श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘चक्र – –’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
एक दिवस माणसाला चक्राचा शोध लागला अन् क्षणात तोच चक्रावला!
.. फिरू लागली त्याच्या मनात चक्रे
.. आली गती जीवनाला.
कालचक्र फिरतच होतं अविरत, अव्याहत.
बघता बघता सगळीच चक्रं फिरू लागली गरगरा…. भावनांची, वासनांची, अकांक्षांची, अहंकारांची.
उडू लागली चक्रावर्तं आसमंतात.
.. कोणालाच कळलं नाही या चक्रांनी किती गती घेतली ते!
एक चक्र पोटात घेऊन भूमीने केला प्रयत्न वेग थांबवण्याचा… पण व्यर्थ!
हाती घेऊन सुदर्शन ‘त्याने’ही केला यत्न… पण नाही…
चक्रे फिरायची थांबली नाहीत.
अनेक शतकांच्या आवर्तनानंतर…. एक सम्राटही धावला आपलं ‘अशोकचक्र’ घेऊन….
“अरे, जरा शांत रहा” सांगत… पण त्याला दाद कोण देतो!
काही चक्रं वेशीवर येऊन थांबलेली..
शक- हूण-कुशाणांची परचक्रेदस्यूं, दानवांची परचक्रे, यवनांची, म्लेंछांची परचक्रे, ताम्रमुखींची, हबश्यांची परचक्रे..
आणि ही अजून काही दुष्टचक्रे…
दारिद्र्य-अज्ञान.. वर्षा-अतिवर्षा-अवर्षण.. हत्या-आत्महत्या.. पोषण-शोषण
…. यातच फसलाय, पुरता अडकलाय बिचारा!
दिवसामागून दिवस…
वर्षामागून वर्षं…
शतकामागून शतकं…
युगामागून युगं…
फिरतायत, भोवळतायत!
भूमीने गिळलेलं चक्र पुन्हा वर काढून… तिच्या नाकावर टिच्चून… अहंकाराचे फूत्कार हवेत सोडीत
तो धावूच लागला… वेग, वेग, प्रचंड वेग! शतयोजने निमिषात लंघीत तो धावूच लागला.
…. त्याची मजल काही पळात चंद्र-सूर्य गिळण्याची… अग्निरथाच्या साथीला यंत्रांची दातेरी, काटेरी चक्रं…
मग काय विचारता…
वेग… प्रवेग… आवेग!
माणसाचा एक हात घड्याळाच्या तबकडीवर… दुसरा लोकलच्या दांडीवर.
सगळ्यांच्या पायाला भिंग-या बांधलेल्या… पळतायत, धावतायत, धडपडतायत बापडी!
पण काही मर्यादा? काही स्थिरता? …. नाहीच!
– – गतीच्या वेडानं तो भ्रमिष्ट झालाय… हे गतीचे हे दुष्टचक्र असंच फिरायचं!
वाटतं, एक दिवस…
या विश्वाच्या रथाचं हे विराट गतिचक्र… समतोल ढळून गळून पडणार… काळाच्या अतूट उतरणीवरून…
घरंगळत कुठतरी जाऊन आदळणार… कानठळ्या बसवणारा ध्वनी… आणि त्या चक्राचे अनंत खंड…
धडाडत खाली कोसळणार…..
मग शेषही नाही साहू शकणार तो आघात… ताठ मानेने!
नंतर मात्र शांतता, स्थिरता, निश्चलता…
…. महाप्रलयानंतरची!
त्यावेळी कोवळ्या पिंपळपानावर… असेल “तो” पहुडलेला… आपल्या इवल्या नाजुक बालपावलांचा…
अंगठा चोखीत…
…. अन् विश्वाच्या पुनर्निमितीची… चक्रं फिरवीत!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




