीभाईकडं पाहताना मनात खूप साऱ्या भावनांची गर्दी झालेली.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




