सुश्री वीणा रारावीकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ हॅल्युसिनेशन्स – लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर ☆ परिचय –  सुश्री वीणा रारावीकर ☆

पुस्तक : हॅल्युसिनेशन्स 

लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर

प्रकाशक – सुनिधी पब्लिशर्स, पुणे

पृष्ठ संख्या – १८८

मूल्य – ३०० रुपये

सध्याच्या काळात अनेक लोक आपला बहुतांशी वेळ आभासी दुनियेत घालवत असतात. कधी कधी त्यांना तेच जग खरे आहे असा भास होऊ लागतो. भास-आभासाच्या या खेळाचा माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभव घेत असतो. या आभासाचा अतिरेक होतो तेव्हा त्याला हॅल्युसिनेशन्स होऊ लागते. त्यामुळे हॅल्युसिनेशन्स हे पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठ बघून सुरवातीला या गूढ कथा आहेत असा मनात संभ्रम निर्माण होतो. लेखक डॉ. पद्माकर केसकर यांनी या भासाला छेद दिला आहे. हॅल्युसिनेशन्स हा बारा लघुकथांचा संग्रह आहे. या अभ्यासपूर्ण कथा आहेत. वैज्ञानिक, भावनिक, जीवनस्पर्शी अशा या कथा आहेत.

हॅल्युसिनेशन्स, लेखकाच्या पहिल्या कथेत पुढच्या काही कथांचा संदर्भ येतो. आणि यातून त्या कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.

माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला तरीही तो पहिला येऊ शकत नाही. हेच सत्य द सेकंड बेस्ट या कथेतून अधोरेखीत केले आहे. मेंदूला पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, याचा मागोवा त्यांनी एका श्वासाचे अंतर यात घेतला आहे.

एखाद्या अति श्रीमंत माणसाशी त्याच्या ईस्टेटीसाठी लग्न करायचे आणि नंतर त्याचा काटा काढायचा. हे कथेचे बीज जुनेपुराणेच. पण तो काटा काढताना कोणते तंत्र वापरायचे, हा एक प्रश्न. लेखकाने गोबेल या कथेत हिटलरच्या साथीदाराने शोधून काढलेल्या, युद्ध काळात वापरल्या जाणर्‍या तंत्राचा उपयोग अप्रतिमरित्या केला आहे.

लेखक वैद्यकीय व्यवसायात आहेत. हॉस्पिटल मधील वातावरण, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या भाव-भावना यांच्याशी लेखकाचा जवळून परिचय आहे. एखादा रुग्ण अगदी काही तासाचा सोबती असेल तर डॉक्टर कसे वागतील आणि त्याचबरोबर रुग्णाच्या जवळचे नातेवाईक कसे वागतात, याचा अनुभव त्यांनी सहजपणे रेखाटला आहे. याचा प्रत्यय बिंब-प्रतिबिंब या कथेत येतो.

तर त्यांच्याच व्यवसायातील धोका त्यांनी संडे इव्हिनिंग या कथेत अतिशय भावुकपणे मांडला आहे.

यातील बहुतांशी कथा मानवी जीवन – मृत्यू मधील संघर्ष संबंधीत आहेत. तरीही प्रत्येक कथेत एक वेगळा विचार आहे. एक कथा राजकीय तर एक मानवी स्वप्नांवर. तर भास- आभासाच्या या खेळात शेवटची पाहुणा पाऊस ही कथा एक वेगळीच वळण घेते आणि मनाला हुरहूर लावते.

लघुकथा अर्थात प्रत्येक कथा साधारणपणे १२ ते १५ पानांची आहे. त्यामुळे एकावेळी एक कथा सहजपणे वाचून होते आणि संपूर्ण पुस्तक वाचून कधी संपते हे समजत नाही. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे. सर्व कथा प्रथमपुरुषी एकवचनात लिहिल्या आहेत, हे विशेष. तसेच या कथांमध्ये केलेले ग्रीष्म ऋतुमधील उन्हाळ्याचे, शिशिरातील पानगळीचे अथवा न थंडीतील धुक्याचे वर्णन यामुळे अतिशय योग्य वातावरण निर्मिती होते.

या पुस्तकातील काही कथा लेखकाने त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून म्हणजे साधारण ९० च्या दशकात लिहिलेल्या आहेत. वेगाने बदलत जाणार्‍या तंत्रज्ञानाने माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. तरी पण आजही या कथा वाचताना तितक्याच ताज्या – टवटवीत, नवीन वाटतात. यातील काही पारितोषक विजेत्या कथा आहेत.

एक मनस्वी कलाकार, लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तर डॉ. अच्युत गोडबोले आणि निरंजन घाटे यांनी त्याची पाठराखण केली आहे. यातील रेखाचित्रे अतिशय समर्पक आणि कथेला उठाव आणणारी आहेत.

तरुणांपासून जेष्ठ लोकांपर्यंत सर्व वाचकांना खिळवून ठेवेल अशा या कथा आहेत. सुनिधी पब्लिशर्सने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल, यात शंका नाही.

परिचय : वीणा रारावीकर

दक्षिण मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Dr Padmanabh Keskar
0

धन्यवाद ! .. खूप छान परीक्षण केले आहे!!
… हातात पुस्तक घेऊन पाने उलटत त्यामधील साहित्याचा आस्वाद घेणे .. याचा आनंद स्क्रीनवर स्क्रोल करून वाचण्यापेक्षा खूप वेगळा असतो… दोन्हीकडे मजकूर तोच असतो पण पुस्तकांमध्ये स्पर्शाचे नाते दडलेले असते. हे स्पर्शाचे नाते जिवंत ठेवण्यासाठी आणि वाचन संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी पुस्तके विकत घेऊन वाचा आणि भेट देण्यासाठी पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तकांचा पर्याय स्वीकारा.

डॉ. पद्मनाभ केसकर ( 9762258650 )

नीलिमा नरवणे
0

खूप सुंदर परिक्षण.