सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणींचे पक्षी☆ सुश्री शीला पतकी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात त्या वेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ, तारकेश्वरी सिन्हा यांना घेऊन आले होते.. काकासाहेब गाडगीळ यांना मी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासूनच ओळखत होतो.. मुंबई प्रांताचे स्पीकर भाऊसाहेब फिरोदिया व काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते मी संपादीत केलेल्या प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या व्यासपीठावर या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगरला त्या वेळी (१९६६/६७) केले होते.. पुण्यात यावेळी मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक होतो.. काकासाहेब यांनी मला जवळ बोलावून तारकेश्वरी सिन्हा यांची ओळख करून दिली होती.. आपल्या उर्दू शेरशायरीयुक्त भाषणांसाठी आणि धारदार वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या तारकेश्वरी सिन्हा यांचे नाव मला माहीत होते.. संसदेतील आपल्या स्पष्ट मतांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. राम मनोहर लोहियांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे वादविवाद होत असत.. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर, त्यांनी इंदिरा गांधींना सोडून मोरारजी देसाई आणि के. कामराज यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्या इंदिरा गांधींच्या कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. तथापि, हे देखील उल्लेखनीय होते की जोपर्यंत त्या राजकारणात सक्रिय होत्या, तोपर्यंत इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले—अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्येही. मी तारकेश्वरी यांना किर्लोस्कर साठी मुलाखत देण्याची विनंती करीत असतानाचे हे छायाचित्र आहे.. कैक वर्षानंतर हा फोटो मला सापडला.. व तो प्रसंग मनात तरळून गेला… आठवणींचे पक्षी. ,. ” 

– प्रा. जवाहर मुथा

– – तारकेश्वरी सिन्हा यांच्याबद्दलची वरची पोस्ट आज वाचली. मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि तेव्हा माहितीचे स्त्रोत पण नव्हते मी नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ लागले होते तेव्हा त्या सोलापुरात आल्या होत्या. त्या इंदिरा गांधीच्या विरोधक आणि माजी पंतप्रधान माननीय मुरारजी भाई देसाई यांच्या पक्षातल्या.. म्हणजे काँग्रेस एस आणि काँग्रेस आय. तेव्हा त्यांचे भाषण पार्क मैदान वर झाले.

काँग्रेसचे विभाजन झाले होते, त्या एस पक्षातल्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती म्हणजे पार्क मैदान भरले होते त्यापूर्वी कार्यकर्त्यांसाठी जनरल लायब्ररीच्या वरच्या हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले. त्या दोन्ही कार्यक्रमाला मी होते. मुख्य म्हणजे संपूर्ण दिवसभर मी तारकेश्वरी सिन्हा बरोबर होते जनरल खूप गप्पा झाल्या. आता माझ्या एवढ्या मुलीशी ती एवढी मोठी विदुषी काय गप्पा मारणार ना? … टिळक स्मारक मधला कार्यक्रम संपून आम्ही पार्क मैदान वर गेलो पार्क मैदान वर वॉशरूमची सोय नाही त्या म्हणाल्या काय करायचे मी म्हणलं काहीतरी सोय करू त्या तिथे संपूर्ण पार्क मैदान च्या बागेची सोय पाहणारे माझ्या वडिलांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक राजमाने राहत होते म्हणजे ए बी राजमानांचे वडील त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि काकांना मी अडचण सांगितली. त्यांच्या घरात छोटे बाथरूम होते ते सगळे बाहेर आले तेव्हात्या वाॅशरूम मध्ये फ्रेश झाल्या. काकांनी त्यांना चहा घ्यायला विनंती केली त्या पाच मिनिटे थांबून पाणी पिऊन त्यांच्या घरातून बाहेर पडल्या राजमान्यांचे घर अत्यंत नेटके आणि स्वच्छ होते त्याचे जाताना कौतुक करायला त्या विसरल्या नाही काकूंचा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या घराचे कौतुक केले होते. त्यांचे पार्क मैदान वर भाषण झाले मी बऱ्याच व्यवस्थेत होते, त्यामुळे मला भाषण सलग ऐकता आले नाही आणि काही कळतही नव्हते. राजकारणातले फारसे ठाऊक नाही. पण त्यांचे वक्तृत्व अप्रतिम होते हे कानावर पडणारे शब्दावरून जाणवत होते.

– – आज मी प्राध्यापक मुथा यांचा लेख वाचला आणि मला जाणवले… इतक्या वर्षांनी.. कि आपण केवढ्या मोठे व्यक्ती बरोबर होतो दिवसभर…! पण आपल्याला काही घेता आले नाही कारण ती व्यक्ती किती मोठी आहे याची जाणीवच नव्हती. त्या इंदिरा गांधींच्या प्रखर टीकाकार होत्या. सोलापुरात एस काँग्रेसचे कार्य आदरणीय डॉक्टर अंत्रोळीकर हे करत होते ते आमच्या वडिलांचे गुरु. त्यानी मला सांगितले होते की तारकेश्वरी सिन्हा यांच्याबरोबर तू दिवसभर राहायचे. आज मला त्याची हळहळ वाटते. केवढ्या मोठ्या बाई माझ्याबरोबर होत्या आणि मी त्यांचा काहीच लाभ घेतला नाही हे आज आत्ता जाणवलं – – – – – आयुष्यात कुठल्या गोष्टीचा कधी पत्ता लागेल काही सांगता येत नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments