संगीता कुलकर्णी
विविधा
☆ भोंडला म्हणजे समृद्धीचा उत्सव… ☆ संगीता कुलकर्णी ☆
आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.. आपले सण उत्सव हे कृषी संस्कृतीशी संबंधित आहेत.. भोंडला हा प्रामुख्याने कुमारिकांचा उत्सव आहे.. “भोवंडल” हा मूळ प्राकृत शब्दावरून भोंडला हा शब्द आला असावा असं संशोधकांचं मत आहे.. भोवंड म्हणजे गोल फिरणे..
मुलींनी एकत्र येऊन फेराची गाणी म्हणणे याच्या मुळाशी मोठा अर्थ आहे.. आषाढ श्रावणातल्या पावसाने भूमीला तृप्त केलेलं असतं.. अश्विन महिन्यात ही तृप्त झालेलो भूमी भरघोस पिकांच्या रूपाने रसरसून बहरलेली असते.. जमिनीच्या सफलतेची नवनिर्माणाची ताकद पूर्णत्वाला पोहोचलेली असते कारण स्त्री ही भूमीप्रमाणे सर्जनशील आहे.. धरणीसारखी तिच्याकडेही निर्माणाची शक्ती आहे.. कुमारिका तर सुफल होण्याच्या शक्तीने ओतप्रोत भरलेली असते म्हणून भूमीशी साधर्म्य असणा-या कुमारिका भूमीची सुफलन शक्ती असणा-या या काळात त्या “समृद्धीचा उत्सव ” गाणी म्हणून साजरा करतात…
भोंडला, भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.. महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसतात..
अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरूवात होते आणि छोट्या- मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते कारण माहीत आहे का?.. कारण याच दिवसापासून त्यांच्या आवडत्या हादग्याची किंवा भोंडल्याची सुरूवात होते.. अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरूवात झाली की त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली हादगा खेळतात.. त्याला भोंडला असेही म्हणतात..
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात प्रचलित असलेल्या स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळ खेळला जातो.. हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीची प्रतिमा एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात.. हत्ती समृद्धीचा प्रतिक मानला जातो.. तसेच शक्तीचे प्रतिक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.. त्याच्या भोवती फेर धरून छोट्या मुली, शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणतात.. जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुस-या दिवशी दोन, अशा नवव्या दिवशी नऊ अधिक एक अशी खिरापत असते.. फेर धरताना पण एका छोट्या मुलींचा आणि एक मोठ्या मुलींचा असे दोन फेर असतात..
घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ- तांदुळाचा हत्ती मांडून त्याच्या भोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.
व-हाड- खानदेशात साजरा होणारा हा उत्सव भाद्रपदातील पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा असा महिनाभर चालतो..
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भुलजा भुलाबाई यांच्या मातीच्या मूर्ती आणल्या जातात.. भुलाबाई नऊवारी साडी नेसलेली तर भुलजा धोतर नेसलेला व फेटा बांधलेला…
भुलोबा, भुलजा म्हणजे शंकर आणि भुलाबाई म्हणजे पार्वती… भिल्ल रूप घेऊन राहणा-या शंकराला भिल्लीणीचा वेष घेऊन भुलवायला पार्वती आली म्हणून ती भुलाबाई आणि तिला भुलणारा शंकर भुलोबा अशी त्यामागची कथा आहे.. या मूर्तींना पिवळे वस्त्र परिधान करतात.
रोज सायंकाळी जमा होतात आणि भुलाबाईची गाणी गायली जातात. यामध्ये विविध देवतांचे वर्णन असते..
!! पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे
घातिला मंडप खेळ खेळ खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वणी वणी
सअवसानं
अवसनेचं पाणी तसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वैरिला भात
जेविला कंथ लोकीला रांध
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
भुलाबाई झोके अवस्नर फुगे
भाऊ भाऊ केकती माया फुले
झळकती
झळकतीचं एकचं पान दुरून
भुलाबाई नमस्कार.. !!
यापैकी काही गाणी…
!! अक्कण माती चिक्कण माती
अशी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई,
रवा पिठी काढावी
सपिटी दळावी.. !!
*
!! ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे
करिन तुझी सेवा !!
*
!! आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
रामाचा पत्ता कुठं नाही
राम गं वेचितो कळ्या
सीता गं गुंफिते जाळ्या.. !!
☆
या गीतात सीता ही भूमीकन्या असून धर्तीचे रूप मानले जाते तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो..
काही गाणी ऐकताना तर मन उदास होते कारण त्या गीतात महिलांची अपार दुःखे साठवलेली असायची..
असहाय्यतेचे कारुण्य प्रकट झालेले आसायचे.. अबला म्हणून आयुष्य कंठताना वेळोवेळी झालेली कुचंबणा मिळालेली हीन वागणूक स्पष्टपणे त्यात प्रतिबिंबित झालेली असायची.. त्यापैकी एका गीतात सुनेची माहेरची आणि कुटुंबातील सदस्यांची हतबलता दिसून येते…
नुकतेच लग्न होऊन सासरी नांदायला आलेल्या सुनेला माहेरची आठवण होते.. आईच्या आठवणीने तिचा जीव व्याकूळ झालेला असतो आणि तिकडे सुद्धा आईला लेकीची आठवण येऊन ती सुद्धा तिला भेटायला व्याकूळ झालेली असते..
माय लेकीची गाठभेट करून देण्यासाठी तिचे वडील तिला घेण्यासाठी तिच्या सासरी येतात.. आपले वडील आपल्याला घ्यायला आलेले बघून ती आनंदी उल्हासित होते आणि आनंदी उल्हासित झालेली सून हळूच भीत भीत सासूला विचारते..
!! हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनवते तुम्हाला
बावाजी आले घ्यायला
जाऊ का मी माहेरला, माहेराला ?
माहेरी जाण्याची रितसर परवानगी सून मागत आहे हे बघून सासू थोडी भांबावते.. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात.. एक तर शेतीत काम करणारे दोन हात कमी होणार म्हणून ती सूनबाईला म्हणते…
!! कारलीचे बी लावं ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा !!
कारलीच्या बियांची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला पटतो आणि ती लवकर लागवड उरकते आणि पुन्हा विचारते..
!! कारलीचे बी लावले जी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा माहेरा !!
एक वेळ मारून नेता आली आता पुढे काय ? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते ती म्हणते…
!! कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा !!
अशी एक ना अनेक भोंडल्याची गाणी त्या गाण्यामागचा अर्थ गात शेवटी… !! आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला !! याने सांगता होते.. खिरापतीला काय ग अशी विचारणा होऊन एकेक पदार्थांची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते..
शेवट गोड की तिखट अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिच्या घरी भोंडला असायचा तिला अगदी धन्य वाटायचे..
पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे..
© संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे मो. 9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





