मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “घाणेरी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – घाणेरी – ? ☆ श्री सुहास सोहोनी

हो मी घाणेरी, घाणेरी, कुणी हसा वा चिडवा;

नाही करणार कधी, बागेतल्यांचा मी हेवा… 

*
शालू हिरव्या पानांचा, त्याला कातरी किनार;

रंगरुपाने देखणी, बहुगुणी अशी नार… 

*

काया काटेरी तरीही, फळे असती मधूर;

श्रावणातल्या पाण्याचे, मला सुखावती सूर… 

*
चार कौतुकाच्या ओळी, लिहिल्या ना माझ्यावर;

दुर्लक्षिती सारे तरी, नाही घेत मनावर… 

*

कुणी घेईल जवळ, किती वाट मी पाहते;

खंत उरातली माझ्या, कवीमनाला कळते..

*

वईदांड्यातून आता, आले आहे मी बागेत;

कधीतरी मिळेलच, स्थान फुलांना पुजेत… 

*

छान दिसणे असणे, फार फरक दोन्हीत;

दु:ख पचवून सारे, द्यावा आनंद हसत… 

*

ऋतू येतील जातील, खंत कशाला करावी;

जिद्द आणिक उमेद, जगण्याची ना सोडावी… 

*

गूज सांगून मनीचे, झाले मोकळी मोकळी;

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

आता बहरेल पुन्हा, माझी डहाळी डहाळी……

🌹

कवी : मेधानुज

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नारी शक्ती असते भारी 

देई प्रत्‍यय प्रसंगोत्‍पात,

तूच मायेचा असशी झरा 

किमया दाविसी विश्वात!*

होम करुनी अष्टमीला

तुझे स्तवन करती भक्त,

रात जागवुनी सारेजण

खेळती दांडिया मनसोक्त!

*

कधी होऊनि रणचंडीका 

करशी पाडाव दैत्याचा,

येता कोणी शरण तुजला 

उद्धार करशी त्याचा!

*

नऊ दिसाचे नऊ रंग 

शोभून दिसती तनुवरी,

तूच एक जगन्माता

साऱ्या विश्वाची संसारी!

*

अष्टभुजांनी सांभाळशी 

सकल विश्वाचा पसारा,

नमन करुनी आदिमायेस

करू साजरा दशमीला दसरा!

…करू साजरा दशमीला दसरा!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सारेच कर्मयोगी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सारेच कर्मयोगी…? श्री आशिष  बिवलकर ☆

कर्मयोगी पहा | एका चौकटीत |

सर्व समर्पित | समाजासी ||१||

*

बाबा आणि माई | कुष्ठरोगी सेवा |

मानवता ठेवा | जीवनात ||२||

*

प्रकाशाची वाट | होती अवघड |

तिची धडपड | त्याच्या संगे ||३||

*

दिगंत आरती | आणि अनिकेत |

तत्पर सेवेत | वारसाने ||४||

*

हेमलकसात | प्रकल्प उभारी |

लोक बिरादरी | सेवाकार्य ||५||

*

वन्यजीव सेवा | आरोग्य शिक्षण |

कार्य विलक्षण | निस्वार्थाने ||६||

*

साधेपणा हाच | शोभे अलंकार |

नसे अहंकार | आमटेंना ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोकर्णी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गोकर्णी…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त: उद्धव, मात्रा: 2+8+2+2=14)

गोकर्णी मजला भासे

अपराजिताच मनभावन

मधुमास असो फुलणारा

वा रिमझिमणारा श्रावण

*

ही श्वेतांगीही फुलते

पोपटल्या पानी खुलते

वेलींच्या हिंदोळ्यावर

मग मोहरूनही झुलते

*

देवालय माझे सजते

चिंतामणी रंग दिसावा

किरिटावर धारण करुनी

तो कान्हा गोड हसावा

*

सुपली म्हणती हिज कोणी

कोणी गौर्याही म्हणती

नावातच आहे जादू

मज भासते जणू पणती

*

ही वैद्यच आहे घरची

व्याधींवर उपाय करते

विष्णुकांतेस या मीही

मग नेमाने बघ जपते

*

आभास होतसे मजला

फुलपाखरे जणू उडती

वेलींवर इकडे तिकडे

गोकर्णरुपे बागडती

*

ती सखी होवुनी माझी

खिडकीवर माझ्या येते

हितगुज माझ्याशी करता

मी कविता तिजला देते

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मेंदी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मेंदी… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

सांगते मेंदी कानी आज तिची सुरेख कथा गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

शेवाळी हिरवे पावडरचे रूप बालपण सांगते

आठवणीतूनी तिच्या याच माहेरपण डोलते

पाण्यामध्ये मिसळताच सांगे सासरी जाणार आता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

