श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “पाच देहांमध्ये जगणारी कनिष्का” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कनिष्का गौड
जोधपूर येथे जन्मलेल्या या कनिष्का गौड नावाच्या कन्येचा हा गोड चेहरा पुढे जाऊन लष्करी गणवेशातल्या करारी, सेवाभावी, देशप्रेमी महिला अधिका-याच्या रुपात आपल्याला बघायला मिळाला असता… राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. खडकवासला) मध्ये प्रवेश मिळवायची जिद्द तिने मनाशी बाळगली होती… आणि तिची तयारीही जोरात सुरु होती. पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी… १२ नोव्हेंबरला ती एका अपघातात हे जग सोडून निघून गेली.
पण तिच्या देहातील अवयव अजून चैतन्य जागवीत जिवंत राहिले होते. आपली लाडकी लेक अशी अवेळी निघून गेल्याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतानाही कनिष्काच्या आई-वडिलांनी, श्री. अशोक आणि सौ. संगीता यांनी, तिला आणखी काही देहांत जिवंत पाहण्याचा निश्चय केला. आज पाच देहांमध्ये कनिष्का श्वास घेते आहे… एका रुग्णाला तिचे यकृत, दोन रुग्णांना तिचे एक एक मूत्रपिंड, दोन अंधांना तिचे एक एक नेत्रपटल दान दिले गेले. जयपूरच्या ए. आय. एम. एस. रुग्णालयात हे अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले. कनिष्काचे मूत्रपिंड पोहोचवण्यासाठी विशेष वेगवान रस्ता मार्गिका राखून ठेवत जोधपूर ते जयपूर हे सुमारे साडे पाच तासांचा प्रवास असलेला, साडे तीनेशे किलोमीटर्सचे अंतर असलेला टप्पा सलग पार करण्यात आला!
सैनिक अधिकारी होऊ पाहणा-या कनिष्काची ही मृत्यूनंतरची देशसेवा परमेश्वरचरणी निश्चित रुजू झाली आहे! भावपूर्ण नमन, कनिष्का!
देहदान, अवयवदान ही काळाची गरज आहेच… आणि प्रक्रियाही सोपी आहे. देहदानात तर देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी उपयोग करून झाल्यावर त्या देहावर अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात!
केवळ नेत्रदान करावयाचे झाल्यास, संपूर्ण डोळा नव्हे तर केवळ नेत्रपटल काढून घेतले जाते. शरीराची कोणत्याही प्रकारे विटंबना होत नाही, केली जात नाही. श्रीलंका हा छोटा देश दरवर्षी किमान एक लाख नेत्रपटले निर्यात करतो… हे ध्यानात घेण्यासारखे आहे. असो.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