मेंदी सजली हातावरी जशी पोर आली सासरी

लालीमा देत हाताला सूरात नाहली पावरी

सहजता भरली त्यामध्ये जसा हले पापणीचा भाता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

उतरला रंग तरी थोड्या खुणा वार्धक्य हे आले बाई

दुजाचे जीवन खुलवायचे सांगे थकायचे मुळीच नाही

नव्या दमाने येईन अवचित पुसून ही जाता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

*

तीन अवस्था या जरी माझ्या आहेत तुझ्यापरी गं

जगून घे सासरी पोरी रंग जीवनी भरी गं

सार्थकी लागेल जिणे तुझे चटके सोसता सोसता गं

ऐक सखये तू सुद्धा मेंदीची ही गाथा गं||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ध्यास… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ध्यास…? श्री आशिष  बिवलकर ☆

जमीनदोस्त झालं तरी,

जगण्याचा ध्यास आहे |

उखडलं जरी मुळांना

जमिनीशी कास आहे |

*

वादळाने झोपवलं तरी,

उभे राहण्याची जिद्द आहे |

येईल त्या परिस्थितीशी

लढण्याचा निश्चय सिद्ध आहे |

*

कितीही संकटे आली तरी,

झेलण्याची हिम्मत आहे |

ध्येय ठेवून जगण्याला,

जीवनात किंमत आहे |

*

ऋतू चक्राच्या फेऱ्यात,

शिशिरात पानगळ आहे |

नवचैतन्य देणाऱ्या वसंतात,

जगणं उजळ आहे |

*

आघात जरी झाले तरी,

उभं राहण्याचा संयम आहे |

सगळेच दिवस सारखे नसतात,

निसर्गाचा तो नियम आहे |

*

जन्माला आलेलं सारं जरी,

उद्या भविष्यात नश्वर आहे |

सकारात्मक वर्तमानात,

प्रयत्नांती परमेश्वर आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कवडसा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “कवडसा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

या मोकळ्या आभाळाचे

शब्द तुझ्या ध्यानी आहे..!

*

या नभातल्या चांदण्याचे

तेज तुझ्या नयनी आहे!

*

या क्षणाच्या आनंदाचे

उमज तुझ्या मनी आहे

*

अंतर मनातील लाटांचे

बोध तुझ्या हृदयी आहे !

*

स्नेह-दर्पणाचा कवडसा

जर तुला प्रकाशित आहे ?

*

मग हर्ष-शोक हिंदोळ्याचे

गुपित तुला कळले आहे.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तयात वेगळाल्या छटा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तयात वेगळाल्या छटा… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मुळे यांची जमिनीखाली

जमिनीच्या वरती वाढ

वेगवेगळे पान आकार

वेगळे असे प्रत्येक झाड

*

फुलरंग पिवळेच तरी

तयात वेगळाल्या छटा

आकार फुलांचे वेगळे

मनमोहक गंधांच्या लाटा

*

वंश एक जातही एकच

एक सर्वांची गंध कुळी

एकतरी जवळी असावा

सकाळ असो वा सायंकाळी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोल ना गं अबोली… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बोल ना गं अबोली…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

बोल ना ग अबोली माझ्याशी जरा

नाजूक साजूक तुझा नखरा

*

नवरीसाठी तुझा खास गजरा

माहेरचा मान तुला आहेच खरा

*

चार रंगाची चांदणी खुळी

मऊ मुलायम तुझी पाकळी

*

गुलाबी हिरवी अबोली पिवळी

वाऱ्यावर डुलते सोनसळी

*

नाव तुला शोभते फटाक्याचे फुल

कदंबे विणताना मना पडे भूल

*

कागड्याची फुले मोगऱ्याच्या संगे

दुरंगी विणताना अबोली रंगे

*

परसात तुझे ताटवे फुलती

वैद्याचे गुण अंगी केवढी महती

*

बालपण हसले तारुण्य रुजले

तुझ्या संगती जीवन सजले

*

शब्द आज माझे झाले दिवाणे

अबोलीसाठी हे काव्य नजराणे

*

कविता सजली पानात रुजली

कुंतल सजवून ती कुजबुजली

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पूर्वज… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पूर्वज… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

गणेश विसर्जन झाले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पंधरा दिवस पूर्वजांच्या नावाने

पिंड घालणे, चांगले चुंगले खाणे

कावळ्यांना महत्व देणे

वर्षभर का मग दुर्लक्षिलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पूर्वज होते तेव्हा केली का हो सेवा

उलट पदोपदी प्रार्थना लवकर सोडव रे देवा

कावळ्यांना तरी कधी देता का मेवा

नकोत त्यांना भाव नुसते दाखवलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

आता तरी ऐका  म्हणणे त्यांचे

हेच पंधरा दिवस पुन्हा सान्निध्याचे

माना की हे दिवस पण पुण्याईचे आशीर्वादाचे

अशुभ का समजता या पंधरवड्यातले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares